Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ जुलै २००९
  सबसे फेवरिट जोडी
  ओपन फोरम
नशिबावर विश्वास आहे का?
  थर्ड आय
.. झुकानेवाला चाहिए
  नेट कॉर्नर
My Times UP?
  मेल बॉक्स
  हेल्थ कॉर्नर
ब्रेस्ट इलॅस्टिसिटी
  स्मार्ट बाय
  दवंडी
हरिश्चंद्राची फॅक्टरी
  ग्रूमिंग कॉर्नर
कारणं सांगू नका.. काम दाखवा
  आवजो- चौखी दाणी!
  दिशा
स्लिम इन्स्टंट
  फुड कॉर्नर

दवंडी
हरिश्चंद्राची फॅक्टरी

माध्यम क्रांती अनेक संधी उपलब्ध करुन देते. निवडीला पर्याय देते. पण उडदामाजी काळे गोरे कसे निवडावे? काय घडतंय यापेक्षा काय काय घडणार आहे आणि त्याला आपण कसे सामोरे जाणार आहोत. त्याचा फायदा आपण कसा करुन घेणार आहोत हे ठरवण्यासाठी ही दवंडी..
गेल्या आठवडय़ात तुलनेने कमी महत्त्वाच्या असलेल्या आणि त्यामुळेच कुठे तरी कोपऱ्यात छापून आलेल्या बातम्या लक्षवेधक होत्या. कॉम्प्युटर इंजिनीअरिंग करत असलेल्या एका २५ वर्षांच्या युवकाने साध्या हँडीकॅमवर काही मिनिटाचे लघुपट बनविले आणि त्याला काही आंतरराष्ट्रीय महोत्सवात प्रवेश मिळाला, त्याच्या कल्पनाशक्तीचे कौतुकही झाले. आणखी एका मुलीने आपल्या खर्चासाठी दिलेल्या पैशातून मोबाईलवर एक छोटा माहितीपट

 

बनवला आणि त्यालाही वाहवा मिळाली. मला या बातम्या लक्षवेधक वाटतात याचे कारण आता सिनेमा बनविणे ही काही मूठभर लोकांची मिरासदारी राहिली नाही. कल्पनाशक्ती पूर्वीही अनेक लोकांकडे असेल पण त्या वेळी चित्रपट माध्यमच एवढं महागडं होतं की सिनेमा बनविण्याचा विचार करणे म्हणजे भिकेचे डोहाळे. नुकताच मी हरिश्चंद्राची फॅक्टरी हा नवीन मराठी सिनेमा पाहिला. अजून तो थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला नाहीये. पण दादासाहेब फाळकेंना त्या काळी म्हणजे १९१२ साली सिनेमा करावासा वाटल्यावर काय काय कुचेष्टा, हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या याची नितांतसुंदर कथा म्हणजे हरिश्चंद्राची फॅक्टरी.
भारतीय चित्रसृष्टीचे जनक म्हणून ज्या दादासाहेब फाळकेंच्या नावाने आपण चित्रसृष्टीतला सर्वोच्च सन्मान देतो त्यांनी अक्षरश: घरातल्या वस्तू गहाण टाकून, मित्रांच्या मदतीने या सिनेमाचा घाट कसा घातला हे अत्यंत प्रेक्षणीय पद्धतीने या सिनेमामध्ये मांडलं आहे. विशेष कौतुक का वाटलं की या सिनेमाची डॉक्युमेंटरी व्हायला वेळ लागला नसता पण तसं न करता दिग्दर्शक परेश मोकाशीने कुठेही तडजोड न करता हा सिनेमा केलाय. दादासाहेब फाळक्यांच्या पत्नीने, मुलांनी त्याला जे सहकार्य केलं ते पाहताना डोळ्यात पाणी उभं राहिल्याखेरीज राहू शकत नाही. दादासाहेब सिनेमाचं तंत्र शिकण्यासाठी परदेशी गेले. सेसील बी डिमीलसारख्या दिग्दर्शकाचा सहाय्यक बनून त्यानी त्यावर प्रभुत्वही मिळवले. गोऱ्यांनी तेव्हा त्यांना तिथेच राहण्याची विनंतीही केली होती पण मला परत जायला हवं कारण माझ्या देशातल्या लोकांना हा सिनेमाचा व्यवसाय कळला पाहिजे, हा एक उद्योग म्हणून वाढला पाहिजे, असं सांगणाऱ्या या भारतीयसृष्टीच्या पितामहांना सलाम केल्यावाचून राहवणार नाही.
