Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ जुलै २००९
  सबसे फेवरिट जोडी
  ओपन फोरम
नशिबावर विश्वास आहे का?
  थर्ड आय
.. झुकानेवाला चाहिए
  नेट कॉर्नर
My Times UP?
  मेल बॉक्स
  हेल्थ कॉर्नर
ब्रेस्ट इलॅस्टिसिटी
  स्मार्ट बाय
  दवंडी
हरिश्चंद्राची फॅक्टरी
  ग्रूमिंग कॉर्नर
कारणं सांगू नका.. काम दाखवा
  आवजो- चौखी दाणी!
  दिशा
स्लिम इन्स्टंट
  फुड कॉर्नर

सबसे फेवरिट जोडी
‘तुमच्या प्रयत्नातकसूर करू नका. परीक्षा आणि निकालांना सामोरं जाताना एक सूत्र नेहमी लक्षात ठेवा की, परीक्षेतलं यश म्हणजे ९० टक्के प्रयत्न आणि १०% नशीब..’ ते बोलता बोलता म्हणाले. गेल्या काही दिवसांतली ९०:१० ची ही ‘सबसे फेवरिट जोडी’ अशी अचानक समोर आल्यावर तिथे एकच खसखस पिकली. शाळा, कॉलेज, परीक्षा, रिझल्ट यांच्याशी संबंधित कुठलीही चर्चा या ९०-१० च्या जोडगोळीशिवाय पूर्ण होतच नाही की काय? दिवस असतात एकेकाचे.. दुसरं काय! नाहीतर या दोन आकडय़ांना अचानक इतकं महत्त्व कसं प्राप्त झालं असतं?
सुजाता
मागच्या बुधवारी आमच्या शाळेत नववी- दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवसाचं चर्चासत्र होतं. (त्याच त्याच विषयांवर ‘सतरा’ वेळा चर्चा करायची असेल की त्याला चर्चा ‘सत्र’ म्हणतात- ही त्या शब्दाची फोड अर्थातच ‘की’ची!) विषय होता ‘परीक्षा आणि निकालांना तोंड कसं द्यावं’. त्या दिवशी शाळेचे रोजचे तास झाले नाहीत. घरी दादानं त्यावरून उगीच

 

कावकाव केली- ‘नववीला कशाला हवं ते डॅम सेमिनार?’ (कॉलेजला जातो म्हणून चर्चासत्र शब्द वापरायची याला लाज वाटते; ‘डॅम सेमिनार’ म्हणे!).. ‘आमच्या वेळी कुठे होतं असलं काही?’.. (मग मी काय करू त्याला?).. ‘उगीच शाळा बुडवून तिथे फालतूपणा करत बसणार तुम्ही!’ (हा सुट्टीच्या दिवशी एक्स्ट्रा लेक्चरच्या नावाखाली कॉलेजमध्ये काय करायला जातो ते विचारा ना याला!)..
पण दादाचं एक मात्र बरोबर होतं- दहावीला परीक्षेची तयारीबियारी करावीच लागते पण नववीला कशाला? पण तिथे जावं तर लागलंच आम्हाला. नववी- दहावीच्या सगळ्या तुकडय़ा आणि सगळे शिक्षक दिवसभर तिथेच होते. आमचे आणि अजून दोन शाळांचे मुख्याध्यापक आले होते. भाषणाद्वारे मार्गदर्शन करायला (किंवा मार्गदर्शनपर भाषण ठोकायला)! सगळ्यांनी आपापल्या भाषणात काही चांगले (आणि बरेच घिसेपिटे) मुद्दे मांडले. शिवाय डॉ. सारंग सातोस्कर (ऊर्फ डबल एस्स- हे आम्ही ठेवलेलं नाव!) म्हणून एक मानसोपचार तज्ज्ञपण आले होते. ते मात्र छान बोलले. परीक्षेचा आणि निकलांचा अती ताण येऊ नये म्हणून काय काय करता येईल ते सांगण्यावर त्यांचा भर होता. ‘कुठल्याही कामाच्या बाबतीत थोडाफार ताण हा हवाच, पण तो थोडासाच हवा’ असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या मते ताण यायचाच असेल तर तो एकवेळ परीक्षेचा, पेपर अवघड जाणार की सोपा याचा येऊ दे, पण निकालांचा नको! पालक आणि शिक्षकांनी सतत मागे लागण्यापेक्षा विद्यार्थ्यांनीच आपापली जबाबदारी ओळखून अभ्यास करण्याची कशी गरज आहे ते त्यांनी पटवून देण्याचा- चांगला- प्रयत्न केला.
