Leading International Marathi News Daily
गुरुवार, १६ जुलै २००९
  सबसे फेवरिट जोडी
  ओपन फोरम
नशिबावर विश्वास आहे का?
  थर्ड आय
.. झुकानेवाला चाहिए
  नेट कॉर्नर
My Times UP?
  मेल बॉक्स
  हेल्थ कॉर्नर
ब्रेस्ट इलॅस्टिसिटी
  स्मार्ट बाय
  दवंडी
हरिश्चंद्राची फॅक्टरी
  ग्रूमिंग कॉर्नर
कारणं सांगू नका.. काम दाखवा
  आवजो- चौखी दाणी!
  दिशा
स्लिम इन्स्टंट
  फुड कॉर्नर

आवजो- चौखी दाणी!
‘पिंक सिटी’ जयपूरपासून १५ ते २० कि. मी. अंतरावर १० एकर विस्तीर्ण जमिनीवर राजस्थानी पारंपरिक संस्कृतीची झलक दाखविणारे ‘चौखी दाणी’ हे मिनी राजस्थानच वसले आहे. स्थापत्य, शिल्प, चित्र, नृत्य, नाटय़, संगीत, वाद्यवादन, रंगावली, मीनावर्क, कशिदाकाम, मेंदीकाम, इ. इ. कलांमधून राजस्थानचा सांस्कृतिक, कलात्मक, इतिहासच ‘चोखी दाणीत’ हळूवारपणे उलगडत जातो. कंदीलाच्या मंद प्रकाशात, शेणाने सारवलेल्या जमिनीवर सर्वत्र रेखाटलेल्या राजस्थानी शैलीतील रांगोळ्यांनी, प्रवेशद्वाराजवळ वाजणाऱ्या नगारा वादनाने, सर्वाचे स्वागत होते. तबकातील चंदनमिश्रीत कुंकवाचा टिळा प्रत्येकाला लावून राजस्थानी पारंपरिक वेषभूषेतील स्त्री-पुरुष अतिथी देवो भव: म्हणून जेव्हा स्वागत करतात

 

त्यावेळी भारतीय अगत्याचा, आपुलकीचा आणि जिव्हाळ्याचा गंध त्या स्वागतात असतो!
१० एकर जमिनीवर वसलेल्या या ‘चौखी दाणी’त एकूण ५६ विभाग आहेत. संपूर्ण चौखी दाणीत ५०० कलाकार आपली कला सादर करत राजस्थानी संस्कृतीची ओळख करून देतात. राजस्थानी पद्धतीने स्वागत झाल्यावर, राजस्थानी कलाकुसरीने नटलेल्या गणेश मंदिरातील ‘बाप्पाला’ नमस्कार करूनच मग चौखी दाणीत प्रवेश करायचा. गवती छपराने साकारलेल्या, शेणाने सारवलेल्या भिंतीवर राजस्थानी चित्रकलेचे आभूषण धारण केलेल्या झोपडय़ातील राजस्थानी स्वयंसेवक ‘चौखी दाणी’त क्रमाक्रमाने काय पाह्य़चे याचे मार्गदर्शन ‘गरज’ असल्यास करतात.पण उत्साही पर्यटक याकडे जरा कानाडोळाच करतात. मार्गदर्शन न घेतल्यामुळे प्रत्येकाचा ‘भूलभुलैया’ होतो आणि या चकव्यात सापडल्यावर जी गंमत येते त्याची नशा लाजबाब आहे. गेल्या गेल्याच एका सुंदर झोपडीतील मातीच्या थंडगार रांजणातील जलजिऱ्याचे प्राशन केल्यावर मन कमालीचे उत्साहित होते. राजस्थानी पद्धतीच्या जलजिऱ्याचे आयुर्वेदिक महत्त्व झोपडीवाला राजस्थानी अगदी रूबाबात सांगतो, पण गुलाबी थंडीत खास राजस्थानी रंगीबेरंगी बर्फ गोळे चाखण्याची मजा काही औरच आहे! आणि मग हातामध्ये चना-जोर गरमची पुंगळी घेऊन मजेत चौखी दाणीची सैर करायची!
