Leading International Marathi News Daily

मंगळवार, १४ जुलै २००९

विशेष लेख

निष्ठावान आणि दिलदार
कुठल्याही विचारी कलावंताच्या कारकिर्दीवर त्याच्या वैयक्तिक जीवनाचा, सामाजिक व राजकीय आचारविचारांचा प्रभाव कळत नकळतपणे पडत असतो. निळू फुले यांच्या राजकीय विचारांशी व सामाजिक जाणिवांशी जे चांगल्या प्रकारे परिचित आहेत, त्यांना माझं हे म्हणणे पटू शकेल. सामाजिक जीवनात वावरताना तिथल्या घडामोडींचा प्रभाव आपल्या कलाजीवनातून व्यक्त करण्याचं भान फार थोडय़ा मंडळींमध्ये असतं. निळूभाऊ हे अशा कलावंतांपैकी एक होते. आपल्या राजकीय आणि सामाजिक जाणिवांचा उपयोग स्वत:मधला कलावंत समृद्ध करण्यासाठी त्यांनी केला. अर्थात त्याला त्यांनी प्रचारकी रूप येऊ दिलं नाही. विशिष्ट विचारसरणीशी बांधिलकी ठेवणाऱ्या कलावंतांची एक पिढी ‘इप्टा’नं घडवली. बंगालमध्ये उत्पल दत्त यांनी आपल्या वैचारिक निष्ठा त्यांच्या नाटकांमधून मांडल्या. तो बाज प्रचारकी असला तरी प्रभावी होता यात शंका नाही. निळूभाऊ हे समाजवादाच्या मुशीतून घडलेले, लोहियांच्या विचारांवर अविचल निष्ठा असलेले कलावंत होते. त्यांनी रंगवलेल्या बहुतांश पुढाऱ्यांच्या भूमिका या त्यांच्या राजकीय विचारसरणीशी वरकरणी विसंगत वाटतात.

 

तरीदेखील त्या भावतात, कारण या भूमिका करताना निळूभाऊंनी ठेवलेलं राजकीय आणि सामाजिक भान. ‘सामना’मधली हिंदुराव पाटलाची भूमिका ही तशी मग्रूर आणि खूनशी पुढाऱ्याची, पण त्या भूमिकेलाही एक असहाय्यतेची, कारुण्याची छटा आहे. हा पुढारी एका क्षणी मोडून पडतो.
निळूभाऊंनी ही असहाय्यता ज्या संयतपणे व्यक्त केली, त्यामागे इथल्या राजकारणाचा त्यांनी सखोलपणे केलेला अभ्यास होता. ‘कथा अकलेच्या कांद्याची’ सारख्या वगनाटय़ात पुढाऱ्याची भूमिका साकारताना त्यांनी जी उंची गाठली ती त्यांच्या अनुभवातून आली होती.
राजकारणातली मूल्यांची घसरण त्यांनी जवळून पाहिली होती. त्याचा परिणाम ‘सिंहासन’मध्ये त्यांनी केलेल्या पत्रकाराच्या भूमिकेत दिसला. वास्तविक ‘सिंहासन’मध्ये कुठल्याही नेत्याच्या भूमिकेत ते ‘फिट्ट’ बसू शकले असते, पण त्यांना पत्रकाराची भूमिका द्यायचं मी आणि विजय तेंडुलकरांनी ठरवलं, त्यामागे कारण एवढेच की कोणत्याही भूमिकेच्या अंतरंगात शिरण्याची त्यांची अफाट ताकद. ‘सिंहासन’मध्ये सत्तास्पर्धेबरोबरच राजकीय पडझडीचं दर्शन घडतं, भारतीय राजकारण त्या काळात याच स्थित्यंतरातून जात होतं. इंदिरा गांधींच्या राजवटीनंतर सत्तेवर आलेल्या जनता पक्षाचीही वाताहात झाली होती. या सर्व घडामोडींचा अभ्यास निळूभाऊंनी केला नसता तरच नवल. ‘सिंहासन’मधल्या पत्रकाराच्या भूमिकेला सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांनी जो ‘लूक’ दिलाय तो एखाद्या नटाला अभ्यासातूनच साध्य होऊ शकतो.
व्यक्ती म्हणून निळूभाऊ अत्यंत साधे, नम्र आणि दिलदार वृत्तीचे होते. मला आठवतं. १९७६ साली बर्लिन चित्रपट महोत्सवात ‘सामना’ दाखवला गेला. त्यानंतर आम्ही प्रेक्षकांना सामोरे गेलो. त्यावेळी देखील निळूभाऊंच्या अंगात साध्या खादीचा, चुरगळलेला झब्बा होता.
नुसते नट म्हणून जगायचं ठरवलं असतं तर निळूभाऊ आरामात जगू शकले असते. पण सामाजिक विचारांचा, प्रबोधनाचा ध्यास प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याची त्यांची वृत्ती होती. ती त्यांनी अखेपर्यंत जोपासली. तरुण कलावंतांना प्रोत्साहन देण्याचा, नवनवीन प्रयोगांचं दिलखुलासपणे स्वागत करण्याचा त्यांचा स्वभाव होता. एखाद्या कलाकृतीशी त्यांचा थेट संबंध नसला तरी तिला मोकळेपणानं दाद देण्यात, विधायक सूचना करण्यात ते आघाडीवर असत. माझ्या ‘आंबेडकर’ चित्रपटाच्या वेळी मी हे अनुभवलं. माझ्या व्यक्तिगत जीवनावर निळूभाऊंचा फार मोठा प्रभाव आहे. त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली!
डॉ. जब्बार पटेल
(शब्दांकन : सुनील देशपांडे)