या सिनेमाचा गोडवा असा आहे की, ज्याला दादासाहेब फाळके माहीत नाहीत, ज्याला त्यांचे कार्य माहीत नाही त्यालाही एका माणसाची सिनेमा बनविण्याची धडपड पाहून गलबलल्यासारखे होईल. हेच या सिनेमाचे यश आहे. चवन्नी छटाक कलाकारांना लाखो रुपये देऊन विनोदी सिनेमाच्या नावाखाली हास्यास्पद सिनेमे करणाऱ्यांच्या पंगतीत हा सिनेमा उठून दिसल्याखेरीज राहणार नाही. नंदू माधवने दादासाहेब फाळकेंचे काम करताना जीव झोकला आहे. आमीर खानसारख्या कलाकाराने या सिनेमात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. हा सिनेमा हिंदीत बनवूया असं म्हटलं होतं पण एका मराठी माणसाचा हा सिनेमा मराठीच असायला हवा, असं म्हटल्यावर त्याने मराठी शिकण्याचीही तयारी दाखवली होती पण तरीही परेश मोकाशीनी त्याला तू तसा दिसत नाहीस म्हणून नाकारणं हे वेड लागल्याचं लक्षण आहे, असं आज सिनेमाच्या दुनियेत कोणीही म्हणेल पण असं वेड लागल्याखेरीज असा सिनेमा बनत नाही हेही तेवढेच सत्य आहे.
जुन्या मुंबईचे सेट, त्या वेळी धावणारी ट्राम, त्या वेळची रेल्वे, यासारखे सेट उभे करणे हा वेडेपणाच नाही तर काय होता? पण नितीन देसाईच्या एनडी स्टुडिओत ही मुंबई उभी राहिली आणि किती अप्रतिम. फाळके लंडनला गेले म्हणून निर्मात्यांनी कोल्हापूरला लंडन नाही उभारले. तर खरोखर लंडनला जाऊन
चित्रीकरण केले. म्हणून साडेतीन कोटीचे बजेट असलेला हा कोणतेही सुपरस्टार नसलेला गोड सिनेमा उभा राहिला.
अनेक अर्थानी मला या सिनेमाची मुगल-ए-आजमशी तुलना करावीशी वाटते. के. आसिफने सलीम अनारकलीच्या प्रेमकथेचे वेड जोपासले तेव्हा त्यांना सगळे हसले होते. माझी खात्री आहे की परेश मोकाशींनाही लोक हसले असतील. अशा कलाकारांना घेऊन असा धंदेवाईक नसणारा सिनेमा काढणे म्हणजे खूळच नव्हे का? पण बहुधा मोकाशींच्या डोक्यावर दस्तुरखुद्द धुंडीराज फाळकेंनीच हात ठेवला असावा. मोगल-ए-आझमप्रमाणे यात भव्य सेटस् आहेत पण त्याची भव्यता दाखविण्यासाठी ते बनविलेले नाहीत. ती या सिनेमाची गरज होती. मला सगळ्यात जास्त या सिनेमाचं काय आवडलं असेल तर यामध्ये खलनायक नाही. १९१२ सालचा विचार करता त्यावेळी त्यांना लोकांनी शिव्याही घातल्या असतील. हजारो अडचणी उभ्या राहिल्या असतील पण संपूर्ण सिनेमामध्ये एकही कपाळावर आठी पाडणारा कटकटय़ा क्षण नाही. एक तरल स्वप्नाळूपणा लेखक दिग्दर्शक परेश मोकाशींनी जपला आहे.
