Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १७ जुलै २००९

‘मूषकां’ची मुंबई
काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि बिल्डरांनी घेतला मुंबईचा घास!
संदीप प्रधान, मुंबई, १६ जुलै

शिवसेना-भाजप युतीच्या नेत्यांची उडी एखाददुसऱ्या टॉवरवरून कॉम्प्लेक्सपर्यंत जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आशीर्वादाने पुण्याजवळ ‘लवासा’ हे पंचतारांकित शहर उभे राहिले आहे. तर मुख्यमंत्रीपदावर सर्वाधिक काळ टिकून राहणारे विक्रमवीर विलासराव देशमुख यांच्या आदेशाखेरीज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई महापालिका, म्हाडा आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण येथील एक कागद हलत नव्हता. याच शक्तीच्या बळावर देशमुखांनी पक्षश्रेष्ठींना प्रसन्न केले, विरोधकांना खिशात घातले, राष्ट्रवादीला निष्प्रभ केले. गेल्या दहा वर्षांत राज्यात सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बिल्डर यांनी मुंबईत हैदोस घातला आहे. वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून कुणी जायचे आणि कुणी नाही याची चर्चा तुम्ही-आम्ही करीत आहोत.

राज्यातील धरणांचा पाणीसाठा दोन टक्क्यांनी वाढला
मराठवाडा, नाशिकची स्थिती नाजूक
पुणे, १६ जुलै / खास प्रतिनिधी

गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत राज्यातील धरणांचा पाणीसाठा दोन टक्क्य़ांनी वाढून पंधरा टक्क्य़ांवर पोहोचला आहे. मराठवाडा आणि नाशिकमधील धरणांची जलसाठय़ाची स्थिती अजून नाजूकच असून कोकणवगळता नागपूर, अमरावती व पुणे विभागात दहा ते पंधरा टक्क्यांवर पाणीसाठा जाऊ शकलेला नाही. मराठवाडा आणि नाशिक विभागातील जिल्ह्य़ांत असलेल्या धरणांवर पावसाचा रुसवा कायम आहे. मराठवाडय़ातील धरणांमध्ये केवळ पाच टक्के आणि नाशिकच्या धरणांत फक्त दहा टक्के पाणीसाठा आहे. येत्या काही दिवसांत पावसाने या विभागांत कृपादृष्टी दाखविली नाही, तर पाण्याची स्थिती चिंताजनक होऊ शकते.

‘लवासा’च्या संशयास्पद जमीन व्यवहाराची चौकशी करावी
शासनाला जनआयोगाच्या १२ शिफारशी
पुणे, १६ जुलै / खास प्रतिनिधी

धनदांडग्यांच्या ऐशोरामासाठी उभारण्यात येणाऱ्या ‘लवासा लेकसिटी’ला राज्य शासनाने गैरमार्गाने आणि संशयास्पदरीत्या दिलेल्या जमिनींची नामवंत न्यायाधीश, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रामाणिक अशासकीय सदस्यांमार्फत चौकशी करण्याची मागणी ‘लवासा’संदर्भातील जनआयोगाने आपल्या शिफारशींमध्ये केली आहे. मुळशी-वेल्ह्य़ाच्या मोसे खोऱ्यात लवासा लेकसिटी प्रकल्पामार्फत साडेबारा हजार एकर क्षेत्रावर अलिशान गिरिस्थान विकसित करण्यात येत आहे. या लेकसिटी प्रकल्पात शेतकरी, कातकरी, आदिवासी यांच्या जमिनी बळकावण्यात आल्याच्या आणि कृष्णा खोरे विकास महामंडळानेही सरकारी जमीन सवलतीच्या दरात दिल्याच्या तक्रारी आहेत. पर्यावरणाची हानी, मुद्रांक शुल्कात विशेष सूट, वरसगाव धरणाच्या पाणलोटातील पाणी अडवून स्वतंत्र धरण बांधण्याची परवानगी, लवासासाठी खास रस्तादुरूस्ती अशा सवलतींचा पाऊस पाडण्यात आल्याच्याही तक्रारी होत्या.

रिटा बहुगुणा-जोशींच्या वादग्रस्त विधानामुळे
उत्तर प्रदेशचे राजकारण भडकले!

