Leading International Marathi News Daily
शनिवार, १८ जुलै २००९
  वावटळीतले तारणहार
  बोट सोडून खांद्यावर हात!
  आरामदायी मॅट्रेस
  पण बोलणार आहे!
मराठीची महादशा
  विज्ञानमयी
  प्रतिसाद
  ‘जिव्हाळ्याची ई-बेटं’
बंध नात्यांचे
  मी एक ‘ढ’!
  काळ सुखाचा
.. हा दिवस मुलांचा!
  समलिंगी संबंधांतील प्रश्नोपनिषद
  चिकन सूप...
माझं आयुष्यच बदललंस रे!
  अत्याचारालाही जात असते?
  ‘अक्षरयात्री’चे अक्षरमैत्र
  ललित
पक्षीनिरीक्षण सोहळा
  रुग्ण-हक्कांची सनद
  खजुराहो

 

बोट सोडून खांद्यावर हात!
किशोरवयीन मुलांमध्ये ‘मोठे’ झाल्याची भावना रुजत असते. पण पालक, शिक्षक व एकूणच समाजाकडून या भावनेला तितकासा न्याय व वाव मिळत नाही. त्यामुळे होणाऱ्या मानसिक घुसमटीमुळे आक्रमकता, मनाला वाटेल तसे वागण्याची, स्वत:ला सिद्ध करण्याची ऊर्मी निर्माण होते. संवाद साधताना सर्वप्रथम मुलाचे बोट सोडून खांद्यावर हात ठेवण्याची, म्हणजेच मैत्री करण्याची गरज असते. त्यानंतर हा संवाद इतर कोणालाही सांगितला जाणार नाही, अशी गोपनीयतेची हमी प्रत्येक किशोरवयीन मुलाला हवी असते. खरे तर ही हमी जवळच्या मित्रांकडून मिळते, म्हणून पालक, शिक्षक, डॉक्टरांपेक्षा किशोरवयीनांना मित्रांचे जास्त आकर्षण असते. परंतु तीच हमी घरच्यांकडूनही मिळाली, तर ते त्यांच्याकडेही मन मोकळे करतात. त्यामुळे या मुलांशी संवाद साधू पाहणारे त्यांचे पालक, डॉक्टर, शिक्षक, समुपदेशक यांनी

 

