Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

पश्चिम विदर्भात दमदार पाऊस
वाशीम, १३ जुलै / वार्ताहर

विदर्भातील अकोला, बुलढाणा. अमरावती जिल्ह्य़ासह वाशीम शहरात सोमवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. या पावसाने खरीप पिकांना दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्य़ात यावर्षी सद्यस्थितीत मागील वर्षीच्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. हा पाऊस पिकांच्या वाढीसाठी पोषक असला तरी जिल्ह्य़ातील धरणे, सिंचन तलाव, गावतळी, विहिरी भरण्यासाठी पुरेसा नसल्याने जिल्ह्य़ाच्या काही भागात अद्यापही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे.

पथदर्शी पीक विमा योजनेतून ५८ तालुके वगळले
चुकीच्या निकषाचा फटका
सोमनाथ सावळे, बुलढाणा, १३ जुलै

विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती व वर्धा या सहा आत्महत्याग्रस्त जिल्ह्य़ांसाठी राज्य शासनाने हवामान आधारित पथदर्शी पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय घेतला मात्र, शासनाच्याच चुकीच्या निकषामुळे या सहा जिल्ह्य़ांमधील कापूस उत्पादक पट्टय़ातील ६४ तालुक्यांपैकी केवळ ६ तालुक्यांतीलच शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभासाठी पात्र ठरवण्यात आले आहे. उर्वरित ५८ तालुक्यांना या योजनेपासून वंचित ठेवण्यात आले आहे.

‘बार काऊन्सिल’ निरीक्षण समितीची शांताराम पोटदुखे विधि महाविद्यालयास भेट
चंद्रपूर, १३ जुलै / प्रतिनिधी

बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या निरीक्षण समितीचे सदस्य अॅड. देवेंद्र कुमार शर्मा, अॅड. हेमंत कुमार पटेल व अॅड. फैजल रिझवी या चमुने शांताराम पोटदुखे विधि महाविद्यालयाचे संलग्नीकरण विस्तारित करण्यासाठी भेट दिली. या भेटी दरम्यान महाविद्यालयातील सर्व कागदपत्रे, साधन संपत्ती व शैक्षणिक सुविधांचे निरीक्षण केल्यानंतर विधि महाविद्यालयाच्या दिवसेंदिवस होत असलेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.

महाराष्ट्रात समाजवादी पक्ष स्वबळावर लढणार -अबु आझमी
अकोला, १३ जुलै / प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकांसाठी समाजवादी पक्षाने स्बळावर मोठय़ा संख्येने उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली. समाजवादी पक्षाच्या कार्यक्रमासाठी अबु आझमी अकोल्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी कॉंग्रेस सरकारवर टीका केली. ते म्हणाले, महागाई, भारनियमन, पाणी टंचाई हे प्रश्न सोडविण्यात कॉंग्रेस अपयशी ठरली आहे.

चिमूर मतदारसंघात तीन वर्षात ७५ टक्के शेतजमिनीला बारमाही पाणी -वडेट्टीवार
चंद्रपूर, १३ जुलै/प्रतिनिधी

सिंचनाच्या बाबतीत राज्यात सर्वात प्रगत समजल्या जाणाऱ्या बारामतीमध्ये ६५ टक्के जमीन सिंचनाखाली आहे. या उद्दिष्टाच्या वर जात चिमूर मतदारसंघात येत्या तीन वर्षात ७५ टक्के शेतजमिनीला बारमाही पाणी मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज चिमूर तालुक्यात आमडी येथे सांगितले. लालनाला उपसा सिंचन प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. गोसीखुर्द तसेच लालनाला प्रकल्पातील विविध योजनांचे भूमिपूजन आज दुपारी वडेट्टीवार यांच्या हस्ते पार पडले.

खावटी कर्ज योजनेत निकृष्ट गव्हाचे वाटप
धारणी, १३ जुलै / वार्ताहर

खावटी कर्ज योजनेंतर्गत मेळघाटातील ११ हजार ५०० लाभार्थीना रेशनचा सडलेला गहू वितरित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आदिवासी विकास मंत्रालयाने मुंबई येथील राष्ट्रीय उपभोक्ता संघाला १६०० प्रती क्िंवटलप्रमाणे खावटी कर्ज योजनेत गहू वाटपाचे कंत्राट दिलेले आहे. मात्र, या संघाने उच्च दर्जाचा गहू खरेदी न करता मेळघाटातील व्यापाऱ्यांनी साठवून ठेवलेला निकृष्ट गहू खरेदी करून आदिवासींना त्याचे वाटप सुरू केल्याची तक्रार आहे. स्थलांतरित आदिवासींना रेशनचा गहू मिळत नाही. हा हजारो क्विंटल गहू रेशन दुकानदारांकडे पडून असतो.

