Leading International Marathi News Daily
बुधवार, १५ जुलै २००९

अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेत नियमबदल..
अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेच्या नियमात बदल करण्यात आले आहेत. सीईटी आणि एआयईईई या दोन्ही परीक्षा दिल्यानंतर दोन्हींमधील गुणवत्ता यादीच्या माध्यमातून चांगले महाविद्यालय प्राप्त करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा बदल महत्त्वाचा ठरणार आहे. त्याविषयी हे तपशीलवार मार्गदर्शन..
महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या गेल्या वर्षी सुमारे ५० ने वाढून २२१ झाली आणि या वर्षी ती २६६ पर्यंत गेली. सीईटीला बसणाऱ्यांची संख्या या वर्षी सुमारे पन्नास हजारांनी वाढून दोन लाख १६ हजार ७२४ झाली. सीईटीमध्ये अपात्र विद्यार्थी नाही, कारण प्रत्येकाला कमीतकमी दोन मार्क तरी मिळाले आहेत. (केमिस्ट्रीतील चुकीच्या प्रश्नाबद्दल).
 

एआयईईईला बसणाऱ्यांची संख्याही खूप वाढली आहे.
या वेळेपर्यंत आपणापैकी अनेक लोकांनी एआरसीला जाऊन कागदपत्रे पडताळून घेतलीही असतील. गेल्या वर्षीच्या प्रवेशप्रक्रियेप्रमाणे आपण ऑप्शन ठरवायला सुरुवात केली असेल. मित्रमैत्रिणींनो, जरा थांबा. या वेळी एआरसीमध्ये आपण दोन्ही (सीईटी आणि एआयईईई)साठी एकच अर्ज भरला. अगदी येथपासूनच प्रवेशप्रक्रियेतील बदलाचा थोडासा अंदाज आला. या वर्षी आपल्याला सीईटी आणि एआयईईईसाठी एकच ऑप्शन फॉर्म भरावयाचा आहे. किती ऑप्शन भरायचे आहेत किंवा प्रवेशप्रक्रिया कशी असेल, यासंबंधी अजून आपल्याला काहीही कळविण्यात आलेले नाही. (अगदी हा लेख लिहीत असतानासुद्धा डीटीईच्या वेबसाईटवर ही माहिती उपलब्ध नाही.) थांबा. घाबरून जाण्यासारखे काहीच नाही. आपल्यापैकी कोणाचेच काहीही नुकसान होणार नाहीय. झाला तर फायदाच होणार आहे.
नेमका बदल काय?
गेल्या वर्षी अनेकजणांना पहिल्या फेरीत दोन जागा अ‍ॅलॉट झाल्या होत्या. एक सीईटीतून आणि दुसरी एआयईईईतून. अर्थात त्यापैकी एका जागेवर प्रवेश नक्की केल्यावर दुसरी जागा पुढील फेरीसाठी रिकामी होत असे; परंतु कोणती जागा नक्की करायची, हा निर्णय तो विद्यार्थी घेत असे. या वर्षी मात्र हा निर्णय आपोआप घेतला जाईल. समजा तुम्हाला एआयईईईतून दहाव्या क्रमांकाचा ऑप्शन मिळाला आणि सीईटीतून सातव्या क्रमांकाचा ऑप्शन मिळाला तर तो सातवा ऑप्शन अ‍ॅलॉट होईल आणि तुमचा दहावा ऑप्शन असलेली जागा रिकामी होईल. अर्थात एआयईईईच्या मेरिटसाठी. ज्यांनी एकच परीक्षा दिली होती त्यांना त्यामुळे फारसा फरक पडणार नाही. त्यांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा चांगलाच ऑप्शन मिळेल; परंतु ज्यांनी दोन्ही परीक्षा दिल्या असतील त्यांना मात्र दोन्ही मार्कापैकी कशाचा चांगला उपयोग होईल याचा विचार करूनच ऑप्शन्स द्यावे लागतील. सीईटीच्या मार्कावरून हा अंदाज घेणं सोपं आहे. कारण आपल्याकडे आपला स्टेट मेरिट नंबर असतो, होम युनिव्हर्सिटी मेरिट नंबर असतो, कॅटेगरी मेरिट नंबर असतो, मुलींपैकी मेरिट नंबर असतो. या सगळ्यांमुळे आपण नक्की कुठे आहोत याचा अंदाज येतो; परंतु एआयईईईमध्ये मात्र एकच मेरिट नंबर असेल. त्यात ना होम/ इतर युनिव्हर्सिटी, ना राखीव जागा. त्यामुळे आपण कुठे आहोत, याचा अंदाज बांधणं फार अवघड आहे.
