Leading International Marathi News Daily
शनिवार, १८ जुलै २००९
  वावटळीतले तारणहार
  बोट सोडून खांद्यावर हात!
  आरामदायी मॅट्रेस
  पण बोलणार आहे!
मराठीची महादशा
  विज्ञानमयी
  प्रतिसाद
  ‘जिव्हाळ्याची ई-बेटं’
बंध नात्यांचे
  मी एक ‘ढ’!
  काळ सुखाचा
.. हा दिवस मुलांचा!
  समलिंगी संबंधांतील प्रश्नोपनिषद
  चिकन सूप...
माझं आयुष्यच बदललंस रे!
  अत्याचारालाही जात असते?
  ‘अक्षरयात्री’चे अक्षरमैत्र
  ललित
पक्षीनिरीक्षण सोहळा
  रुग्ण-हक्कांची सनद
  खजुराहो

 

खजुराहो
‘खजुराहो’ या नावाभोवती एक प्रचंड वलय आहे. जगभरातील कलाप्रेमींच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलेल्या खजुराहो मंदिरांना भेट देण्याचा योग नुकताच आला आणि अनेक वर्षांपासून मनात रेंगाळत असलेली ही इच्छा पूर्ण झाली. अजिंठा व वेरुळ लेण्यांमध्ये गाईड म्हणून काम करत असल्याने शिल्पकला आणि त्यातील सौंदर्यस्थळं यांच्याशी जवळून परिचय आहेच. परंतु असं असूनही खजुराहोची शिल्पमंदिरं पाहताना अवाक् व्हायला झालं! भान विसरायला लावणारं हे शिल्पसौंदर्य आणि सांस्कृतिक वारसा आपला आहे, ही भावना अभिमानाचा अत्युत्कट अनुभव देऊन गेली.
केवढं सौंदर्य आहे या मंदिरसमूहातील शिल्पकलेत! एकेक चिरा.. एकेक कोना शिल्पांकित सौंदर्यानं व्यापून गेलेला आहे. स्त्री-पुरुष देहसौंदर्याला अनेकांगाने दगडी चिऱ्यांमध्ये बंदिस्त करणारे ते शिल्पकार खरेच किती उच्च कोटीचे कलावंत होते, हे

 

यातून स्पष्ट होतं. ‘केवळ अप्रतिम’! या एका शब्दामध्ये खजुराहोचं संपूर्ण कलाविश्व सामावलं जातं. खजुराहोची शिल्पं पाहताना कलेच्या उत्कट आविष्कारातून निर्मिलेली जीवनाची विविध रूपं आपल्यासमोर उलगडत जातात. मंदिरांच्या भिंतींवर नटलेली ही शिल्पं आपल्याशी बोलत राहतात.. खुणावत राहतात.. अंगावर रोमांच उमटवताना मनात प्रेमभावना जागृत करतात.. ‘स्त्री-पुरुषांचं एकमेकांमध्ये मिसळून एकाकार होणं म्हणजे जीवनातील परमोच्च सुख होय.. या सुखसमाधीतूनच निर्वाणप्राप्ती होते..’ हे तत्त्वज्ञान खजुराहोच्या कामशिल्पांतून अनुभवायला मिळतं. या परमोच्च सुखाच्या क्षणांना शिल्पांद्वारे बंदिस्त करताना कलाकारांनी एक विलक्षण सहजतेचा अनुभव दिला आहे. या कामशिल्पांतून वासनेची बीभत्सता जाणवत नाही. ही शिल्पं पाहताना अलिप्त तटस्थतेचा अनुभव मिळतो. या अवीट सौंदर्यानं नटलेली स्त्री-पुरुष देहांची कामशिल्पं तत्कालीन समाजजीवनाचा आरसा बनून सामोरी येतात.
