Leading International Marathi News Daily
शनिवार, १८ जुलै २००९
  वावटळीतले तारणहार
  बोट सोडून खांद्यावर हात!
  आरामदायी मॅट्रेस
  पण बोलणार आहे!
मराठीची महादशा
  विज्ञानमयी
  प्रतिसाद
  ‘जिव्हाळ्याची ई-बेटं’
बंध नात्यांचे
  मी एक ‘ढ’!
  काळ सुखाचा
.. हा दिवस मुलांचा!
  समलिंगी संबंधांतील प्रश्नोपनिषद
  चिकन सूप...
माझं आयुष्यच बदललंस रे!
  अत्याचारालाही जात असते?
  ‘अक्षरयात्री’चे अक्षरमैत्र
  ललित
पक्षीनिरीक्षण सोहळा
  रुग्ण-हक्कांची सनद
  खजुराहो

 

वावटळीतले तारणहार
किशोरावस्था म्हणजे आयुष्याचा वसंत ऋतू.. तसेच हा वावटळीचा काळ.. या गुंतागुंतीच्या कालखंडातील मुलांच्या प्रश्नांची उकल करणे पालकांना दिवसेंदिवस आव्हानात्मक वाटू लागले आहे. लहानपणापासून मुला-मुलींची काळजी घेणाऱ्या बालरोगतज्ज्ञांशी मुलांची मानसिक जवळीक असते. त्यांनीच ही मुले मोठी होत असताना त्यांच्या समस्यांची योग्य दखल घेतली तर., या भावनेने एक उपक्रम मध्यंतरी नागपुरमध्ये राबवला गेला. त्यातून पुढे आलेले हे विचारमंथन-
बालपण संपलेले पण तारुण्य अजून दूर आहे, असा आयुष्याचा काळ म्हणजे किशोरावस्था. कवींच्या नजरेतून हा काळ म्हणजे आयुष्याचा वसंत ऋतू तर मानसशास्त्रांच्या दृष्टीतून हा वावटळीचा काळ. डॉक्टरांच्या दृष्टीतून १० ते १८ वर्षे वयातला काळ म्हणजे शारीरिक वाढीचा वेगवान काळ. या काळात उंची वेगाने वाढते, वजन वाढायला लागतं, लैंगिक अवयवांची वाढ होऊ लागते व जननक्षम होण्यासाठी शरीराची आंतरिक वाढ परिपक्व होत असते. हा हार्मोन्सचा परिणाम असल्यामुळे शारीरिक

 

वाढ व लैंगिक वाढीबरोबरच, पण मानसिकतेतही बदल होतो. भिन्न लिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण वाढू लागतं. भावनाविवशता वाढते. आपले समवयस्क सवंगडी व मैत्रिणी यांचे बदलते शरीर बघून, त्याची आपल्या शरीराशी तुलना केली जाते. काहींना आपण कुठे कमी आहोत असं वाटतं आणि न्यूनगंड निर्माण होतो.
या वयातल्या मुलांची शारीरिक वाढ एकसंध नसते. ज्या मुलांची उंची आधी वाढते ते रोडतांगड दिसतात. ज्यांच्ेा वजन आधी वाढते ते स्थूल दिसतात. वाढणाऱ्या दाढी-मिशा, काखेतले व जांघेतले केस, तारुण्यपीटिका या अचानक होणाऱ्या शारीरिक बदलांचा काही मुलांना त्रास होतो. स्तनांचा बदललेला आकार काही मुलींना अस्वस्थ करतो. या काळात मुला-मुलींच्या एकत्र खेळण्याला बंधने घातली जातात. एकत्र वावरण्यावर शंका घेतल्या जातात. आई-वडिलांच्या वागण्यातला हा बदलही किशोरवयीन मुला-मुलींना अस्वस्थ करीत असतो.
