Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ जुलै २००९
  सबसे फेवरिट जोडी
  ओपन फोरम
नशिबावर विश्वास आहे का?
  थर्ड आय
.. झुकानेवाला चाहिए
  नेट कॉर्नर
My Times UP?
  मेल बॉक्स
  हेल्थ कॉर्नर
ब्रेस्ट इलॅस्टिसिटी
  स्मार्ट बाय
  दवंडी
हरिश्चंद्राची फॅक्टरी
  ग्रूमिंग कॉर्नर
कारणं सांगू नका.. काम दाखवा
  आवजो- चौखी दाणी!
  दिशा
स्लिम इन्स्टंट
  फुड कॉर्नर

मेल बॉक्स
बलात्कारविरोधी नवीन कायदा हवा
शुभदा रानडे यांनी ‘ती’ या लेखाद्वारे बलात्कारी स्त्रीची बलात्कारानंतर होणारी फरफट योग्य रीतीने मांडून समाजाचा या प्रश्नासंदर्भातला दृष्टिकोन अधोरेखित केलाय, तो योग्यच आहे. आपला समाज स्वत:ला कितीही सुधारित समजत असला तरी स्त्री बलात्काराबाबत आज एकविसाव्या शतकातही तो तसूभरदेखील सुधारलेला नाही हे आपलं दुर्दैवच म्हणायला हवं. यातही जेव्हा एक स्त्री दुसऱ्या बलात्कारी स्त्रीचं दु:ख समजून घेताना दिसत नाही तेव्हा आश्चर्याबरोबर दु:ख होतं. या लेखानिमित्ताने एक पुरातन गोष्ट

 

आठवली, देवांचा राजा इंद्राने गौतम ऋषींच्या रूपात येऊन अहिल्येचा उपभोग घेतला. या कथेनुसार अहिल्येने मायावी इंद्राला न ओळखता त्याला आपला पती समजून साथ दिली असली, तरी अहिल्या इंद्राच्या या कपटकारस्थानाबाबत पूर्णत: अनभिज्ञ होती. पण गौतम ऋषींना या गोष्टीची जाणीव होता त्यांचा शाप युगानुयुगे शिळेच्या रूपात भोवला तो निष्पाप अहिल्येला. आता या पुरातन कथेतही अहिल्येची चूक कोणती? इंद्राने अहिल्येवर केलेला तो बलात्कारच नव्हता का? कारण तो तिच्या मनाने समजून उमजून झालेला संग नव्हता तर ती एक फसवणूक होती. पण भोगावं लागलं अहिल्येला. पुन्हा इंद्र देवांचा राजा म्हणून युगानुयुगे मिरवतोच आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत अशा किती तरी ‘अहिल्या’ आजही समाजात जिवंत शिळेच्या रूपात रोज तीळ तीळ मरताहेत. काही पुरुषांमधल्या नराचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा निव्वळ मादीच्या रूपातच असतो आणि मादी ही नराला भोगण्यासाठीच जन्माला आलेली आहे हा समज युगानुयुगे चालत आलेला आहे. फक्त यात युगे आणि पात्रे बदलली आहेत, एवढंच. त्या काळी इंद्र होता आज त्याच जागी शायनी आहुजा आहे. वृत्ती तीच नराची, स्त्रीच्या शरीरावर बलात्कार होतो त्याआधी सर्वप्रथम तो तिच्या मनावर प्रचंड आघात करून, तिच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवून मगच शरीर ओरबाडतो, त्या वेळी होणाऱ्या स्त्रीच्या शारीरिक वेदना कालांतराने शमत असल्या तरी समाजाच्या भोचक नजरेतून तिची सुटका नसते. बलात्कार कायद्याने सिद्ध झाल्यास बलात्कार करणाऱ्या पुरुषाला जास्तीत जास्त शिक्षा सात र्वष आणि ती भोगून तो पुन्हा तुरुंगाबाहेर आल्यावर पुन्हा एका नव्या सावजाची शिकार करण्यासाठी मोकळा. यावर उपाय एकच. बलात्कारसंबंधातले गुन्ह्य़ांचे कायदे आता कालबाह्य़ झालेत, ते रद्द करून नवीन कायदे आणि तेही स्त्रियांनीच बनविले पाहिजे. त्यात एकाही पुरुषाचा समावेश नको. यात एका जरी पुरुषाचा समावेश झाला तर मग नवीन कायद्यातही पळवाट निर्माण झालीच म्हणून समजा. कारण आज अस्तित्वात असलेले कायदे पुरुषांनीच तर बनविले आहेत. याच कायद्यात ‘पुरुष’ नाटकातली पुरुषाला झालेली सजा तर या मनोविकृतीवर जालीम इलाज ठरू शकेल. मग बलात्कार करणाऱ्या पुरुषाला कळेल की रोज मरणयातना म्हणजे काय ते. इतरही पुरुष हा गुन्हा करताना लाख वेळा विचार करेल. तसेच या शिक्षेमुळे एक निश्चित होईल निदान शिक्षा भोगून आलेला पुरुष तरी हा बलात्काराचा गुन्हा पुन्हा करू शकणार नाही.
कमलाकर सुधाकर पंडित, गिरगाव.