विस्तीर्ण अशा सपाट मैदानावर विखुरलेली खजुराहोची मंदिरं जगातील श्रेष्ठतम स्थापत्यकलेची साक्ष देतात. मात्र, आज या मंदिरांची ओळख ही केवळ त्यांचे अजोड स्थापत्य व अलौकिक शिल्पसौंदर्य यातच नसून दर्शनी भिंतीवर अनेक ठिकाणी अंकित केलेल्या स्त्री-पुरुष समागमाच्या विविध मुद्रा हे या शिल्पांचं वेगळेपण आहे. येथील बहुतेक सर्वच मंदिरावरील बाह्य़ भिंतींवर अशा अनेक शिल्पाकृती आहेत. ज्या वात्स्यायनाच्या कामसूत्रातील अनेक मुद्रांचे प्रतिनिधित्व करतात. पण मंदिरांच्या सर्व भिंतींवर असणाऱ्या इतर अगणित शिल्पाकृतींपैकी केवळ पाच शतांश शिल्पाकृतीच या अशा कामोत्तेजक मिथुन मूर्ती आहेत. खऱ्या अर्थानं अप्रतिम म्हणता येतील अशा अगणित मूर्ती मनाला भुरळ पाडतात.. पण तरीही या मोजक्या कामशिल्पांमुळे ‘खजुराहोची शिल्पकला’ ही जगभरात ‘काम शिल्पकला’ म्हणूनच प्रसिद्ध पावली आहे.
या मोजक्या कामशिल्पांमुळे इतर अनेक अत्युत्कृष्ट शिल्पांचे महत्त्व झाकोळून गेल्यासारखे होते. इथे जीवनातील लहान-सहान गोष्टींचे व्यवधानही इतक्या सुंदर रीतीने पाषाणात बंदिस्त केलेले आहे की, कलावंताच्या कल्पनाशक्तीचे आणि सजगतेचे कौतुक वाटत राहते.
या मंदिरांची निर्मिती करणाऱ्या रचनाकारांचे श्रेष्ठत्व असामान्य आहेच, पण अशा तऱ्हेची अनेक उत्तम मंदिरे आपल्या राजवटीत निर्माण करणाऱ्या चंदेला राजांचे महत्त्वही अनन्यसाधारण आहे. त्यांनी आपल्या व्यापक आणि कलासक्त दृष्टिकोनातून मंदिरांच्या निर्मितीला चालना दिली आणि इतिहासाच्या पानातील शंभर वर्षांना कुरुंदाच्या लाल-पिवळ्या पाषाणात बंदिस्त करून टाकले. साधारणपणे दहाव्या आणि अकराव्या शतकात (इ.स. ९५० ते इ.स. १०५०) शंभर वर्षांच्या कालखंडात या सुंदर मंदिरांची निर्मिती झाली, असं मानलं जातं. इतक्या कमी कालावधीमध्ये इतक्या सुंदर मंदिरांचे निर्माण व्हावे, हे आश्चर्यकारक आहे. कारण एक-दोन नव्हे, तर अशा ८५ मंदिरांची निर्मिती चंदेला राजांच्या कारकीर्दीत झाली होती. त्यापैकी आज केवळ २२ मंदिरे काळाच्या कसोटीवर तग धरून उभी आहेत. मात्र आज जी मंदिरे आपले अस्तित्व सांभाळून उभी आहेत, त्यातील अप्रतिम शिल्पकला आणि अजोड स्थापत्य यांनी डोळे दिपून जातात, हेच खरं.