हाच काळ शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. अभ्यासाचा ताण, परीक्षेची भीती, भविष्याची चिंता यामुळे आधीच अस्वस्थ असलेल्या मनावर ताण येतो. आई-वडिलांची शिस्त नकोशी वाटते. अवाजवी शिस्तीविरुध्द बंड करावेसे वाटते. हा मानसिकतेमधला झंझावात विविध वर्तनसमस्या निर्माण करतो. शरीर मोठय़ा माणसांचे, पण मन लहान मुलांचे- अशी ही गत असते. या काळात मानसिक आधार हवासा वाटतो. घरी जर पालकांशी खटके उडत असले तर मग घराबाहेर आधार शोधला जातो. त्यांच्या आयुष्यातील मित्र-मैत्रिणींचे महत्त्व वाढते. यातून उत्पन्न होणारे प्रेम ‘परिपक्व प्रेम’ नसते. याला इंग्रजीत Calf love किंवा Puppy love म्हणतात. हे प्रेमसंबंध बहुधा लवकर जुळतात व लवकर तुटतात. कारण एकमेकांना समजून घेण्याची, एकमेकांना मदत करण्याची, एकमेकांना आधार देण्याची परिपक्व मानसिकता तयार झालेली नसते. आपल्याला हवे ते मिळावे ही बुद्धी असते, देण्याची बुद्धी नसते.
या कच्च्या प्रेमप्रकरणातून शारीरिक संबंध घडले, तर अकाली गर्भधारणा, लैंगिक अवयवांना इजा, अयशस्वी संबंधामुळे येणारा न्यूनगंड, सामाजिक भीतीमुळे येणारी अपराधाची भावना व भयगंड हे सगळे या वावटळीचेच भाग!
आरोग्यशास्त्राच्या दृष्टीतून या संबंधातून लैंगिक आजार होऊ शकतात. त्यातल्या काही आजारांना औषधे आहेत. अकऊर-AIDS-HIV यांना औषध नाही. शरीरातील रोगप्रतिबंधक शक्तीवर हल्ला करणारा हा रोग शरीरसंबंधातून होतो.
नुकताच जेड गुडीचा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने मृत्यू झाला. १५-१६ वर्षांच्या अपरिपक्व वयात झालेल्या शरीरसंबंधामुळे मानवी कातडीवरील HPV नामक व्हायरस गर्भाशयाच्या मुखावर असलेल्या अपरिपक्व पेशींवर मुक्काम करतात. त्यातून पुढे कर्करोग होतो, हे आता आरोग्यशास्त्राने सिद्ध केलेले आहे. जेड गुडीला याची जाणीव करून दिली होती. तिने जुमानले नाही. अर्निबध आयुष्य जगत राहिली. वयाच्या २५ व्या वर्षी कर्करोगाने तिचा बळी घेतला.
पौगंडावस्थेत निर्माण होणाऱ्या विविधांगी प्रश्नांमुळे या वयातील मुला-मुलींकडे समाजाने विशेष लक्ष द्यावे, या दृष्टीने वठड ने या वयातील मुला-मुलींच्या आरोग्यावर बालरोगतज्ज्ञांची देखरेख असावी, असा पवित्रा घेतला. लहानपणापासून मुला-मुलींची काळजी घेणाऱ्या बालरोगतज्ज्ञांशी मुलांची मानसिक जवळीक असते. त्यांनीच ही मुले मोठी होत असताना त्यांच्या समस्यांची योग्य दखल घ्यावी. या गुंतागुंतीच्या कालखंडातील मुलांच्या प्रश्नांची उकल करणे बालरोगतज्ज्ञांना तुलनेने सोपे जाऊ शकते, या विचारातून Adolescent Chapter ही उपशाखा बालरोगतज्ज्ञांच्या संघटनेतून उदयाला आली. बालरोगतज्ज्ञांनी विशेष प्रशिक्षण घेऊन पौगंडावस्थेतील मुलांच्या समस्यांची उकल करता येऊ शकते, असे त्यांचे मत आहे. या उपशाखेचे भारतातील मुख्य केंद्र दिल्लीला आहे आणि शाखा विविध प्रांतांमध्ये आहेत. दरवर्षी त्यांची परिषद भरते. या परिषदांमधून डॉक्टर मंडळींना किशोरवयीन मुलांमधील समस्या व त्यावरील उपाय याचे प्रशिक्षण मिळते.
अशीच एक परिषद नुकतीच (४ व ५ जुलै २००९ रोजी) नागपुरात ‘वनामती’ परिसरात संपन्न झाली. त्यात बालरोगतज्ज्ञ, शिक्षक, पालक व किशोरवयीन मुले-मुली यांच्यासाठी विविध कार्यशाळा घेण्यात आल्या.
अशा प्रशिक्षणातून आणि जाणिवेतून झंझावाताच्या काळातून जाणाऱ्या किशोरवयीन मुला-मुलींना मदत व मानसिक आधार मिळेल आणि त्यातून मानसिकरीत्या सक्षम व सुदृढ पिढी तयार होईल, ही अपेक्षा आहे.
