Leading International Marathi News Daily
शनिवार, १८ जुलै २००९
  वावटळीतले तारणहार
  बोट सोडून खांद्यावर हात!
  आरामदायी मॅट्रेस
  पण बोलणार आहे!
मराठीची महादशा
  विज्ञानमयी
  प्रतिसाद
  ‘जिव्हाळ्याची ई-बेटं’
बंध नात्यांचे
  मी एक ‘ढ’!
  काळ सुखाचा
.. हा दिवस मुलांचा!
  समलिंगी संबंधांतील प्रश्नोपनिषद
  चिकन सूप...
माझं आयुष्यच बदललंस रे!
  अत्याचारालाही जात असते?
  ‘अक्षरयात्री’चे अक्षरमैत्र
  ललित
पक्षीनिरीक्षण सोहळा
  रुग्ण-हक्कांची सनद
  खजुराहो

 

‘जिव्हाळ्याची ई-बेटं’
बंध नात्यांचे
यापूर्वी ‘चतुरंग’ पुरवणीत ‘जिव्हाळ्याची बेटं’ आणि ‘आपुलकीचे कट्टे’ या दोन संकल्पना मांडल्या गेल्या होत्या. त्या संकल्पना प्रत्यक्षात आणणाऱ्या आपल्यापैकी असंख्य वाचकांनी आपापल्या जिव्हाळ्याच्या बेटांवरील अनुभवांचे कथन केले होते. आपुलकीच्या कट्टयांवरचा वावर कसा आश्वस्त करतो, याबद्दलही अनेकांनी लिहून कळवले होते. या दोन्ही संकल्पनांना वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला, त्यावरूनच नाती जोपासण्याची आस समाजाला किती वाटतेय, हे सिद्ध झाले होते.
जागतिकीकरणाच्या या युगात समाज संक्रमणावस्तेतून जात आहे. प्रत्येकाच्या जीवनातील व्यग्रता, धावपळ वाढली आहे. जीवनशैली बदलत आहे. नवे बदल स्वीकारत पुढे चाललेल्या समाजाला व्यक्तिस्वातंत्र्य हवेहवेसे आहेच, पण त्याचबरोबर नातेबंधांतील आपुलकीची वीण विसविशीत होऊ नये, असेही वाटते आहे. त्यामुळे सहाध्यायी, सहकारी अशा नात्यांचे नवनवे

 

बंध निर्माण केले जातात. तसेच नातलगांचा घरगुती सपोर्ट ग्रुपही जोपासण्याची धडपड अनेक जण करताना दिसतात. जग जवळ आणणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर हे यासाठी वरदान ठरत आहे. आणि अनेक जण त्याचा पुरेपुर वापर करताना दिसत आहेत. ई-मेल, ई-ग्रुप अशा आधुनिक माध्यमांद्वारे संपर्कात राहणे आणि परस्परांत नेटवर्किंग करणे सहजसोपे झाले आहे. प्रत्यक्ष भेटीसाठी वेळ नाही, ही सबब या ई-भेटी दूर करतात. सततचा संपर्क नातलगांना जवळ ठेवतो. परस्परांना एकमेकांची माहिती कळत राहते. प्रसंगी हक्काची मदत मिळू शकते. अनेक विषयांची चर्चा या आधुनिक व्यासपीठांवर होते. थेट भेटींची ठरवाठरवी होते. म्हणजे आपुलकीचे कट्टे आधुनिक माध्यमांद्वारे भक्कम राहतात आणि अधूनमधून आपापल्या जिव्हाळ्याच्या बेटांवर मैफिली जमतात. ते सारे जण तिथे विसावतात. सामाजिक सुरक्षितता अनुभवतात. प्रस्तुत लेख म्हणजे, जिव्हाळ्याच्या ई-बेटावरचा एक अनुभव. अपलेही असे अनुभव जरूर कळवा.
आपणही ई-मेल, ई-ग्रुप अशा तत्सम नेटवर्कचा लाभ उठवत, स्वत:चे बंध घट्ट करून आपापला सपोर्ट-ग्रुप जोपसत असाल, तर आपले अनुभव जरूर कळवा. आपण अपला ग्रुप कसा बांधून ठेवता, एकमेकांना कसे उपयोगी पडता, कोणत्या विषयांवर आवर्जून चर्चा करता, एकत्र जमता, तेव्हा कायकाय करता, याबद्दल कमाल ५०० शब्दांत, (शक्यतो ग्रुप-फोटोसह) २८ जुलैपर्यंत लिहून पाठवा.
