Leading International Marathi News Daily
शनिवार, १८ जुलै २००९
  वावटळीतले तारणहार
  बोट सोडून खांद्यावर हात!
  आरामदायी मॅट्रेस
  पण बोलणार आहे!
मराठीची महादशा
  विज्ञानमयी
  प्रतिसाद
  ‘जिव्हाळ्याची ई-बेटं’
बंध नात्यांचे
  मी एक ‘ढ’!
  काळ सुखाचा
.. हा दिवस मुलांचा!
  समलिंगी संबंधांतील प्रश्नोपनिषद
  चिकन सूप...
माझं आयुष्यच बदललंस रे!
  अत्याचारालाही जात असते?
  ‘अक्षरयात्री’चे अक्षरमैत्र
  ललित
पक्षीनिरीक्षण सोहळा
  रुग्ण-हक्कांची सनद
  खजुराहो

 

प्रतिसाद
आक्षेपार्ह लेख

‘चतुरंग’मधील (४ जुलै) ‘काळ सुखाचा’ सदरातील पराग पाटील यांचा ‘नवा अध्याय’ हा लेख वाचला.
मला तेरा वर्षांचा मुलगा आहे. आणि मी हे सदर अगदी सुरुवातीपासून वाचतो आहे. ‘मुलांबरोबर क्वालिटी टाइम घालवणे’ ही या सदराची मूळ थीम. पराग पाटील यांच्या आजवरच्या लेखांचा या थीमशी फारसा संबंध मला तरी दिसलेला नाही. पण या अंकातला लेख तर त्या सर्वावर कडी करणारा आहे. दहा वर्षांच्या मुलाचं सेक्शुअल ओरिएंटेशन (म्हणजे काय?) आणि त्याचं त्यांना अकाली वाटणारं टेन्शन यामुळे मुलांच्या मॅस्क्युलीन वृत्ती (पुन्हा म्हणजे काय?) जाग्या करण्यासाठीचे त्यांचे उपाय- हे सगळे प्रकार फारच अतक्र्य व भीतीदायक आहेत आणि त्यांना कसलाही शास्त्रीय आधार नाही.
गेली दोन दशकं इमोशनल इंटेलिजन्सवर चाललेल्या संशोधनातून कळलंय की, मुलांना आपल्या भावना व्यक्त करता येणं, त्यांना तसं करू देणं किती महत्त्वाचं आहे! ती भावनिकदृष्टय़ा समृद्ध तसंच आयुष्यात पुढे यशस्वी होण्यासाठी हे खूप गरजेचं आहे. अशा काळात पराग पाटील आपला मुलगा रडला तर त्याला- ‘ए, पोरींसारखा रडत का बसलायस?’ असं विचारून ‘मुली रडतात आणि रडणं चुकीचं’- असा अत्यंत चुकीचा संदेश त्याला देत आहेत. मुलगा चिडून रडणं थांबवत जरी असला

 