चंदेला राजांनी या मंदिराच्या निर्मितीसाठी ‘खजुराहो’ या छोटय़ा गावातील सपाट भूप्रदेशाची निवड का केली असावी, या प्रश्नाचे उत्तर अद्यापही मिळालेले नाही, कारण हे त्यांच्या राजधानीचे शहर नव्हते. या सुंदर मंदिरांचे निर्माणकर्ते, राजपूत राजे चंदेला हे स्वत:ला चंद्रदेवाचे वंशज मानत. या महान राजांची वंशपरंपरा आणि या मंदिराच्या निर्माणासंबंधी एक विलक्षण दंतकथा प्रचलित आहे. या प्रदेशात राहणाऱ्या एका ब्राह्मणाची अतिसुंदर तरुण कन्या जंगलातील एका सरोवरामध्ये स्नान करीत असताना साक्षात चंद्रदेव तिच्यावर भाळला आणि त्याने तिचे कौमार्य भंग केले. या मीलनाची परिणती म्हणून जो तेजस्वी बालक जन्माला आला तोच पुढे राजपूत राजा ‘चंद्रवर्मन’ म्हणून नावारूपाला आला आणि त्यानेच चंदेला राजवंशाची स्थापना केली. मात्र कुमारीमातेचे तिरस्कृत, अवहेलनेनं भरलेलं आयुष्य भोगणाऱ्या त्या ब्राह्मण कन्येनं, आपल्या पुत्राचे जंगलात राहूनच पालनपोषण केलं. या मातेनं आपल्या पुत्राकडून एक वचन घेतले होते की, तू मोठा झाल्यानंतर अद्वितीय अशा मंदिरांची निर्मिती कर. या मंदिरांच्या भिंतींवर स्त्री-पुरुष समागमाची अभिव्यक्ती असू देत.. या अभिव्यक्तीद्वारे सर्व जगाला कळले पाहिजे की स्त्री-पुरुष संबंध ही निसर्गातील एक सहजसुंदर क्रिया आहे. स्त्री-पुरुषांचे देहमीलन होणे, हा एक नितांत सुंदर अनुभव आहे. जीवनातील नवनिर्मितीच्या प्रक्रियेतील ही एक सर्वसाधारण गोष्ट आहे. हा अनुभव हा जीवनातील उत्कटतेचा परम क्षण असून ही गोष्ट त्याज्य नसून जीवनावश्यक बाब आहे..’’
राजा झाल्यानंतर ‘चंद्रवर्मन’ राजाने आपल्या मातेला दिलेले वचन पूर्ण केले, पण असेही म्हटले जाते की, चंदेला राजा हे तांत्रिक संप्रदायाचे अनुयायी होते. त्यामुळेच सांसारिक आणि भौतिक सुखाच्या तृप्तीनेच निर्वाणप्राप्तीचा मार्ग सुकर होतो, या उक्तीवर ठाम विश्वास ठेवून त्यांनी या मंदिराचे निर्माण केले आणि या निर्मितीमध्ये सहजसुंदर अशा कामशिल्पांना प्राधान्य देऊन स्त्री-पुरुष संबंधांना एका विशुद्ध सहजभावनेचे स्थान दिले. कधी काळी अतिशय छोटेसे गाव असणाऱ्या (आजही ते तसेच आहे) खजुराहोला या मंदिरांमुळे एक आगळेवेगळे महत्त्व प्राप्त झाले. बहुधा या जागेची निवड करतानाही चंदेला राजाचा उदारमतवादी दृष्टिकोन आणि धर्म आणि इतर अनेक संप्रदाय यांना एकत्र आणून एक आगळेवेगळे पीठ निर्माण करण्याचा प्रयत्न होता असेही मानण्यात येते.