आता हा बदल कशासाठी केला गेला असेल ते पाहू. गेल्या वर्षी एकाच विद्यार्थ्यांला दोन जागा मिळत होत्या. त्यामुळे मेरिट असूनही अनेक विद्यार्थ्यांना पुढील पसंतीचा ऑप्शन मिळाला. या वर्षी मात्र जी जागा दुसऱ्या फेरीत येणार होती ती पहिल्या फेरीतच उपलब्ध होईल आणि पर्यायाने ती मेरिटनुसार दिली जाईल. याचे परिणाम चांगलेच असतील. प्रत्येकालाच गेल्या वर्षीपेक्षा चांगली जागा मिळेल. प्रथम फेरीतच जास्त जागा उपलब्ध असतील. नव्हे सगळ्याच जागा उपलब्ध असतील आणि जेवढय़ा जागा तेवढय़ाच विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळेल.
बदलाचा परिणाम
परिणामस्वरूप सर्व महाविद्यालयांचे कटऑफ्स उतरतील. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी प्रथम फेरीतील मिळालेला प्रवेश नाकारून दुसऱ्या फेरीसाठी थांबत होते त्यांनी मात्र एकदा नीट विचार करणे जरुरीचे राहील. या वर्षी दुसऱ्या फेरीत जागा कशा उपलब्ध होतील, का उपलब्ध होतील, मुख्य म्हणजे होतीलच का, याचं उत्तर शोधणे महत्त्वाचे आहे आणि आपल्या लक्षात येईल की, अशा जागा खूपच कमी असतील. अर्थात हा विचार न करता जे प्रवेश घेणार नाहीत त्याच जागा दुसऱ्या फेरीत येतील. याशिवाय प्रथम फेरीअंतर्गत फक्त तीन स्टेजेसचा वापर करून सीईटीतून अ‍ॅलॉटमेंट होणार आहे. त्यामुळे राखीव जागांपैकीच काही जागा दुसऱ्या फेरीत येतील, कारण त्या कॅटेगरीतील मुलींच्या रिकाम्या जागा त्याच कॅटेगरीतील मुलांना देऊन आणि त्यातूनही रिकाम्या राहाणाऱ्या जागा एसबीसीना देऊन ही प्रथम फेरी थांबेल. म्हणजे त्या जागा ओपनला प्रथम फेरीत मिळणार नाहीत. (अर्थात गेल्या वर्षीसुद्धा प्रथम फेरीत अशा तीन स्टेजेसचाच वापर केला होता. त्यापूर्वी मात्र प्रथम फेरीत सर्व स्टेजेस वापरून अ‍ॅलॉटमेंट केले जाई.) अर्थातच ओपन विद्यार्थ्यांना या जागांचा काहीच फायदा होणार नाही, कारण त्या जागा तुम्हाला अपेक्षित असलेल्या ऑप्शन्सपेक्षा खालीच असतील. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे राखीव जागाही रिकाम्या राहण्याची शक्यता नाही.
थोडक्यात म्हणजे दुसऱ्या फेरीसाठी थांबण्यातील धोका वाढला आहे. दुसऱ्या फेरीत अत्यंत कमी जागा असतील आणि त्या फेरीत एक ते सात स्टेजेस सीईटीतील अ‍ॅलॉटमेंटसाठी वापरल्या जातील. त्यावेळी अपंग (फिजिकली हँडिकॅप) विद्यार्थ्यांच्या राखीव जागांपैकी रिकाम्या जागा मेरिटवर उपलब्ध होतील आणि तिसऱ्या फेरीत मात्र सर्व स्टेजेसचा वापर होईल आणि राखीव जागा उरल्या तर ओपनपर्यंत पोहोचतील.
पालक आणि विद्यार्थ्यांच्या शंका
आता काही प्राथमिक शंकांना उत्तरे देऊ
१) ऑप्शन फॉर्म भरण्यासाठीच्या विचारात काही बदल करावा लागेल का?
