Leading International Marathi News Daily
शनिवार, १८ जुलै २००९
  वावटळीतले तारणहार
  बोट सोडून खांद्यावर हात!
  आरामदायी मॅट्रेस
  पण बोलणार आहे!
मराठीची महादशा
  विज्ञानमयी
  प्रतिसाद
  ‘जिव्हाळ्याची ई-बेटं’
बंध नात्यांचे
  मी एक ‘ढ’!
  काळ सुखाचा
.. हा दिवस मुलांचा!
  समलिंगी संबंधांतील प्रश्नोपनिषद
  चिकन सूप...
माझं आयुष्यच बदललंस रे!
  अत्याचारालाही जात असते?
  ‘अक्षरयात्री’चे अक्षरमैत्र
  ललित
पक्षीनिरीक्षण सोहळा
  रुग्ण-हक्कांची सनद
  खजुराहो

 

मी एक ‘ढ’!
काय असतं, माणसं घडवतानाच देव काहीजणांच्या मेंदूत स्पेशल फिटिंग्ज करतो. म्हणजे कसं की, त्यांना सगळं येतं. ज्ञान, अभ्यास इत्यादी असतंच, पण आणखीही काही असतं. त्यांना रिक्षावाल्यांबरोबर मीटरमध्ये पाहून हिशोब करता येतो. अगदी ‘परतीचं भाडं’ असलं तरीही.. आजकालच्या मॉलमध्ये एकावर दोन फुकट, चारावर तीन फुकट अशा बंपर ऑफर्स असतात. त्यावरचं फुलीचं चिन्ह आमच्यासारखे बिनडोक कधीच वाचत नाही. येडय़ासारखे खरेदी करतो आणि काऊंटरवर कळतं- फुकट नाही. त्यामध्ये अटी आहेत. पण ही माणसं.. खटाखट किमती सांगतात. त्या काऊंटरमागचेही त्यांना सामील असल्यासारखे पटापट बॅगा भरतात की निघाले. आम्ही अडकलोय घोळात..
या लोकांना थिएटरमधली सगळ्यात सुंदर जागा कुठली, हे मान वाकडी करून प्लॅन न बघताच कळतं आणि मध्यंतर कधी

 

होणार, हे बहुतेक लेखकानेच किंवा दिग्दर्शकाने त्यांच्या कानात सांगितलेलं असतं बहुतेक. हे आधीच उठून गर्दीच्या आधी बाथरूमला जाऊन बटाटेवडे घेऊन परत खुर्चीत. इकडे आम्ही गुपचूप पाणी पितो.
हे सगळं सांगायचं कारण परवा ‘प्रीटी वुमन’ हा सदाबहार चित्रपट पाहत होते. त्यात तो रिचर्ड गेर त्याच्या वकिलाची एकदम भारी गाडी घेऊन बाहेर पडतो, पण त्याला ती काय जमत नाही. पुन्हा हॉटेलचा सूटचा दरवाजा उघडताना ते कार्ड स्वाईप होत नाही, तेव्हा तो पुटपुटतो.. ‘हाऊ आय मिस बॉक्स!’ मला एकदम तो आपलासा वाटला.. म्हणजे माझ्यासारखा ‘ढ!’ या कार्डाने माझ्यावर एक प्रचंड आफत आणली होती.
