Leading International Marathi News Daily
शनिवार, १८ जुलै २००९
  वावटळीतले तारणहार
  बोट सोडून खांद्यावर हात!
  आरामदायी मॅट्रेस
  पण बोलणार आहे!
मराठीची महादशा
  विज्ञानमयी
  प्रतिसाद
  ‘जिव्हाळ्याची ई-बेटं’
बंध नात्यांचे
  मी एक ‘ढ’!
  काळ सुखाचा
.. हा दिवस मुलांचा!
  समलिंगी संबंधांतील प्रश्नोपनिषद
  चिकन सूप...
माझं आयुष्यच बदललंस रे!
  अत्याचारालाही जात असते?
  ‘अक्षरयात्री’चे अक्षरमैत्र
  ललित
पक्षीनिरीक्षण सोहळा
  रुग्ण-हक्कांची सनद
  खजुराहो

 

पण बोलणार आहे!
मराठीची महादशा

बऱ्याच वर्षांनंतर सुट्टीसाठी भारतात आलेली माझी परदेशस्थ मैत्रीण भेटायला माझ्या घरी आली होती तेव्हाची गोष्ट. ‘‘काय मग? सध्या काय चाललंय? हाऊ इज लाईफ?’’ असं तिनं विचारताच मी ‘टंचाई- महागाई- कोण्णी कोण्णाला विचारत नाही’ या नेहमीच्या नन्नाच्या पाढय़ावर उतरले. आताच्या आमच्या उतरत्या वयांमध्ये अशा निरुपद्रवी विषयांवर विव्हळण्याची चैन हमखास करता येते. विषय संपत नाहीत. विव्हळणं संपत नाही. शिवाय व्यक्तिगत पातळीवर कोणाला काही अंगाला लावून घ्यावं लागत नाही. तर अशा प्रकारे सार्वत्रिक गाऱ्हाणी सांगणं सुरू असताना मध्येच मैत्रीण म्हणाली,
‘‘म्हणजे कुठेच काही बरं, चांगलं, आशादायक चित्र नाहीये म्हणायचं का?’’
‘‘एका बाबतीत आहे.’’
‘‘कोणत्या?’’

 

