Leading International Marathi News Daily

गुरुवार, १६ जुलै २००९

‘ मूषकां ’ ची मुंबई
निवृत्तीनंतरची व्यवस्था करणारे नोकरशहा झालेत बिल्डरांचे बटिक !
संदीप प्रधान, मुंबई, १५ जुलै
‘‘घरे बांधणे हे शासनाचे काम नाही हे गेल्या काही वर्षांतील अनुभवावरून शासनाच्या लक्षात आले आहे. हे काम करण्याकरिता निर्दयपणे काही गोष्टी कराव्या लागतात. लोककल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारलेल्या सरकारला ते शक्य नाही. त्यामुळेच शासनातील मंडळींनी बिल्डरांना विचारपूर्वक खुली सूट दिली आहे.’’ हे उद्गार राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदावरील एका अधिकाऱ्याने खासगी गप्पांमध्ये काढले होते. सध्या हे महाशय अर्धन्यायिक संस्थेवर काम करीत आहेत. राज्याच्या प्रशासनातील बहुतांश वरिष्ठ अधिकाऱ्यांची जर ही भूमिका असेल तर सत्तेवर शिवसेना-भाजप युती आली काय किंवा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आली काय ‘बिल्डरशाही’च्या रोलरखाली चिरडल्या जाणाऱ्या सामान्य माणसाला न्याय मिळणे अशक्य आहे.

सेना-भाजप व काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे मुंबईची दुर्दशा झाली!
राज ठाकरे यांचा आरोप
संदीप आचार्य, मुंबई, १५ जुलै

दररोज उभ्या राहणाऱ्या अनधिकृत झोपडय़ांमुळे मुंबईची जी वाट लागत चालली आहे त्याला मुंबई महापालिकेतील शिवसेना-भाजपची सत्ता आणि राज्य शासन जबाबदार असल्याची जोरदार टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. ज्यांनी ठोस कारवाई करणे अपेक्षित आहे त्यांच्यावरच जर मोर्चा काढण्याची वेळ येत असेल तर त्यांनी सत्तेवर राहू नये, असे राज म्हणाले. हाती सत्ता असूनही मोर्चे काढून जनतेच्या भावनांशी खेळणाऱ्यांना लोक धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.

अकरावी प्रवेश यादीचा घोळ कायम
मेरा नंबर कब आएगा?

विद्यार्थी व पालक हवालदील
मुंबई, १५ जुलै / प्रतिनिधी
दहावीत चांगले गुण मिळवले. ऑनलाइन प्रवेशाचा अर्ज भरून तो अडथळा ही पार केला. पहिल्या प्रवेशयादीत नावही आले. आता अंतिम टप्पा ओलांडला की किमान पुढील दोन वर्षे तरी चिंता नाही. पण हा टप्पाही सहजासहजी पार होणारा नाही. त्यासाठी प्रतीक्षा करावीच लागणार आहे. पहिली प्रवेशयादी लागल्यानंतर रुईया महाविद्यालयाबाहेर विद्यार्थी आणि पालक ‘मेरा नंबर कब आएगा’ याची वाट पाहत उभे होते. अकरावीच्या प्रवेशात विज्ञानऐवजी वाणिज्य शाखेला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात असून असे विद्यार्थी व त्यांचे पालक कमालीचे हवालदील झाले आहेत. विज्ञान शाखेमध्ये प्रवेश मिळू न शकलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी ‘लोकसत्ता’कडे आपल्या तक्रारी मांडल्या आहेत.

सेनेचे बिल्डर अन्याय करीत असतील तर त्यांनाही सोडू नका - उद्धव ठाकरे
मुंबई, १५ जुलै/प्रतिनिधी

शिवसेनेचे पदाधिकारी बिल्डर असतील आणि अन्याय करीत असतील तर त्यांना सोडू नका, असा आदेश शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज दिला. शिवसेनेतील पदाधिकारी व बिल्डर यांच्या साटय़ालोटय़ासंबंधीचे वृत्त ‘लोकसत्ता’ने आज प्रसिद्ध केले. त्याबाबत वृत्तवाहिन्यांनी उद्धव ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले की, शिवसेनेचे पदाधिकारी बिल्डर असतील व अन्याय करीत असतील तर त्यांनाही सोडू नका, असा आदेश मी शिवसैनिकांना दिला आहे. म्हाडावर घरांच्या प्रश्नाकरिता काढलेल्या मोर्चात मी जेव्हा बिल्डरांना इशारा दिला तेव्हा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना वगळून आदेश दिले नव्हते. बिल्डर मग तो कुणीही असो त्या विरोधात आंदोलन करण्याचा मी आदेश दिला आहे. मुंबईतील घरांच्या प्रश्नाला म्हाडा आणि सरकार जबाबदार असल्याने शिवसेनेने त्या विरोधात मोर्चा काढला होता. सरकार मुंबईबाहेर भाडेतत्त्वावर घरे बांधून येथील मराठी माणसाला बाहेर काढण्याचे कारस्थान करीत असल्याचेही ते म्हणाले.