दहा-पंधरा वषार्ंपूर्वी एटीएम कार्ड्स सर्रास मिळू लागली. माझ्या एका अशाच माझ्यासारख्या हुशार मैत्रिणीने हौसेने कार्ड घेतलं. माझा पहिलाच अनुभव आणि तिचाही कदाचित पहिलाच, पण ती दाखवत नव्हती. तिने एटीएम सेंटरपाशी पोहोचल्यावर एकदम जेम्सबाँडसारखं कार्ड काढलं आणि ते स्लीटमध्ये घातलं. मी खरंच जाम इंप्रेस झाले. साधारणपणे २/४ मिनिटांनंतर कार्ड बाहेर. तिने माझ्याकडे 'don’t worry' असा कटाक्ष टाकून परत कार्ड स्वाईप केलं. पुन्हा तेच झालं. मी आपली बॅगमधली रोख रक्कम मोजायला लागले. हिची झटापट चालूच. संध्याकाळची वेळ. चर्चगेटचा एरिया. माणसं वाहाताहेत आणि पुन्हा आमच्यामागे रांग लागलेली, पण ही मर्दानी हार मानायला तयार नाही. आणि अचानक एकदम त्या सेंटरमधून वॉव वॉव असा अलार्म. चांगला कान फोडणारा. खरं सांगते, बर्फगार होणं हे काय ते मला तेव्हा कळल. बरं तर कार्ड हट्टी मुलासारखं आत अडकलेलं. मी आपली घाम टिपत.. आजूबाजूची माणसं संशयाने बघायला लागली. अलार्म थांबायचं नाव नाही. मी तिला खेचणार, इतक्यात रांगेतला एक तरुण पोरगा आला- ‘आंटी मे आय..’ असं म्हणून त्याने ते कार्ड कसं जाणे काढलं. एवढं होऊनही ही ढिम्म. ‘कुछ तो प्रॉब्लेम है मशीन मे..’ त्याला म्हणाली. त्याने शांतपणे कार्ड आमच्यासमोर धरलं. गधडीने ऑफिसचं आय कार्ड वापरलं होतं. त्या पोराने तिचं एटीएम कार्ड घेतलं आणि पैसे काढून दिले. माझा तरुण पिढीवरचा विश्वास आणि प्रेम एकदम वाढलं. सांगायचा मुद्दा हा की, त्यापेक्षा बँकेत जाऊन पैसे काढणं बरं नाही का हो? मला तर मी बँक लुटारू वगैरेच वाटलेले तेव्हा..
फजिती सांगू नये म्हणतात, पण मी हा किस्सा सांगितला आणि अनेकांनी सहवेदना व्यक्त केल्या. आणि त्यातून आमच्यासारख्या लोकांना (म्हणजे Technically/ techniogically dumb) काय काय त्रास सहन करावा लागतो, हे कळलं.
हे ‘कार्ड स्वाईप’ सगळ्याच हॉटेलात असतं. मी माझ्या छप्पन्न पिढय़ा राजघराण्यात वाढल्यात, अशा थाटात त्या वेटर का जो कोण असतो तो मेला.. त्याच्याच हातात कार्ड देते. त्याने दरवाजा उघडून दिवे लावले की मग मी खूश.. पण खरी परीक्षा पुढे असते.. बाथरूममध्ये. माझा नवरा हा डोळे फक्त क्रिकेटचा स्कोअर बघायला वापरतो मला संशय होता, आता खात्री पटलीय. आजकाल लोक काय, हॉटेलवाले काय, बाथरूमवर अफाट खर्च करतात. अशाच एका भयंकर पॉश बाथरूममध्ये मी प्रवेश केला. एरवी संध्याकाळपर्यंत अंगाला पाणी न लावू देणाऱ्या माझ्या नवऱ्याला शुचिर्भूत व्हायची घाई होती. त्याने टीव्ही लावला आणि मी त्या नळासमोर.. विमानाचं कॉकपिटसुद्धा सोप्पं असेल हो.. दोन्ही नळ उलटेसुलटे फिरवले. मधला लिव्हर खेचला. पाणी नाही. हाईट म्हणजे कमोडच्या नळाला पाणी होतं, पण थंड. शेवटी रूम सव्‍‌र्हिसवाल्याला बोलावलं. (माझा असा पोपट नेहमी या तरुण पोरासमोरच का व्हावा?) मी वैतागले होतो. मला रूम बदलून द्या. काय फॉल्टी नळ आहेत, ही माझी बडबड ऐकून तो शांतपणे आत गेला. मघाशी दात-ओठ खाऊन फिरवलेले नळ त्याने एका विशिष्ट खुणेपाशी आणले आणि Vojia चक्क पाणी आलं. पण दुसरा