अर्थातच! कारण आतापर्यंत आपण विचारात घेत असलेली कॉलेजेस सीईटीला वेगळी आणि एआयईईईला वेगळी होती. कारण आपले दोन्ही परीक्षांतील गुण वेगवेगळे होते आणि त्यांची तुलना होऊ शकत नव्हती. अर्थातच जे मार्क चांगले तिथे चांगल्या कॉलेजेसचे ऑप्शन्स आणि जिथे मार्क कमी तिथे पुढच्या कॉलेजेसचे ऑप्शन्स, हाच मार्ग निवडला जात असे. आता मात्र असे वेगवेगळे ऑप्शन फॉर्म नसतील, तर या दोन्ही ऑप्शन्सच्या याद्या एकत्र कराव्या लागतील आणि ते काम अवघड असणार आहे.
काही विद्यार्थी एआयईईईमधून इतर विद्यापीठांतील महाविद्यालयांसाठी ऑप्शन भरत असत आणि सीईटीमधून स्वतच्या विद्यापीठातील महाविद्यालयात अर्ज करीत असत आणि दोन्हीकडून जागा अ‍ॅलॉट झाल्यावर मग ते निर्णय घेत असत की, यापैकी कोठे प्रवेश नक्की करायचा; परंतु अशा सर्व विद्यार्थ्यांना आता दोन्ही विद्यापीठांतील महाविद्यालये, शाखा यांची तुलना करून ऑप्शनचा क्रम ठरवायचा आहे. हे काम फार जिकिरीचे आहे.
२) कॉलेजेसचे कटऑफ्स कसे राहातील? गेल्या वर्षीच्या कटऑफ्सचा कसा वापर करता येईल?
आधीच सांगितल्याप्रमाणे कटऑफ्स खाली उतरण्याची शक्यता आहे. कितीने खाली येतील याचे अंदाज मी माझ्या वेबसाईटवर देणार आहेच. कारण प्रत्येक ठिकाणी ते वेगवेगळे असणार आहेत. गेल्या वर्षीच्या कटऑफ्सचा आंधळा वापर केला तर अ‍ॅलॉटमेंट येईल, पण नीट वापर केला तर आणखी चांगली जागा मिळवता येईल.
३) या बदलाचा परिणाम कोणाला जाणवणार नाही?
या बदलाचा परिणाम सर्वानाच जाणवणार आहे. त्याचप्रमाणे राखीव जागांमध्ये मात्र कमी असणार आहे. महत्त्वाचा परिणाम जो सर्वाना जाणवेल तो म्हणजे पुढच्या फेरीत थांबण्याचा. खूप धाडसी निर्णय म्हणावा लागेल. कारण गेल्या वर्षीच्या तुलनेत पुढील फेरीतील कटऑफ्स त्या प्रमाणात कमी होणार नाहीत.
४) अनुसूचित जाती आणि जमातींमधील विद्यार्थ्यांचा प्रश्न?
आजपर्यंत अनुसूचित जाती आणि जमातींमधील विद्यार्थी एआयईईईमधील जागेसाठी अर्ज करताना कायम हाच विचार करायचे की, जर एआयईईईमध्ये राखीव जागा नाहीत तर आम्हाला ज्या फीजमध्ये सवलती मिळत होत्या त्या मिळणार का? अनेकजण या भीतीमुळे एआयईईईची परीक्षा देऊनही आणि चांगले गुण असतानाही या १५ टक्के जागांना अर्ज करीत नव्हते. आता परिस्थिती बदलेल.
५) काही अपेक्षित प्रतिक्रिया-
-याला काय अर्थ आहे? असे नियम आयत्यावेळी कसे बदलतात?
-मग एआयईईई कशासाठी दिली?
-यामागे काहीतरी राजकारण असणार!
-हा बदल लोकांना समजणं अवघड आहे.
या अशा वक्तव्यांना काही अर्थ नाही. नियम बदललेले नाहीत. दोन जागा मिळवून जो निर्णय तुम्ही तेव्हा घ्यायचात तोच निर्णय आता फॉर्म भरताना घ्यायचा आहे. तंत्रशिक्षण संचालकांनी घेतलेला हा असा निर्णय आहे ज्यात एकाही विद्यार्थ्यांचे नुकसान न होता अधिक विद्यार्थ्यांना प्रथम फेरीतच प्रवेशाची संधी मिळेल. वेळ वाचेल. त्यामुळे फक्त ऑप्शन्स भरताना नीट विचार करावा लागेल. अर्थात त्यासाठी पुरेसा अवधी आहे.
अगदी नाराजी राहिलीच तर ती एआयईईईच्या प्रवेशासाठी घेतलेल्या रु. ९०० किंवा ७०० बद्दल राहील आणि खरं आहे जर सीईटीला परीक्षेसकट प्रवेशापर्यंत जी फी रु. ९०० होती, तर एआयईईईच्या फक्त प्रवेशप्रक्रियेच्या फीज आणखी कमी असणं आवश्यकच होतं.