‘‘भाषेच्या. आपल्या मराठीची सध्या महादशा सुरू आहे.’’
‘‘म्हणजे काय?’’
‘‘टी. व्ही. लाव म्हणजे समजेल. वेगवेगळे मराठी चॅनेल्स ऐक. ‘बघ’ असं म्हणत नाही. बघण्यासारखं काही असेलच असं नाही. पण ऐकण्यासारखं असतं. ते ऐक. म्हणजे मराठीची सॉल्लिड महादशा कशी सुरू झालीये ते समजेल.’’
‘‘कशी?’’
‘‘आता आपल्याकडे महास्पर्धामध्ये महागायक नाही तर महागायिका भाग घेतात. मग ते महामेहनतीने महासंग्रामांना सामोरे जातात. करताकरता महाअंतिम फेरीपर्यंत मजल मारतात. आणि शेवटी महाविजेते ठरून महामिनिस्टर वगैरे किताब पटकवतात.’’
‘‘हे काय महामहा लावलंयस?’’
‘‘कानाला बरं वाटतंय की नाही?’’
‘‘समजत नाहीये.’’
‘‘हळूहळू समजेल. ऐकून ऐकून बरं वाटायला लागेल. नुसतीच मुळमुळीत चर्चा नको. महाचर्चा हवी. नुसता कोमट ‘संवाद’ नको. महासंवाद हवा. नुस्ता फुटकळ ‘विजेता’ नको. महाविजेता हवा. एकदम भव्यदिव्य वाटतं की नाही?’’
‘‘महाभव्यदिव्य वाटतं.’’
‘‘है शाबाश! असं हवं माणूस. झटकन परिस्थितीशी समझौता करणारं! म्हणजेच, सध्याच्या भाषेत, ‘महासमझौता’ करणारं!’’
‘‘आपल्या लहानपणी ‘महा’चा अर्थ एवढा बरा नव्हता, नाही?’’
‘‘कशावरून?’’
‘‘खूप म्हणजे खूपच चिडली की आई मला ‘महामूर्ख’ म्हणायची. एखादं मूल फार वांड असलं की त्याला ‘तो नाऽ अगदी महाऽऽ आहे’ असं म्हटलं जायचं. म्हणजे एकुणात, चांगला तो महान आणि वाईट तो महाऽऽ अशी काही तरी वाटणी असावी बहुधा.’’
‘‘असेल! पण काय असायचं, तेव्हा आपल्याला वेगळं ‘महामूर्ख’ वगैरे म्हणावं लागायचं. आता लोक तसं म्हणत बसत नाहीत. परस्पर आपल्याला महामूर्खात काढून मोकळे होतात.’’
‘‘तुम्ही बरे काढून घेता?’’
‘‘आम्हा पामरांसी कोण हो पुसतो? म्हणजे विचारतो? नाही तर हातात फडकं घेऊन पुसणं असं वाटायचं तुला.’’
‘‘परदेशात राहिल्याने माझं मराठी चांगलं आहे.’’
‘‘असा तुझा भ्रम आहे बये. निव्वळ भ्रम. महाभ्रम. तुझ्या मते आहे ना तुझं मराठी चांगलं? मग प्रत्येक शब्दाला ‘महा’ची अशी महिरप लावायचं तुला कागं नाही सुचलं?’’
‘‘मग कोणाला सुचलं? तुला? मराठीची अशी महादशा करण्याला तू कारण आहेस की काय?’’
‘‘मी नाही गं! माझी कुठे एवढी प्रतिभा? ही सगळी एकेका महाचॅनेलवरच्या महानिवेदकाची महाकमाल आहे. मला विचार. मी बाई प्रत्येक स्पर्धा कशी निवडफेरीपासून महाअंतिम फेरीपर्यंत अगदी महानिष्ठेने बघते. जेवण नको, झोप नको, काही नको त्याच्यापुढे!’’
‘‘हे महाअंतिम, महाअंतिम काय लावलंयस महापासनं? म्हणजे मगापासनं? अंतिम ह्याचा अर्थच अगदी शेवटचं असा ना? मग त्याच्या मागे ‘महा’ कसा काय लावणार?’’
‘‘लागतो. आमच्यात लागतो. हल्ली कशाच्याही मागे ‘महा’ लावण्याची महालाट आलीये इकडे. होऊन जाऊ द्या! महाअंतिम तर महाअंतिम.’’
‘‘गुरू आहेस.’’
‘‘गुरू काय? ग्युऱ्यु क्याय? महागुरू म्हण. कसलं वजनदार वाटतं.’’
‘‘हे मात्र मी अजिबात ऐकून घेणार नाही हं, गुरूच्या वर कधीच कोणीच जाऊ शकत नाही. गुरू अंतिम, गुरू सर्वोच्च असं शिकलो ना आपण?’’
‘‘असेल! आपल्या लहानपणच्या त्या महादरिद्री काळामध्ये असल्या महाक्षुद्र कल्पना असतील एक वेळ. पण आता नाही. आता आमच्याकडे ‘महागुरू’ असतो आणि तो एकदा दुडक्या चालीनं दुडदुडत आपल्या महाखुर्चीवर टेकला की गुरुगुरुगुरुगुरू उपदेशामृत गाळायला मोकळा होतो. तसा आदेशच असणार त्याला. स्वत:ला काही कळो न कळो, दुनियेतल्या यच्चयावत विषयांमध्ये उपदेश कर, महा उंच पट्टी धर आणि समोरच्या सगळ्यांना आपले बंदे कर.’’
‘‘अच्छाऽ म्हणजे असे दिवस आल्येत म्हणायचे तर..’’
‘‘दिवसबिवस नाही गं. दिवस गेले. दचकू नकोस. आपल्यातल्या हिलातिला नाही दिवस गेले. जनरल मराठीतले दिवस गेले. आता म्हणजे कसं? थेट ‘पर्व’ येतं. पहिले नुसतं ‘पर्व’, मग ‘महापर्व.’ मग ‘सुपरपर्व’ अध्याय! महाअध्याय! सुपर अध्याय! संग्राम! महासंग्राम! सुपरसंग्राम!
अशी सारखी आम्हीच आमच्यावर कडी करत असतो आजकाल. ब्रीद एकच, जरा म्हणून पट्टी घसरू द्यायची नाही. पट्टी बोलण्याची, पट्टी भाषेची. सदैव उंचात उंच ठेवायची. प्रत्यक्ष जगण्यात कितीदाही, कितीही खाली घसरावं लागलं तरी चालेल. असं महाधोरण आहे आमचं.’’
‘‘याला कोणी हरकत घेत नाही?’’
‘‘कोण घेणार? ज्या भाषेत अध्यक्षाविना संमेलन होतं, ज्या भाषेत एकदा छापलेली- वाचलेली- वाटलेली पुस्तकं मागे घेता येतात, त्या भाषेत हरकती वगैरे घेण्याइतका स्वाभिमान आणि त्राण कोणामध्ये उरलाय? मागे कधी तरी ‘भयंकर सुंदर’ असा शब्दप्रयोग आला. तो तोंडोतोंडी रुळून गेला. मग कधीतरी ‘प्रचंड प्रेम’ वगैरे आलं. तेही प्रेमानं आपलंसं केलं. सध्या ‘महा’चा महापूर आहे. तो अंगवळणी पडेल. महा तर महा! लोकहो, बघत राहा.’’
मैत्रीण खरोखरच माझ्याकडे विस्मयाने बघत राहिली. ती नेहमी इथे राहत नसल्याने तिला माझ्या कडकडाटापैकी बरंच काही कळलं नसेल हे शक्य होतं. एकेकाळच्या माझ्या गरीब बिचाऱ्या ‘भयंकर सुंदर’ मराठीवर ‘प्रचंड प्रेम’ असल्याने तिचीही महादशा मला कधीकधी महाअसह्य होते. आणि मी उगाचच एखाद्यावर महाचिडचिड करते तसं काहीसं त्या दिवशी झालं असणार! तरीही आम्ही जात्याच हुशार असल्याने या हृदयीचं त्या हृदयी नक्की पोचलं असणार, असं मानायला जागा आहे. परवाच तिचं एक शुभेच्छाकार्ड मला टपालाने आलंय. पत्त्यामध्ये तिनं पठ्ठीनं ‘महापुणे, महामहाराष्ट्र, महाभारत’ असं लिहिलंय. पोस्टमननेही त्याचं रामायण न करता अगदी निमूट ते माझ्या टपालपेटीत टाकलंय. अशा प्रकारे तिला-मला- पोस्टमनला असा सर्वत्र महाआनंदीआनंद झालेला आहे.
मंगला गोडबोले
mangalagodbole@gmail.com