‘तुमच्या प्रयत्नातकसूर करू नका. परीक्षा आणि निकालांना सामोरं जाताना एक सूत्र नेहमी लक्षात ठेवा की, परीक्षेतलं यश म्हणजे ९० टक्के प्रयत्न आणि १०% नशीब..’ ते बोलता बोलता म्हणाले. गेल्या काही दिवसांतली ९०:१० ची ही ‘सबसे फेवरिट जोडी’ अशी अचानक समोर आल्यावर तिथे एकच खसखस पिकली. शाळा, कॉलेज, परीक्षा, रिझल्ट यांच्याशी संबंधित कुठलीही चर्चा या ९०-१० च्या जोडगोळीशिवाय पूर्ण होतच नाही की काय? दिवस असतात एकेकाचे.. दुसरं काय! नाहीतर या दोन आकडय़ांना अचानक इतकं महत्त्व कसं प्राप्त झालं असतं?
पण हेच दोन आकडे का? ८० आणि २० का नाही? किंवा ९५ : ५ का नाही? दुसऱ्या दिवशी मधल्या सुट्टीत मग आम्ही आपापसात याच विषयावर चर्चासत्र आयोजित केलं. शाळेच्या चर्चासत्रात ‘परीक्षेला जोखड मानू नका, तिला निर्धारानं सामोरं जा’, ‘पुढच्या यशस्वी आयुष्याची ही पायाभरणी असते’ वगैरे सुविचार कानावर पडले. आमच्या चर्चासत्रातून काही गोंधळवून टाकणारे मुद्दे समोर आले.. म्हणजे असं बघा, त्या डबल एस्स नी सांगितलेल्या सूत्रानुसार ९०:१० कोटय़ापैकी ९० टक्क्यात जागा मिळवायची तर नशीबाचा भाग वाढेल.. प्रयत्न आणि नशीब यांचं गुणोत्तर ८५:१५ असं होईल! (ते ८५:१५ होईल की ८०:२० यावर आमचं एकमत होईना!) अजून एखाद्या चर्चासत्रात कुणी तरी अजून एखादं असलंच तर सांगेल. अशा पाच-सहा सूत्रांत बघता बघता हे ९०:१० चं प्रमाण ५०:५० वर येऊन पोहोचेल.. काही सांगता येत नाही! (पाच-सहा सूत्रांतच प्रमाण ५०:५० वर येईल की नाही ते आम्ही युनिट टेस्टनंतरच्या आमच्या पुढच्या चर्चासत्रात ठरवणार आहोत.)
शेवटी मुद्दा हा की जर ९०:१० हे प्रमाण ५०:५० वर आणणं शक्य आहे तर हे लोक ती जास्तीची पाच-सहा सूत्रं शोधायची सोडून चर्चासत्रं वगैरे भरवण्यात वेळ का घालवतात? त्यापेक्षा आम्हाला आमच्या आमच्या पद्धतीनं अभ्यास करू दे की!
कीर्ती
‘ए, कसं झालं गं ते सेमिनार?’ हिंदी अस्मितानं उत्सुकतेनं विचारलं.
‘सेमिनार काय? चर्चासत्र म्हण, चर्चासत्र!’ सुजी म्हणाली.
‘तेच ते गं! कसं झालं सांग ना..’
‘९०% बोअर, १० % चांगलं?’ मराठी अस्मितानं सेमिनारचा निकाल जाहीर केला.
‘इसको क्या हो गया? अशी अचानक टक्केवारीत का बोलायला लागलीस, गं?’ हिंदी अस्मितानं काहीही न कळून विचारलं.
तिचा झालेला माठ चेहरा बघून आम्हाला हसू यायला लागलं..
हिंदी अस्मिता आजारी असल्यामुळे तीन-चार दिवस शाळेत आली नव्हती. सेमिनारलाही ती येऊ शकली नाही. तिला भेटायला म्हणून रविवारी संध्याकाळी आम्ही तिच्या घरी गेलो होतो. नुकतीच तिची मावशी अमेरिकेहून आली आहे. तिनं अस्मितासाठी तिकडून काय काय आणलंय ते पण पाहायचंच होतं आम्हाला. शिवाय काल युनिट टेस्टचं टाईमटेबल मिळालं तेही तिला द्यायचं होतं, असा आमचा खरं म्हणजे फुल्ल डे प्रोग्रॅम होता पण दरम्यान बुधवारी ते शाळेतलं सेमिनार झालं. बुधवारी गणिताचे दोन तास असतात. ते बुडालेले तास भरून काढण्यासाठी गणिताच्या सरांनी रविवारी दुपारी दोन एक्स्ट्रा लेक्चर्स ठेवली. गणिताचे राणे सर पोर्शन कधीही वेळेवर पूर्ण करत नाहीत आणि मग एक्स्ट्रा लेक्चर्स घेत बसतात. त्यात या वेळेला त्या सेमिनारचंही निमित्त झालं. शेवटी ती एक्स्ट्रा लेक्चर्स संपवून मग आम्ही संध्याकाळी हिंदी अस्मिताच्या घरी जमलो..‘आता अशा ९०-१० च्या भाषेतच बोलायचं सगळ्यांनी!’
