Leading International Marathi News Daily
शनिवार, १८ जुलै २००९
  वावटळीतले तारणहार
  बोट सोडून खांद्यावर हात!
  आरामदायी मॅट्रेस
  पण बोलणार आहे!
मराठीची महादशा
  विज्ञानमयी
  प्रतिसाद
  ‘जिव्हाळ्याची ई-बेटं’
बंध नात्यांचे
  मी एक ‘ढ’!
  काळ सुखाचा
.. हा दिवस मुलांचा!
  समलिंगी संबंधांतील प्रश्नोपनिषद
  चिकन सूप...
माझं आयुष्यच बदललंस रे!
  अत्याचारालाही जात असते?
  ‘अक्षरयात्री’चे अक्षरमैत्र
  ललित
पक्षीनिरीक्षण सोहळा
  रुग्ण-हक्कांची सनद
  खजुराहो

 

चिकन सूप...
माझं आयुष्यच बदललंस रे!
एक अननुभवी तरुण शिक्षिका या नात्याने मी जेव्हा धास्तावून जाऊन सहावीच्या वर्गात प्रवेश केला होता; तेव्हा तिथे मला फ्रँकी भेटला होता. त्या आधी दोन र्वष सहाय्यक शिक्षिका म्हणून मी काम केलेलं होतं. नंतर के.जी.ची शिक्षिका बनण्यासाठी कॉलेजमध्ये नाव घालून पुढचं आवश्यक शिक्षण घेण्याचं मी ठरवलं होतं. मग आता मी त्या सहावीच्या वर्गात काय करत होते बरं?
दुर्लक्ष करता येणार नाही, अशा प्रकारचा तो मुलगा होता. वर्गामध्ये सगळ्यात मागच्या रांगेतल्या खुर्चीत बसून ती खुर्ची झुलवत समोरच्या टेबलावर आरामात पाय टाकून तो बसलेला दिसत होता. फ्रँकीचे कपडे मळलेले असत. त्यावर वाळलेल्या चिखलाचे डाग पडलेले होते. कॅनडामधल्या या विनिपेग शहरात गेले कित्येक महिने चार फूट बर्फ व हिमवर्षांव होत होता. त्या पलीकडे कुठे नावालाही माती नजरेस पडली नव्हती, मग याच्या कपडय़ांवर चिखल कुठून आला होता? कित्येक दिवसांत त्याच्या केसांना कंगवा लागलेला नसावा, इतके

 