त्यांच्याशी छान ‘रॅपो-बिल्डिंग’ करणे फार आवश्यक असते. किशोरवयीन मुलांशी अनेक विषयांवर सहज गप्पा मारून त्यांच्याशी हळुवार नाते निर्माण करणे आवश्यक असते. अर्थात पालकांनी यासाठी लहानपणापासूनच नात्याची मशागत करायला हवी.
या वयातील मुलांशी संवाद साधून काही गोष्टी पालकांनी तसेच समुपदेशन करणाऱ्या डॉक्टरांनी जाणून घ्यायला हव्या-
घरातील वातावरणाबद्दल त्यांचे मत - अभ्यास किंवा इतर गोष्टींविषयी तक्रार, शेजाऱ्यांविषयी, असपासच्या संबंधितांविषयी काही विशिष्ट मत/ समस्या.
शाळा/शैक्षणिक प्रश्न- शिक्षकाकडून त्रास/ शाळेतील मुलांकडून त्रास. विशेषत: छेडछाड, शाळेतील शिक्षकांच्या व पालकांच्या अभ्यासाविषयीच्या अपेक्षांविषयीचे ओझे.
लैंगिक, शारीरिक, मानसिक शोषणाचा अनुभव.
धूम्रपान, मद्यपान, तंबाखू-गुटख्याच्या सवयींविषयी.
स्वत:च्या लैंगिकतेविषयी, शरीरातील बदलांविषयी त्यांच्या मनातील काही विचार/समस्या
मित्र-मैत्रिणींविषयी काही समस्या- उदा. मित्रांमध्ये सामीलकी असण्यासाठी काही गोष्टी स्वत:च्या मनाविरुध्द कराव्या लागताहेत का?
स्वत:च्या मनातील स्वत:बद्दलची प्रतिमा
मनोरंजन, टीव्ही, चित्रपट किंवा खेळण्यासाठी रोज दिला जाणारा वेळ व आठवडय़ातून दिला जाणारा वेळ.
आक्रमक विचार
त्यांच्या या बाबींची माहिती व जाणीव या मुलांच्या घरच्यांना असायला हवी.
किशोरवयातील काही शारीरिक व्याधी टाळण्यासाठी काही तपासण्या हितावह ठरू शकतात-
ऑडीओमेट्री : बहिरेपणा टाळण्यासाठी कुमारवयातच ही तपासणी केल्याने प्रतिबंधासाठी उपयोग होऊ शकतो.
डोळ्यांची तपासणी
रक्तदाबाची तपासणी : किशोरांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रकार वाढत आहेत. निदान लवकर झाल्यास त्यावर उपचार होऊ शकतात.
स्तनांची तपासणी : स्तनांमध्ये काही गाठी असल्यास त्याच्या निदानासाठी, लैंगिक वाढीच्या तपासणीसाठी मुलींना स्वत:हून आयुष्यभर स्तनांची तपासणी सातत्याने कशी करायची हे शिकवणे आवश्यक आहे.
मुलांच्या जननेंद्रियांची तपासणी : मुलांच्या जननेंद्रियांच्या गाठी, बेरोकोसील सारख्या आजारांचे लवकर निदान होऊ शकते.
किशोरवयीन मुलांची मानसिक व शारीरिक तपासणी कशी करावी, याशिवाय परिषदेत चर्चा झाली. कुमारी माता या ससस्येवरही चर्चा झाली. अनेकदा किशोरवयीन मुलींना मासिक पाळी व लैंगिकतेविषयी अज्ञानामुळे आपण गरोदर आहोत, हे बरेच दिवस कळत नाही. कळले तरी शरमेमुळे व स्वत:विषयीच्या रागामुळे मुली ही समस्या कोणालाही सांगण्यास धजावत नाहीत. काही प्रकरणांत काही वेळा २० आठवडय़ांची सीमा पार होते व त्यानंतर बेकायदेशीर गर्भपातासाठी धावपळ सुरू होते. त्यात गर्भपातासाठी चुकीचे मार्ग वापरल्याने मुलीला धोका संभवतो. त्यामुळे सर्वप्रथम किशोरवयीन मुलींना असे होऊ नये, यासाठी लैंगिक शिक्षण व जीवनशिक्षण तर मिळायलाच हवे. तसेच वाट चुकलीय तर आता काय मार्ग काढायचा, असा थेट संवाद साधण्याइतपत मोकळीक हवी. यासाठी काही विश्वासार्ह हेल्पलाईन सुरू झाली तर तेही अधिक सोयीचे ठरू शकते, असाही मतप्रवाह आहे.
किशोरवयातील प्रेमसंबंध व ते हाताळण्याविषयीही परिषदेत चर्चा झाली. सहसा असे प्रेमसंबंध पालकांना किंवा शिक्षकांना कळल्यास कुमारवयीन मुलांना टोकाचा विरोध केला जातो. त्यांना एकमेकांपासून दूर खेचण्याचा प्रकार सुरू होतो. यातूनच जास्त जवळीक व सुरक्षितता शोधण्याच्या मानसिकतेतून शारीरिक संबंध ठेवण्याचे प्रयत्न किशोरवयीन युगुलांमध्ये होतात. त्यातून बऱ्याचदा नैराश्य, स्वत:बद्दल राग अशा भावना, विशेषत: मुलींमध्ये निर्माण होऊ शकतात. अशा वेळी टोकाची भूमिका घेण्यापेक्षा या वयात वाटणाऱ्या आकर्षणातील संप्रेरकांचा, बाह्य़ शारीरिक आकर्षणाचा भाग जास्त असल्याची जाणीव करून देत, मुलांशी खुबीने पण स्पष्टपणे बोलणे आवश्यक असते. पक्के मानसिक नाते जुळण्यासाठी मन व शारीरिक संबंध स्वीकारण्यास शरीर अजून पूर्णपणे परिपक्व नसल्याची जाणीव मुला-मुलींना अशावेळी नक्की करून द्यावी. थोडक्यात ‘गुड्डी’ चित्रपटात धर्मेद्रच्या प्रेमात पडलेल्या गुड्डीला वास्तवाची जाणीव करून देत त्या प्रेमातून बाहेर काढले जाते, ते पालकांनी आठवावे.
या परिषदेत चर्चेला आलेली एक नवी समस्या म्हणजे ‘डेट रेप ड्रग्स’ म्हणजेच किशोरवयीन व इतरही वयोगटात लैंगिक शोषण करण्यासाठी वापरली जाणारी औषधे. यातील काही औषधे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांच्या दुकानांमध्ये उपलब्ध असल्याने आणि त्यांच्या वापरामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने हा एक चिंतेचा विषय बनत चालला आहे.
परिषदेच्या शेवटच्या दिवशी पालकांना डॉक्टरांशी थेट संवाद साधता यावा म्हणून ‘पब्लिक फोरम’चे आयोजन करण्यात आले होते. त्यात पाल्यांसाठी वास्तववादी ध्येयनिश्चिती कशी करावी, संगोपनात घरातील ज्येष्ठांचा सहभाग, फक्त एकच मूल असणाऱ्यांच्या समस्या अशा विविध विषयांवर चर्चा झाली.
या परिषदेच्या यशामध्ये संयोजक डॉ. राजीव मेहता व डॉ. आर. जी. पाटील यांनी मोलाचा वाटा उचलला. याशिवाय डॉ. तुषार राणे, डॉ. प्रबीर दास, डॉ. प्रकाश देव अशा ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभले.
‘अ‍ॅडोलसंट मेडिसीन’ या वैद्यकशाखेला अजून मेडिकल काऊन्सिलने वेगळी शाखा म्हणून मान्यता दिलेली नाही. पण या परिषदेतील पालक-शिक्षकांच्या सहभागावरून समाज या शाखेला मान्यता देऊ लागला आहे, असे दिसले. या वयातील मुलांच्या समस्या वाठत आहेत. त्याला बरीच सामाजिक कारणेही आहेत. त्या सोडवणे पालकांना कठीण वाटू लागले आहे. तरी त्यावर वैज्ञानिक उपाय आहेत. विवेकी पालकत्वाची विशेष गरज आहे. अशा परिषदांची भविष्यात गरज आहेच. पालक, शिक्षक, बालरोगतज्ज्ञ, फॅमिली डॉक्टर व ज्यांच्यासाठी हा सगळा ज्ञान-प्रपंच चालला आहे, ती किशोरवयीन मुले या सर्वाना सहभागी करून घेत अशा परिषदा ठिकठिकाणी जाल्या तर या मुलांना व पालकांना वयातील खळबळीला तोंड देणे सोपे होईल.
डॉ. अमोल अन्नदाते
amolaannadate@yahoo.co.in