तरी वरकरणी चांगली वाटणारी ही गोष्ट किती चुकीची आहे! ज्या कारणासाठी तो रडत होता, त्याचं काय? ते क्षुल्लक असं तुम्ही कसं ठरवणार? मुलाला तो रडत असताना त्याची भावना पूर्ण व्यक्त करायला मदत करायचं सोडून लेखक त्याला ‘रडणं (भावना व्यक्त करणं) चुकीचं’ हा मेसेज देत आहेत. आणि कशासाठी, तर त्याच्यातल्या मॅस्क्युलीन वृत्ती जाग्या करण्यासाठी?!!
मुलीसारखं रडू नको सांगणं, बायकोनं- जेण्डर बायस्ड बोलू नकोस, असं सांगितल्यावर त्याकडे दुर्लक्ष करणं, आणि वर हे अभिमानानं सांगणं, मुलासमवेत टीव्ही मालिका पाहून बॉईज टॉक नावाखाली आईला सांगू नको सांगणं, मुलींची म्हणून रूढ असलेली कंपासपेटी मुलाने पालीसारखी झटकली म्हणून खूश होणं, हेच त्यांचे मॅस्क्युलिनिटीचे मानक आहेत का? आणि दहा र्वष मुलांच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर बाप म्हणून हात देण्याचे किस्से..? आणि आता तो ‘नॉर्मल’(?) आहे असं दिसल्यावर ‘हात आखडता घेऊन दुरून बघावं’, हा पालकत्वाचा कोणता नवा धडा ते आपल्याला देत आहेत?
सेक्शुअल ओरिएंटेशन, नॉर्मल होण्यासाठीचं मुलांचं संगोपन अशा अति गुंतागुंतीच्या विषयाला हात घालून पराग पाटील यांनी त्याला जे हलकंफुलकं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे, तो अतिशय केविलवाणा आणि आक्षेपार्ह वाटातो.
समानतेच्या मूल्यांचा सतत पाठपुरावा करणाऱ्या आणि मुलांचं संगोपन या विषयाकडे सजगतेने लक्ष देणाऱ्या ‘चतुरंग’ पुरवणीत असं काही छापलं जाण, हे खटकलंच पालकत्वाच्या नावाखाली कुणाच्या काहीही कल्पना असू शकतात, असतातही. पण म्हणून कसलाही शास्त्रीय आधार नसलेल्या कल्पना तुम्ही अशा जाहीर व्यासपीठावर धकवू शकत नाही.
- मिलिंद पळसुले, बोरिवली.

कवितेच्या वाटेवरील फुलांच्या पायघडय़ा
‘चतुरंग’ पुरवणी अत्यंत वाचनीय असते. मी तर शनिवार केव्हा येतो याची वाट पहात असते. ‘कवितेच्या वाटेवर’ असलेल्या फुलांच्या पायघडय़ा चालताना शनिवारी इतकी उत्तम कविता आस्वादायला मिळते.
‘येरे येरे घना’मधील वाऱ्याने चुरगळलेली फुलं गंध सर्व रानात पसरवतात. ‘टाकुनिया घरदार’- ही आळवणी तर प्रत्येकाच्या अंतर्मनाची.
या कवितेच्या पावसातून बाहेर निघावेसे वाटत नाही. त्याची धुंदी ओसरते तोच ज्ञानदेवांची ‘विरहिणी’ जणू मूर्तिमंत प्रगट झाली. ढगांचा आवाज नूपुरासारखा- पायातल्या पैंजणांसारखा मोहवतो. विरहिणीला भवतारकु कान्ह्य़ाच्या भेटीची ओढ मनस्वी भासते. सर्व शीतल गोष्टी तिला दाहकारक वाटतात. हळूहळू मनाची ओढ तीव्र होते. तिचं मन स्वत:च्या प्रतिबिंबाऐवजी परमात्म्याचंच रूप आरशात पाहतं. तो ब्रह्मानंदाचा क्षण- परमानंदाचा क्षण- त्यात तन्मय पावलेली विरहिणी- आठवडाभर तिचंच चिंतन. आणि पुढच्या शनिवारी भेटली ‘कुब्जा’.
भागवतातील कुब्जा फारशी ओळखीची नाही. पण इंदिरा संतांची ‘कुब्जा’ अतिशय जवळची, हृदयात कायम वस्ती करून राहिलेली. अगदी थोडय़ा शब्दांत भावनांचा खळखळ वहाणारा झरा डोळ्यांपुढे उभी करणारी. पहाटेची रम्य वेळ, ‘केसरी चंद्र’ मावळतीकडे झुकलेला अशा अवेळी मंजुळ पाण्याचे स्वर कानावर पडल्यामुळे तृप्त समाधानी कुब्जा मनाच्या फलकावर सुंदर रंगसंगतीने चित्रित झाली. कृष्णावर अत्यंत भक्ती करणारी कुब्जा, कृष्णाने सौंदर्य बहाल केलं म्हणून कृष्णमय झाली. त्याच्या बासरीचे सूर तिच्यासाठी उमटले. यातच ती धन्यता मानते- जीवनाचे सार्थक झाले असे तिला वाटते व आधीचे सर्व अपमान, अवहेलना ती विसरून जाते. कुब्जा व तिला आनंद देणारा कृष्ण- मनात घर करून राहतात.
ल. गो. देव, डोंबिवली.