रानडुकरांच्या हल्ल्यात चार जखमी
वाशीम, १३ जुलै / वार्ताहर

मालेगाव तालुक्यातील दुधाळा व ब्राह्मणवाडा येथे रविवारी रानडुकराने केलेल्या हल्ल्यात चार जण जखमी झाले. मागील एक महिन्यापासून जिल्ह्य़ात सर्वत्र रानडुकरांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. दुधाळा येथील कासा सुदामा पुंडगे (५०), विठ्ठल पुंजाजी काळे (३०) आणि गणेश कवडूजी इंगोले (२८) हे रविवारी शेतात काम करीत असताना अचानक रानडुकरांच्या कळपाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कासा पुंडगे जबर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. विठ्ठल काळे व गणेश इंगोले यांच्यावर शिरपूर (जैन) येथील प्रश्नथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. ब्राह्मणवाडा येथील माणिक उत्तम घुगे यांच्यावर रानडुकराने हल्ला केल्याने ते जबर जखमी झाले. जिल्ह्य़ाच्या विविध भागात रानडुकरांचा हैदोस वाढल्याने, शेतकरी व शेतमजुरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्य़ात सर्वत्र रानडुक्कर आणि हरणांचे कळप मोठय़ा प्रमाणात आहेत. या वन्यप्रश्नण्यांच्या हैदोसामुळे शेतकरी त्रस्त झाले असून खरिपाच्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. वनविभागाने या संदर्भात त्वरित उपाययोजना करून वन्यप्रश्नण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी व शेतमजुरांनी केली आहे.

माळवंडीत पपईची साडेचारशे झाडे कापली
बुलढाणा, १३ जुलै / प्रतिनिधी
रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन एका माथेफिरूने शेतकऱ्याच्या शेतातील ४५० पपईची झाडे कापल्याची घटना माळवंडी येथे सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी रायपूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अशोक रामराव चव्हाण यांनी शेतीमध्ये पपईच्या १ हजार झाडांची लागवड केली होती. भीषण पाणीटंचाईचा सामना करीत पाणी देऊन पपईच्या वाढीसाठी त्यांनी प्रयत्न केले. झाडांची वाढ पाच फुटापर्यंत होऊन बहुतांश झाडांना फळेसुद्धा लागली होती पण, माथेफिरूने एक हजार झाडांपैकी तब्बल ४५० झाडे विळ्याच्या साह्य़ाने कापून टाकली. सकाळी पपईची झाडे कापल्याचे अशोक चव्हाण यांच्या निदर्शनास आले. हा प्रकार पाहून त्यांना मोठा धक्का बसला. यावेळी चव्हाण यांनी शेताची पाहणी केली असता झाडे कापणाऱ्याचा भगव्या रंगाची किनार असलेला रूमाल आढळून आला.या घटनेत चव्हाण यांचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ऐन पेरणीच्या दिवसात नुकसान झाल्यामुळे या शेतकऱ्यावर आíथक संकट कोसळले आहे. समाजकंटकाने त्यांच्या शेतातील नुकसान केल्यामुळे गावात नाराजी व्यक्त होत आहे. याप्रकरणी चव्हाण यांनी रायपूर पोलिसांकडे तक्रार केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दुर्गापुरातील रेशन दुकानाचा परवाना रद्द करण्याची मागणी
चंद्रपूर, १३ जुलै / प्रतिनिधी

दुर्गापूर येथील एका स्वस्त धान्य दुकानातून अवैध धान्याची विक्री करण्याकरिता नेत असताना पोलिसांनी छापा टाकला. यात दुकानातील तसेच गोदामातील एकूण ५६ पोते तांदूळ व गहू जप्त करण्यात आले. हे दुकान जितेंद्र ईश्वरलाल सरबरे(४०)यांच्या मालकीचे आहे. मागील काही दिवसांपासून या स्वस्त धान्य दुकानातून जादा भावाने धान्याची विक्री होत होती. जादा भावाने विक्रीकरिता एमएच ३४ - एम ४७९ क्रमांकाच्या वाहनाने ३० पोते तांदूळ व २६ पोते गहू नेत असताना दुर्गापूर पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला व चालक मधुकर वेरूरकर याला अटक केली. दुकानामागील गोदामातही धाड टाकून सदर धान्य जप्त करण्यात आले. या स्वस्त धान्य दुकानदारावर कारवाई करून त्याचा परवाना रद्द करावा, अशी मागणी दुर्गापूरवासीयांच्यावतीने करण्यात आली आहे.