वास्तुकलेच्या दृष्टिकोनातून विचार करता ही मंदिरे अप्रतिम आहेतच, तसेच या मंदिरांची निर्माणशैली तत्कालीन मंदिरशैलीपेक्षा खूप वेगळी आहे. जरी ही मंदिरे नागर शैलीमध्ये उभारली गेली असली तरी हिमालयातील गगनचुंबी हिमशिखरांना नजरेसमोर ठेवून, या मंदिरांच्या शिखरांची उभारणी केलेली आहे, त्यामुळे मंदिराच्या प्रत्येक वेगळ्या कक्षावरचे आच्छादन म्हणजेच शिखर हे उंच पर्वत शिखराप्रमाणे निमुळते होत गेलेले आहे. वास्तुरचनेतील वेगळेपण आणि गुरुत्वाकर्षणाचा मध्य साधण्याची उत्कृष्ट कला आत्मसात केलेल्या त्या रथपतींनी आपल्या स्थापत्यकलेतील श्रेष्ठत्व अशा तऱ्हेने सिद्ध केलेले आहे. या शिखरांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे संपूर्ण शिखरांमध्ये अनेक लहान-मोठी पूर्णरूपी शिखरे निर्माण केली आहेत. त्यामुळे इतरत्र कुठेही पाहायला न मिळणारे सौंदर्य या मंदिरांमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
सर्वच मंदिरांच्या उभारणीमध्ये सारखेपणा आहे. शिवाय मंदिरांची अंतर्रचना साधारणत: सारखीच आहे. प्रत्येक मंदिर हे उंच अशा प्रशस्त चौथऱ्यावर उभारलेले आहे. शिवाय मंदिरांचे प्रवेशद्वारही उंचावर असल्यामुळे किमान १०-१२ पायऱ्या चढूनच आपल्याला मंदिरात प्रवेश करता येतो. प्रवेशद्वाराशी सुंदर मकरतोरणे असून प्रवेश अर्धमंडप, मुख्य सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे सर्वसाधारण विभाग आहेत. प्रत्येक मंदिराच्या सभामंडपामध्ये चौखांबी मंडप आहे. बाह्य़ भागाप्रमाणेच, मंदिराच्या अंतर्भागामध्येही अनेक सुंदर शिल्पाकृती आहेत. स्तंभाच्या वर असणाऱ्या मदळसा (सुंदर स्त्री प्रतिमा) बहुतेक ठिकाणी गायब झालेल्या आहेत. मंदिराच्या तीन प्रमुख विभागांवर वेगवेगळी शिखरे आहेत, मात्र गर्भगृहावरचे शिखर हे सर्वोच्च शिखर असून त्याखाली क्रमाक्रमाने इतर शिखरांचे कळस येतात. गर्भगृहावरील कळस आणि सभामंडपावरील कळस यांच्यामध्ये चंदेला राजाचे प्रतीक असणाऱ्या शार्दूलाची (सिंह) प्रतिमा आहे. या सर्व कलशांना जोडणारी काल्पनिक रेषा आखल्यास सुंदर चंद्रकोर तयार होताना दिसते. चंद्रवशी चंदेलांनी मंदिरांच्या निर्माणात शिखरांना बिजेच्या चंद्रकोरीगत आकार देऊन स्थापत्यकलेतील आणखी एक वैशिष्टय़ प्राप्त करून दिले आहे.
संपूर्ण मंदिर ‘इंटरलॉकिंग’ पद्धतीने उभारले गेले आहे. दोन चिऱ्यांना जोडण्यासाठी कुठलेही माध्यम वापरलेले नाही. ३१ मीटर उंचीचे कंडारिया महादेव मंदिर हे अशा इंटरलॉकिंग पद्धतीनुसार उभारलेले असून आजतागायत दिमाखाने उभे आहे. वास्तुविशारदांचे श्रेष्ठत्व प्रमाणित करण्यासाठी यापेक्षा दुसरा कुठला पुरावा देता येईल?