एका गोलाकार कट्टय़ावर राजस्थानी नृत्यशैलीचे बहारदार दर्शन होते. ४/५ राजस्थानी तरुणी पारंपरिक वेषभूषा धारण करून, पारंपरिक दागिन्यांचा ‘जडशीळ’ साज चढवून, ५/६ कलाकुसरीने सजलेले रंगीबेरंगी घडे घेऊन जी नृत्य अदाकारी सादर करतात ते पाहताना मन थक्क होते. चपळपणे गिरक्या घेताना डोक्यावरचे घडे खाली कसे पडत नाहीत हा विचार मनाला अचंबित करतो. या नर्तकींच्या रूपाने साक्षात राजस्थानी संस्कृतीचेच दर्शन घडते. कशिदाकाम केलेले त्यांचे भले मोठे घागरे, हाताच्या कोपऱ्यापर्यंत चढविलेल्या लाखेच्या, चांदीच्या बांगडय़ा, पायात वजनदार कडी, साखळ्या, गळाभर दागिने, डोक्यावरून पदर, मेंदीने रंगलेले हात आणि चेहऱ्यावर शालीनता, हा सारा साजशृंगार राजस्थानी जीवनाचा अविभाज्य भागच आहे! या तरुणी जेव्हा नृत्य करतात त्यावेळी त्यांच्यातीलच एक ढोलवादन करत असते. यावेळी चैत्र महिन्यात येणाऱ्या ‘गणगौर’ सणाची भावपूर्ण गाणी सादर करत त्या नृत्य करतात. किंवा ‘मान्सूनतीज’ची कठोर तपस्या केल्यावर पार्वतीला शिवाची प्राप्ती होते या अर्थाची सुरेल गाणी सादर करत आपल्या प्रिय सख्याला दीर्घायुष्य लाभावे अशी प्रार्थना करतात. त्यांच्या नृत्यातील दिलखेचक अदाकारीमुळे खूश झाल्यावर एक ‘षटकोनी मेंदी कट्टा’ सर्वाचेच लक्ष वेधून घेतो!
या ‘षटकोनी मेंदी कट्टय़ावर’ षटकोनात बसायला बैठी गोलाकार बाकडी असून त्या बाकडय़ांवर राजस्थानी मऊ मऊ रजया अंथरलेल्या असतात आणि प्रत्येक कोनात कपाळावर येईल असा घुंघट ओढून अतिशय नाजूकपणे मेंदी काढण्यात राजस्थानी मेंदी कलाकार मग्न असतात. हे पाहिल्यावर आपोआपच तमाम महिलांचे पाय मेहंदी कट्टय़ाकडे वळतात. राजस्थानी लोकगीते गुणगुणत या मेहंदी कलाकार प्रत्येकीच्या हातावर अगदी कोपऱ्यापर्यंत सुबकपणे मेंदी काढतात. या डिझाईनमध्ये पाने, फुले, वेली, कलश, घडे, तोरणे, सूर्यप्रतिमा, उंटाची, हत्तीची पिल्ले, कठपुतळी बाहुल्या, दिलवाडा मंदिराप्रमाणे नक्षीकाम इ. चा समावेश असतो. अगदी पाच मिनिटात एक हात त्या पूर्ण करतात इतकी सफाई त्यांच्या बोटात आहे. यावेळी एक मेंदी कलाकार म्हणाली, ‘अगदी लहानपणापासूनच प्रत्येक मुलीला मेंदी काढता आलीच पाहिजे, मेंदीच्या नक्षीमधला नाजूकपणा जरासुद्धा बिघडता कामा नये यावर घरातील प्रौढ महिलांचा कटाक्ष असतो’. या मेंदी कलाकार सिझनमध्ये रोज जवळजवळ १२०० ते १५०० हातांवर मेंदी काढतात, राजस्थानी मेहंदी जगभर प्रसिद्ध आहे. परदेशी तरुणी हातावर मेंदी काढून घेतात. परदेशी पुरुषसुद्धा मेहंदी घेण्यास उत्सुक असतात, पण पुरुषांच्या हातावर आम्ही मेहंदी काढणार नाही असे सांगून लाजत लाजत नकार देतात. आणि मेहंदी काढून झाल्यावर निरोप देताना म्हणतात, ‘जेवढी मेहंदी लाल होऊन रंगेल तेवढेच तुमच्या पियाचे प्रेमही रंगेल’!
