Leading International Marathi News Daily
शनिवार, १८ जुलै २००९
  वावटळीतले तारणहार
  बोट सोडून खांद्यावर हात!
  आरामदायी मॅट्रेस
  पण बोलणार आहे!
मराठीची महादशा
  विज्ञानमयी
  प्रतिसाद
  ‘जिव्हाळ्याची ई-बेटं’
बंध नात्यांचे
  मी एक ‘ढ’!
  काळ सुखाचा
.. हा दिवस मुलांचा!
  समलिंगी संबंधांतील प्रश्नोपनिषद
  चिकन सूप...
माझं आयुष्यच बदललंस रे!
  अत्याचारालाही जात असते?
  ‘अक्षरयात्री’चे अक्षरमैत्र
  ललित
पक्षीनिरीक्षण सोहळा
  रुग्ण-हक्कांची सनद
  खजुराहो

 

काळ सुखाचा
.. हा दिवस मुलांचा!

आपल्यापैकी प्रत्येकाकडे पावसाशी जोडलेल्या आठवणींची पोतडी असते. दर वर्षी पाऊस पडायला लागला, की त्या हळव्या, कडू-गोड आठवणींबरोबर आपण पुन्हा एकदा काही क्षण तरी घालवतो. मला दर पावसात माझ्या शाळेची हमखास आठवण होते. आज मुंबईतल्या मराठी माध्यमाच्या सुसज्ज, प्रयोगशील शाळांमध्ये आघाडीचं नाव कमावलेली ही शाळा तेव्हा मात्र अगदी साध्या बैठय़ा पत्र्याची छपरं असलेल्या इमारतीत भरायची. सगळा मामला साधासुधा असल्यामुळे छप्परातून, खिडक्यांमधून पावसाने वर्गात हजेरी लावणं तसं साहजिकच होतं. अशा एका पावसाच्या दिवशी आमच्या पाचवीच्या वर्गात विद्यार्थ्यांची उपस्थिती तुरळक होती. आमच्या कोणत्यातरी शिक्षकांच्या ‘ऑफ पिरियड’ला विज्ञान शिकवणाऱ्या बाई आल्या होत्या. बाहेर जोरदार पाऊस पडत होता. त्यांना एक कल्पना सुचली. चला ‘सायन्स लॅब’मध्ये

 