नवी दिल्ली, १६ जुलै/खास प्रतिनिधी

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांच्याबद्दल अभद्र विधान करणाऱ्या उत्तर प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष रिटा बहुगुणा जोशींमुळे आज देशाच्या राजकारणात भडका उडून उत्तर प्रदेशात सत्ताधारी बसप व काँग्रेस आमनेसामने आले. मायावतींविषयी अशोभनीय उद्गार काढल्याबद्दल बहुगुणा-जोशी यांचे राजधानी लखनौमधील निवासस्थान बसप समर्थकांनी जाळून टाकले, तर मायावती प्रशासनाने जातीयवाचक टिप्पणी केल्याच्या आरोपावरून बहुगुणा-जोशींना अटक करून १४ दिवस न्यायालयीन कोठडीचा रस्ता दाखविला. या घटनाक्रमाचे पडसाद उमटून आज संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्यांनी गोंधळ घालून दिवसभरासाठी ठप्प केले.

विद्यार्थ्यांवरील अन्याय त्यांच्याच चुकांमुळे
ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या कोअर कमिटीचा अजब निर्वाळा

मुंबई, १६ जुलै / प्रतिनिधी

ऑनलाइन प्रवेशाचे हे पहिलेच वर्ष आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून चुका झाल्या आहेत तशा आमच्याकडूनही झाल्या आहेत. दोन दिवस पाऊसही पुष्कळ झाला. पहिल्या प्रवेश फेरीत अन्याय झालेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीत संधी दिली जाईल. पण त्याला पहिल्या प्रवेश यादीतील महाविद्यालय नको असले तरीही तिथे प्रवेश घ्यावाच लागेल. कारण आमच्या सॉफ्टवेअरमध्ये तशी रचना करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांच्या चुकीमुळेच त्यांच्यावर अन्याय झाला आहे. प्रवेश यादी तयार करण्याची आमची पद्धत मात्र योग्यच आहे. अशा शाब्दिक कसरती ‘अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या कोअर कमिटी’च्या सदस्यांनी आज पत्रकार परिषदेत केल्या. अकरावी प्रवेशाच्या पहिल्या यादीनंतर विद्यार्थ्यांकडून प्रचंड तक्रारी येऊ लागल्याने कोअर कमिटीने तातडीची पत्रकार परिषद आयोजित केली होती.

आज होणार पहिला ‘नॅनो’धारक
मुंबई, १५ जुलै / प्रतिनिधी
जानेवारी २००८ मध्ये दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या ‘ऑटो एक्स्पो’मध्ये ‘नॅनो’चे दर्शन झाल्यानंतर तब्बल दीड वर्षांच्या कालावधीनंतर आता पहिली नॅनो कार ग्राहकाच्या ताब्यात देण्यात येणार आहे. शुक्रवारी १५ जुलै रोजी प्रभादेवी येथील कॉँकर्ड या टाटाच्या शोरुममध्ये सायंकाळी पावणेसहा वाजता रतन टाटा यांच्या हस्ते या गाडीच्या चाव्या पहिल्यावहिल्या नॅनोग्राहकाच्या हाती सुपूर्त करण्यात येणार आहेत. पहिल्या कारचा ग्राहक कोण याविषयी मात्र टाटाच्या सूत्रांनी काहीही जाहीर न केल्यामुळे याबाबतची उत्सुकता लागून राहिली आहे. प्रदुषणाच्या बाबतीत असलेल्या नियमांमुळे नॅनोचे एक लाख रुपयांत उपलब्ध होणारे मॉडेल मुंबईत वितरित करण्यात येणार नाही. त्यामुळे उद्या देण्यात येणारे मॉडेल हे नॅनोचे अप्पर मॉडेल असणार आहे. गेल्या वर्षभरात नॅनो प्रकल्पाला काही अडथळ्यांना सामोरे जावे लागले. पश्चिम बंगालमध्ये उद्भवलेल्या समस्येमुळे टाटाला नॅनोचा कारखाना गुजरातमध्ये हलवावा लागला. असे असले तरी नॅनोची पहिली गाडी उत्तर भारतातील पंतनगर येथील कारखान्यात तयार झालेली आहे.

नांदेड आयुक्तालयाचा मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव थंड बस्त्यात !
मुंबई, १६ जुलै / खास प्रतिनिधी

औरंगाबादचे विभाजन करून नांदेडला विभागीय आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने गेल्या जानेवारीत घेतला असला तरी काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या सूचनेवरून मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना या निर्णयाची अंमलबजावणी करता येऊ शकलेली नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीही नांदेड आयुक्तालय स्थापन होण्याची शक्यता मावळली आहे.
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना राजकीयदृष्टय़ा शह देण्याकरिता औरंगाबादचे विभाजन करून नांदेडला विभागीय आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्रीपदावर आरूढ झाल्यावर लगेचच मुख्यमंत्री चव्हाण यांनी घेतला होता. या निर्णयावर मराठवाडय़ात तीव्र प्रतिक्रिया उमटली होती.

 

प्रत्येक शुक्रवारी