Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ जुलै २००९
  सबसे फेवरिट जोडी
  ओपन फोरम
नशिबावर विश्वास आहे का?
  थर्ड आय
.. झुकानेवाला चाहिए
  नेट कॉर्नर
My Times UP?
  मेल बॉक्स
  हेल्थ कॉर्नर
ब्रेस्ट इलॅस्टिसिटी
  स्मार्ट बाय
  दवंडी
हरिश्चंद्राची फॅक्टरी
  ग्रूमिंग कॉर्नर
कारणं सांगू नका.. काम दाखवा
  आवजो- चौखी दाणी!
  दिशा
स्लिम इन्स्टंट
  फुड कॉर्नर

घरोघरी - शहाणपण
आजी : कुणाल, ए कुणाल..
कुणाल : आलो ग आजी. दोन मिनिटं थांब.
आजी : कुणाल, अरे पटकन ये.
कुणाल : ..
आजी : कुणाल, अरे येतोस का? माझ्या पायात गोळा आलाय रे.
कुणाल : आजी आलो ग. पाच मिनिटं थांब ना.

 

आजी : कुणाल..
कुणाल : आजी अगं येतच होतो मी. किती हाका मारते आहेस?
आजी : ..
कुणाल : आणि हे काय? तुझा चेहरा का असा दिसतोय? आजी, काय झालं तुला? बरं वाटत नाहीये का? डॉक्टरना फोन करू?
आजी : अरे, त्यासाठीच तर बोलवतेय तुला केव्हाची. माझ्या पायात गोळा आलाय रे. मला पाणी आणि
मीठ आणून दे.
कुणाल : हं हे घे आणि आजी अगं तसं सांगायचं नाहीस का? नुसतीच हाका मारत होतीस ते.
आजी : सांगितलं मी, पण तुला ऐकायला येईल तर शपथ. ते कानाला लावून बसला असशील आणि डोळे त्या कंपुटरला चिकटलेले असतील. मग कशाला ऐकायला येतंय.
कुणाल : आजी, कंपुटर नाही गं कॉम्प्युटर म्हण.
आजी : तेच ते रे. विषय बदलू नकोस. मी म्हणते, एखाद्यानं बोलावलं तर पटकन यायला काय होतं रे
तुम्हा मुलांना.
कुणाल : ए आजी, अग, खूप महत्त्वाची फाइल सेंड करत होतो..
आजी : तुझी फाइल महत्त्वाची आणि आजी? ती नाही महत्त्वाची?
कुणाल : आजी, काहीतरीच काय बोलतेस?
आजी : काहीतरीच कशाला? अरे, मरताना पाणी मागितलं तर ते काही वेळेवर येऊन घालणार नाहीत
तुम्ही. सरणावर चढल्यावर याल धावत पळत लोटा घेऊन.
कुणाल : आजी, अगं, कुठून कुठे पोचते आहेस.
आजी : कुणाल, अरे हे तुमचं नेहमीचच झालंय. बोलावलं की कधी तुम्ही लगेच येत नाही. तूही तसलाच
आणि ती केतकीही तशीच. हाका मारून मारून आमचा जीव जातो. पण तुमचा पत्ता नसतो. कधी वेळेवर
येणार नाहीत.
कुणाल : अगं पण आम्हीही काही तरी कामात असतो, म्हणून येत नाही.
आजी : अरे, पण कोणी बोलवतंय म्हटल्यानंतर निदान ओ तरी द्यावी. म्हणजे कळतं माणसाला आपली
हाक ऐकू गेली आहे का नाही ते.
कुणाल : ओ दिली की मी. उगीचच काय रागावते आहेस?
आजी : मला तर काही ऐकू आलं नाही. मी आपली वेडय़ासारखी हाका मारत होते. आमचं तरी काय रे
वय झालं आता. म्हातारी खोडं आम्ही. म्हणून तुमची मदत लागते. नाही तर मलासुद्धा कुण्णा कुण्णाकडून
काही करून घ्यायला आवडत नाही. आजपर्यंत केलंच की सगळं आमचं आम्ही.
कुणाल : हो आजी, मी कुठे नाही म्हणतोय. आधीच ती फाईल जात नव्हती. कशीबशी लोड झाली म्हणून
म्हटलं तेवढं काम पूर्ण करावं आणि मगच जावं.
