Leading International Marathi News Daily
शनिवार, १८ जुलै २००९
  वावटळीतले तारणहार
  बोट सोडून खांद्यावर हात!
  आरामदायी मॅट्रेस
  पण बोलणार आहे!
मराठीची महादशा
  विज्ञानमयी
  प्रतिसाद
  ‘जिव्हाळ्याची ई-बेटं’
बंध नात्यांचे
  मी एक ‘ढ’!
  काळ सुखाचा
.. हा दिवस मुलांचा!
  समलिंगी संबंधांतील प्रश्नोपनिषद
  चिकन सूप...
माझं आयुष्यच बदललंस रे!
  अत्याचारालाही जात असते?
  ‘अक्षरयात्री’चे अक्षरमैत्र
  ललित
पक्षीनिरीक्षण सोहळा
  रुग्ण-हक्कांची सनद
  खजुराहो

 

ललित
पक्षीनिरीक्षण सोहळा
सकाळची शाळेत जायची धांदल असायची. पोळ्या लाटता लाटता कान बाहेरच्या आवाजाकडे असायचे. स्वयंपाकखोलीच्या बाहेरच्या बाजूला आम्ही थोडीशी बाग केली होती. त्यात पारिजातक, आंबा, बोर, तगरी, सोनटक्का, अबोली, गोकर्ण, गुलबक्षी इत्यादी झाडे लावली होती. सकाळी सकाळी खिडकी उघडली की झाडावरच्या चिमण्यांचा किलबिलाट ऐकू येई. मनात येई- किती गडबड करतात! घसे सुकत असतील यांचे! म्हणून मग एका भांडय़ात त्यांच्यासाठी दररोज पाणी ठेवू लागले. दोन-चार दिवसांत चिमण्यांचं लक्ष पाण्याकडे गेलं आणि किलबिलाट अगदी जवळ ऐकू येऊ लागला. तिथे असंख्य चिमण्या येऊन पाणी पिऊ लागल्या. मग ग्रीलमध्ये दिवसातून दोनदा पाणी ठेवू लागले. परिणाम असा झाला की, चिमण्यांबरोबर हळूहळू इतर पक्षीही पाण्यासाठी येऊ लागले.

 

हळूहळू पक्षीनिरीक्षणाचा छंदच लागला. त्यात आनंद वाटू लागला.
कधी पाणी ठेवायला उशीर झाला की कावळा काव काव करून भंडावून सोडी. पाणी ठेवले की मग पक्ष्यांची नुसती रांग लागे. चिमणी, कावळे हे तर नित्याचेच; पण बुलबुलची बडबड, नाचऱ्या नाचणपक्षी, वटवटय़ा, छोटय़ा नाजूक अंगाचे, पोटाकडे पिवळेधमक असणारे सुभग पक्षी हेसुद्धा पाणी प्यायला येऊ लागले. कधी झाडावरच्या फांदीवरून सरडाही येऊन पाणी पिऊन जाई. या सर्वामध्ये खारुताईचीही लुडबूड असे.
पक्ष्याचा वेगळा आवाज आला की मी हळूच डोकावून पाही. कधी कावळ्यासारखा दिसणारा, पण तुकतुकीत रंगाचा कोकीळ येई, तर कधी सतत ‘टी टी टय़ॅव’ करणारा काळा, चिमणीएवढा, अंगावर एकच पांढरी रेघ असणारा पक्षी पाणी पिऊन जाई. बहुधा धोबीपक्षी असावा. नंतर नंतर तर जशी विहिरीवर पाणी भरायला गर्दी होते तशी माझ्या पाण्यावर पक्ष्यांची गर्दी होऊ लागली. चिमण्या तर यथेच्छ आंघोळी करत. तेवढय़ा वेळात इतर पक्षी फांद्यांवर बसून, ग्रीलवर येऊन वाट बघत असत. मी तर चिमण्यांना ‘साळकाया माळकाया बसल्या नहात,’ म्हणत असे. माझ्या कामवाल्या बाईलाही त्यांची मोठी गंमत वाटे. कारण त्यांच्या धसमुसळीनं सगळं पाणी ओटय़ावर शिंपडलं जाई. मग इतर पक्षी ओरडून ओरडून चिमण्यांना हाकलत. हा सोहळा अगदी संध्याकाळपर्यंत चाले.
