Leading International Marathi News Daily

बुधवार, १५ जुलै २००९

पाऊस आला मोठ्ठा..
मुंबई, १४ जुलै / प्रतिनिधी
सोमवारी संध्याकाळपासून कोसळणाऱ्या पावसाने आज दिवसभर मुंबईला झोडपले. धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांची पुरती त्रेधातिरपीट उडाली. जागोजागी पाणी तुंबल्याने रेल्वे व रस्ते वाहतुकीचा बोजवारा उडाला. मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नौदलास सतर्क राहण्याचे आदेश द्यावे लागले. पश्चिम रेल्वेच्या लोकल तब्बल तासभर उशिराने धावत होत्या, तर मध्य रेल्वेने सुमारे तीन तास मान टाकली होती. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. मिठी नदीची पातळी वाढत असल्याचे वृत्त कळताच अनेक शासकीय व खासगी कार्यालये दुपारीच सोडण्यात आली. सोमवारी संध्याकाळपासूनच पावसाने मुंबईत दमदार हजेरी लावली.

उद्धव ठाकरे घरातील उंदरांच्या शेपटय़ा कधी धरणार?
संदीप प्रधान
मुंबई, १४ जुलै

उद्धव ठाकरे यांनी सोमवारी काढलेल्या मोर्चात महाराष्ट्राला बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या पडलेल्या वेढय़ाबद्दल तीव्र टीका केली. त्यांच्या त्या टीकेनंतर राज्यातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये आणि खुद्द मंत्रिमंडळातही एकच खळबळ उडाली आहे. गेल्या २० वर्षांत शहरांनजिकचे प्रदेश ‘एनए’ म्हणजेच ‘नॉन अ‍ॅग्रिकल्चर’ करून या सर्व जमिनी बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरांच्या ताब्यात देण्यात आल्या. तेव्हपासून राज्याच्या अर्थव्यवस्थेला विकृत आणि गुन्हेगारीचे वळण लागले. या पाश्र्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलेला मुद्दा खरोखरच राज्याच्या हिताचा आहे.

मार्डशी मांडवली
विद्यावेतनात सात हजारांची वाढ घेऊन संप मागे
मुंबई, १४ जुलै/ खास प्रतिनिधी
वाढीव विद्यावेतनाच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यासांठी गेले आठ दिवस संपावर असलेल्या राज्यातील निवासी डॉक्टरांना सात हजार रुपये विद्यावेतनात वाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे आज ‘मार्ड’ या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने आपला संप मागे घेतला. निवासी डॉक्टरांच्या संपामुळे गेले आठ दिवस रुग्णांचे अतोनात हाल झाले होते. सरकारने या डॉक्टरांवरील सर्व कारवाया मागे घेतल्या असून रात्रीपासून निवासी डॉक्टर कामावर रुजू झाले.

प्रवेशाचा ऑनलाईन गोंधळ..अंक दुसरा
* अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर
* किचकट अर्जामुळे अनेक विद्यार्थ्यांना फटका
* नियमांच्या बाबतीत शिक्षण विभागाची कोलांटउडी
मुंबई, १४ जुलै / प्रतिनिधी

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर झाली. परंतु, किचकट ऑनलाइन अर्जाचा मोठा फटका अनेक विद्यार्थ्यांना बसला आहे. चांगले गुण असतानाही दुय्यम दर्जाची महाविद्यालये अशा विद्यार्थ्यांना मिळाली आहे. हे कमी म्हणून की काय, मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेणे विद्यार्थ्यांवर बंधनकारक आहे. प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांला पुढील प्रवेश प्रक्रियेत बाद ठरविण्यात येणार असल्याचा विचित्र नियम अचानक लागू करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे धाबे दणाणले आहेत.

तलाव क्षेत्रात दमदार पाऊस
मुंबई, १४ जुलै / प्रतिनिधी

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या क्षेत्रात अखेर आज पावसाने दमदार हजेरी लावली. गेले अनेक दिवस पावसासाठी आसुसलेल्या तलावांच्या क्षेत्रात पावसाची सतंतधार असल्यामुळे पाणीकपातीचा सामना करणाऱ्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. तलाव क्षेत्रात असाच पाऊस कोसळला तर पालिकेला कृत्रिम पावसाचा खटाटोप करण्याची गरज भासणार नाही, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

डोंबिवली ते ठाणे प्रवास; तब्बल सव्वा दोन तास!
मुंबई, १४ जुलै / प्रतिनिधी

पावसामुळे मध्य रेल्वेच्या सेवेचा बोजवारा उडाल्याने प्रवासी हैराण झालेले असतानाच नेहमीप्रमाणे योग्य उद्घोषणा न करून रेल्वेने प्रवाशांच्या मनस्तापात आणखीच भर घातली. रेल्वेच्या या बोजवाऱ्यामुळे डोंबिवली ते ठाणे या वीस मिनिटांच्या प्रवासाला आज दुपारी तब्बल सव्वा दोन तास लागत होते. सव्वा दोन तासांचा हा प्रवास प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारा ठरला.

अवघ्या १५० मिमी पावसाने मुंबईच्या वाहतुकीचे तीनतेरा
मुंबई, १४ जुलै / प्रतिनिधी

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील वाहतुकीची गती अवघ्या १५० मिमी पावसाने जवळपास ठप्प केली. जागोजागी रस्त्यांना तलावाचे स्वरुप आल्याने, रस्ते वाहतुकीचे तीनतेरा वाजले. पावसाळ्यासाठी सुसज्ज असल्याचे दावे करणाऱ्या मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल तीन तास खोळंबली. दादर-चर्चगेट प्रवासासाठी लोकलमध्ये तब्बल तासभराहून अधिक वेळ खर्चून हजारो प्रवाशांनी पश्चिम रेल्वेची कूर्मगती अनुभवली.

नेरुळ येथे संरक्षक भिंत कोसळून दोन ठार
बेलापूर, १४ जुलै/वार्ताहर

नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील व एस. आय. ई. एस. महाविद्यालयाच्या मध्ये असलेली संरक्षक भिंत सततच्या पडणाऱ्या पावसामुळे कोसळल्याची घटना सोमवारी रात्री दीड वाजता घडली. या दुर्घटनेत दोन कामगार जागीच ठार झाले, तर अन्य पाच कामगार जखमी झाले.सनीदेव पटेल (२२) व चंद्रगणेश हरीजन (२०) असे मृत कामगारांची नावे आहेत. जलाराम पटेल हा कामगार गंभीर जखमी असून त्याच्यासह अन्य पाच जणांवर डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वरील सर्व कामगार डी. वाय. पाटील कॉलेजच्या बांधकाम साइटवर काम करणारे होते. दुर्घटनाग्रस्त भिंती लागून कामगार झोपडे बांधून राहत होते. रात्री सतत पडणाऱ्या पावसामुळे या भिंतीच्या पलीकडे असलेल्या एसआयइएस कॉलेजच्या बांधकामासाठी रचून ठेवलेल्या विटा सदरच्या भिंतीवर ढासळल्या. त्यामुळे भिंत झोपडय़ांवर कोसळली.

 

प्रत्येक शुक्रवारी