Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

विविध

दिल्ली मेट्रो पुलाच्या ठिकाणी पुन्हा क्रेन कोसळली
सहा जखमी
नवी दिल्ली, १३ जुलै/पीटीआय

दिल्ली मेट्रोचा पूल काल ज्या ठिकाणी कोसळला त्याच ठिकाणी आज क्रेन कोसळण्याची दुर्घटना घडली. त्यात सहाजण जखमी झाले आहेत. मेट्रोचा पूल कोसळल्याच्या ठिकाणी ढिगारा उपसण्याचे काम ही क्रेन करीत होती, त्यावेळी ही क्रेन कोसळली. काल दक्षिण दिल्लीतील जमरूदपूर येथे झालेल्या दुर्घटनेत बांधकाम चालू असलेला पूल कोसळून सहाजण ठार झाले होते.

वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याचा मेट्रो रेल्वेवर दबाव नाही : रेड्डी
नवी दिल्ली, १३ जुलै/खास प्रतिनिधी

पुढच्या वर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेपूर्वी दिल्ली मेट्रो रेल्वेचे जाळे पसरण्यासाठी कोणतीही घाई करण्यात येत नसून सुरक्षेलाच सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचे आज केंद्रीय नगरविकास मंत्री जयपाल रेड्डी यांनी लोकसभेत जाहीर केले. पण लोकसभेत निवेदन करण्यापूर्वीच लाजपतनगर बाजारपेठेत कालच्याच ठिकाणी मेट्रो रेल्वे प्रकल्पाला पुन्हा अपघात घडून सहा जण जखमी झाले.

राज्यात हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम सुरु करण्याचा परदेशी शिक्षण संस्थेचा प्रस्ताव
नवी दिल्ली, १३ जुलै/खास प्रतिनिधी

परदेशी शिक्षण संस्थांनी भारतातील विद्यापीठांच्या सहकार्याने विविध अभ्यासक्रम सुरु करण्याचे सहा प्रस्ताव अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेला दिले असून त्यात महाराष्ट्रात इन्स्टिटय़ूूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाचाही समावेश असल्याची माहिती आज मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिली.

इराकमधील स्फोटातून अमेरिकी राजदूत बचावले
बगदाद, १३ जुलै/पी.टी.आय.

इराकमधील अमेरिकेच्या राजदूतांना घेऊन जाणारे वाहन भूसुरूंग स्फोटामधून बचावले, अशी माहिती अमेरिकी दूतावासाकडून देण्यात आली. इराकमधील राजदूत ख्रिस्तोफर हिल आणि इतर अमेरिकी दूत काल दक्षिण इराकमधील शिया पंथीयांच्या धी क्वार भागामधून जात होते. त्याचवेळी त्या वाहनाजवळ दहशतवाद्यांकडून भुसूरुंग स्फोट घडविण्यात आला. या स्फोटाची तीव्रता कमी होती. त्यामुळे वाहनातील सर्व प्रवाशांना कोणतीही हानी झाली नाही, असे दूतावासाचे प्रवक्ते सुसान झिआदे यांनी म्हटले आहे. अमेरिकी राजदूत ख्रिस्तोफर हिल व इतर अधिकारी सुखरूप आहेत याव्यतिरिक्त कोणताही तपशील दूतावासाकडून देण्यात आला नाही. दरम्यान, स्फोटामुळे वाहनाचे नुकसान झाले असल्याचे वृत्त ‘युएसए टुडे’ने दिले आहे.

भविष्य निर्वाह निधीची दावा न केलेली कोटय़वधीची रक्कम सरकारकडे पडून
नवी दिल्ली, १३ जुलै/ पीटीआय

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या सरकारकडे जमा झालेल्या ३ हजार ८३७ कोटी रुपयांवर ३१ मार्च २००८ अखेर कोणीही दावा केलेला नसून या रकमेचे खरे हक्कदार शोधून काढण्याचे प्रयत्न सुरु असून, हा पैसा इतरत्र कोठे वापरण्याचाही विचार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.हे पैसे कार्यान्वित नसलेल्या खात्यांमध्ये पडून असून, सदस्यांच्या वारसांकडून जेव्हा कधी त्यावर दावा केला जाईल तेव्हा त्यांना परत करावा लागणार असल्याने तो इतर कारणासाठी वापरता येणार नाही.