तो
त्याने बलात्कार केला होता. त्याला अटक झाली. केस फाईल झाली. कोर्टासमोर उभे केले गेले. प्रश्न-प्रतिप्रश्न सुरू झाले. त्याने बेलसाठी याचना केली. ‘मी चांगल्या घरातला आहे, म्हणून तरी मला बेल द्या’ त्याने विनंती केली. स्वत:ची बाजू पटवून द्यायचा प्रयत्न केला. पण मुळात त्याने असे केलेच का? चांगल्या घरातला आहे हे तो तेव्हा विसरला होता का? तो संसारीदेखील आहे, हेदेखील तो विसरला होता का? काय कारण होते? काय गरज होती? इतका मोठा अपराध करायला तो धजावलाच कसा? मनात एकदाही विचार आला नाही की आपण नेमके काय करतोय? का तेव्हा वाटले आपल्याला कोण जाब विचारणार? आपण बडे आहोत, स्टार आहोत.
असे कृत्य करणारा तो पहिलाच नाही किंवा अखेरचाही नाही. आजवर अनेक मोठय़ा हस्ती मोठमोठय़ा गुन्ह्य़ांत सामील होत्या. कोणी देशद्रोह केला. कोणी नशेत माणसांचा जीव घेतला, तर आता याने रेप केला. का वागले ते असे? का वागला तो असा? हा प्रश्न केवळ त्यालाच नाहीये; त्या सर्वाना आहे ज्यांनी अशी कृष्णकृत्ये केली. कधी पोलीस, कधी बाप, कधी शिक्षक तर कधी आणखीन कोणी. प्रत्येक नात्यात, प्रत्येक पेशात एकतरी तो दडलेला आहेच, जो असे पाप करतो.
आपल्या साध्या रूटीनमध्येही आपल्याला तो दिसतो. ट्रेनमध्ये भरगर्दीत ती बिचारी नाइलाजाने जनरल डब्यात चढलेली असते. तिथेही तो काहीना काहीतरी फायदा घ्यायचा प्रयत्न करतोच. भरगर्दीत निर्धास्तपणे स्वत:चा हेतू साध्य करू पाहतो. ती काहीच करू शकत नाही. तो मस्तपणे जेवढा जमेल तितका फायदा घेतो आणि स्टेशन आले की उतरून जातो. तेव्हा आपण कदाचित बघून न बघितल्यासारखे करतो आणि नुसतेच गप्प बसतो. तो आपल्यामधलाच एक असतो पण आपल्यासारखा नसतो.
त्याचा हा चहाटळपणा बघून आपल्याला मनोमन चीड येते, संताप येतो, त्याला रोखावेसे वाटते, पण बहुतांश वेळेला जाऊ देत, आपण एकटेच कशाला मध्ये पडा असे म्हणत सगळेच जण शांत बसतात. म्हणूनच त्याची हिंमत वाढते, आणि एक दिवस त्याची मजल बलात्कारापर्यंत जाते. कॉलेजमधल्या शेमडय़ा पोरांमध्येही एक निगरगट्ट तो असतो. हव्या असणाऱ्या मुलीने नाही म्हटले तर तो हरप्रकारे तिला त्रास देतो. तिच्या इतर मित्रांना इजा पोहोचवतो. ब्लँक कॉल्स, इव्ह टिझिंग सगळे काही करतो. ती बिचारी बहुतेकदा गप्प राहते. इतर मुलेही लफडय़ात न पडणेच पसंत करतात. तो मात्र निर्लज्जपणे त्याचे काम करत राहतो आणि एकंदरीतच आपोआप कंटाळा आला की नाद सोडून देतो. बघा, तो किती ठिकाणी आहे ते. तो खरेतर आपल्यातही आहे, पण आपण त्याच्यावर संस्कारांचे, चांगुलपणाचे, सभ्यतेचे, सुसंस्कृतपणाचे लगाम घातले आहेत. म्हणूनच तर तो आटोक्यात आहे. पण ज्यांच्यावर असले लगाम नाहीत ते तर मोकाट सुटले आहेत. ज्यांच्यावरच्या लगामाची पकड ढिली ते सर्वच धोकादायक आहेत. त्यातलाच एक शायनी आहे, कोणी सुनील मोरे तर कोणी आणखीन कोणतरी.
