Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ जुलै २००९
  सबसे फेवरिट जोडी
  ओपन फोरम
नशिबावर विश्वास आहे का?
  थर्ड आय
.. झुकानेवाला चाहिए
  नेट कॉर्नर
My Times UP?
  मेल बॉक्स
  हेल्थ कॉर्नर
ब्रेस्ट इलॅस्टिसिटी
  स्मार्ट बाय
  दवंडी
हरिश्चंद्राची फॅक्टरी
  ग्रूमिंग कॉर्नर
कारणं सांगू नका.. काम दाखवा
  आवजो- चौखी दाणी!
  दिशा
स्लिम इन्स्टंट
  फुड कॉर्नर

ओपन फोरम
नशिबावर विश्वास आहे का?
असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी आणि दैव देतं पण कर्म नेतं या दोन टोकाच्या म्हणी नशिबावर विश्वास ठेवावा की मेहनतीवर या बाबतीत पार गोंधळ उडवतात. आजची तरुणाई ही खूप प्रॅक्टिकल आहे. मेहनतीवर भर देते. असं म्हटलं तरी नशिबाशी जोडलेले धागे-दोरे ही तरुणाई नाकारत नाही. कधी मेहनत तर कधी नशिब हेच आपल्या यशाचं किंवा अपयशाचं गमक असल्याचं हे तरुण सांगतात. या काही बोलक्या प्रतिक्रिया..

 

प्राजक्ती पै (इंटिरिअर डिझायनर)
माझा नशिबावर विश्वास नाही. त्याचा फारसा विचारही करु नये असं मला वाटतं. नाहीतर त्याचा परिणाम आपल्या मेहनतीवर होतो. एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून लोक नशिबाला दोष देतात. मला हे एक प्रकारचं डिफेन्स मेकॅनिझम वाटतं. नशिबामुळे यश पदरात पडेल की नाही याची खात्री नसते. पण मेहनतीने थोडंतरी यश मिळतंच. याची मला खात्री आहे. माझ्या मते आपल्या कर्तृत्वानेच आपलं नशिब बनतं.

स्वप्निल पवार (इंजिनीअरिंग)
माझ्या मते फक्त दोन टक्के भाग नशिबाचा असतो. बाकी सगळी मेहनत. आपण कुठे, कशा ठिकाणी जन्म घेतो हे नशिबावर अवलंबून असतं. पण पुढे आपण जे अचिव्ह करतो ते मेहनतीच्याच बळावर. जे जमत नाही, मिळवता येत नाही त्यासाठी नशिबाला दोष देऊ नये. मी नेहमी मेहनतीला प्राधान्य देतो. नशिब माझ्यासाठी दुसऱ्या स्थानावर आहे. प्रेमात अजून पडलो नाही पण ते नशिबावर सोडलय.

समीर रेवंडकर (डी.टी.पी. ऑपरेटर)
माझा नशिबावर विश्वास आहे. प्रमाण काढायचं म्हटलं तर ३० टक्के नशिब आणि ७० टक्के मेहनत हे प्रमाण सगळ्यांनाच नसलं तरी बऱ्याच गोष्टींना लागू होतं. नोकरीच्या बाबतीत मेहनत जास्त महत्त्वाची असते. आणि अभ्यासाच्या बाबतीत तर १०० टक्के मेहनत फळाला येते. प्रेमासारखे नातेसंबंध मात्र १०१ टक्के नशिबावरच अवलंबून असतात. तसंच २६ जुलै, बॉम्बस्फोट अशा संकटांमध्येही नशिब चांगलं असेल तरच आपण वाचतो.

श्रद्धा मालवणकर (एम.एस.सी.)
माझा नशिबावर विश्वास आहे. नोकरी करिअरच्या बाबतीत म्हणायचं झालं तर हे प्रमाण ५०-५० टक्के आहे. असं मला वाटतं. पण काही गोष्टींमध्ये उदाहरणार्थ रिलेशनशिप्समध्ये समोरच्या व्यक्तीला आपण आवडू न आवडू हे नशिबावरच सोडावं लागतं. त्यासाठी मेहनत तर करण्याची गरज नसते. पण बाकी सगळ्या गोष्टी आपल्या टॅलेन्टवर अवलंबून असतात.

अवधूत काबाडे (मार्केटिंग, फार्मास्युटिकल)
प्रत्येक गोष्टीत १० टक्के नशिब आणि ९० टक्के मेहनत असते. पण हे १० टक्के उरलेल्या ९० टक्क्य़ांना भारी पडू शकतात. मेहनत करुन यश मिळणार असा दृढ विश्वास ठेवावा पण हे फळ कधी मिळेल हे मात्र नशिबावर अवलंबून असतं. एखाद्या कामात कधी कधी मेहनतीशिवाय अनपेक्षितपणे यश मिळतं. आपण त्यासाठी काहीच केलेलं नसतं. पण केवळ मेहनतीच्या जोरावर असं काही मिळत नसतं. नशिबाची साथ असावीच लागते. हां, पण जेव्हा एखादं लांबचं ध्येय गाठायचं असतं, तेव्हा सततची मेहनत अधिक महत्त्वाची ठरते. उदाहरणार्थ प्रमोशन.