जाऊ. तिथे फारसं पाणी नाही येत आत. त्या दिवशी बाईंनी फुरसतीने आम्हाला ‘सायन्स लॅब’मधल्या अनेक इंटरेस्टिंग गोष्टी दाखविल्या. तारामासा, सीहॉर्स, समुद्र काकडी असे एकापेक्षा एक वैशिष्टय़पूर्ण प्राणी फॉर्मेलीनमध्ये घालून बाटल्यांमध्ये भरून ठेवले होते. ते खरेखुरे प्राणी पाहताना अक्षरश: अंगावर काटा आला होता. गंमत म्हणजे यातलं काहीही आमच्या अभ्यासात नव्हतंच.
वर्गात परत आल्यावरही आम्ही सगळे मनाने ‘सायन्स लॅब’मध्ये होतो. बाईही किती छान वेगळ्या मूडमध्ये होत्या. असं वाटलं की, जणू आम्ही कुठल्याशा पिकनिकलाच जाऊन आलो आहोत. सगळ्यांना खूपच मजा आली होती. आजही पाऊस पडून शाळेला सुट्टी दिली गेली, की मला बाटल्यांमधला तारा मासाच आठवतो. अमेरिकन प्रीस्कूलमध्ये काम करताना एकदा तिथे जोरदार पाऊस (तिथल्या मानानं) झाला. बऱ्याच भागातली वीज गेली. माझ्या दोघी सहकारी शाळेत येण्याच्या स्थितीत बिल्कुलच नव्हत्या. मूळ मुंबईकर असल्यामुळे असेल, तेवढय़ा पावसाचं काहीच न वाटून मी शाळेत थडकले होते. आमच्या वयोवृद्ध मिस सॅण्ड्रा, मी आणि सात-आठ मुलं एवढीच जणं त्या दिवशी वर्गात होतो. त्या म्हणाल्या, ‘आजचा दिवस बोनस आहे, आज नेहमीसारखं काहीच करायचं नाही आणि आपल्याला काय करायचं आहे ते आपणच ठरवायचं.’ आमच्या मुलांना आधी त्या काय सांगताहेत, ते कळेच ना! मग त्या स्वत: चेंजिंग रूममध्ये जाऊन भलतेच मॅचिंगचे कपडे घालून आल्या. एरवी इकडचा केस तिकडे सरकण्यापूर्वीही बाईंची परवानगी विचारणाऱ्या सॅण्ड्रा यांना हिरव्या-पिवळ्या-गुलाबी रंगांची टोपी - स्कार्फ घातलेलं पाहून मुलं अर्थातच चेकाळली. मग मुलांनी एकेक गोष्ट सुचवायला सुरुवात केली. आज आधीच खाऊ खायचा. दूध अजिबात प्यायचं नाही, अशा त्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या अनेक गोष्टी मुलं सांगू लागली.. मुलांच्या काही सूचना सहज प्रत्यक्षात आणण्यासारख्या होत्या. ज्या नव्हत्या, त्या त्यांनी मुलांनाच बोलतं करून पटवून दिल्या. आम्ही दिवसभर अक्षरश: धमाल केली. दिवस संपताना एक जण म्हणाली, ‘आय होप असा पाऊस नेहमी नेहमी पडत राहील.’
नंतर बोलताना सॅण्ड्राबाई म्हणाल्या, ‘‘माझ्यासाठी हा दिवस मुलांचा असतो! माझे खूप स्टुडण्ट्स आजही माझ्याबरोबरच्या अशा खूप पाऊस आणि स्नोफॉलच्या दिवसांची आठवण काढतात.’’
खूप पाऊस पडत असताना मुलं अगदी घरात कोंडली जातात. त्यांना काय करावं कळत नाही, तेव्हा हे प्रसंग मला हमखास आठवतात. एकदा असाच खूप पाऊस पडत असताना, मुलगा उघडून ठेवलेल्या छत्रीखाली सारखा जाऊन बसत होता. आम्हीही लहानपणी छत्र्यांवर चादरी टाकून तंबू बनवायचो. मी त्याला म्हटलं, ‘चल, छत्र्यांचा तंबू बनवूया का?’ तो आधी जरा गोंधळला, मग आम्ही दोघंही आत बसू शकू, एवढा तंबू बनवायचं आम्ही ठरवलं. पुढचे दोनेक तास आमचं तंबू बनवणं सुरू होतं. खुच्र्या, डायनिंग टेबल, चादरी, दुपट्टे, उडू नये यासाठी वजन म्हणून छोटा खलबत्ता, सेफ्टी पिन्स, छत्र्या, नाडय़ा- अशा बऱ्याच गोष्टींची अनेक कॉम्बिनेशन्स आम्ही करून पाहिली. शेवटी आम्हाला हवा तसा तंबू बनला तेव्हा मुलगा तंबूसमोर उभं राहून म्हणाला, ‘आपण छत्र्यांचा तंबू बनविणार होतो ना!’ तंबू उभा करताना येणाऱ्या अडचणींमधून मार्ग काढताना तंबूमधून छत्र्या पूर्णपणे वजा झाल्या होत्या! पण त्या दोन तासांत आम्हाला दोघांना जी मजा आली, ती केवळ ग्रेट होती.
चार वर्षांपूर्वी मुंबईत भयानक पाऊस झाला. शाळांना दोन-तीन दिवस सुट्टी मिळाली होती. ही सुट्टी नुसती मजेची नव्हती. अनेकांचे स्नेही-आप्त घरी परतू शकले नव्हते. माझ्या एका मैत्रिणीला रात्रभर ऑफिसमध्ये राहावं लागलं होतं. ती सुखरूप आहे, एवढंच ती घरी कळवू शकली होती. घरी फक्त बाबा आणि मुलगाच होते. त्या रात्री बाबांनी आणि मुलाने मिळून स्वयंपाक केला. मागची आवराआवर केली. मुलाला खूप टेन्शन आलं होतं. मग बाबांनी कुणीतरी कधीतरी भेट दिलेलं पाचशे तुकडय़ांचं जिगसॉ पझल काढलं. एवढं मोठं पझल सलगपणे बसून करायला पुरेसा वेळ मिळणार नाही, म्हणून ते कधी खोक्याबाहेर निघालंच नव्हतं. हळूहळू मुलाला त्यात रस वाटायला लागला. रात्री फरशीवर अर्ध झालेलं पझल तसंच ठेवून ते दोघं झोपले. सकाळी उठून पुन्हा सुरुवात. दुपारनंतर आई घरी पोहोचली तेव्हा संपूर्ण पझल फरशीवर तयार होतं. मुलगा प्रचंड एक्साइट झाला होता. आदल्या दिवसाचा ताण कुठल्या कुठे पळून गेला होता.
मिथिला दळवी
mithila.dalvi@gmail.com