Leading International Marathi News Daily
शनिवार, १८ जुलै २००९
  वावटळीतले तारणहार
  बोट सोडून खांद्यावर हात!
  आरामदायी मॅट्रेस
  पण बोलणार आहे!
मराठीची महादशा
  विज्ञानमयी
  प्रतिसाद
  ‘जिव्हाळ्याची ई-बेटं’
बंध नात्यांचे
  मी एक ‘ढ’!
  काळ सुखाचा
.. हा दिवस मुलांचा!
  समलिंगी संबंधांतील प्रश्नोपनिषद
  चिकन सूप...
माझं आयुष्यच बदललंस रे!
  अत्याचारालाही जात असते?
  ‘अक्षरयात्री’चे अक्षरमैत्र
  ललित
पक्षीनिरीक्षण सोहळा
  रुग्ण-हक्कांची सनद
  खजुराहो

 

अत्याचारालाही जात असते?
जातीव्यवस्थेने आपल्या मन-बुद्धीचा ताबा विखारी पद्धतीने घेतला आहे. म्हणून मग ज्या समाजावर अन्याय होतो, त्याचा प्रतिकार, धिक्कार हा केवळ त्या त्या समाजाने करावा, अशी एक असहिष्णू- दुष्ट जातीप्रथा आपल्या समाजात रूढ झाली आहे.
राजकारण, साहित्य- संगीत- कला- विज्ञान- संशोधन अशा अनेक क्षेत्रांमध्ये महिलांनी आघाडी मिळवली असली, तरी देशातील महिलांच्या सामाजिक दर्जात काही विशेष फरक पडला आहे, असे म्हणता येणार नाही. महिलांवर होणारे अन्याय-अत्याचार हे चिंताजनक आहेत. मात्र, यापेक्षाही भयंकर गोष्ट अशी की, अत्याचारातही जात पाहण्याची जात्यंध रोगट मानसिकता आपल्या समाजाला जडली आहे. अत्याचार ज्या समाजावर आणि ज्या समाजातील बायका-पोरांवर होतो, त्या अत्याचाराची नोंद आणि निषेध केवळ संबंधित जाती-वर्गाने करावा,

 

बाकीच्या जाती-वर्गाना तो अत्याचार मग तो कितीही क्रूर, रानटी नि निर्घृण असला, तरी त्याच्याशी काहीही घेणे-देणे नसावे, अशा संवेदनशून्य मनोवृत्तीने आपला समाज दैनंदिन जीवन कोरडेपणाने व्यतीत करू लागला आहे. या माणुसकीशून्य वर्तनाला काय म्हणता येईल?
औरंगाबाद शहरात मानसी देशपांडे या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा नुकताच अमानुष खून झाला. आरोपीने ज्या निर्दयतेने मानसीचा खून केला आहे, त्यामुळे कुठल्याही संवेदनशील मनाला धक्का बसेल. मात्र मानसी खून प्रकरणाने आणखी एक विदारक सत्य अधोरेखित केले. ते हे की, मानसी ही उच्चभ्रू समाजातील असल्यामुळे फक्त उच्चभ्रू वर्गातील महिलांनीच मानसीच्या खुनाचा तीव्र धिक्कार केला. इतर मराठा अथवा दलित संघटनांनी निषेधाचा शब्दही उच्चारला नाही. अन्याय, अत्याचाराकडे पाहण्याची आपली जातीय दृष्टी अजूनही बदलत नाही व याला कुणी एक जात जबाबदार नसून सर्वच जाती तितक्याच जबाबदार नि दोषी आहेत, हेच खरे.