'Adolescon 2009" असे परिषदेचे शीर्षक होतं. त्या परिषदेमध्ये सहभाग घेणारे सगळे डॉक्टर्स होते, त्यातले बहुतांशी बालरोगतज्ज्ञ होते. अखिल भारतीय स्वरूपाची परिषद असल्यामुळे कोलकाता, मुंबई, चेन्नई, दिल्ली अशा देशाच्या चारही बाजूंनी बालरोगतज्ज्ञ आले होते. परिषदेसाठी उद्दिष्ट होते 'mentor for each adolescent' म्हणजे ‘प्रत्येक किशोरवयीन मुलांसाठी तारणहार’.
या परिषदेत किशोरवयीन मुलांच्या समस्या व त्यांचे निराकरण यावर विविधांगांनी विचार करून चर्चासत्रे व परिसंवाद आयोजित केले होते. ‘जीवन कौशल्ये’ या विषयावर एक कार्यशाळा पालकांसाठी आयोजित केली होती. ‘आई-वडील व्यवसायात अतिशय व्यस्त असतील त्यांनी पालकत्व कसं निभवायचं?’ हा विषय घेऊन पालकांसाठी आणखी एक कार्यशाळा होती. ‘किशोरवयीन मुलांशी संवाद कसा साधायचा?’ याही विषयावर पालकांसाठी कार्यशाळा घेतली गेली.
शिक्षकांसाठी ‘समस्याग्रस्त किशोर’ या विषयावर कार्यशाळा घेतली होती. डॉक्टर्स व बालरोगतज्ज्ञांसाठी ‘समुपदेशन- किशोरवयीन मुलामुलींचे’ या विषयावर एक कार्यशाळा घेतली गेली. ‘किशोरवयातील लैंगिकता व लैंगिक समस्या’ यावरही डॉक्टरांसाठी कार्यशाळा झाली.
‘किशोरवयीन मुलांसाठी समुपदेशन कसे करावे?’ या विषयावरील कार्यशाळेचे संचालन डॉ. श्रीकांत चोरघडे (बालरोगतज्ज्ञ व समुपदेशक) आणि डॉ. शैलेश पानगावकर (मानसिक रोगतज्ज्ञ आणि समुपदेशन) यांनी केले. या कार्यशाळेमध्ये सहभागी श्रोत्यांना चार प्रश्न विचारले गेले-
समुपदेशनाबद्दल तुमच्या काय कल्पना आहेत?
किशोरवयीन मुलांमधील समुपदेशन वेगळें असते का? कुठल्या प्रश्नांसाठी समुपदेशन करावे?
हल्ली तुम्ही कशा पद्धतीने समुपदेशन करता?
चांगल्या समुपदेशकाची लक्षणे काय असतात?
या प्रश्नांसाठी प्रेक्षकांचे चार गट केले गेले. प्रत्येक गटासाठी एक गटनायक नेमला गेला. त्याने त्या त्याच्या गटातील लोकांशी चर्चा करून अंतिम उत्तरे सादर करायची होती. त्या उत्तरांवर चर्चा घडवून त्यातील शास्त्रोक्त सत्य संचालकांनी प्रेक्षकांपुढे मांडले. त्यातून मिळणारा संदेश पुढीलप्रमाणे होता-
समुपदेशन करणाऱ्याने पध्दतशीर प्रशिक्षण घेणे आवश्यक असते. विविध समस्यांवर समुपदेशन करण्यासाठी त्या त्या समस्येप्रमाणे समुपदेशनात बदल करावा लागतो. किशोरवयीन मुला-मुलींसाठी अर्थातच नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने समुपदेशन करावे लागते. समुपदेशक चांगला संवादपटू असायला हवा. त्यासाठी शांतपणे, चेहऱ्यावरच्या हावभावासकट संपूर्ण ऐकायला हवे असते. समुपदेशन म्हणजे सल्ला नव्हे. समुपदेशन हा एक संवाद असतो व त्यातून समस्याग्रस्त व्यक्तीला स्वत: उत्तरें शोधून आपल्या वागणुकीत बदल करायचा असतो.
समुपदेशन करणारा व ते घेणारा त्या दोन्ही व्यक्तींची संमती त्यासाठी हवी असते. दोघेही अनुकूल असल्याशिवाय समुपदेशन यशस्वी होणार नसते. वेळ आगामी घेऊन व भरपूर वेळ ठेवून समुपदेशन व्हायला हवे.