इराणचे विमान कोसळून १६८ प्रवासी ठार
तेहरान, १५ जुलै/वृत्तसंस्था

इराणचे एक प्रवासी विमान कोसळून आतील सर्व १६८ प्रवासी ठार झाले. तेहरानहून निघालेले हे विमान उड्डाणानंतर थोडय़ाच वेळात वायव्येकडील काझविन शहराजवळ कोसळले. ‘इर्ना’ या इराणच्या अधिकृत वृत्तसंस्थेने या अपघाताचे वृत्त दिले. हे विमान आर्मेनियाची राजधानी येरेवान या शहराकडे निघाले होते. भारतीय वेळेनुसार आज दुपारी १२.३३ वाजता हा अपघात झाला. अपघातात विमानातील १५३ प्रवासी व १५ कर्मचारी ठार झाले असावेत, अशी भीती काझविनच्या पोलीस प्रमुखांनी व्यक्त केली आहे. हे विमान रशियन बनावटीचे होते. इराणला हवाई अपघातांचा काळाकुट्ट इतिहास आहे. गेल्या दशकभरात हवाई अपघातांमध्ये शेकडोजण प्राणाला मुकले आहेत.

रिलायन्सच्या वीजदरवाढीला स्थगिती
मुंबई, १५ जुलै / खास प्रतिनिधी
मुंबई उपनगरात विजेचा पुरवठा करणाऱ्या रिलायन्स वीज कंपनीला वीज दरवाढ करण्यास राज्य विद्युत नियामक आयोगाने आज स्थगिती दिली. या वीजदरवाढप्रकरणी प्रथमच राज्य शासनाने हस्तक्षेप करून आयोगाला दरवाढीच्या निर्णयाचा फेरविचार करण्याचे निर्देश दिल्यानंतर दरवाढीला स्थगिती देत गेल्या वर्षीप्रमाणेच विद्युत देयके पाठविण्याचे आदेश आयोगाने आज दिले. राज्याचे ऊर्जामंत्री सुनील तटकरे यांनी रिलायन्सला दरवाढ करण्यास आयोगाने स्थगिती दिल्याची माहिती मंत्रालयात पत्रकार परिषदेत दिली.

शिवराज पाटील उत्तर प्रदेश, तर अर्जुन सिंह महाराष्ट्राचे राज्यपाल?
नवी दिल्ली, १५ जुलै/खास प्रतिनिधी

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळवू शकलेले अर्जुन सिंह आणि शिवराज पाटील यांच्यासह सध्या अडगळीत पडलेल्या काँग्रेसच्या अनेक नेत्यांची लवकरच राज्यपाल म्हणून नियुक्ती होऊ शकते. पंतप्रधान मनमोहन सिंग भारतात परतल्यानंतर किंवा संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यावर त्याविषयी घोषणा होण्याची शक्यता आहे. शिवराज पाटील यांना उत्तर प्रदेशचे, तर अर्जुन सिंह यांना महाराष्ट्र किंवा गुजरातचे राज्यपालपद सोपविले जाईल, असे संकेत मिळाले आहेत.

काँग्रेस जनसंपर्क अभियानात तिकीटसंपर्कासाठीच ‘हात’घाई !
आजी-माजी मुख्यमंत्र्यांचे समर्थक भिडले

मुंबई, १५ जुलै / खास प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रदेश काँग्रेसने जनसंपर्क अभियान आणि प्रत्येक विभागात दोन मंत्र्यांना निरीक्षक पाठवून आढावा घेण्यास सुरुवात केली असतानाच ठिकठिकाणी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व केंद्रीय अवजड उद्योगमंत्री तथा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या समर्थकांमध्ये ठिकठिकाणी बाचाबाची व गोंधळ होऊन पक्षांतर्गत वाद चव्हाटय़ावर आला आहे.
काँग्रेसचे जनसंपर्क अभियान सध्या मराठवाडय़ात सुरू आहे. या अभियानाची सुरुवात औरंगाबादमध्ये झाली तेथेच मुख्यमंत्री अशोक चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत वादावादी झाली.

काठी ग्रामपंचायतीचा कर थकविण्यासाठी राजकीय ‘संपदा’ पणाला!
शिवाजी राऊत, पाटण, १५ जुलै

जलसंपदामंत्री अजित पवार यांच्या पत्नीच्या नावावर असलेल्या ‘फायर पॉवर मार्केटिंग (आय) प्रा. लि.’ या कंपनीने पाटणच्या पठारावर काठी ग्रामपंचायतीच्या हद्दीत दोन पवनचक्क्यांद्वारे वीजनिर्मिती सुरू केली असली तरी पंचायतीचा घरपट्टीसह ११ लाख ४८ हजार रुपयांचा कर थकविला आहे. इतकेच नव्हे तर करचुकवेगिरीविरोधात पंचायतींनी सुरू केलेली जप्तीची कारवाईही दहशत व दबावाच्या या राजकीय ‘संपदे’पुढे थंडावली आहे.

 

प्रत्येक शुक्रवारी