राजकारण वगैरे काही नसतं. प्रक्रिया आणि आपण यांची अधिक चांगली सांगड घातली जात आहे. नशीब नव्हे तर मेरिटला प्राधान्य मिळतंय. विचाराची दिशा बदला.
हा बदल लोकांना समजणं अवघड आहे? पण खरंतर स्वतचा फायदा न समजण्याइतके तर कोणीच वेडं नसतं. बदल चांगला आहे. समजण्याच्या बाबतीत म्हणाल तर गेल्या वर्षीपेक्षा चांगला ऑप्शन मिळेल एवढंच समजून घ्या. लोकांचं जाऊ द्या, स्वत समजून घ्या. इतरांना पटवा.
ऑप्शन फॉर्मनुसार प्रवेश कसा दिला जातो?
सगळ्यात पहिले आणि महत्त्वाचे. आपला फॉर्म जेव्हा अ‍ॅलॉटमेंटसाठी येतो तेव्हा फक्त आपले ऑप्शन्स असतात आणि त्या वेळेला असलेल्या रिकाम्या जागा. अर्थात त्या जागा या त्या त्या वर्गवारीप्रमाणे रिकाम्या असतात. आपण दिलेले ऑप्शन्स हे त्याच क्रमाने विचारात घेतले जातात.
सर्वात प्रथम एआयईईईच्या मेरिट लिस्टनुसार अ‍ॅलॉटमेंट दिली जाईल. क्रमांक एकच्या ऑप्शनची जागा एआयईईईमध्ये रिकामी आहे का ते पाहिले जाते. असल्यास ती जागा, सीट तुम्हाला दिली जाते. अ‍ॅलॉट होते. नसल्यास क्रमांक दोनचा ऑप्शन विचारात घेतला जातो आणि ही प्रक्रिया तुमच्या सीट अ‍ॅलॉट होईपर्यंत किंवा ऑप्शन्स संपेपर्यंत चालू राहाते.
या पद्धतीने एआयईईईतील सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज तपासले जातील आणि एआयईईईची अ‍ॅलॉटमेंट संपेल. आता सीईटीच्या मेरिट लिस्टनुसार परत एकदा ऑप्शन फॉर्म विचारात घेतले जातील. जर त्या विद्यार्थ्यांला एआयईईईतून एखादा ऑप्शन मिळाला असेल, समजा ऑप्शन १४, तर सीईटीतून ऑप्शन क्र. एक ते १३ क्रमाने विचारात घेतले जातील आणि त्यातील एखादा ऑप्शन सीईटीतून मिळत असेल तर तो ऑप्शन अ‍ॅलॉट होईल. त्यानंतर त्याला आधी अ‍ॅलॉट झालेली एआयईईईतील जागा परत एकदा एआयईईई मेरिटनुसार अ‍ॅलॉट होईल. त्याही वेळेला जर आधी मिळालेल्या ऑप्शनपेक्षा चांगला, म्हणजेच वरचा ऑप्शन मिळाला असेल तरच तो दिला जाईल आणि एआयईईईतून विद्यार्थी वर सरकेल. अशाच रीतीने जर सीईटीमधील जागा रिकामी झाली तर त्या मेरिटनुसार ती दिली जाईल.
ही संपूर्ण प्रक्रिया संगणकाच्या साहाय्याने पार पडते. यात कोणतीही शंका घेण्याचे काहीही कारण नाही. कोणतीही चूक होण्यास इथे कसलाच वाव नाही. कोणत्याही प्रकारे कसलाच फेरफार करणे केवळ अशक्य आहे.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट. समजा तुम्ही एखादे कॉलेज दिले आहे क्रमांक सातचा ऑप्शन म्हणून आणि तुमच्या नंतरच्या विद्यार्थ्यांने तोच ऑप्शन क्रमांक एकला दिला आहे. समजा एकच जागा शिल्लक आहे, तर ती कोणाला मिळणार? तुम्हाला की, त्या नंतरच्या विद्यार्थ्यांला? खरं म्हणजे उत्तर सोपं आहे. ती जागा तुम्हालाच मिळणार. अगदी क्रमांक २० वर लिहिलात तरी! कारण तुमचा मेरिट क्रमांक त्या मुलाच्या/ मुलीच्या आधी आहे. ऑप्शनचा क्रम हा तुमच्या आवडीनुसार आहे. एखादं कॉलेज हे आधी का नंतर ते तुमच्या आवडीनुसार, विचारानुसार ठरेल. कॉलेज क्रमांक एकला लिहिल्यास मिळण्याची शक्यता अधिक आणि क्रमांक दहाला लिहिल्यास शक्यता कमी असे काहीही नसते. जागा रिकामी असणं एवढय़ा एकाच गोष्टीवर ते अवलंबून असते. जेव्हा आपण ते कॉलेज क्रमांक १० ला लिहितो तेव्हा पहिल्या नऊ जागांपैकी जर काहीही मिळाले नाही तर हा ऑप्शन, असा याचा अर्थ होतो.
