Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ जुलै २००९
  सबसे फेवरिट जोडी
  ओपन फोरम
नशिबावर विश्वास आहे का?
  थर्ड आय
.. झुकानेवाला चाहिए
  नेट कॉर्नर
My Times UP?
  मेल बॉक्स
  हेल्थ कॉर्नर
ब्रेस्ट इलॅस्टिसिटी
  स्मार्ट बाय
  दवंडी
हरिश्चंद्राची फॅक्टरी
  ग्रूमिंग कॉर्नर
कारणं सांगू नका.. काम दाखवा
  आवजो- चौखी दाणी!
  दिशा
स्लिम इन्स्टंट
  फुड कॉर्नर

थर्ड आय
.. झुकानेवाला चाहिए
आपल्याच स्वप्नरंजनात रममाण असणाऱ्यांना डोळे उघडायला लावणारं सदर ‘थर्ड आय’.
फोटोग्राफी हा माझा पोटापाण्याचा व्यवसाय! पापी पेट का सवाल!! मग कॅमेऱ्यातून बघताना मला एक डोळा बारीक करावा लागतो, नतंर मात्र त्या लेन्सद्वारे दोन्ही डोळ्यांनी एकत्र पाहिल्यावर जसं दिसतं, तसं ते चित्र मी टिपतो. पण मग तो बारीक केलेला डोळा- म्हणजे ‘थर्ड आय’ म्हणा हवं तर- तो उघडला की जे दिसतं, ते चित्र मात्र कधी कधी भयानक, धक्कादायक असतं. म्हणजे

 