मंदिराच्या बाह्य़ भिंतींवर असणाऱ्या अगणित शिल्पाकृतींबद्दल काय लिहावे? मथुरा शैलीमध्ये शिल्पांकित झालेल्या या मूर्ती म्हणजे मानवी देहसौंदर्याचे अभिजात नमुने आहेत. केवळ स्त्रीदेहाचे सौंदर्यच नाही, तर पुरुषदेहसुद्धा तितक्याच सौंदर्यपूर्णतेने शिल्पांकित झालेले आहेत. स्त्रीदेह सौंदर्याचे विविध पैलू, बारकावे, नाजुकपणा, देहाची कमनीयता, अवयवांची पुष्टता, चेहऱ्यावरील नाक-डोळ्यांचे सौंदर्य आणि चेहऱ्यावरील भावविभ्रमांचे प्रकटीकरण, त्यातील मनमोहकता.. या सर्व गोष्टींचे इतके सुंदर आणि कालातीत असे शिल्पांकन येथील शिल्पमूर्तीमध्ये झाले आहे की, प्रत्येक शिल्प आपले लक्ष वेधून घेते. पिवळसर, गुलाबी आणि हलक्या लालसर रंगातील सँडस्टोन दगडांमध्ये ही मंदिरे उभारलेली आहेत. मात्र या शिल्पाकृती आजही तितक्याच पूर्णावस्थेत उभ्या आहेत. फारशी तोड-फोड नाही.. (काही शिल्पं गायब झालेली आहेत) अथवा ऊन, वारा, पाऊस यामुळेही फारसे नुकसान झालेले नाही.
शिल्पमूर्तीचे एकावर एक असे अनेक उभे पट्टे आहेत. साधारण दीड ते दोन फूट उंचीच्या दगडी चिऱ्यावर कोरलेल्या या मूर्ती कमालीच्या उठावदार, कमनीय आणि प्रमाणबद्ध आहेत. स्त्री देहाची प्रमाणबद्धता निरखताना आपल्या लक्षात येते की, सौंदर्यखनी ललनांचे लांबसडक हात, पाय, निमुळती हंसासारखी बाकदार मान आणि उतरते खांदे, अतिशय उन्नत, रेखीव वक्ष हे सर्व मापदंड आजच्या २१व्या शतकातील सौंदर्यखनींनाही लागू पडत आहेत. प्रत्येक मूर्तीला वैशिष्टय़ आहे. ओळख आहे. येथील रूपगर्विताच्या चेहऱ्यावर भावभावना आहेत. राग, लोभ, काम, क्रोध, मद, मत्सर या सर्व भावनांना शिल्पातून दाखविण्यात हे कलावंत यशस्वी झालेले आहेत.
इथे आरशात स्वत:चे रूप न्याहाळणारी रूपगर्विता ‘मोहिनी’ आहे. प्रियकराच्या प्रतीक्षेत आतुरलेली ‘कामिनी’ आहे. प्रेमातुर ‘अभिसारिका’ आहे. आपला विपुल ओला केशसंभार पिळणारी पाठमोरी नवयौवना आणि तिच्या केसांतून गळणारे पाण्याचे थेंब टिपण्यासाठी आतुरलेला हंस आहे. कामेच्छा अनावर होऊन बेभान झाल्यामुळे शरीरावरील कपडे उतरविण्यापर्यंत तिची मजल गेली आहे अशा तारुण्यानं मुसमुसलेल्या तरुणीचे शिल्प आपल्याला खिळवून ठेवते. कारण या बेभान अवस्थेत तिला आपल्या मांडीपर्यंत चढलेल्या विंचवाचेही भान राहिलेले नाही.. डोळ्यात काजळ घालणारी ‘शृंगारिका’, पायांना अळते लावणारी ‘मदालसा’, प्रियकराला पत्र लिहिणारी आणि प्रियकराचे आलेले पत्र वाचून त्याच्या आठवणीत व्याकुळ होऊन गेलेली ‘विरहिणी’, हातामध्ये चेंडू धरून ते फेकण्याच्या आकर्षक मुद्रेतील नवयौवना आणि आळोखे-पिळोखे देत संपूर्ण शरीराला एका आकर्षक मुद्रेतील ‘मनमोहना’ या सर्व स्त्री शिल्पांचे सौंदर्य वर्णनातीत आहे. मनमोहनेच्या पाठमोऱ्या देहाची कमनीयता पाहून तिच्या पुष्ट नितंबावर ताणले गेलेले तलम वस्त्र तिच्या देहाची पुष्टता द्विगुणीत करताना दाखवून कलाकाराने या कलेतील त्याचे श्रेष्ठत्व सिद्ध केलेले आहे, असेच वाटत राहते.