ऑप्शन फॉर्म कसा भरावा?
साधारणपणे ऑप्शन्स भरताना आपण आपल्या निवडीनुसार एक क्रमावली तयार केली पाहिजे. हा क्रम तयार करताना फक्त आपल्याला काय हवं आहे याचाच विचार केला पाहिजे आणि आधीच सांगितल्याप्रमाणे प्रत्येक ऑप्शन भरताना हा विचार केला पाहिजे की, जर आधीचा कोणताही ऑप्शन मिळाला नाही तरच आपल्याला हा ऑप्शन हवा आहे ना? प्रत्येकवेळी हो हेच उत्तर घेऊन मगच पुढचा ऑप्शन शोधावा. हा क्रम साधारणपणे सर्व कॉलेज- ब्रँचसाठी तयार करावा.
मात्र या वर्षी आपल्याला हे ऑप्शन देताना सीईटी आणि एआयईईई या दोन्हींचा एकत्रित विचार करायचा आहे. त्यासाठी मेरिट क्रमांकाचा उपयोग होईल. एकदा का ही क्रमावली तयार झाली की, मग आपण ही माहिती मिळवायला हवी की, साधारणपणे आपल्या सीईटीच्या मार्कानुसार गेल्या वर्षी काय काय मिळू शकत होतं. त्यानुसार मग पहिल्या मिळू शकणाऱ्या ऑप्शन्सच्या आधीच्या सात ते आठ ऑप्शनपासून आपला फॉर्म भरावा. शक्यतो आपण ठरविलेल्या क्रमावर ठाम राहावे. विचार करताना तो सर्व बाजूंनी करावा. शक्यतो विचारातील मुद्दे लिहून ठेवावेत. यामुळे कोणाच्याही सांगण्यावरून उगाचच क्रमावलीमध्ये ढवळाढवळ होणार नाही. कारण हा क्रम अतिशय महत्त्वाचा आहे. खाली-वर झाल्यास नको तो ऑप्शन मिळेल आणि हवे आहे ते मिळू शकत असूनही निसटून जाईल. असे झाल्यास या वर्षीच्या नियमांप्रमाणे तो प्रवेश अनिवार्य असेल आणि त्याचप्रमाणे आपल्याला पुढील फेरीत संधी मिळणार नाही. कटऑफ्सवर या बदलाचा परिणाम होणार आहेच. पण तो कुठे, किती असेल यासाठी आपण माझ्या वेबसाईटचा अवश्यउपयोग करून घेऊ शकता. या वेबसाईटवर अगदी ऑप्शन तयार करण्यापासून ते काय मिळेल यापर्यंतच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सहजी मिळतात. याशिवाय ई-मेलवरून आपण माझे मार्गदर्शनसुद्धा घेऊ शकता. गेल्या वर्षी या वेबसाईटचा वापर शेकडो विद्यार्थ्यांनी करून घेतला होता. गेल्या वर्षी आपल्याला काय मिळू शकत होतं, या प्रश्नाच्या उत्तरापासून या वर्षी आणखी काय चांगले मिळू शकेल, या उत्तरापर्यंत विचारांची झेप पोहोचायला हवी. नवीन महाविद्यालये, बदललेले नियम आणि काही शाखांकडे विद्यार्थ्यांचा कमी झालेला ओढा याचा एकत्रित विचार करून आपले ऑप्शन्स ठरवा. काही ठोकताळे बांधून त्याला सांख्यिक जोड द्या. जमेल. नक्कीच चांगली अ‍ॅलॉटमेंट मिळेल. माझ्या हार्दिक शुभेच्छा! मेरिटनुसार फायदा, दुसऱ्या नव्हे पहिल्याच फेरीत!
प्रा.अभय अभ्यंकर
www.trialallotment.com
संपर्क- ९८२२०६७४१७, ९८२२०२६६७३