एकतर इतरांनी न पाहिलेलं किंवा बघून नजरेआड केलेलं असतं. म्हणून तर हा सगळा उपद्व्याप! आपल्याच स्वप्नरंजनात रममाण असणाऱ्यांना, डोळे उघडायला लावणं वगैरे, वगैरे..
पण कधी कधी इतरांनीही न पाहिलेलं हे सत्य, अद्भुत, अविस्मरणीयसुद्धा असतं, पण हे सत्य कॅमेऱ्यात टिपता येण्यासारखं नसतं. ते अनुभवावंच लागतं आणि मग ते जगाला ओरडून सांगावंसं वाटतं, एक जळजळीत धडधडीत सत्य! पण ज्यांना भयानक आणि धक्कादायक चित्र दिसतंय ते बघूनही त्याकडे दुर्लक्ष का करत असतील? काही घडत असताना ते नजरेआड का करत असतील? काणाडोळा का करत असतील? की त्यांना संवेदनाच नाहीत? का कोणाला घाबरून ते असे वागत असतील? आपल्याच खाली जळत असलं तरी आपण गप्प बसायचं का?
गेल्या गुरुवारी, ‘कोण तो शेक्सपिअर’ हा लेख छापून आल्यावर, कोण्या एका शूरवीराने मला समजुतीचा सल्ला देण्याचा प्रयत्न केलाय. माफ करा, खरं तर सबुरीचा सल्ला! ‘समुद्रसेतू’ला नाव देणं इतकंच खुपत असेल, तर मग काय त्या पुलाला तुमच्या बापाचं नाव द्यायचं का?’ असं विचारलं त्या शूरवीराने! माझ्या तीर्थरूपांचं स्मरण केल्याबद्दल त्या शूरवीराला माझा सलाम! पण माझ्याच काय, कोणाच्याच बापाचं नाव, सार्वजनिक स्थळे, रस्ते व पुलांना देता येत नाही असा सरकारी नियम आहे. १५ फेब्रुवारी २००० पासून शासनाच्या स्वत:च्या निर्णयानुसार निर्णय क्र ‘आरओडी’- ०९९ (२९२/९९) रस्ते- ४’ या आदेशानुसार कोणत्याही मान्यवराचे नाव कोणत्याही रस्त्याला वा पुलाला देताच येत नाही.
‘माहितीचा अधिकार’ प्राप्त करण्याची जबाबदारी काही फक्त अण्णा हजारेंचीच आहे असं नाही? तुम्ही-आम्हीसुद्धा तो प्राप्त करू शकतो. शासनानेच असा निर्णय घेतला असताना, नावावरून, कोंबडय़ाची झुंज लावायचे उद्योग का आणि कोण करतं? मग आपलेच आदेश बासनात गुंडाळून ठेवून, बोंबा मारणाऱ्या मंडळींना, आगलावे मंडळी नाही म्हणायचं तर काय म्हणायचं?
पण का वागतात ही राजकारणी मंडळी अशी? कारण ज्या जनतेकडे त्यानी लाचार होऊन मतांचा जोगवा मागितला, ती जनता मूग गिळून बसणारी आहे म्हणून? का त्या राजकारण्यांना स्वत: लाचार होऊन, दुसरं काही पदरात पाडून घ्यायचा हव्यास असतो म्हणून?
बहुधा आपली सर्वसामान्य जनता, फार दुधखुळी आहे, हे त्यांना ठाऊक आहे. कोणत्याही क्षेत्रातल्या सर्वसामान्य जनतेला, फार प्रेमानं ‘अनुदानाचा’ तुकडा भिरकावला की, त्या अनुदानाची ‘हाडं’ चोखून ती जनता षंढ होते. हे या राज्यकर्त्यांनी चांगलंच ओळखलंय. मग ते साहित्यक्षेत्र असो, नाटय़क्षेत्र असो, शिक्षणक्षेत्र असो किंवा धर्मक्षेत्र असो. राज्यकर्त्यांना हे अनुदान नावाचं ‘डॉग फूड’ चांगलंच परवडतं.
आणि मग आपलीही प्रामाणिक मंडळी, अशी अनुदानाची हाडं चावण्यात गुंतली की, साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वारापासून, नाटय़गृहापासून ते विद्यालयापर्यंत आम्ही या राज्यकर्त्यांच्याच नावाचा गजर करत राहतो. विठ्ठलाच्या पूजेचा पहिला मानसुद्धा, सर्वसामान्य भक्ताला न देता, लाल दिव्याच्या गाडीवाल्यांना देतो. मग इतकी लाचारी, स्वेच्छेने पत्करल्यावर त्या आपल्या ‘अन्नदात्यां’ना दोष देण्यात काय अर्थ आहे?
ऐपत नसेल तर साहित्य- नाटय़ संमेलनं भरवू नका, हिंमत असेल तर, नाटय़गृहांना आद्य नाटककारांची, विमानतळांना जे.आर.डी. टाटासारख्यांची नावे द्या. विज्ञान केंद्र आणि तारांगणाला खगोल शास्त्रज्ञांची नावे द्या.आपल्या भावी पिढीला आपल्या भारतीय संस्कृतीची, भारतीय संशोधकांची, भारतीय शास्त्रज्ञांची, आपल्या पूर्वजांची, आपल्या दिग्गजांची त्या निमित्ताने ओळख करून द्या.
अजून किती दिवस आपण आपल्याच स्वप्नात रममाण होऊन राहायचं? इथं शहरात बसून आपल्याला विजेच्या वाढत्या दराची काळजी आहे की एस.एस.सी., आय.सी.एस.ई. याची काळजी आहे, बर्गर की शिववडा याची चिंता आहे, माहिमच्या आणि मिठी नदीच्या काठावरचे अनैतिक धंदे आणि बांधकामं, पावसाच्या तडाख्यानं वाहून जातील याची भीती आहे.
आणि आमचे शासनकर्ते, राज्यकर्ते, लोकप्रतिनिधी, त्या शेक्सपिअरलाही वेडय़ात काढून आमचं लक्ष दुसरीकडे वळवतायत. आपल्याला त्या नावांच्या भेंडय़ा खेळायला लावून, राज्यातल्या मिट्ट काळोखाला विसरायला लावतायत. आय.सी.एस.ई. किंवा एस.एस.सी.च काय पण शिक्षक पगाराविना संसार चालवतायत, हे विसरायला लावतायत, बर्गर- शिववडाच काय, पण शाळेच्या मुलांचा शिधा आणि दूध ग्रामपंचायतीच्या किंवा जिल्हाध्यक्षांच्या नरडय़ात जातेय, हे विसरायला लावतायत.
कारण आपण सारे हळूहळू आपल्याच स्वप्नरंजनात रममाण होतोय का काय? पण तसं नका होऊ देऊ. डोळे उघडे ठेवूया, नाही तर या राज्याला ‘षंढराज्य’ आणि या देशाला एखाद्या ‘कुटुंबाचं’ नाव लागून, एका वेगळ्याच भारतीय संस्कृतीचं आणि परंपरेचं दर्शन घडवायची लाचारी आपल्यावर येईल.
संजय पेठे
sanjaypethe@yahoo.com