बचतगट उत्पादित मालाला बाजारपेठ मिळवून देणार -दत्ता मेघे
शेंदूरजनाघाट, १३ जुलै / वार्ताहर
महिला बचत गटांनी निर्माण केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन खासदार दत्ता मेघे यांनी येथे दिले. सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेंतर्गत अहल्यादेवी समाज विकास समितीच्यावतीने आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते.या प्रसंगी ‘झेप’ या स्मरणिकेचे प्रकाशन व रोगनिदान शिबिराचे उद्घाटनही पार पडले. बचत गटांना ४ टक्के व्याजाने कर्ज मिळाले पाहिजे. त्यांना रोजगार प्रश्नप्त झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मेघे म्हणाले. आमदार हर्षवर्धन देशमुख यांनी रोगनिदान शिबिराचे उद्घाटन केले. या कार्यक्रमामध्ये खासदार दत्ता मेघे, नगराध्यक्ष सुरेंद्र आडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रकल्प अधिकारी विलास आठवले यांनी केले, तर जना अकर्ते यांनी प्रश्नस्ताविक केले. यावेळी नीता पोटे, जया श्रीखंडे यांनी विचार व्यक्त केले. आभार रेखा सावरकर यांनी मानले. व्यासपीठावर आमदार वीरेंद्र जगताप, नरेशचंद्र ठाकरे, सुधाकर गणगणे, मुख्याधिकारी राठी उपस्थित होते. रोगनिदान शिबिरामध्ये ३५५ रुग्णांची तपासणी करण्यात येऊन २२२ लाभार्थींना चष्मे वाटप करण्यात आले.

मूर्तीजापूर तालुक्यातील अपंग अंत्योदय योजनेपासून वंचित
मूर्तीजापूर, १३ जुलै / वार्ताहर
तालुक्यातील हजारो अपंगांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळत नसल्याचा आरोप भाजपच्या अनुसूचित जाती-जमातीच्या तालुका आघाडीने केला आहे.अपंग लाभार्थ्यांना उपविभागीय कार्यालयावर मोर्चा नेऊन योजनेंतर्गत शिधापत्रिकांची मागणी केली. अनुसूचित जाती-जमाती आघाडीचे शहर अध्यक्ष हरीश पिंपळे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो अपंगांनी मूर्तीजापूरचे उपविभागीय अधिकारी रमेश घेवंदे यांना या संदर्भात एक निवेदनही सादर केले, तर खासदार संजय धोत्रे व अकोला जिल्हाधिकारी यांच्याकडेही याबाबत तक्रार करण्यात आली आहे.मूर्तीजापूर तालुक्यात अपंग बांधवांची संख्या हजारोंनी असून त्यापैकी थोडय़ानाच अंत्योदय योजनांचा लाभ मिळत असल्याच्या अपंगांच्या तक्रारी आहेत. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. अशा स्थितीत सर्वच अपंगाना अंत्योदय व बी.पी.एल. शिधापत्रिकांचा तातडीने लाभ द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी भाजप कार्यकर्ते शिरीष गांधी, नीलेश हांडे, ज्ञानेश्वर गढवाले, अरुण घाईत, दत्तात्रेय बरडे, अभय पांडे, कमलाकर गावंडे, अशोक तीखूर, राजू मिलांदे, श्याम काकडे, सतीश सारडा, नंदकिशोर मोरे, प्रशांत अग्रवाल आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचा विभागीय मेळावा शुक्रवारी
अकोला, १३ जुलै / प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विदर्भ विभागीय शिबीर शुक्रवारी १७ जुलै रोजी येथील मराठा मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष आर.आर. पाटील, जलसंपदा मंत्री अजित पवार, गोविंदराव आदिक या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विभागीय मेळावा अकोल्यात आयेाजित करण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष आर.आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, पक्षाचे सरचिटणीस गोविंदराव आदिक, अजित पवार या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. माजी प्रदेशाध्यक्ष अरुण गुजराथी, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, विजयकुमार गावीत, मनोहर जोशी, राजेंद्र शिंगणे, विमल मुंदडा या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. यावेळी आमदार सुभाष ठाकरे, तुकाराम बिरकड, सुलभा खोडके, सुरेखा ठाकरे, लक्ष्मण डोबळे, वसंत धोत्रे, निखेलेश दिवेकर उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला राकाँच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महानगराध्यक्ष युसुफअली, जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे यांनी केले आहे.