मानसीच्या मारेकऱ्यांना अटक व्हावी, म्हणून उच्चभ्रू समाजातील महिलांनी रस्त्यावर उतरून, मोर्चे, निदर्शने करून निष्क्रिय नि सुस्त पोलीस यंत्रणेला जे सळो की पळो करून सोडले, ही बाब महिला जागृतीला तसेच स्त्रीशक्तीला दाद द्यावी, अशीच आहे. पण प्रश्न असा की, दलित महिला-मुलींवर खेडोपाडी सवर्ण धनदांडगे जेव्हा रानटी अन्याय, अत्याचार, बलात्कार करतात, तेव्हा या उच्चभ्रू महिला कुठे असतात? दलित महिलेवरील अत्याचार हा अत्याचार नसतो का? मानसीप्रकरणी जी जागरूकता उच्चभ्रू महिलांनी, शिवसेनेच्या रणरागिणींनी दाखविली, ती जागरूकता एरवी का दिसून येत नाही? ग्रामीण भागात सवर्ण धनदांडगे कसे अमानुष अत्याचार दलितांवर करीत असतात, याच्या बातम्या काय कमी येतात? त्या उच्चभ्रू महिला वाचतच नाहीत काय? आणि त्या वाचूनही जर अस्वस्थ होत नसतील, त्यांच्या स्त्री मनाला पाझर फुटत नसेल तर याला कारणीभूत जातीचा संस्कार त्यांच्याही मनावर घट्टपणे रुजला आहे, असा निष्कर्ष का काढू नये?
परस्त्री मातेसमान मानून तिची साडी-चोळीने बोळवण करून राजे छत्रपती शिवाजी महाराज सन्मानाने रवानगी करीत असत, अशा स्त्रीदाक्षिण्याचा गौरवशाली इतिहास सांगणाऱ्या संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, छावा, मराठा सेवा संघ आदी ‘मराठा’ संघटनांनी तरी मानसी देशपांडे हिच्या खुनाचा निषेध का केला नाही? मानसी मराठा नव्हती म्हणून? आणि एरवी दलित महिला-मुलींवर जे पिसाट अत्याचार खेडोपाडी होतात, त्याचा निषेध तरी या मराठा संघटना का करीत नाहीत? अत्याचार करणारे बहुधा स्वजातीय असतात म्हणून? नांदेड जिल्ह्य़ातील नायगाव येथे चंद्रकांत गायकवाड या मातंग युवकाने सवर्ण मुलीशी प्रेम केले, म्हणून त्याचे डोळे काढले जातात आणि औरंगाबाद जिल्ह्य़ातील पाल गावी (ता. फुलंब्री) मातंग तुपे याने सवर्ण मुलीशी संबंध ठेवले, म्हणून त्याला दगडाने ठेचून मारण्यात येते; तेव्हा मुक्त, स्वतंत्र जीवनाचा नि प्रेमविवाहांचा पुरस्कार करणाऱ्या महिला संघटना कुठे असतात? आणि हो, महिलांना संसदीय क्षेत्रात ३३ टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे, म्हणून ज्या उच्चभ्रू महिला कंबर कसून महिला आरक्षणाचा बेंबीच्या देठापासून पुरस्कार करतात, त्या तथाकथित ‘हाय-फाय’ महिला या दलित महिला अत्याचारप्रकरणी जर साधा निषेधही न करता मूग गिळून बसत असतील (काही महिला कार्यकर्त्यांचा सन्माननीय अपवाद) तर मग त्यांना ३३ टक्के आरक्षण हवे तरी कशाला? या महिला कोणत्या स्तरातील महिलांचे प्रतिनिधित्व करणार आहेत? अन्याय, अत्याचाराकडे पाहण्याची आपली जातीय दृष्टी अजूनही बदलत नाही व याला कुणी एक जात जबाबदार नसून सर्वच जाती तितक्याच जबाबदार नि दोषी आहेत, हेच खरे.
