Leading International Marathi News Daily
शनिवार, १८ जुलै २००९
  वावटळीतले तारणहार
  बोट सोडून खांद्यावर हात!
  आरामदायी मॅट्रेस
  पण बोलणार आहे!
मराठीची महादशा
  विज्ञानमयी
  प्रतिसाद
  ‘जिव्हाळ्याची ई-बेटं’
बंध नात्यांचे
  मी एक ‘ढ’!
  काळ सुखाचा
.. हा दिवस मुलांचा!
  समलिंगी संबंधांतील प्रश्नोपनिषद
  चिकन सूप...
माझं आयुष्यच बदललंस रे!
  अत्याचारालाही जात असते?
  ‘अक्षरयात्री’चे अक्षरमैत्र
  ललित
पक्षीनिरीक्षण सोहळा
  रुग्ण-हक्कांची सनद
  खजुराहो

 

‘अक्षरयात्री’चे अक्षरमैत्र
काही वर्षांपूर्वीची गोष्ट. नाशिकमधील एका मराठी विद्यार्थिनीला ‘कुसुमाग्रज कोण होते?’ असं शिक्षकांनी विचारलं तेव्हा तिला उत्तर देता आलं नाही, त्यामुळे ते शिक्षक अतिशय खंतावले. ही गोष्ट पुण्याच्या संजीवनी बोकील या संवेदनशील कवयित्रीच्या कानी आली तेव्हा त्यांच्या मनात ठिणगी पडली आणि एक बीज पेरलं गेलं. कालांतरानं ते रुजलं आणि आता त्यातून एक सुंदर रोपटं जन्माला आलं असून, दिवसेंदिवस ते तरारून दमदारपणे वाढत आहे.
पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढता ओढा आणि मराठी माध्यमाच्या शाळांमधील परीक्षार्थी शिक्षणव्यवस्था या दोन कारणांमुळे मराठी विद्यार्थ्यांच्या मातृभाषेची प्रचंड हेळसांड होत आहे आणि ते आपल्या सांस्कृतिक संचितापासून दुरावत चालले आहेत, हे संजीवनीताईंच्या लक्षात आलं तेव्हा त्या अतिशय अस्वस्थ झाल्या. त्यातून मराठी मुलांना मराठी साहित्याची गोडी कशी लावता येईल, या दिशेनं त्यांचं विचारचक्र सुरू झालं. मुळात व्यवसायानं संजीवनीताई अध्यापन क्षेत्रातच कार्यरत

 

आहेत. त्यांनी आपल्या ओळखीच्या काही शाळांमधील मराठी शिक्षिकांना एकत्र बोलावून त्यांच्याशी याबाबतीत विचारविनिमय केला आणि त्यातून ‘अक्षरयात्री’ हा संघ व ‘अक्षरमैत्र’ हा उपक्रम आकारला आला. ‘एक पूल शब्दांचा.. अर्थापर्यंत’ हे ‘अक्षरमैत्र’चं ध्येयवाक्य आहे.