पाठवण्याचा पत्ता- ‘जिव्हाळ्याची ई-बेटं’, चतुरंग पुरवणी, लोकसत्ता संपादकीय कार्यालय, एक्स्प्रेस टॉवर, नरिमन पॉईंट, मुंबई- ४०००२१.
ई-मेल- chatu.lok@gmail.com

‘‘अहो वरच्या वहिनी, पाऊस नसतानाही काल आम्ही चिंब-चिंब भिजलो.’’
‘‘मी समजले नाही, काय म्हणायचंय तुम्हाला?’’
‘‘अहो, काल रात्रभर तुमच्या घरातून अक्षरश: हास्याचे धबधबे खाली लोटत होते. त्यात आम्ही पार ओलेचिंब झालो.’’
‘‘वहिनी, खरं तर मीच ‘माफ करा’ म्हणायला येणार होते. रात्रभर तुम्हाला त्रास झाला ना?’’
‘‘मुळीच असं म्हणू नका. उलट आम्ही भाग्यवान! इतकं निखळ, मोकळं हसणं खूप वर्षांनी ऐकलं. खूप आनंद झाला, पण तुम्ही सारे मित्र-मैत्रिणी आहात का?’’
‘‘नाही. आम्ही नातेवाईक आहोत!’’
‘‘पण काल काही विशेष होतं का? हं, आवडत असेल तर जरा सविस्तरच सांगा की!’’
वहिनी म्हणाल्या-
‘‘अहो, सांगते की! त्यात लपवण्यासारखं तर काही नाहीच आहे, उलट सर्वानी ऐकण्यासारखंच आहे. मी स्मिता भागवत. माझे वडील दादा घैसास. करोगेटेड बॉक्सेसच्या उत्पादनातलं एक नाव. दादांची आठ भावंडं आहेत. सहा बहिणी- दोन भाऊ! ही झाली घैसासांची पहिली पिढी. या आठ भावंडांची एकूण १९ मुलं (१५ मुली व ४ मुलगे)- ही झाली दुसरी पिढी. म्हणजेच माझी पिढी. साधारणत: ३० ते ४५ वर्षे असा या दुसऱ्या पिढीचा वयोगट आणि आम्हा १९ भावंडांची २४ मुलं (३ वर्षे ते १९ वर्षे) ही तिसरी पिढी. आम्ही दुसऱ्या पिढीतली सारी आते-मामे (एकमेकांचे) भावंडं आहोत. आम्ही १९ जण (परस्परांचे आते-मामे भावंडं) आमच्या लहानपणी आजी-आजोबांना भेटायला निदान वर्षांतून एकदा जायचो. रत्नागिरी जिल्ह्य़ातल्या दापोली तालुक्यातलं केळशी हे आम्हा घैसासांचं गाव. दापोली तालुक्याच्या गालावर पडलेली खळी म्हणजे हे आमचं गाव. देखणेपणाचं लेणं घेऊनच आलेलं. अगदी जुन्या वळणाचं आमचं कौलारू घर. घरासमोर अंगणात अबोली, जाई-जुई, शेवंतीचे ताटवे, सारवलेलं अंगण, तुळशी वृंदावन. घरामागे मोठी गोल विहीर. आंबे, फणस, नारळ, चिकू, पपनस अशी अनेक झाडांची गर्द दाटी. ओटी, पडवी, मोठं माजघर, त्यातला झोपाळा, बाजूच्या खोल्या, माडी! झोपाळ्यावर आम्ही दाटीवाटीने बसून धुडगूस घालायचो. परीक्षा संपली की उन्हाळ्याची सुट्टी लागतेय कधी याचीच वाट पाहायचो आम्ही! महिनाभर मुक्काम पोस्ट केळशी!