झोल होता- शॉवर टबबाथमध्ये होता. मॅडम ये अभी लेटेस्ट है. सभी जगह ऐसाही मिलेगा.. असं म्हणून तो गेला. लग्नाला २२ वषर्ं झाल्यावर नवऱ्याला कितपत प्रेमाने बोलावता येईल, त्या आवाजात बोलावलं. पाणी पाहून आपली बायको तशी हुशार आहे, हे त्याच्या चेहऱ्यावर थोडंसं दिसलं. बाथटबमधली आंघोळ त्याला पटणारी नव्हती, पण पर्याय नव्हता. माझा accident prone स्वभाव जाणून त्याने इथे पडू-बिडू नकोस, असं सांगितलं आणि एकदाचा आंघोळीला गेला. मी ‘हुश्श म्हणून बसते, ना बसते तोच आतून यांचा ओरडण्याचा आवाज. मी रहस्यपटांची भोक्ती असल्याने ‘याला काय शॉक लागला की काय’ असा विचार करीत मला जमेल तितपत बाथरूमकडे धाव घेतली. दरवाजा उघडला गेला आणि हा काकडत टॉवेल गुंडाळून उभा. ‘गरम पाणी नाहीये’, असं म्हणत त्याने अंग पुसायला सुरुवात केली. त्याची चूक नव्हती. बाहेर चक्क बर्फ पडतोय. आणि त्यात थंड पाणी. मी पुन्हा रूम सव्‍‌र्हिसकडे वळणार, तोच बाथरूमबाहेरच्या एका बटणाने लक्ष वेधलं. ते मी जपून ऑन केले. आणि चक्क गरम पाणी. मी बॉयलरचा स्वीच चालू करायलाच विसरलेल, पण उरलेले सर्व दिवस मी एखाद्या जराजर्जर वृद्धाप्रमाणे त्या टबातून बाहेर येताना अगदी जपून येत होते. वास्तवाच्या शेवटी कस्टमर सजेशन नामक एक कॉलम भरायचा होता. तिथे मी फक्त एकच लिहिलं, Pl. use normal bathroom fitting. गंमत म्हणजे हा अनुभव थोडय़ा-फार फरकाने बऱ्याचजणांना आला होता, पण झाकली मूठ..
एवढं विस्ताराने सांगायचं कारण हल्लीच्या जगात आमच्यासारख्या तुलनेने जरा मंद माणसांना काहीही ‘युजर फ्रेंडली’ नसतं. साधा शाम्पू घ्या. बाटली ठीक, पण त्याची लहान पाकिटं मला आजतागायत व्यवस्थित फाडता आलेली नाहीत. तीच गोष्ट बाकीच्या उत्पादनांची. ब्रिस्टर पॅक (आपल्या भाषेत फोड आलेलं पॅकिंग) मधली कुठलीही वस्तू मी त्याच्याशी झटापट केल्याशिवाय उघडूच शकत नाही. अगदी पॅकवर Cut here असं लिहिलेलं असूनही. अगदी बॅटरीचं पॅकिंगही मला वात आणतं. यात आणखी एक. इलेक्ट्रॉनिक उपकरणाबरोबर येणारी त्यांची मॅन्युअल्स. ही वाचून ज्याला कळली, त्या महानुभवाला साष्टांग दंडवत. एक तर ते उपकरण कसं वापरू नये, हे प्रथम लिहितात. आणि मग ते कसं वापरावं हे अजिबात न समजणाऱ्या भाषेत असतं. मी मघाशी उल्लेख केलेली भाग्यवान मंडळी, ते न वाचताच ते उपकरण वापरतात. पूर्वी ब्रेड मिळायचा बघा.. साध्या पॅकिंगमध्ये, आता ती काय तरी झिगझ्ॉग पट्टी लावतात. ती उघडताना पुडय़ाची एक बाजूच लोंबू लागते. परिणाम उरलेला ब्रेड नीट डब्यात ठेवणं हे काम वाढतं. या सगळ्यात तापदायक प्रकार म्हणजे कॉम्प्युटर. त्याचं महत्त्व निर्विवाद आहे. मलासुद्धा मी गरज म्हणून थोडा-फार शिकलेय. पण मी बसले आणि हवी ती साईट मिळाली असं कधीच होत नाही. तो कॉम्प्युटर हँग होतो. साईट चुकीची आहे, हे सतत दिसतं आणि कहर म्हणजे शेवटी वीजच जाते. चला, गणपती बाप्पा मोरया!
माझा ‘ढ’पणा हा हल्ली तर फारच उघड व्हायला लागलाय. स्टेशनवर उतरल्यावर (अनोळखी) पूर्व कुठलं आणि पश्चिम कुठलं हे मला चार/ पाच वेळा विचारावं लागतं.