डॉ. आंबेडकरांच्या राजकीय आणि सामाजिक चळवळीचे स्वत:ला वारस म्हणवणारे तरी जातीपातीच्या पलीकडे जाऊन विचार करायला कुठे तयार आहेत? मानसीच्या खुनाने उभा समाज हादरला, पण एरवी दलित अत्याचारप्रकरणी रस्त्यावर उतरणाऱ्या दलित पक्ष-संघटनांनी साधे एखादे निषेध पत्रक काढूनही मानसीच्या खुनाचा धिक्कार केला नाही. का? मानसी दलित समाजाची नव्हती म्हणून? मानसी उच्चभ्रू समाजातील होती म्हणून? तिच्यावर झालेल्या अत्याचाराची जातही उच्चभ्रू होती काय? दलित स्त्रीवर जेव्हा अत्याचार होतो, तेव्हा तिला ज्या यातना, दु:ख सहन करावे लागते त्याच नरकयातना, तेच दु:ख मानसीलाही भोगावे लागले ना? मग दलित पक्ष-संघटना मानसी प्रकरणावर का बोलल्या नाहीत? ‘मला खासदार करा’, ‘मला आमदार करा’, असा गजर करणाऱ्यांना मानसीच्या खुनाचे काहीच कसे वाटले नाही? राजकारण इतके आत्मकेंद्रित, संवेदनशून्य, नि जातीनिष्ठ असू शकते की, डोकं बधीर करणाऱ्या अत्याचारानेही त्यांची आत्ममश्गुलता गळून पडू नये? समाजात मुस्लिम, शीख, मारवाडी, गुजराती, ख्रिश्चन आदी अठरापगड जाती-धर्माचे लोक आहेत, पण आपल्या अवतीभोवती बाया-पोरांवर, दीन-दुबळ्यांवर अत्याचार होतात आणि त्याचा निषेध जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकीच्या नात्याने आपण करायला हवा, असे कुणालाच वाटत नाही, याचे वैषम्य वाटते.
जातीव्यवस्था वाईट आहे, ती समाजा-समाजात, माणसा-माणसात फूट पाडते, असे किती जरी सांगण्यात येत असले तरी जाती मोडायला कुणीही फारसे तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे. राजकीय पक्ष निवडणुकीत खुलेआम जातीच्या नावे मते मागत असतील आणि मतदारही जातीचा उमेदवार पाहूनच मतदान करीत असतील तर जाती मोडणार कशा? राजकीय पुढारी शक्तिप्रदर्शनाच्या नावाखाली जर जातीय मेळावे भरवीत असतील तर जातीव्यवस्था गळून कशी पडणार? खेडय़ा-पाडय़ांतून अजूनही देशपांडे गल्ली, सुतारवाडा, देशमुखवाडा, धनगरवाडा, मांगवाडा, बौद्धवाडा, मारवाड गल्ली अशा जातीबद्ध आळ्या अजूनही अस्तित्वात आहेत. शहरात तरी काय वेगळी स्थिती आहे? अमूल कॉलनी ब्राह्मणांची, तमूक वसाहत दलितांची, अमूक मोहल्ला मुस्लिमांचा, तमूक पेठ मारवाडय़ांची अशाच वसाहती आजही कायम आहेत. सामाजिक अभिसरणाला गती देणाऱ्या मिश्र वसाहती आपल्या समाजात तितक्याशा अस्तित्वात आलेल्या दिसत नाहीत. तात्पर्य, जातीव्यवस्थेने आपल्या मन-बुद्धीचा ताबा विखारी पद्धतीने घेतला आहे. म्हणून मग ज्या समाजावर अन्याय होतो, त्याचा प्रतिकार, धिक्कार हा केवळ त्या त्या समाजाने करावा, अशी एक असहिष्णू- दुष्ट जातीप्रथा आपल्या समाजात रूढ झाली आहे.
म्हणूनच, जातीव्यवस्था मोडण्यासाठी सातत्याने प्रामाणिकपणे प्रबोधन करीत राहणे हाच एक प्रभावी मार्ग आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जाती-धर्मामध्ये सुसंवाद होण गरजेचे ठरते. त्यासाठी विशिष्ट जाती-धर्मियांचे मेळावे न भरविता सर्व जाती-धर्मियांचे मैत्रीपूर्ण, सहिष्णू मेळावे भरवणे हा जातीव्यवस्थेवरील आणखी एक उतारा ठरेल. इतका बोध जरी मानसी देशपांडे खूनप्रकरणाने समाजाला मिळाला आणि त्या दृष्टीने पावले उचलण्यात आली, तरी ते पुरेसे ठरेल.
बी. व्ही. जोंधळे