समस्याग्रस्त व्यक्तीचे मन जाणून घेणे महत्त्वाचं. नि:संकोचपणे त्याने समुपदेशनासमोर मन उघड करायला हवे. यात समुपदेशकाचे कौशल्य असते. समुपदेशकाचे कौशल्य समोरच्याला बोलते करण्यात असते.
समस्याग्रस्त व्यक्तीच्या आचार आणि विचारात बदल करण्याची प्रेरणा मिळून ते प्रत्यक्षात आणले तरच समुपदेशन यशस्वी झाले असे म्हणता येईल.
किशोरवयीन मुलामुलींशी संभाषण करताना ती व्यक्ती संपूर्ण विकसित व्यक्तिमत्त्व आहे, असे समजून संवाद घडावा. संवाद घडताना आई-वडील सोबत नकोत. या वयातील व्यक्तींना बोलते करायला प्रसंगी जास्त वेळा संवाद साधावा लागतो. बालरोगतज्ज्ञाचा जर त्या व्यक्तीशी जुना संपर्क असेल, तर ते काम जास्त सोपे असते.
‘किशोरवयीन मुलामुलींशी कसं वागावं?’ या विषयावरील कार्यशाळा डॉ. जया शिवलकर या समुपदेशक डॉ. निशिकांत कोतवाल हे बालरोगतज्ज्ञ यांच्या देखरेखीखाली घेण्यात आली. ही कार्यशाळा आई-वडील दोघेही व्यावसायिक असलेल्या कुटुंबांतील पालकांसाठी होती. या कार्यशाळेतून निघालेले निष्कर्ष खालीलप्रमाणे-
किशोरवयीन मुलामुलींशी संवाद साधताना त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे लादले जाऊ नये. त्यांची मते समजून घ्यावीत.
अपेक्षा न सांगता स्वत:ची मते म्हणून सांगितली जावीत. ‘तू विचार कर व योग्य वाटेल त्याप्रमाणे कृती कर’, अशा भाषेमध्ये संवाद साधला जावा. ‘काम कर’ असे न म्हणता ‘प्रयत्न कर’ अशी भाषा असावी. मत मांडताना त्यातून अपेक्षित सुपरिणाम व दुष्परिणाम दोन्हीची जाणीव द्यावी. पालकांच्या बोलण्यात आशावाद असावा. कृती व वाणी दोन्हींमध्ये सकारात्मक भूमिका असावी.
किशोरवयीन मुलामुलींना शक्यतो ‘नाही’ म्हणू नये. आणि जेव्हा ‘नाही’ म्हटले जाईल, तेव्हा कुठल्याही कारणास्तव त्या नकाराचा होकार होऊ नये. नेहमीच्या वागण्यात होकार विपुल असावा. नकार अभावाने पण समर्थ असावा.
रागावण्याचे प्रसंग कमी असावेत. मौनामधून मुलांना राग समजेल, असे प्रयत्न असावेत. रागावताना लांबलचक भाषणे प्रभावशून्य ठरतात.
चांगल्या कृतीसाठी मुलांची स्तुती करायला, नावाजायला एकदाही विसरू नये. स्तुती अवास्तव नसावी. केवळ त्या विशिष्ठ कृतीसाठी किंवा गुणाविषयी असावी. टीकासुद्धा त्या प्रसंगापुरती व मोजक्या शब्दांतच असावी.
समुपदेशकाचा सल्ला पालकांनी जरूर घ्यावा. मुले पौगंडावस्थेत शिरण्याच्या आधीच सल्ला घेतला गेला, तर संगोपन सोपे जाईल. याला Anticipatory Guidance असे म्हटले जाते. प्रतिबंधक समुपदेशन असा याचा अर्थ. रोगाविरुद्ध प्रतिबंधक लस असते, तसाच हा प्रकार.
मुलांचा आहार चौरस असावा. बाहेरचे खाणे, स्वयंचलित वाहने, संगणक, मोबाईल यांचा वापर नाकारला जाऊ नये, पण वापरावर माफक र्निबध असावे.
व्यावसायिक पालकांना घरात मोजका वेळ असतो. त्या वेळेचा वापर टीकाटिप्पणी व शिस्त यासाठी न करता सकारात्मक संवादासाठी केला जावा.