आजीच्या हातच्या तांदळाच्या चुलीवरच्या गरम गरम भाकऱ्या, कुळथाचं पिठलं, अढीतनं काढलेल्या आंब्याचा रस, कण्या घालून केलेली फणसाची सांदणं, झाडाच्या ताज्या कोकमांचं सरबत, उतरवलेली शहाळी, चर्रऽऽर्र फोडणी दिलेली अंबाडीची भाजी.. अहाहा! झाडावरच्या सूरपारंब्या, पत्ते, झाडावर चढणं, समुद्रावरच्या वाळूत मनसोक्त हुंदडणं, विहिरीच्या पाण्यानं झाडाचं शिपणं, गोठय़ातल्या म्हशींना चारा देणं, असं काय काय करायचो. दुपारच्या वेळी आदिवासी बाया भाजी आणायच्या, त्याच्या बदल्यात आजी कधी नारळ द्यायची. केळीच्या पानावर जेवताना येणारी मज्जा औरच होती. वालाची उसळ केली की आम्ही सारेच खूश व्हायचो, पण कुळथाची उसळ असली की झाली आमची तोंडं वाकडी व्हायची. मग आजी समजावणीच्या स्वरात म्हणायची, ‘मुलींच्या जातीला आवर्जून खावी ही उसळ! मोठी होताना कसलाच त्रास नाही व्हायचा.’ तेव्हा हे आजीचं बोलणं कळायचं नाही, आता मात्र पटतंसुद्धा!’’
‘‘तुम्ही सारी आते-मामे भावंडं ना? विशेषच आहे. नाहीतर ‘आत्या म्हणता-म्हणता गेला तोंडातून वारा..’’
‘‘अहो, उलट या महिनाभरात आमचं नातं सख्ख्याहूनही अधिक घट्ट व्हायचं. मनाने खूपच जवळ यायचो आम्ही. आम्ही सुट्टीत केलेले नाच, बसवलेली नाटकं, एकपात्री कार्यक्रम, संध्याकाळी तुळशीजवळ आजीने दिवा लावला की एकत्र म्हटलेल्या परवचा, ‘शुभं करोति’, सांजावलेली ती कातरवेळ या पवित्र बोलांनी पटकन संपून जायची. आणि सुट्टीही.. पुढे आजी-आजोबा गेल्यावर, गावी एकत्र जाणं सगळ्यांसाठी वेळेमुळे जमेनासं झालं. लग्न, मुंज अशा कारणपरत्वेच सर्वाची भेट व्हायला लागली.
आता आपणच कमी प्रमाणात भेटलो तर आपल्या मुलांना- तिसऱ्या पिढीला परस्परांबद्दल आत्मीयता कशी बरं वाटेल? या विचारमंथनातून एका विवाह सोहळ्यात एक योजना ठरली. वर्षांतून किमान एक निवासी सहल. तेव्हापासून असं भेटणं चालू झालं. १९९४ सालापासून निवासी सहल चालू झाली. १५ वर्षे झाली. डिसेंबरची वर्षअखेर, परीक्षा, मुलांचे क्लास असे अडथळे जेव्हा नसतील अशी वेळ बघून वर्षभरात कधीही.’’
‘‘एकूण कितीजण असता बरं?’’ वहिनींची उत्सुकता ताणलेली.
‘‘आम्ही ६० जणं आहोत. अगदीच अनिवार्य अडचण आल्यास ४-५ जण क्वचित गळतात. नाहीतर कोरम फुल्ल! यात वय वर्षे तीन पासून ५० वर्षांपर्यंतचे सारे जण असतो. अनेक विषयांवर चर्चा घडतात. अर्थात वादविवाद, मतभेद होतात, पण ते त्या विषयांपुरतेच. परत एकत्र यावंसं वाटतं ते या खेळीमेळीच्या वातावरणामुळे!’’
‘‘कोणाच्या मुलाची शाळा प्रवेशाची वेळ असली की, शिक्षणाचं माध्यम कोणतं असावं, वयात येणाऱ्या मुलामुलींच्या समस्या, शेअर मार्केट, राजकारण, दहावीनंतर पुढे काय, असं करियर मार्गदर्शनही घडतं. आम्हा भावंडांत इंजिनीअर आहेत, काही पीएच.डी. प्राध्यापक आहेत. पत्रकार, शिक्षिका अशा विविध क्षेत्रांतल्या अनुभवांचा सर्वानाच लाभ होतो. गेल्या वर्षी माझी मुलगी बारावी झाली. तिला इंजिनिअरिंगला जायचं होतं. प्रत्येकाने आपापल्या परीने मतं मांडली. त्यामुळे माझ्या मृण्मयीला निर्णय घेणं सोपं गेलं. काही सामाजिक विषयांवरही चर्चा होते. आमच्या भावंडांपैकी काही जणांनी दत्तक मूल घेतले आहे.’’
‘‘आई, आम्ही सात-आठ भावंडं मागे व्यक्तिमत्त्व विकास शिबिराला गेलो होतो, आठवतं का?’’ स्मितावहिनींची मुलगी मृण्मयी आठवून म्हणाली. त्या वेळीपण आमची गट्टी छान जमली होती.