तो स्वैराचार करतो, पकडला जातो आणि कधी कधी चक्क शिक्षाही भोगतो. पण त्याने खरंच त्याची मनोवृत्ती बदलते का? ‘तो’ ही मनोवृत्ती आहे. आपण अजूनही तिला विक का मानतो? तिला वडिलांच्या आधाराची, नवऱ्याच्या बाहूंची खूपच आवश्यकता आहे, तिला उडायला आपलीच गरज आहे हा आपला गैरसमज तर नाही? सर्व समान हक्क लाभलेली भारतीय स्त्री निराधार, बेबस, विक आहे? सर्व क्षेत्रांवर आघाडीवर असलेली ही स्त्री डिपेंडंट आहे? या देशातच एक स्त्री पंतप्रधान झाली आणि उत्तम प्रशासक बनली. या देशातच एक स्त्री राष्ट्रपती झाली, या देशातलीच स्त्री अंतराळात गेली, वीरमरण मेली. तरीही ती अजून नाजूकच आहे? तिच्यात काहीच कणखरपणा नाही? का आपली मनोवृत्तीच चुकीची आहे? आपल्या नजरेत दोष आहे?
तो वाटेल तसा वागतो. ती बिचारी केविलवाणी होऊन दाद मागते. त्याला शिक्षाही होते, पण तिचा केविलवाणेपणा जात नाही. कारण आपण तो जाऊ देत नाही. दाद फक्त तिनेच मागावी? मोर्चे फक्त तिनेच काढावेत? शीलभंग तिचाच व्हावा ?आपल्यातल्याच कोणी तरी असा गुन्हा केला, आपल्याच देशातल्या एका व्यक्तीवर अन्याय झाला म्हणून केवळ आपण सगळेच दाद का मागत नाही? अन्यायाला वाचा का फोडीत नाही? तिला केविलवाणे होऊ देण्यापेक्षा तिला सामना करायला मदत का करीत नाही?
मित्रहो, वाचकहो, हे कोणते तत्त्वज्ञान किंवा idealism मी सांगण्याचा प्रयत्न करीत नाही. हे फक्त आत्मपरीक्षण आहे. असे काही घडल्यावर एक सामान्य माणूस म्हणून, एक नागरिक म्हणून तुम्हालाही सात्त्विक संताप येतच असेल, स्वत: पुरुष असून त्या नराधमाचा राग येत असेल, त्याचे वागणे खटकत असेल, तिच्याविषयी मनात हळहळ वाटत असेल. पण त्यावेळेला त्याला हे सगळे कुठे कळणार आहे? त्याच्यापर्यंत आपल्या मनातल्या भावना थोडीच पोचणार आहेत? तो तर कायद्याशी मस्त कबड्डी कशी खेळता येईल याच्या विचारात मग्न असणारी. पण असे होता कामा नये. व्यभिचार करणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या चुकीच्या वागण्याची जाणीव व्हायलाच व्हावी. ती कदाचित आपणच करून देऊ शकतो. वर म्हटल्याप्रमाणे हा लेख म्हणजे केवळ माझे आत्मपरीक्षण आहे. त्यातून वाटलेले लेखणीत उतरवण्याचा प्रयत्न आहे आणि प्रत्येक ‘तो’ मनोवृत्ती विरुद्ध उभे ठाकण्याचा छोटासा प्रयत्न आहे.
मैत्रेय रिसबूड, डोंबिवली

व्हिवाचं कौतुक करणाऱ्या पत्रांचं आम्हाला निश्चितच कौतुक आहे. पण त्याहीपेक्षा आम्हाला आवडतील विश्लेषणात्मक पत्रं. तुम्ही विचार करा आणि इतरांना विचार करायला लावा.
व्हिवासाठी मजकूर किंवा पत्र खालील पत्यावर पाठवा- व्हिवा-लोकसत्ता, लोकसत्ता संपादकीय, एक्सप्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरीमन पॉईंट, मुंबई - ४०० ०२१. अथवा खालील ई मेलवर पाठवा. viva.loksatta@gmail.com