‘कठपुतली कट्टा’ तर सर्व वयोगटातील स्त्री-पुरुषांनी सदैव फुललेलाच असतो. अतिशय कुशलतेने हातातील नाजूक दोऱ्या विविध पदन्यासाप्रमाणे नाचवीत नाचवीत कठपुतलीवाला कलाकार ‘कठपुतली शो’ सादर करतो त्या वेळी हमखास राज-नर्गीसची आठवण होते. तीन कठपुतल्या व तीन कठपुतले या तीन जोडय़ा जेव्हा नाच करतात तेव्हा कोण-कोणाच्या हातचे बाहुले आहे हेच समजत नाही इतके कौशल्य कठपुतली कलाकाराचे असते. या कठपुतली शोच्या वेळी राजस्थानचे लोकप्रिय संगीत व वाद्याचा समावेश असतो. या कठपुतळ्यांचे पोशाख, दागिने व नृत्यकला राजस्थानी संस्कृतीची ओळख करून देतात. एका भल्यामोठय़ा पाच फणी नागाच्या वेटोळ्यावर ‘नाग कट्टा’ सजलेला आहे. या नागाच्या वेटोळ्यावर बसण्यासाठी गोलाकार बाके आहेत. नागाच्या फणीखाली राजस्थानी गारुडी पुंगी वाजवीत वाजवीत जिवंत नागाला असे काही डोलायला लावतो की ते बघताना अंगावर रोमांच उभे राहतात पण नाग आपला मित्र आहे, तो कृषीमित्र आहे हे सांगायलाही तो गारुडी विसरत नाही! ‘ज्योतिष मंच’ या मंचावर राजस्थानी पागोटे, घेरदार अंगरखा, राजस्थानी स्टाईल धोतर व कपाळाला केशराचा टिळा लावून राजस्थानी ज्योतिषी रुबाबात भविष्य सांगतो. कुतूहल म्हणून पाय तिकडे वळतात. मंद कंदिलाच्या प्रकाशात आपल्या ज्योतिषाच्या चोपडय़ा वर-खाली करत हा ज्योतिषी ज्या वेळी भविष्य कथन करतो त्या वेळी गंमत वाटते पण ‘ज्योतिषकला’ ही पूर्वापार चालत आलेली गणिती व खगोलशास्त्रीय पद्धत आहे यावर या लोकांचा विश्वास आहे! एका झाडाखाली ‘तेल मॉलिश चंपी कट्टा’ आहे. या कटय़ावर तेल मॉलिशवाला अत्यंत शास्त्रशुद्धपणे तेल मॉलिश करतो. त्याच्या मॉलीशची नेटकी पद्धत पाहतानाच डोळ्यावर गुंगी येते. पुरुषांना हा कट्टा अधिक प्रिय वाटतो. राजस्थानी म्युझियममध्ये सर्व प्रकारची स्वयंपाकाला लागणारी लहान-मोठी भांडी आहेत. चौखी दाणीतील हे म्युझियम पाहताना भौगोलिक व हवामानानुसार तयार केलेली ही भांडी आहेत आणि भांडय़ाच्या वापरामागे अभ्यासपूर्ण शास्त्र आहे हे लक्षात येते. एका भल्या-मोठय़ा सजविलेल्या मेण्यात जैसलमेरची राणी घुंघट ओढून बसलेली आहे. या मेण्यावरचे नक्षीकाम पाहताना कलाकाराला सलाम करावासा वाटतो. राणी राजस्थानी वेषभूषा, केशभूुषा व आभूषणांनी नटलेली आहे ही मेण्यातील राणी उठून चालायला लागेल इतकी जिवंत कलाकृती वाटते!