‘‘आणखी कोणते विषय? अपंग मैत्री, उत्तरक्रिया तसंच, एकाने नर्मदा परिक्रमा केली, एकाने डॉ. अभय बंग यांचं काम तर एकाने डॉ. विकास आमटे यांचं काम बघितलं. तिथलं वर्णन केलं. आमच्यातल्या शिक्षकांनी बाजारात आलेल्या नवीन पुस्तकांबद्दल सांगितलं. मराठी, इंग्रजीसुद्धा! परदेशात स्थायिक व्हावं का? येथपासून ते राजकीय पक्षांवर खुली चर्चाही! शिवाय खेळही होतेच. पत्ते, अंताक्षरी (मराठी गाण्यांची), जी. के. प्रश्नमंजूषा, श्री. तशी सौ. (नवरा- बायकोंसाठी प्रश्न), वकीलपत्र, उभा खो-खो, तळ्यात- मळ्यात, मराठीला इंग्रजी पर्यायी शब्द असे खूप खेळ झाले. संध्याकाळी एकत्र अथर्वशीर्ष, रामरक्षा, मारुतीस्तोत्र म्हणून झालं. सकाळी निसर्ग भ्रमंती, पक्षिनिरीक्षण, डोंगर चढणं.’’
‘‘वरनं मस्त घमघमाटही येत होता- काय- काय खाणं होतं?’’
‘‘आचारीच बोलावले होते. सामोसे, भेळपुरीपासून सारं झालं.’’
‘‘बरं या मुलांनाही असं भेटणं आवडतं का?’’
‘‘हो खेळ असतातच. बऱ्याच प्रश्नांवर चर्चा झाल्याने मुलांनाही आवडतं. निर्णय घेताना त्याचे पर्याय समजतात. वेगवेगळ्या प्रकारचे विचार करता येतात ही जाणीव समृद्ध होतेच. शिवाय आदिवासी भागातलं काम, वाचन, परदेशवारीचे अनुभव, केशवसृष्टी, नॅब इ. संस्थांची माहिती समजते. नर्मदा परिक्रमासारखा विषय! आमच्यातल्या दोघींनी तर मुलांना वेळ देण्याकरिता नोकरी सोडून लघुउद्योग सुरू केला आहे. त्यांचे अनुभव, अशा साऱ्यांतून मुलं अनुभवसमृद्ध होतात. जीवनाची दृष्टी विकसित होते. एखाद्याच्या आर्थिक अडचणीत, अपघातात आर्थिक मदत आणि मनुष्यबळ दोन्ही अर्थानी सारे पाठीशी उभे राहतात.’’
‘‘दरवेळी ही तुमची सहल असते तरी कुठे?’’
‘‘रिसॉर्टपासून एखाद्या बंगल्यापर्यंत वा जमेल तसं. गादीपासून सतरंजीपर्यंत व ताटल्या धुण्यापर्यंत सहकार्यासाठी सारेच तयार असतात. माणशी खर्च २५०/- ते ३००/- इतका होतो. त्यात एखाद्याचा वाढदिवस, बक्षीस असा योग आला तर मज्जाच असते. तिसऱ्या पिढीची प्रतिनिधी मृण्मयी म्हणाली- ‘‘मी एकुलती एक, पण इतकी भावंडं मला आहेत, त्यांचं नातं जवळचंच आहे. या चर्चातून आत्मविश्वास वाढतो, चर्चेतून प्रश्न सुटतात. खूप दिवस या सहलीच्या आठवणीत आनंदात जातात. आता आम्ही नेटवर ‘घैसास याहू ग्रुप’ केला आहे. एक ‘मेल’ केला की सर्वाना निरोप कळतो.
आमच्या पहिल्या पिढीचा ‘हिंडू- फिरू क्लब’ आहे. नणंदा, भावजया वीसजणी भेटतात. मज्जाही करतात. वैचारिक खाऊही असतो. आपल्या चौकोनी घरापलीकडे सामाजिक बांधीलकीने गुंतलेलं वेगळं भावविश्व आहे. नात्यांचे बंध जुळवत, माणुसकीचं, सहकार्याचं नातं जोडणारी ही ‘निवासी सहल’ सहजीवनाचा अनुभव देऊन जीवन समृद्ध करणारी! प्रत्येक घराच्या मन:तरंगावर अशी गाज ऐकू आली तर? कदाचित सागरी सेतूबरोबर मन:सेतूही जुळतील नाही का वहिनी?’’
शोभा नाखरे