‘जीवनकौशल्ये’ या विषयावर किशोरवयीन मुलामुलींसाठी असलेली कार्यशाळा हे परिषदेचे आकर्षण ठरले. सुमारे २५० शालेय मुलांची ही कार्यशाळा झाली.
WHO ने १९९३ साली १० जीवनकौशल्ये निर्धारित केली आहेत. किशोरवयीन मुलांना ही जीवनकौशल्ये शिकवल्यास त्यांना जीवनातील वेगवेगळ्या समस्या, अडचणी आणि मोह यांचा सामना करणे आणि आपले जीवन आनंदी व समाधानी बनविणे सोपे जाते, असा WHO ने म्हटले आहे.
बंगलोरच्या डॉ. प्रीती गलगली व नागपूरच्या डॉ. शुभदा खिरवडकर या दोन डॉक्टरांनी विविध खेळांमधून, प्रश्नोत्तरांतून तसेच पंचतंत्रातील गोष्टींमधून ही जीवनकौशल्ये मुलांना शिकवली. ‘नाही’ कसे म्हणायचे, पालकांशी संवाद कसा साधायचा, एखाद्या समस्येचे सर्जनशीलतेने निराकरण कसे करायचे, ताणतणावांशी सामना कसा करायचा, निर्णयक्षमता कशी वाढवायची- ही सगळी जीवनकौशल्ये ही मुले अतिशय उत्साहात सहभागी होऊन शिकली. अशा कार्यशाळा पुन्हापुन्हा व्हायला हव्यात, असा प्रतिसादही त्यांनी दिला.
या कार्यशाळेत केला गेलेला एक प्रयोग उल्लेखनीय होता. त्यात ‘तुम्हाला सगळ्यात जास्त आवडणारी व्यक्ती कोण?’ या प्रश्नाचे उत्तर असलेली चिट्ठी बंद पेटीत टाकायला सांगितली. या जादूच्या पेटीत मुले डोकावली. त्यात आरसा असल्यामुळे त्यांना स्वत:चा चेहरा यात दिसला. आपली आवडती व्यक्ती आपण स्वत: असावे व ती नेहमी आवडती राहील यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत- असा अंतिम संदेश या प्रयोगातून मुलामुलींना मिळाला.
किशोरवयीन मुलामुलींच्या पालकांना जीवनकौशल्याची जाणीव देण्यासाठी वेगळी कार्यशाळा घेतली गेली. मुलामुलींचे व्यक्तिमत्त्व परिपक्व, सृजनशील व परिपक्व होण्यासाठी त्यांची जीवनकौशल्ये विकसित कशी करता येतील याबद्दल या कार्यशाळेतून पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.
चेन्नईस्थित डॉ. यमुना, नागपूरमधील लैंगिक समस्यातज्ज्ञ डॉ. संजय देशपांडे यांनी ‘किशोरवयीन मुलांमधील विविध लैंगिक समस्या’ यावर कार्यशाळा घेतली. UNFPA या संस्थेच्या विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन केलेले होते. या माध्यमातून किशोरवयीन मुलांमधील विविध लैंगिक समस्या व लैंगिक आजार याची जाणीव देण्यात आली.
‘किशोरवयीन मुलामुलींसाठी उपलब्ध असलेल्या प्रतिबंधक लसी व त्यांचं महत्त्व’ विषद करणारी कार्यशाळा डॉ. विनोद गांधी व डॉ. संजय मराठे या नागपूरकर बालरोगतज्ज्ञद्वयाच्या सहकार्याने दिल्लीच्या डॉ. अजय गंभीर यांनी घेतली. त्यात कांजण्या, गोवर, घटसर्प या बालपणीची वैशिष्टय़े समजल्या गेलेल्या रोगांच्या पुन्हा परतण्याबद्दल माहिती दिली गेली व त्याविरुद्ध उपयोगात येणाऱ्या लसींची माहिती दिली. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरुद्धची लस किशोरवयीन मुलींना दिली जावी, याची जाणीव दिली गेली.
एकंदरीत किशोरवयीन मुला-मुलींच्या प्रश्नांविषयी समाजात जाणीव तीव्र होताना दिसत आहे. मात्र अजूनही त्यांच्या प्रश्नांची उकल करण्यासंदर्भात गोंधळाची भावना आहे. जर सारे समजदार घटक एकत्र येतील, तर याबाबत अधिकाधिक स्पष्टता येईल.
डॉ. श्रीकांत चोरघडे