परंतु पक्ष्यांच्या या कलकलाटीचा शेजारणीला त्रास होऊ लागला. मी बाहेरगावी गेले असता तिने तिच्या मुलांकडून समोरचे दिसत नाही म्हणून साऱ्या फांद्या तोडून टाकल्या. वरच्या माळ्यावर राहणाऱ्या गुजरात्यानेही मच्छर होतात म्हणून तिला पाठिंबा दिला. तर सोसायटीतले इतरजण ‘बाग कसली? जंगल नुसते!’ म्हणून हसत होते.
बाहेरगावाहून परतल्यावर झाडे तोडलेली पाहिल्यावर वाईट वाटले. नाचण पक्ष्याचे शेपटीचा तुरा हलवीत राहणे, सुभग पक्ष्याचं ‘छीऽई’ अशा आवाजात शीळ घालीत लांब चोचीने फुलातील मध पिणे, डोक्यावर टोपी असणाऱ्या बुलबुल पक्ष्यांची घरासाठी जागा शोधणे, सतत ‘टी टी टय़ॅव’ करणाऱ्या धोबी पक्ष्याचे चिवचिवणे, सायंकाळच्या अंधुक प्रकाशात बागेतले किडे खाणाऱ्या पिंगळा पक्ष्याचे वावरणे आणि चिमण्यांचे मनसोक्त आंघोळ करणे.. हे डोळ्यांना सुखावणारं दृश्य सगळ्यांनाच भावेल असे नाही, हे सत्य पचविणे जरा जडच गेले.
पुढे मी उपनगरात मुलांकडे राहायला आले. घराची मागची बाजू आणि उंचावरचे घर असल्याने समोर नुसते झाडांचे जंगल होते. मला हा सुखद धक्का होता. झाडांचे गच्च रान म्हणजे पक्षी नक्कीच असणार!
हळूहळू पक्षीनिरीक्षणाला सुरुवात झाली. घराच्या खिडक्यांतून समोरची दाट झाडे दिसत. पहाटेपासूनच कोकिळेच्या कुहूकुहू स्वराने तसंच इतरही पक्ष्यांच्या सुरेल गुंजनाने जाग येई. इथे खिडकीसमोरच्या इलेक्ट्रिक तारेवर रोज सकाळी ६ ते ६।। आणि संध्याकाळी ४ ते ६ या वेळात रोज एक छोटा काळा पक्षी ‘व्हीऽटय़ु.. व्हीऽटय़ु’ अशी सतत साद घालत असतो. तर ग्रीलवर साळुंख्या येऊन विविध आवाज काढत असतात. कधी कधी गच्चीच्या कोपऱ्यावर रंगीत मैनाही दिसते. समोरच्या झाडावर तर सगळे पोपटच राहतात. अगदी हिरवेकंच! रसरशीत! झाड नुसते दणाणत असते त्यांच्या आवाजांनी. हे पोपट कधी कधी माझ्या ग्रिलवर हजेरी लावून जातात. मध्येच समोरच्या झाडीतून सारेगमची सुरेल सुरावट ऐकू येते. तर क्रॅक क्रॅक, टी-उर, पिटपिट, चीं चीं असे असंख्य आवाज दिवसभर कानांवर येत असतात.
इथेच भारद्वाज पक्षीही दिसला. तेही संख्येनं बरेच आहेत. चॉकलेटी पंखाचे व लांब शेपटीचे भारद्वाज शांतपणे किडे खाताना दिसतात. मध्येच ते ‘कू कू कू’ ओरडत असतात. निळा खंडय़ा पक्षीही दिसतो. अतिशय सुंदर पक्षी. निळाकंच. काळे डोके असलेला. पण दोन-तीन मिनिटांनी पटकन् उडून जातो. रोज सकाळी पिवळ्याधम्मक हळद्या पक्ष्यांची एक जोडीही उडत जाताना दिसते.
आमच्या बिल्डिंगखालून एक नाला वाहतो. तिथे काटेरी झुडपं आहेत. या नाल्याच्या पाण्यात बहुधा मासे असावेत. कारण वरून बघताना मला बरेच छोटे बगळे ध्यान लावून बसलेले दिसतात. त्यातही नुसते पांढरे बगळे, राखी बगळे, पिवळे पाठवाले बगळे, गायबगळे, काळ्या पंखाचे बगळे नाल्यासभोवती उडताना दिसतात. त्यांचा क्रॅक-क्रॅक आवाज नुसता घुमत असतो.