हा उपक्रम वर्षांतून दोन सत्रांत चालवला जातो. शाळा-शाळांमधील इयत्ता ९ वीच्या वाचनोत्सुक विद्यार्थ्यांना २५०/- रु. वार्षिक शुल्क आकारून ‘अक्षरमैत्र’ संघाचं सभासद करून घेतलं जातं आणि त्यांच्यासाठी साधारणपणे प्रत्येक सत्रात बारा कार्यक्रम सादर केले जातात. दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी पुण्यातील एस. एम. जोशी फाऊंडेशनच्या सुसज्ज प्रेक्षागृहात चित्रपट, नाटय़, संगीत, नृत्य, चित्रकला, आदी विविध क्षेत्रांतील कलाकार विद्यार्थी-श्रोत्यांसमोर मराठी साहित्यातील उत्तमोत्तम उताऱ्यांचं साभिनय वाचन करतात. हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं हृदयंगम.. कधी कधी तर हृदयस्पर्शीही होतो. मोठे कलावंत बघायला मिळणार, याचं मुलांना आकर्षण असतंच. पण एकदा हा कार्यक्रम अनुभवल्यावर मुलं त्या कलावंताशी आणि त्या साहित्यकृतीशी इतकी एकरूप होतात, की मराठी साहित्यात किती अनमोल खजिना दडला आहे, याची त्यांना नकळतच जाणीव होते. कधी कधी ताला-सुरावर गायिलेली किंवा पदन्यासावर नाचणारी कविता ऐकली की मुलांना त्या कवितेतलं भावसौंदर्य वर्गातल्यापेक्षा अधिक भिडतं. प्रत्येक विद्यार्थ्यांला वर्षभरासाठी एकेक वही दिली जाते. तीमध्ये त्या विद्यार्थ्यांने प्रत्येक कार्यक्रमानंतर आपली प्रतिक्रिया टिपणं अपेक्षित असतं. पुढील कार्यक्रमाच्या वेळी सर्व मुलांच्या नावाच्या चिठ्ठय़ा एकत्र टाकून पाहुण्यांच्या हस्ते एक चिठ्ठी उघडली जाते. ज्याचं नाव येईल त्या मुलाला आपली प्रतिक्रिया वाचून दाखविण्याची संधी मिळते. त्यामुळे मुलंसुद्धा आपल्या भावनांची अभिव्यक्ती करायला शिकतात. एकदा अशा कार्यक्रमांची गोडी लागली की मुलं दहावीत गेल्यानंतरही कार्यक्रमांना येण्याचा आग्रह धरू लागतात आणि आता आपल्याला कदाचित या कार्यक्रमाला प्रवेश मिळणार नाही, या भावनेनं ती खट्टू होतात.
११ ऑगस्ट २००७ रोजी या उपक्रमातील पहिला कार्यक्रम सादर झाल्यापासून आजतागायत दोन र्वष पुरी झाली. या उपक्रमाची आजवरची फलश्रुती काय? प्रथम श्रवणानंद अनुभवून बहुश्रुत होणारी मुलं हळूहळू वाचनानंद घेऊ लागली. नंतर त्यांच्यातील सुप्त प्रतिभाशक्ती जागी झाल्यामुळे त्यांना आपणही काही सर्जनशील लिखाण करावंसं वाटू लागलं. सगळय़ात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उदात्त साहित्यसंस्कार घेऊन मोठी होणारी मुलं माणुसकीची मूल्यं जपू लागली आणि हेच या उपक्रमाचं खरं श्रेय होय.
या यशस्वी उपक्रमाचे पाच मुख्य आधारस्तंभ आहेत. संजीवनीताईंना जिव्हाळय़ानं सक्रिय साथ देणाऱ्या सुमारे २५ शिक्षिका हे त्यांचं मुख्य भांडवल आहे. प्रत्येक कार्यक्रमाच्या आयोजनाच्या पूर्वतयारीची सर्व कामं त्या सगळय़ाजणी आत्मीयतेनं वाटून घेतात व प्रत्यक्ष कार्यक्रमातही सूत्रसंचालन आदी कामांत हिरीरीनं सहभागी होतात. हे शिक्षक आपापल्या शाळांतील मुलांमध्ये प्रचार करतातच, परंतु त्याला पालकांचीही साथ मिळायला हवी. अनेक शाळांच्या पालकसभांमध्ये हा विषय मांडल्यावर पालकांना या गोष्टीचं महत्त्व पटलं आणि त्यांनी आपल्या पाल्यांना या उपक्रमात सहभागी होण्यास प्रोत्साहन दिलं. दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी लांब-लांबचे पालक आपल्या पाल्यांना सभागृहाच्या ठिकाणी घेऊन येतात आणि संध्याकाळी ५ ते ७ पर्यंत ते त्यांच्यासाठी थांबतात. काही रिकाम्या खुच्र्यात पाल्यांच्या सोबतीला बसून पालकही या कार्यक्रमांमध्ये रस घेऊ लागले आणि त्यांना स्वत:लाही वाचनाची गोडी लागली. प्रौढ व्यक्तींनाही रु. ३००/- वार्षिक शुल्क भरून ‘रसिक परिवारा’चं सभासदत्व घेता येतं.
