Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

विशेष लेख
भूमिका जगणारा | बाइंडरबरोबरचा नाटय़प्रवास | निष्ठावान आणि दिलदार

बाइंडरबरोबरचा नाटय़प्रवास
सहजसाधे बोलणे, नाटकीपणा अजिबात नाही. नैसर्गिक अभिनय हा निळूभाऊंचा विशेष होता आणि अशा कलावंताचा सर्वात अधिक सहवास मला मिळाला, ही माझी जमेची बाजू मी मानते. त्यांच्या सर्वच भूमिका चांगल्या होत्या, पण सर्वात कळस चढविला तो ‘सखाराम बाइंडर’च्या भूमिकेने!
निळूभाऊंबाबत माझ्या अनेक आठवणी आहेत. त्यांच्याबरोबर सर्वाधिक नाटकांत काम करणारी मीच होती. मी त्यांच्याबरोबर १९७२ पासून पुढची दहा वर्षे नाटकांत काम केले. सुमारे दीड हजार प्रयोगांत आम्ही एकत्र होतो. त्यात त्यांचा सहवास मला मिळाला. विजय तेंडुलकर यांच्या ‘सखाराम बाइंडर’नेच आमच्या नाटय़प्रवासाची सुरुवात झाली. त्याआधी निळूभाऊंनी नाटके केली होती. त्यांचे तसे पहिले नाटक होते ‘कथा अकलेच्या कांद्याची’. मात्र खऱ्या अर्थाने त्यांचेही पहिले परिपूर्ण नाटक हे ‘सखाराम बाइंडर’ हेच होते, असे मी मानते. सखारामची भूमिका त्यांनी

 

अजरामर केली. त्यानंतर दोन कलाकारांनी सखारामची भूमिका केली. माझे पती कमलाकरनेही ती केली, पण निळूभाऊंची सर त्यापैकी कोणालाच नव्हती. ‘सखाराम बाइंडर’विरोधात खटला उभा राहिला तेव्हा त्यामध्ये निळूभाऊ प्रत्यक्ष नव्हते, पण त्यांनी त्या दरम्यान आम्हाला सातत्याने साथ दिली. आपण या लफडय़ात का पडायचे, आपला काय संबंध, असा विचार त्यांच्या मनालाही शिवला नाही. ‘सखाराम बाइंडर’च्या नाटय़प्रयोगांसाठी आम्ही दौरे करायचो. नाटकाला विरोध होत असताना नाटय़प्रयोग बंद पाडण्यात येत असत, तसेच मोर्चेही येत. तरीही त्यांनी तो त्रास मानला नाही. त्यांचा नैतिक पाठिंबा आम्हालाच राहिला. त्यांची साथ नसती तर ‘सखाराम बाइंडर’ नाटक होऊच शकले नसते.
आम्ही ‘सखाराम’ १९७२ मध्ये केले. त्यानंतर १९७४ मध्ये ‘जंगली कबुतर’, १९७६ मध्ये ‘बेबी’, तर १९७९ मध्ये ‘सूर्यास्त’ केले. ‘जंगली कबुतर’मधील दादा, ‘बेबी’मध्ये वेडा राघव ही विविध रूपे त्यांनी अत्यंत समरसतेने वठविली होती. ‘सूर्यास्त’मधील अप्पाजीही त्यांनी अप्रतिम केला. खरेतर ‘सखाराम बाइंडर’ची भूमिका हे एक टोक, ‘बेबी’तील भूमिका हे दुसरे टोक, तर ‘सूर्यास्त’मधील अप्पाजींची भूमिका हे तिसरेच टोक होते, एवढय़ा त्या भूमिका परस्परभिन्न स्वरूपाच्या होत्या. अप्पाजींची भूमिका म्हणजे भाऊसाहेब रानडेंचे व्यक्तिमत्त्व उभे करणे होते. ते कामही त्यांनी तितक्याच लिलया पेलले. अभिनेते म्हणून ते खूपच वरच्या पातळीवरील होते. त्यांची सहजता, वाक्य फेकण्याची कला ही इतकी छान असायची, की त्याचे कौतुक करावे तेवढे थोडे असायचे.
नाटकांप्रमाणेच चित्रपटांतही निळूभाऊंनी भूमिका केल्या. ‘सिंहासन’, ‘सामना’ या चित्रपटांतील भूमिका तर खूपच गाजल्या. या दोन्ही चित्रपटांत मी असले तरी एक प्रसंग वगळता आम्ही दोघे त्यात एकत्र नव्हतो. केवळ ‘सिंहासन’मधील एकाच प्रसंगात मी त्यांच्या बरोबर होते. या दोन चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी इतरही अनेक चित्रपटांत केलेल्या भूमिकांमध्ये पाटील-जमीनदार-राजकीय नेता अशा भूमिका विशेष गाजल्या.
सहजसुंदर अभिनय तर निळूभाऊ करायचेच, पण माणूस म्हणूनही ते साधे होते. त्यांचे हेच हवे, तेच हवे असे कोणतेही नखरे नसायचे. नाटकांत ते समोर आहेत याचे दडपण आम्हाला कधीच आले नाही. ते खूप नम्र होते. माणूस म्हणून सामाजिक कार्यकर्ता म्हणून मोठे होते. त्यांच्या बोलण्यात हटकून लोहियावाद यायचाच. रंगात येऊन ते त्याबद्दल बोलू लागले, की त्यांना थांबवावे लागायचे.
मुंबईला नाटय़प्रयोग असला, की प्रयोग झाल्यावर आमच्या घरी ते जेवायला असत. त्यांची पंचाहत्तरी साजरी केली तेव्हा त्यांनी लालनच्या हातचे खायचे आहे, अशी इच्छाही व्यक्त केली होती.
त्यांच्या शेवटच्या आजारात त्यांना काही दिवसांपूर्वीच मी रुग्णालयात भेटायला गेली होती. त्यांना नीट बोलता येत नव्हते, पण लालन आलीय म्हटल्यावर ‘कशी आहेस’, अशी विचारणा त्यांनी केली.
आज सकाळीच निळूभाऊ गेल्याचे कळले आणि त्यांच्याबाबतच्या या आठवणींनी मनात गर्दी केली.
लालन सारंग