त्रास देणाऱ्या माकडाला घाबरून प्रिय सख्याला बिलगलेली प्रिया आणि हातातील दांडय़ाने माकडाला हाकलणारा प्रियकर, मिठीमध्ये सामावलेली प्रिया.. एक ना दोन अनेक शिल्पांचे वानगी दाखले देता येतील.. आपल्या देवदेवतांना युगुल रूपात दाखवून कलावंतांनी शिव-शक्तीच्या एकरूपतेचे आणि लिंगपूजेच्या हिंदू धर्मातील प्रथेचे येथेही दाखले दिलेले आहेत. लक्ष्मी-विष्णू, शिव-पार्वती, ब्रह्मा-ब्रह्माणी यांच्याबरोबरच अष्टदिक्पाल, नवग्रह, सप्तमातृका, गंधर्व अप्सरा, विष्णू अवतार, सूर्यप्रतिमा यांची विविध रूपंही पाहायला मिळतात.
कामशिल्पं ही बहुधा चंदेला राज्यकर्त्यांना नजरेसमोर ठेवूनच शिल्पांकित केलेली आहेत. कारण कामक्रीडेत मग्न पुरुष हा ‘राजा’ असल्याचे दिसते. बऱ्याच ठिकाणी एकच पुरुष अनेक स्त्रियांशी संभोग करताना दाखवला आहे. यातही विशेष म्हणजे बऱ्याच शिल्पांमधून पुरुषाचे रतिक्रीडेमधील वर्चस्व अथवा सार्वभौमत्व प्रकर्षांने दृग्गोच्चर होताना दिसते. ‘स्त्री’ ही त्याच्या उपभोगाचे साधन असून तिचा उपभोग तो समरसतेने घेत असल्याचे प्रकर्षांने जाणवते. उज्जैन नगरीतील वात्स्यायनाने शब्दबद्ध केलेल्या ‘कामसूत्र’ या ग्रंथातील अनेक मुद्रांना अशा तऱ्हेने ठळकपणे भिंतीवर स्थान देऊन चंदेला राज्यकर्त्यांनी त्याचे वेगळेपण सिद्ध केलेले आहे.
पश्चिम समूह आणि पूर्व समूह तसेच दक्षिण समूह असे तीन भाग केलेले आहेत. पश्चिम समूहातील कंडारिया महादेव मंदिर हे सर्वोत्कृष्ट आहे. इतरही लक्ष्मण मंदिर, विश्वनाथ मंदिर, चित्रगुप्त मंदिर, ६४ योगिनी मंदिर, जगदंबा मंदिर ही सर्व तितकीच महत्त्वपूर्ण आहेत. पूर्व समूहातील आदिनाथ मंदिर उत्कृष्ट आहे.
विस्तीर्ण आवारात, उंच चौथऱ्यांवर उभारलेली, कलेच्या उच्चतम आविष्काराने नटलेली ही सुंदर मंदिरे अप्रतिम आहेतच, त्याचबरोबर चोहोबाजूंनी सुंदर हिरवळ आणि हिरवेगार वृक्ष यामुळे या परिसराला अतिशय अनोखे सौंदर्य प्राप्त झालेले आहे. रोज रात्री मध्य प्रदेश टुरिझमच्या वतीने ‘ध्वनी-प्रकाश’ योजनेतून सुंदर खेळ दाखवला जातो. तो प्रत्येकानं आवर्जून पाहावा, असाच आहे. रात्रीच्या नीरव शांततेमध्ये प्रकाशझोतांनी उजळलेली ती भव्य-दिव्यं मंदिरे पाहताना भूतकाळ सजग होतोय, असेच वाटत राहते.. काळाची पानं उलटून मागे जाताना अंधारामध्ये काळाची स्पंदने ऐकल्याचा भास होत राहतो.. हा अनुभव न चुकता घ्यावा..
राधिका टिपरे
radhikatipre@gmail.com