राजस्थानी भोजनगृहात तर तोबा गर्दी असते. मोठमोठय़ा चुलाण्यावर खास गरम गरम राजस्थानी पदार्थ शिजत असतात. शेणाने सारवलेल्या जमिनीवर मऊ रजया अंथरलेल्या असतात. समोर पत्रावळ असते. या पत्रावळीत आठ द्रोण असतात तिथे खाली बसूनच जेवायचे असते. दाल बाटी, खिचडी, मालपोवा, कंदमुळ्याच्या भाज्या, गरम गरम बाजरीच्या भाकऱ्या, राजस्थानी कढी, असा बेत असतो. आग्रह करून करून गरम गरम जेवण वाढतात तो आग्रह पाहूनच पोट भरते, अतिथी देवो भव:। हा मंत्र जपत ‘चौखी दाणीत’ पर्यटकाला अगदी खूश करून सोडतात. चौखी दाणीत हत्ती, उंट आणि बैलगाडय़ातून रपेट मारून आणतात. गोल गुल्फी कट्टय़ावर सर्वजण मलई गुल्फीची लज्जत चाखतात. त्याच वेळी सारंगी कट्टय़ावर सारंगी वादनाने मन प्रसन्न होते. इथे भुलभुलैय्या आहे. सापशिडी आहे, बोगदे आहेत , झूला आहे. ब्रीज आहे, मोठा धबधबा आहे. छोटय़ा पहाडावर शंकरांचे मंदिर आहे. तलाव आहे. बोटिंगची व्यवस्था आहे. बायोस्कोप आहे. १५० लोक बसून नाटक पाहण्यासाठी खुले नाटय़गृह आहे. चौपाल, पानघाट आहे. जंगल गेम आहेत. फोटो स्टुडिओ आहे. पक्ष्यांची घरटी आहेत. चौखी दाणीला राहण्यासाठी ६५ झोपडय़ा व आठ हवेली सूटस आहेत दोन कॉन्फरन्स हॉल आहेत. केसरकॅरी मैदान आहे. ६५ झोपडय़ांपैकी ३१ झोपडय़ा स्टँडर्ड व ३४ झोपडय़ा एक्झिक्युटिव्ह आहेत. या झोपडय़ात सर्व सुविधा आहेत. या झोपडय़ा पाहणे हा एक आनंददायी अनुभव आहे. या चौखी दाणीत हजारो लोकांना, कलाकारांना रोजगार मिळाला आहे. चौखी दाणीत राजस्थानच्या संस्कृतीचे मनोज्ञ दर्शन होते आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे इथे हट बाजार आहे. या हट बाजारात नऊ दुकाने आहेत. या दुकानातून खास बांधणी साडय़ा, घागरे, पागोटे, रजया, तोरणे, बटवे, लाखेच्या बांगडय़ा, चांदीचे दागिने, करंडे, हत्ती, उंट, राजस्थानी मोजडी, राजस्थानी दिवे, अत्तरे, कठपुतल्या, गुलकंद, गुलाबपाणी, काचेच्या शिल्पाकृती इ. इ. खास राजस्थानी खरेदी मनसोक्त करता येते. हट बाजार चौखी दाणीतले स्पेशल आकर्षण आहे!
चौखी दाणी पाहण्यास कमीत कमी तीन ते साडेतीन तास तरी लागतात. हा वेळ अगदी अपुरा वाटतो पण सायंकाळी ६ ते ११ या वेळातच चौखी दाणीची खरी मजा लुटता येते. चौखी दाणीतील प्रत्येक विभागाची कलात्मक रचना, प्रत्येक कट्टय़ावरची वेगवेगळी रंगसंगती व कलाकुसर, येथील प्रत्येकाला वाटणारे राजस्थानी संस्कृतीविषयीचे प्रेम व अभिमान, नियम व शिस्तीचे पालन, येथील स्वच्छता हे सारे पाहून मन प्रसन्न होते आणि सर्वात शेवटी निरोप देताना अत्यंत अगत्यपूर्वक सांगतात, ‘आवजो चौखी दाणी’- राजस्थानी संस्कृती असे, चौखी दाणीमां साचवी छे, अमे तमे करि पाछा आवजो आवजो चौखी दाणी..!
मीना गोडखिंडी