टीनओपनरने कधीही टीनचं झाकण आमच्याकडून सहज उघडलं जात नाही. तो पत्रा हाताला लागून रक्त आल्याशिवाय कार्य सिद्ध होत नाही. अगदी पेप्सी/ कोकसारख्या शीतपेयांचं टीनसुद्धा मी उघडते, तेव्हा आतला वायू हर्षवायू झाल्यासारखा आपल्या सर्वशक्तीनुसार ते पेय माझ्या अंगावर फेकतो. अशा वेळी बोलता, सहजपणे बोलता कॅन उघडणाऱ्यांकडे मी भक्तिभावाने बघते.
पूर्वी कसं सोपं होत! गोष्टी लक्षात ठेवायला कॅलेंडर. उठण्यासाठी गजराचं घडय़ाळ. दार बंद करायला साधं कुलूप. कोल्ड्रिंक प्यायला स्ट्रॉ. बाथरूमही साध्या एकदम userfriendy ?. पैसे काढायला बँॅक, तक्रार नोंदवायची असेल तर ऐकायला हाडामांसाचं माणूस. आता तुम्ही तक्रार नोंदवायला जा. फोनवरून कमेंट येते. आपण अमुक-अमुक असाल तर एक दाबा. अमुकसाठी दोन, तमुकसाठी तीन. आणि शेवटी आपली तक्रार नोंदवायला कुठला नंबर दाबायचा, त्याचा उल्लेखच नसतो. आणि आपण नंबरच विसरतो.
अमेरिकेत म्हणजे माझ्यासारख्या मते, तंत्रज्ञानाच्या विरोधात (खरं म्हणजे ‘ढ’) असणाऱ्यांनी back to basics म्हणून चळवळ उभी केलीय. काय करतील बिचारे. पूर्वी मला प्रचंड न्यूनगंड यायचा. आता या चळवळीमुळे मला माझा अडाणीपणा झाकण्यासाठी एक काहीतरी नवा शब्द शोधावा लागणार आहे.
पण तोपर्यंत या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणं भाग आहे. आणि नाहीच जुळवता आलं तर दैवावर भरोसा ठेवायचा. हे सगळं जरी असलं तरी माझी तंत्रप्रगत माणसाबद्दलची असूया आणि आदर कमी होत नाही. प्रत्येक ठिकाणी हे लोक दिसतात. पूर्वी थिएटरमध्ये जायचं तर गाडी पार्क करायला मागे ठसठशीत जागा असायची. आता मल्टीप्लेक्समध्ये जा, नाही तर मॉलमध्ये. तळघरात पार्किंग. पुन्हा ते मेलं एकच असेल तर ठीक. त्यात लोअर बेसमेंट, अपर बेसमेंट आणि ग्राऊंड फ्लोअर असे प्रकार (बेसमेंट ‘अपर’ कसं असेल हो?) जाताना आपण कुठे गाडी ठेवतो, हे मला कधीही लक्षात राहत नाही. आणि मग सगळं संपल्यावर एक तर जड पिशव्या हातात घेऊन ती बेसमेंट शोधावी लागतात. मला रात्रौ १२ वाजता बेसमेंटमध्ये जाणं म्हणजे ‘सायको’मधल्या त्या लॉजमध्ये जाण्यासारखं वाटतं. इंग्रजी चित्रपटात बरेच खून या बेसमेंटमध्येच होतात. प्रत्येक खांबाकडून पुढे सरकताना अक्षरश: राम राम म्हणत मी ‘ढूंढो ढूंढो रे साजना’ करत राहाते. माझी ही अवस्था एकदा घरात सांगत होते. तेव्हा मध्येच अभद्र भविष्यवाणी कशी येत, तसाच माझा नवरा म्हणाला, ‘तुझा खून कोण करणार? तुझी खरेदी पाहून कळेल या बाईची पर्स रिकामी झालीय आणि सीरियल किलर सुंदर बायकांना मारतात.’