‘करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे।’ या उक्तीनुसार मुलांचे मनोरंजन करण्यासाठी पुढे सरसावणारे नामवंत कलाकार हा या उपक्रमाचा तिसरा स्तंभ होय. डॉ. गिरीश ओक, वंदना गुप्ते, जितेंद्र जोशी, श्रीरंग गोडबोले, अनिल इंगळे, राजेश देशमुख, किरण पुरंदरे, शांभवी वझे, अनुराधा मराठे.. नावं तरी किती घ्यावीत? अक्षरश: न संपणारी नामावळी! या कलावंतांना शक्य तितकं मानधन दिलं जातं आणि देण्याचा प्रयत्न असतो. पण त्यापैकी कोणाचीही ठराविक मानधनाची अट नसते. एवढंच नव्हे, तर पाकिटातून दिलेलं मानधनही काहीजण देणगी म्हणून परत करतात.. हा या कलावंतांचा मोठेपणा! डॉ. गिरीश ओक यांच्यासारखे काही कलावंत आपला मोलाचा शब्द टाकून इतरही कलावंत मिळवून देतात.
हा सारा खटाटोप ज्यांच्यासाठी चालतो ती मुलं हा चौथा आधारस्तंभ. ही मुलं सुरुवातीला सामूहिक ‘अक्षरप्रार्थना’ म्हणत या कार्यक्रमाशी समरस होतात, कलावंतांना भरभरून दाद देतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरून जेव्हा आनंदलहरी ओसंडून वाहतात तेव्हा शिक्षकांना आपल्या कष्टाचं चीज व सार्थक झाल्यासारखं वाटतं. मुलांचं मनोरंजनातून प्रबोधन करणारा हा आगळावेगळा उपक्रम खरोखर वाखाणण्याजोगा आहे. आजवर बहुश: मध्यमवर्गीय शाळांतील मराठी मुलं यात सहभागी झाली असून, पुणे महापालिकेतर्फे पालिकेच्या खर्चानं १५० मुलांनाही या उपक्रमात प्रवेश देण्यात आलेला आहे.
आणि अखेरीस पैशाचा मामला! केवळ पैशानंच सर्व गोष्टी साधतात असं नसलं, तरी पैशावाचून असे सार्वजनिक उपक्रम सिद्धीस जाऊ शकत नाहीत, हेही तितकंच खरं. सर्व सोंगं आणता येतात, पण पैशाचं सोंग आणता येत नाही. अशा कार्यक्रमांना उदारमनस्क प्रायोजक मिळतात हे ‘अक्षरमैत्र’ संघाचं अहोभाग्य! सभागृहाचं भाडं, ध्वनियंत्रणेचा खर्च, कलावंतांचं मानधन, हारतुरे, इ. खर्चाच्या बाबी निव्वळ वर्गणीच्या पैशांतून भागत नाहीत. अशावेळी ‘युनिक अ‍ॅकॅडमी’चे संचालक तुकाराम जाधव, ‘काकडे ज्वेलर्स’च्या उषाताई काकडे, इंदिरा इन्स्टिटय़ूटच्या सरिता वाकलकर, ‘नंदादीप कार्ड्स’चे सदानंद महाजन आदी मंडळी धावून येतात आणि हा खर्चभार इतक्या निरपेक्ष भावनेनं उचलतात, की त्यांना आपल्या श्रेयनामाचीही फिकीर नसते.
तिसऱ्या वर्षांचा उद्घाटनाचा कार्यक्रम शनिवार, २५ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजता पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात होणार असून, तो सर्वाना खुला राहणार आहे. या स्थानिक उपक्रमाची सर्वदूर प्रसिद्धी करण्यामागील मुख्य हेतू हा की, त्यापासून महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या मराठीप्रेमी व्यक्तींना प्रेरणा मिळावी.. ज्योत से ज्योत जलाते चलो।
लवकरच सोलापूर येथे अशा प्रकारचा उपक्रम सुरू होणार असून, सांगली येथेही तशीच हालचाल सुरू झालेली आहे. उपक्रमशील व्यक्तींनी आपापल्या भागांत जर अशी चळवळ सुरू केली तर मराठीचं भवितव्य निश्चित उज्ज्वल होईल.
अंधार फार झाला, पणती जपून ठेवा!
संपर्क- डॉ. अ. ल. देशमुख- ९८२२६०८४७६ (पुणे), संजीवनी बोकील- ९८५०६६०६०० (पुणे)
सत्त्वशीला सामंत