त्याचे केस पिंजारलेले दिसत होते व ‘मला शिकवण्याचा साधा प्रयत्न तर करून बघा!’ असा काहीसा भाव त्याच्या नजरेत होता.
नेहमीचे वर्गशिक्षक पदव्युत्तर शिक्षण संपवण्यात व्यस्त असल्यामुळे विद्यार्थ्यांना स्वत:च्या स्वत काही अभ्यास करायला त्यांनी सांगितलं होतं व नंतर लायब्ररीमध्ये जाऊन इतर पुस्तकं वाचून त्यातून माहिती काढण्यास सांगून मुलांना दंगामस्ती करण्यापासून रोखलं होतं. वर्गामधील गणितात हुशार नसलेल्या काही मुलांना माझ्यावर सोपवलेलं होतं. त्या दंगेखोर, चलबिचल करणाऱ्या मुलांना मी गणिताची गोडी लावावी, असा त्या वर्गशिक्षकांचा आग्रह होता. त्यांना गणिताची गोडी लावणं, म्हणजे मला स्वत:ला कुणीतरी ‘हँड ग्लायडिंग’च्या खेळाची गोडी लावण्यासारखा प्रकार होता तो. त्या मुलांच्यात फ्रँकीचाही समावेश होता. फ्रँकीने रोज वर्गात येऊन नुसतं तोंड जरी दाखवलं तरी पुष्कळ होतं, असं त्या वर्गशिक्षकाचं मत होतं. त्याने नुसती हजेरी लावली व पाय वर घेऊन आरामात वर्गात बसून राहिला तरी त्याला पूर्ण मार्क मिळत असत.
दांडगाई करणाऱ्या त्या नऊ मुलांचं कशा प्रकारे गणितामध्ये मन रमवावं, याबद्दल मी डोकं खाजवत विचार करू लागले. गणितातील अपूर्णाक त्यांना शिकवावा व ते शिकवताना पाककृतींच्या उदाहरणांचा उपयोग करण्याचं मी ठरवलं. चॉकलेटची बिस्किटे व मी घरी बनवलेला ब्रेड एवढं साहित्य घेऊन माझा प्रयोग सुरू झाला. सुरुवातीला फ्रँकी मागच्या ओळीतल्या मुलांबरोबर बसून शिकण्यात अजिबात रस घेत नव्हता. मग मी एक युक्ती केली. जी मुलं गणितं पूर्ण करून दाखवतील, त्यांना मी मधल्या सुट्टीत शाळेजवळच्या मॅकडोनल्डमध्ये जेवायला घेऊन जाण्याचं कबूल केलं. पण मी तसं काही प्रत्यक्षात करू शकणार नाही, असं फ्रँकीने स्पष्टपणे बोलून दाखवलं. त्यावर मीही म्हणाले, ‘का नाही ? मी सांगितल्यानुसार नक्की करून दाखवेन.’
पाहता पाहता फ्रँकी शिकण्यात रमू लागला. त्या मुलांवर धाडसी प्रयोग करण्याचा माझा तो दुसरा आठवडा सुरू झाला आणि एक चमत्कार घडला.. फ्रँकी वर्गात आला, तो अगदी स्वच्छ आंघोळ करून छान व्यवस्थित नीटनेटके कपडे घालून, केसांना भांग पाडून! तिसरा आठवडा संपण्याच्या सुमारास सगळ्या नऊच्या नऊ मुलांनी- अगदी फ्रँकीसकट- गणिताचा तो धडा पूर्ण केला. मी कबूल केल्याप्रमाणे त्यांना सगळ्यांनाच मॅकडोनल्डला घेऊन जाणं प्राप्तच होतं. खरंच सगळ्यांनी मनापासून परिश्रम केले होते! पण शाळेच्या ऑफिसकडून मला जेव्हा सांगण्यात आलं की शिक्षक-शिक्षिका मुलांना शाळेच्या आवाराच्या बाहेर घेऊन जाऊ शकत नव्हते. त्यांचा तसा नियमच होता. ते ऐकून मला तर चांगलाच धक्का बसला. फ्रँकीचं म्हणणंच शेवटी खरं ठरलं होतं. मी नाही करू शकले माझ्या मनासारखं! त्या धक्क्यानंतर पाठोपाठ अजून एक चपराक बसली मला. त्या वर्गशिक्षकांनी माझ्या शिकवण्याच्या पद्धतीचं मूल्यमापन करून ते अतिशय कनिष्ठ दर्जाचं असल्याचं सांगितलं. त्या वर्षभरात माझ्या शैक्षणिक क्षेत्राच्या अनुभवात असं वाईट प्रमाणपत्रं मिळण्याचा मला कधीच अनुभव आला नव्हता.
पराजित व निराशेच्या भावनेने मी सगळ्या मुलांची माफी मागितली व त्यांनी घेतलेल्या परिश्रमांबद्दल त्यांचे आभार मानून कौतुक करून मी माझी पुस्तकं घेऊन तिथून निघाले. कर्मधर्मसंयोगाने त्याच दिवशी शाळेमध्ये सहावीच्या सर्व तुकडय़ांसाठी मिळून व्हॅलेंटाइनच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवलेला होता. उत्कृष्ट कलाकृतीचा नमुना असणारं होतं ते नृत्य. सगळी मुलं स्टेडियमच्या एका बाजूला उभी होती आणि मुली समोरच्या बाजूला उभ्या दिसत होत्या. रांगेतील काही मुली आपापसातच नृत्य करत होत्या. अजून नृत्याची सुरुवात व्हायची होती. आधीच मनाने दुखावलेली मी तिथे स्टेडियमच्या पायऱ्यांवर बसून राहिले होते. प्राथमिक शाळेतून मुलं वरच्या वर्गात जाण्यापूर्वी मी त्यांच्याकडे शेवटचा कटाक्ष टाकत होते.
‘रॉक अ‍ॅण्ड रोल’चं कर्णकर्कश्य संगीत अचानक थांबलं व स्टेडियममध्ये वॉल्ट्झची शांत धून वाजू लागली. फ्रँकी मुलांच्या रांगेतून बाहेर पडून पायऱ्या चढून माझ्याजवळ आला व मी त्याच्याबरोबर नृत्य करण्यास येऊ शकते का, म्हणून मला विचारू लागला. स्टेडियमच्या मध्यभागी केवळ आम्ही दोघंच वॉल्टझ् नृत्य करू लागलो व सगळ्यांच्या नजरा आमच्यावर खिळल्या. ती धून संपत आली आणि फ्रँकी नृत्य करता-करता थांबला. माझ्या नजरेत नजर मिसळून मला तो म्हणाला, ‘‘थँक यू, माझं आयुष्यच बदलून टाकलंत तुम्ही. बाई, मी खूप आभारी आहे तुमचा.’’
पाककृती किंवा अपूर्णाक शिकवण्यामुळे घडलेली जादू नव्हती ती किंवा मॅकडोनल्डला जेवायला घेऊन जाण्याच्या वचनाचाही परिणाम नव्हता तो! ते अद्भुत घडण्यामागचं एकच कारण मला दिसत होतं व ते म्हणजे आपुलकीच्या भावनेचा आविष्कार झालेला होता. जखमी फ्रँकीच्या आयुष्यात बदल घडवून आणला होता, तशाच प्रकारे फ्रँकीनेही माझं आयुष्य बदलून टाकलं होतं. प्रेमात दडलेली शक्ती, दयाळू वृत्ती व वर्गामध्ये दिला जाणारा सन्मान मी त्याच्याकडूनच शिकले होते. के.जी. शिक्षिका बनण्याचं स्वप्न विसरून या शिक्षिकेने खास शिक्षणक्रमात नाव नोंदवलं आणि नंतर कॅनडा व अमेरिकेमध्ये शिक्षकी पेशा स्वीकारून बरीच र्वष अविस्मरणीय अनुभव घेतला. फ्रँकीसारखी अनेक मुलं शोधून काढून त्यांचं पूर्ण जीवन बदलून दाखवलं.
थँक यू फ्रँकी! माझं आयुष्यच बदललंस रे तू. खूप खूप ऋणी आहे मी तुझी!
रँडी लॉइड मिल्स्
Thank You for changing my Life
स्वैरानुवाद : उषा महाजन
sayhi2usha@rediffmail.com