‘का?’
‘आपल्याला दहावीनंतर ९०:१० च्या कोटय़ाला सामोरं जायचंय की नाही? मग त्याची आतापासून सवय नको का व्हायला? सेमिनार काय उगीच ठेवलं होतं का शाळेनं?’
‘काही सांगता येत नाहीऽऽ! इजा-बिजा झालं, पुढच्या वर्षी कुठला तरी तिजा उपटेल अचानक.’
‘म्हणजे?’
‘म्हणजे, मागच्या वर्षी पर्सेटाईल झालं, यंदा ९०:१०.. आता आपल्या अॅडमिशनच्या वेळेला नवीन काहीतरी नियम काढतील!’
‘तरीही ९०-१० ही जोडी अतिशय महत्त्वाची आहे आणि त्याला इतरही अनेक कारणं आहेत..’
‘कुठली?’ अजूनही हिंदी अस्मिताच्या डोक्यात फारसा प्रकाश पडला नव्हता!
‘दहावीला नव्वद टक्क्यांवर मार्क्स मिळवणारे दहा टक्केच असतात.’
‘असंच काही नाही काही. जास्त सुद्धा असू शकतात..’ ही प्रज्ञा तर ना, नाही तिथे चुका काढत असते.
‘..इतरांचा नव्वद टक्के अभ्यास झालेला असतो आणि दहा टक्के त्यांनी ऑप्शनला टाकलेला असतो!’
‘दहावी म्हणजे आपली शाळेची नव्वद टक्के र्वष संपत आलेली असतात आणि दहा टक्के उरलेली असतात.’
‘त्या दिवशी सेमिनारला आपल्या पाचजणींपैकी चारजणी हजर होत्या आणि तू एक आली नव्हतीस’, आता प्रज्ञाचा मेंदूही कामाला लागला..’ म्हणजे ते प्रमाणही ९०:१० झालं.’
‘ओ, गणित विशारद! चारास एक म्हणजे ९०:१० नाही, ८०:२० होतात.’ सुजी तोंडी गणितात ९० टक्के एक्सपर्ट आहे. (..आणि लेखी गणितात १०%!)
आमची ही अशी चटरपटर चालू असताना तिथे हिंदी अस्मिताचा पाच-सहा वर्षांचा मावसभाऊ मयूर दुडदुडत आला. हा मयूर जाम गोंडस, गोजिरवाणा आहे. मागे एकदा आम्हाला हिंदी अस्मितानं त्याचे ई-मेलमधून आलेले फोटो दाखवले होते.
‘ए, हा फोटोतल्यापेक्षा किती वेगळा दिसतोय आता!’ सुजी त्याचा गालगुच्चा घेत म्हणाली.
‘तो ९०% त्याच्या आईसारखा दिसतोय.’ मराठी अस्मिता.
‘..आणि उरलेला १०% त्याच्या बाबांसारखा दिसत असणार!’ मी सूत्र पूर्ण केलं.
आम्ही एकमेकींना टाळ्या देत जोरजोरात हसायला लागलो. मयूरला वाटलं आम्ही त्यालाच हसतोय. त्यानं अचानक भोकांड पसरलं आणि ‘ममाऽऽ’ म्हणत बाहेर त्याच्या आईकडे धाव घेतली.
‘हा दहावीत जाईपर्यंत कदाचित दहावीच्या परीक्षा रद्दच झाल्या असतील कायमच्या..’
‘जन्मापासून अमेरिकेत वाढलेला, आईला ‘ममाऽऽ’ म्हणणारा तो! तो दहावीच्या परीक्षेला इथे भारतात कशाला थांबेल?’ सुजीचा मुद्दा बरोबर होता.
‘..तुझ्या मावशीला एकदा विचारलं पाहिजे आपल्या १० + २ + ३ किंवा ९०:१० सारख्या तिकडे काय काय पद्धती असतात ते.’
‘ते विचारू गं नंतर कधी तरी, त्यासाठी आपल्याकडे अजून एक अख्खं वर्ष आहे! आधी मावशीनं माझ्यासाठी तिकडून ‘पर्सनल ग्रूमिंग किट’ आणलंय ते दाखवते तुम्हाला..’ असं म्हणत हिंदी अस्मिता उठली.
‘ग्रूमिंग किट? म्हणजे?’
‘अगं, म्हणजे त्यात ९०% मेकअपचंच सामान असतं. १०% इतर सटरफटर..!!’ ते किट उघडत तिनं उत्तर दिलं.
सेमिनारमध्ये काय काय कसं कसं झालं ते तिला आता बरोबर कळलं होतं..!
प्रीती छत्रे
p.pacpac@gmail.com