हल्ली छोटय़ा, काळ्या रंगाच्या, पण पोटाकडे पांढऱ्या रंगाच्या, बिनशेपटीच्या रानकोंबडय़ासुद्धा दिसतात. इतर पक्षी जेव्हा मासे पकडायला नाल्यात येतात तेव्हा या त्यांच्या मागे लागताना दिसतात. चंदेरी रंगाचा, पिवळसर पोटाचा, बदकासारखी चोच असणारा बगळाही दिसतो. याचे नाव अजून कळलेले नाही. बिल्डिंगच्या कुंपणाच्या भिंतीवर दयाळ पक्ष्याचे येणे-जाणे असते. तो आपली शेपूट उडवत सुरेल ‘स्वीऽई’ गाणे गात असतो.
एकदा पक्ष्यांची लांबच लांब रांग पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसली. एका रांगेत- सलग. लक्षात आले तेव्हा मोजायला सुरुवात केली. त्रेपन्नजण. सगळेच शिस्तीत उडत होते. बहुधा स्थलांतरित पक्षी असावेत.
छोटे कागदी विमानाएवढे चॉकलेटी रंगाचे भांडिक पक्षीही उंचावर उडताना दिसतात. ते अगदी ग्रिलजवळून जातात. पक्ष्यांना पाणी ठेवायची सवय इथेही कायम ठेवल्याने पक्ष्यांची ये-जा आपोआपच सुरू झाली. त्यातून निरीक्षणाने बरेच पक्षी ओळखायला येऊ लागले. त्यापैकी गप्पीदास, दयाळ, रंगीत मैना, खंडय़ा, भारद्वाज, हळद्या, कोतवाल हे नवीन पक्षी कळले. ठिपकेवाली कबुतरेही आढळून येतात.
एकदा मी व मुलगा खिडकीत चहा पीत उभे होतो. समोर एक घार, तिच्या मागे दहा-बारा कावळे लागलेले व कावळ्यांच्या मागे चाळीसएक कबुतरांचा थवा. घार त्यांना मस्त चकवे देत होती. पण कावळ्यांनी तिला शेवटी हाकलवलीच. दहा मिनिटं आम्ही तो पाठलाग बघत होतो.
त्या दिवशी थोडा पाऊस भुरभुरला. त्या पावसात छोटे पोपट मस्त ‘खीट्ऽखॅट्’ करत विहरत होते. ‘येरे येरे पावसा’च्या तालावर ओलेचिंब होत होते.
मुलं सकाळी कामावर गेल्यावर घरात एकटीच असताना पक्षीनिरीक्षणाचा, पक्षीदर्शनाचा आनंद मी उपभोगत असते. आता दुर्बीणही आणली आहे. तिने पक्षी जवळून पाहण्याचा आनंद मिळतो. नवीन पक्ष्यांचे वर्णन हल्ली वहीत लिहून ठेवते. पक्ष्यांची पुस्तके आणून त्यांची नावे शोधते. त्यामुळे वेळही चांगला जातो. मुलंही पक्षीनिरीक्षणात रस घेतात. दिवसभर एकटेपण जाणवत नाही, कारण पक्ष्यांचे विविध आवाज सोबतीला असतात.
या छंदाने मला अनेक पक्ष्यांचे दर्शन घडवले. निखळ आनंद दिला. चिमणी, कावळा, पोपट एवढेच मर्यादित पक्षी माहीत असणाऱ्या मला गप्पीदास, सुभग, नाचण, दयाळ, भारद्वाज, खंडय़ा, पिंगळा, रंगीत मैना, बुलबुल, कोतवाल, वटवटय़ा, वेगवेगळे बगळे, रानकोंबडय़ा, हळद्या या सर्वाची ओळख झाली. त्यातून जाणवले ते प्रत्येक पक्ष्याचे वेगळेपण, देखणेपण, नजाकत, नखरा! खिडकीत उभे राहून मी हे सगळे अनुभव घेत असते आणि आनंदित होत असते. हा आनंदही कसा, तर बिनपैशांत मिळालेला!
नीलम सावंत