आजी : कसली एवढी कामं असतात रे तुम्हाला?
कुणाल : ते तुला सांगून तरी कळणार आहे का?
आजी : हो रे बाबा. आम्ही अडाणी माणसं. आम्हाला कुठे काय कळतंय? आयुष्यभर हेच ऐकत आलो.
आता ओठ पिळले तर दूध निघेल अशा तुमच्यासारख्या करंगळीएवढय़ा पोरांकडूनही तेच ऐकतो.
कुणाल : आजी,तसं नव्हतं ग म्हणायचं मला.
आजी : तुला काय म्हणायचं होतं आणि काय म्हणायचं नव्हतं मला चांगलं कळतंय हो. आता तुमचे
बोलण्याचे आणि आमचे ऐकण्याचे दिवस. अर्थात असं म्हणायला आमचे दिवस होतेच कधी? इतकी वर्षे
तुझ्या आजोबांनी कधी बोलू दिलं नाही आता तुम्ही बोलू देऊ नका. आमच्या वाटेला हे असंच. कधी
मनासारखं वागताच आलं नाही.
कुणाल : आजी, गोळा गेला पायातला?
आजी : एवढय़ात कुठला जायला! अगदी अंत बघेल आणि मगच जाईल. सुख नाही कधी असं जवळ
राहिलं पण दु:ख मात्र आलं की वस्तीलाच यायचं.
कुणाल : आजी, पाय चेपू? बरं वाटेल बघ तुला.
आजी : असं म्हणतोस? पण तुला तुझं काम नाही? काही तरी काम अर्धवट सोडून आला होतास ना? तू
जा बाबा तुझ्या कामाला नाही तर तेवढं कारण तुला मिळायचं की आजीमुळे काम अर्धवट राहिलं.
कुणाल : आजी, कुठे गं इथे तुझा पाय जास्त दुखतो ना?
आजी : अं हं हं. जरा खालती.
कुणाल : इथे?
आजी : हो रे हो. अगदी तिथेच. हातात जादू आहे रे तुझ्या कुणाल. किती हळुवार हातांनी दाबतो आहेस.
चुकून इंजिनीयरिंगला गेलास. मेडिकलला गेला असतास तर छान डॉक्टर झाला असतास.
कुणाल : आजी, तुला खरं तर डॉक्टर व्हायचं होतं ना गं?
आजी : हो नं. माझी खूप इच्छा होती. पण आमच्या वेळेस कुठे मुलींना शिकवायचे? तुझे पणजोबा म्हणजे
जमदग्नीचा अवतार. सातवीपर्यंत शिकवलं हेच खूप झालं. माझ्या लग्नाची कोण घाई झाली होती त्यांना.
कुणाल : पण मग तू सांगायचस की आजोबांना. ते काही एवढे रागीट नव्हते हं.
आजी : अरे, तुमच्या जन्मापर्यंत खूप मवाळ झाले होते. म्हणून तुला असं वाटतय.
कुणाल : मग लग्नानंतर आजोबांना सांगायचस.
आजी : मलाही असच वाटत होतं की लग्नानंतर शिकायला मिळेल. पण आपल्या एकत्र कुटुंबात अशी
अडकले की सगळ्या इच्छा अपूर्णच राहिल्या.
कुणाल : आजी, कशी गंमत आहे बघ ना. लहानपणी तू माझे पाय चेपायचीस आणि आज मी तुझे पाय
चेपतोय. आता बरं वाटतंय?
आजी : हो रे बाळा, खूप बरं वाटतंय. ती बघ, तुझी आई आलीच. आता तू तुझ्या कामाला गेलास तरी
चालेल हो.
कावेरी : आई, लवकर येते म्हटलं खरं. पण उशीरच झाला बाई. पण तुम्हाला काही त्रास नाही ना झाला?
आजी : अगं, झाला तर, नेहेमीप्रमाणे पायात असा काही जोराचा गोळा आला की, काही विचारूच नकोस.
कावेरी : अगं बाई मग?
आजी : मग काय. तुझ्या लेकानं माझी अगदी छान सेवा केली बघ. मीठ-पाणी आणून दिलं. पाय चेपले. गप्पा मारल्या. शहाणा झालाय हं आता अगदी. तुम्ही उगीचच त्याच्या नावानं खडे फोडता हं..
शुभदा पटवर्धन
shubhadey@gmail.com