Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

विशेष लेख

भूमिका जगणारा
ज्याच्याबरोबर काम करायला हवे, असे वाटायला लावणारा पहिलाच संपूर्ण अभिनेता मी पाहिला, तो निळू फुले! रंगभूमीवर उभे राहिल्यानंतर एक क्षणभरही आपल्या भूमिकेतून बाहेर न जाणारा आणि खऱ्या अर्थाने भूमिका जगणारा असा तो कलावंत होता. त्यांच्यासारखा सहकारी कलावंत मिळणे भाग्याचे असते आणि ते भाग्य माझ्या वाटय़ाला आले. मी आफ्रिकेतून १९६८ च्या सुमाराला परत आलो तेव्हा यापुढे डॉक्टरी करायची नाही आणि केवळ रंगभूमीवर काम करायचे, असे ठरवूनच. त्यावेळी मला सांगण्यात आले, की तुम्ही एका माणसापासून जपा. तो म्हणजे निळू फुले. अर्थात मला कोणाशी स्पर्धा करायची नव्हती, पण हे निळू फुले काय प्रकरण आहे, ते पाहण्याची उत्सुकता लागून राहिली. त्यांचे त्यावेळचे ‘कथा

 

अकलेच्या कांद्याची’ हे नाटक मी पाहिले. त्यात त्यांच्या तीन-चार भूमिका होत्या. एकाच नाटकात वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांनी केलेल्या भूमिका पाहिल्या आणि मी थक्क होऊन गेलो. प्रत्येक भूमिकेची लकब वेगवेगळी होती. त्यात तपकीर ओढणारे एक पात्र होते. त्याचे काम करताना निळूभाऊ संवादात आडकाठी न आणताही इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने तपकीर ओढत असत, की त्याला तपकिरीचे व्यसन आहे, हे सांगायची गरज लागत नसे.
भूमिका साकारताना निळूभाऊ त्या पात्राशी एकरूप होत. नटाने भूमिका जगत असल्याचा भास केला पाहिजे, असे मी कायम म्हणतो. त्याच पद्धतीने ते भूमिका जगत असत. त्यांचा अभिनय पाहून बऱ्याच लोकांच्या डोक्यात असा विचार गेला, की फुले आणि लागू एकत्र आले तर ते रंगभूमीवर दंगा करतील. मात्र रंगभूमीवर आम्ही तशा अर्थाने त्यावेळी एकत्र आलो नाही, तरी पुढे चित्रपटांमध्ये आलो आणि अलीकडे म्हणता येईल, अशा काळात ‘लग्नाची बेडी’ या नाटकात आम्ही एकत्र काम केले. सामाजिक कृतज्ञता निधीसाठी मोठय़ा अभिनेते-अभिनेत्रींचा समावेश असलेले असे ‘लग्नाची बेडी’ नाटक बसविण्यात आले होते. त्यात मी, फुले, तनुजा यांचा समावेश होता. त्यात त्यांना गोकर्णाचे काम दिले होते. त्यावर ते म्हणाले, ‘या ब्राह्मण गोकर्णाची भूमिका मला काय जमणार?’ पण आम्ही आग्रह केला आणि त्यांनी रंगभूमीवर काय धुमाकूळ घातला होता.
‘सखाराम बाइंडर’ या नाटकातील सखारामाच्या भूमिकेसाठी प्रथम निर्माते माझ्याकडे आले होते. मी त्यांना सांगितले, ‘सखाराम करणे हे माझे काम नाही. तो निळूभाऊ तिथे बसलाय, त्याचे ते काम आहे. तुम्ही ते त्याला द्यायला हवे.’ त्यानंतर ते काम निळूभाऊंना देण्यात आले. त्यांचे नाटक पाहायला मी गेलो तेव्हा पहिल्या प्रसंगात मला असे वाटून गेले, की आपली सूचना चुकली की काय! पण त्यानंतर त्यांनी जे काम केले त्याला तोड नाही. कमीतकमी भावाभिनय, हालचाली ते करीत. ते केवळ भुवया चढवायचे आणि बोलायचे. सखारामचे काम निळूभाऊंनी जसे केले तसे कोणीच करू शकणार नाही. मात्र ‘सूर्यास्त’ या नाटकातील भूमिका वेगळ्याच पठडीची असल्याने त्यांना काम करण्याचा त्रास होतो आहे, हे जाणवत होते. असे असले तरी ती एकच भूमिका अपवाद होती. इतर सर्व भूमिका पाहताना संपूर्णपणे निर्दोष असे काम पाहात असल्याची जाणीव होत असे. त्यांची काम करण्याची क्षमता जबरदस्त होती. बऱ्याचदा नटाचे भूमिकेचे संवाद पाठ झाले, त्या कामामध्ये तो शिरला, की त्यातून लक्ष काढून घेतो. निळूभाऊ मात्र प्रत्येक प्रयोगाच्या वेळी नवीन गोष्ट शोधत. ते अभिनय विचारपूर्वक करीत, पण त्याला स्वरूप सहजतेचे देत. चित्रपटांमध्ये गेल्यावरही ते रंगभूमीला विसरले नाहीत. अत्यंत व्यावसायिकतेने त्यांनी दोन्ही क्षेत्रांना न्याय दिला.
रंगभूमीवर असताना निळूभाऊंचा नावलौकिक मी ऐकला होता. तरी त्यांची आणि माझी प्रत्यक्ष भेट ‘िपजरा’ चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी घडली. त्यातील त्यांच्या भूमिकेत हवा असणारा छद्मीपणा त्यांनी अचूक आणला होता. मी त्यांच्या थोबाडीत मारतो, असा त्या चित्रपटातील एक प्रसंग होता. त्यात भूमिकेच्या भरात माझ्या हातून एवढय़ा जोरात थोबाडीत बसली, की माझ्याही हाताला झिणझिण्या आल्या. तरीही गाल चोळीत निळूभाऊ पुढचा संवाद म्हणतात, ‘मास्तर, तुम्ही मला मारलंत.’.
‘िपजरा’तील भूमिकाही अवघड होती. त्यानंतर ‘सामना’ हा तर त्यांच्या आणि माझ्या जुगलबंदीचाच चित्रपट होता. दोघांच्याही भूमिका ताकदवान होत्या. विजय तेंडुलकर यांनी आम्हा दोघांना डोळ्यांपुढे ठेवूनच चित्रपट लिहिला होता. त्यात मी नेहमीची शैली सोडून भूमिका केली होती. त्याला उत्तर देताना सुरुवातीस निळूभाऊ थोडे बावरले होते, मात्र त्यानंतर त्यांनी जे काम केले, त्याला तोड नव्हती. व्ही. शांताराम यांनी या चित्रपटाबाबत बोलताना, यात दृश्येच (व्हिज्युअल्स) नाहीत, असे मत नोंदविले होते. मात्र फुले आणि लागू अशी दोन मोठी व्हिज्युअल्स या चित्रपटात आहेत, असे उत्तर जब्बार पटेलांनी दिले होते. माझ्या मास्तरच्या पात्राला शेवटपर्यंत पाटील म्हणजे निळूभाऊ जपत असत, असे चित्रपटात दाखविण्यात आले होते. मास्तरबाबत वाटणारी ही काळजी त्यांनी अचूकपणे साकारली होती.
निळूभाऊ लोहियावादी होते तर मी गांधीवादी. त्यामुळे आमची चर्चा चांगलीच रंगे. अशाच रंगलेल्या चर्चामुळे त्यांचे वाचन अफाट असल्याचे समजे. त्यांच्याशी बोलताना ते पूर्वी ससूनच्या बागेत माळीकामाची नोकरी करीत असल्याचे समजले. त्याचवेळी मी ससूनमध्ये पांढरा कोट घालून डॉक्टरकी करीत होतो. आपण आत असताना बाहेर निळूभाऊ झाडांना पाणी घालत होते, हे मला समजल्यावर मी ओशाळवाणा झालो. सगळे स्वत:कडे ओढायचे आणि समोरच्याला पाडायचे, अशी वृत्ती असलेले कलावंतही असतात; परंतु निळूभाऊ त्याला अपवाद होते. सुरेख सहकार्य असणारेही सहकारी कलावंत असतात, हे त्यांनी दाखवून दिले होते. अशा कलावंताचा सहवास मिळणे हे माझे भाग्यच!
श्रीराम लागू
(शब्दांकन : सुनील माळी)