फाळके इंग्लंडहून परत आले आणि इथल्या लोकांना घेऊन त्यांनी सिनेमाच्या तयारीला सुरुवात केली तिथून पुढे सगळा भाग तर फारच झोकदार झाला आहे. त्या काळाला अनुरूप स्त्री भूमिका करण्यासाठी एकही स्त्री मिळणे शक्यच नव्हते. फाळकेंनी त्यासाठी रेडलाईट एरियाही पालथा घालायला कमी केलं नाही. शेवटी पुरुष नटच तारामतीच्या भूमिकेसाठी त्यांना घ्यावा लागला. मग त्याने वडील जिवंत आहेत म्हणून मिशा काढायला नकार देणे, प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या वेळी सगळ्या युनिटला पोलिसांनी पकडून नेणे.. हा भाग अतिशय मनोरंजक झाला आहे. हे सगळं असंच त्या काळी घडलं होतं, असं वाटून तोंडात आश्चर्याने बोट गेल्याशिवाय राहणार नाही.
३ मे १९१३ रोजी कॉरोनेशन थिएटरमध्ये सिनेमा लागला. पहिल्या आठवडय़ात सिनेमा पहायला मोजके प्रेक्षक आले. मग त्याकाळीसुद्धा लकी तिकिटावर साडी मोफत देण्याची जाहिरात करावी लागली आणि मग सिनेमा धूमधडाक्यात चालला. असं म्हणतात की प्रत्येक सिनेमामध्ये प्रेक्षक हिरोच्या किंवा हिरॉइनच्या मिशनशी एकरूप झाले तर तो सिनेमा लोकांना आपलासा वाटतो. आवडतो आणि चालतो. एवढी धडपड करून दादासाहेबांनी राजा हरिश्चंद्र बनविताना पाहिल्यावर मला तो सिनेमा हीट झाला पाहिजे असं उत्कटतेने वाटत होते. पहिल्या आठवडय़ात प्रेक्षक आले नाहीत तेव्हा दादासाहेबांइतके नसेल पण मलाही वाईट वाटले होते. माझ्यापुरता तरी मी त्याच्याशी तद्रूप होऊन गेलो होतो. मराठी सिनेमाने कात टाकली आहे की नाही यावर चर्चा करणाऱ्यांनी हा सिनेमा पहावा म्हणजे एक परिसंवादाचा मुद्दा निकालात निघेल. ज्यावेळी हा सिनेमा प्रदर्शित होईल तेव्हा अवश्य पहाच. मराठी सिनेमाबद्दल प्रेम असेल आणि एकंदर सिनेमाची सुरुवात भारतात कशी झाली याबद्दल उत्सुकता असेल तर हा सिनेमा पाहावा. त्याची झलक तुम्हाला www.harischandrachifactory.com या वेबसाइटवरही पहायला मिळेल.
इथून सुरुवात करून आपण मोबाइलवर सिनेमा करण्याच्या क्रांतीपर्यंत येऊन पोहचलो आहोत. दादासाहेबांनी हे केलं नसतं तर दुसरं कुणीच केलं नसतं का? केलं असतं. पण त्यांनी हे स्वप्न पहिल्यांदा पाहिलं आणि पराकोटीच्या ध्यासाने पूर्ण केलं म्हणून त्याच्या खांद्यावर आज भारतातल्या मनोरंजनाचा डोलारा उभा आहे. त्यांचे ऋण या निमित्ताने फेडता आले तर पहा. नाहीतर नुसतंच मराठी मराठी करून टिऱ्या बडवण्यात काय अर्थ आहे?
अभय परांजपे
asparanjape1@gmail.com