मला खात्री आहे, माझ्यासारखे अभागी बरेच असतील. पण तोंड दाबून बुक्क्याचा मार. आता मी माझ्यापुरती युक्ती काढलीय. म्हणजे मी प्रचंड बिझी वगैरे असल्याचं दाखवते आणि ‘एक दाबा, दोन दाबा’, अशा तक्रारी नोंदवायला कुलदीपकांना सांगते (तो या भाग्यवंतांच्या कॅटेगरीमधला आहे) पार्किंग-बिर्किंग करण्यासाठी करुणास्पद नजरेने आजूबाजूला बघते. आता केस चांगले पिकलेत, चाळिशी लागलीय. त्यामुळे अगदी सीनियर सिटीझन नाही, पण बऱ्यापैकी सीनियर या वर्गात मोडते. माझा चेहरा पाहून कोणताही तरुण मुलगा येतोच येतो हो मदतीला. पुन्हा परत मी कसं यावं, हेसुद्धा सांगतो. मात्र एक असंही की, अशा वेळी तरुण काटर्य़ा मात्र ढिम्म हलत नाहीत. उलट त्रासिक नजरेने how silly म्हणून बघतात. माझ्यासारख्या आठवडय़ाला सही विसरणाऱ्या बाईने कार्ड वापरणं म्हणजे ‘माकडाच्या हातात..’ त्यामुळे ‘कॅश की कार्ड’ असं विचारलं की, जितपत त्रासदायक भाव आणता येतील तेवढे म्हणून मी ‘ओह, कार्ड विसरले, Cash any dew’,असं स्टाईलमध्ये सांगते. पण इथेही कधी कधी माझं दुर्दैव आड येतं. वाण्याच्या दुकानात स्वच्छ पुडय़ा मिळायच्या, परत क्रेडिट असायचं. आता कुठेही खरेदी करा, तो बारकोड असतो आणि मी जी काही वस्तू निवडते त्यावर तो कधीच नसतो. इतरांच्या खरेदी वेळी ‘पीक पीक’, असं आज्ञाधारकपणे पेकाटणारं ते बारकं मशीन माझी पाळी आली की आचके देतं, मग ती विक्रेती/ विक्रेता थंडपणे सांगतो, ‘बारकोड नहीं है, दुसरा लेके आओ’ कल्पना करा, रांग सोडून परत त्या गर्दीत जाऊन ती वस्तू शोधणं. देवा.. त्यापेक्षा मी संध्याकाळच्या विरार लोकलमध्ये बोरिवलीला चढून भाईंदरला उतरून दाखवेन. मग ती वस्तू कॅन्सल. इथे पुन्हा मदतीला तरुण पिढी येते बिचारी. एवढय़ा वेळेला हा अनुभव घेऊनही वस्तू घेताना ते मेलं बारकोड बघणं माझ्या लक्षात कधीच राहात नाही.
असो, आपली स्तुती सांगे तो एक मूर्ख, असे रामदास स्वामी म्हणालेत. पण आपली फजिती सांगणाऱ्यांना काय म्हणायचं? हल्ली Politically Correct शब्द वापरायची सक्ती आहे. एका दृष्टीने बरोबरच आहे म्हणा. म्हणून माझ्यासाठी माझ्यासारख्या अनेक अभाग्यांसाठी शब्द काढलाय- Technologically Challenged! वाटतं की नाही भारदस्त. अर्थात इथे एका तरुण कार्टीने हवा काढलीच माझी. म्हणाली ‘आंटी हे झालं टेक्निकली, पण तुम्हाला लेबल्स्सुद्धा कधी कधी वाचता येत नाहीत. त्याला काय करणार?’ फार पूर्वी आई-बापांनी कितीही मोठय़ा मुलाला मारलं तरी चालायचं, तसं आता झालं पाहिजे. पण तसं नाहीये, म्हणून राग गिळून मी मला जितपत गोड हसणं जमू शकेल, तितकं हसून म्हणाले, ‘बाळा मी तुला घेऊन जात जाईन हो आणि काय गं तुझा अटेंडन्स पूर्ण आहे ना?’Yes!.. कधी कधी वयाचा फायदा घेतला तरी चालतो! बाकी वेळेला.. ‘रडवे माझे वदन बघोनी’ असा चेहरा केला की, मदत पटकन मिळते. फक्त त्याकरिता तुम्ही ४५ च्या पुढचे असावे लागतात.
So either join than or ask for help!
शुभा प्रभू-साटम