Leading International Marathi News Daily

शनिवार, १८ जुलै २००९अनधिकृत नर्सिग होम्सचा सुळसुळाट

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास पालिका प्रशासनाची टाळाटाळ
संदीप आचार्य, मुंबई, १७ जुलै

राजकारणी आणि बिल्डर यांच्या साटय़ालोटय़ातून कधी नियमात बसवून तर कधी नियमांना बगल देत बांधकाम क्षेत्रासह ट्रस्टची अभियांत्रिकी तसेच वैद्यकीय महाविद्यालये काढली जातात. या साऱ्यात नियम वाकवणे, नियमांना बगल देणे अथवा नियमात फेरबदल करून ते ‘बसवून’ घेण्याचे ‘कौशल्या’चे काम करतात ते सनदी अधिकारी. मुंबईत ‘विकास नियंत्रण नियमावली १९९१’ (डिसी रुल) मधील तरतुदी धाब्यावर बसवून किमान १२०० नर्सिग होम आज बेकायदा व्यवसाय करत आहेत. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सहा महिन्यांमध्ये ही नर्सिग होम्स बंद करावीत, असे स्पष्ट आदेश दिल्यानंतरही मुंबई महापालिका प्रशासनातील उच्चपदस्थ या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याऐवजी विकास नियंत्रण नियमावलीत फेरबदल करण्याच्या तयारीत आहेत. यातील गंभीर बाब म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या कारवाईचे आदेश काही विशिष्ट कालावधीसाठी स्थगित ठेवावेत अशी अजब अपेक्षा गटनेत्यांकडे व्यक्त करण्यात आली आहे.

एरंडोलजवळ भीषण अपघातात १० ठार
जळगाव, १७ जुलै / वार्ताहर

मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर एरंडोल जवळ आज सकाळी मारूती ओम्नी टॅक्सी आणि टँकरची समोरासमोर धडक होवून झालेल्या भीषण अपघातात १० प्रवासी ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. मृत व जखमी हे जळगाव जिल्ह्य़ातील आहेत. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून टँकरचालकास अटक करण्यात आली आहे. जळगाव येथील काही युवकांचा गट गणेश मूर्ती घेण्यासाठी जात असताना हा अपघात झाला. सकाळी प्रवासी घेवून जाणाऱ्या टॅक्सीने ते निघाले होते. ही व्हॅन एरंडोल गावाजवळ एका हॉटेलजवळ पोहोचली असताना समोरून भरधाव येणाऱ्या टँकरने तिला जोरदार धडक दिली.

शासन निर्णयाची कुऱ्हाड म. गांधींच्या शाळेवरही!
शुभदा चौकर , मुंबई, १७ जुलै

अनुदानाचा भार नको म्हणून नव्या मराठी शाळांना मान्यता न देण्याच्या राज्य शासनाच्या करंटेपणाची कुऱ्हाड प्रयोगशील खासगी मराठी शाळांनाही बसली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या महात्मा गांधीजींनी भारताचे पहिले शैक्षणिक धोरण आखले त्यांच्याच ‘नई तालिम’ संस्थेच्या ‘आनंद निकेतन’ शाळेलाही गेली पाच वर्षे प्रयत्न करूनही अद्याप परवानगी मिळालेली नाही. ‘आनंद निकेतन’ नावाचीच नाशिक येथील प्रयोगशील शाळाही मान्यतेअभावी कचाटय़ात सापडली आहे. मुख्य म्हणजे या शाळांना शासनाचे अनुदान नकोच आहे. कायम विनाअनुदानित तत्त्वावर शाळा चालविण्याची त्यांची नीती आहे. असे असतानाही राज्य शासनाने त्यांना शाळा चालविण्याची परवानगी देऊ नये याचा खेद वाटून हे शाळाचालक अत्यंत उद्विग्न झाले आहेत.

एअर इंडियाच्या अध्यक्षांचेच कर्मचाऱ्यांपुढे महाघोटाळ्याचे सूतोवाच !
समर खडस, मुंबई, १७ जुलै

तब्बल ७००० कोटींचा तोटा झाल्याने आता कर्मचाऱ्यांनी चांगले व अधिक काम करावे, असे सांगणाऱ्यांची तोंडे बंद व्हावी, असे महाघोटाळ्याचे धक्कादायक सूतोवाच एअर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरविंद जाधव यांनी केबीन क्रू असोसिएशनच्या बैठकीत केले. एअर इंडियाच्या विमानांच्या तिकीटांच्या आरक्षणात महाघोटाळा सुरू असल्याची माहिती अध्यक्षांनी स्वत:च दिल्याने कर्मचारी अवाक झाले. हा घोटाळ्याची पाळेमुळे शोधून काढून त्याचे उच्चाटन करण्याचे आश्वासनही जाधव यांनी कर्मचाऱ्यांसमोर दिले. मात्र ७००० कोटींचा हा तोटा कर्मचाऱ्यांच्या आळशीपणामुळे झाल्याचा गेल्या इतक्या दिवसांचा ‘एअर इंडिया’तील विविध ‘साहेबां’चा आरोप पूर्ण चुकीचा असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

पाईप गॅस आणि सीएनजी महागला
मुंबई, १७ जुलै / प्रतिनिधी
महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) उद्या शनिवारपासून मुंबईसह ठाण्यात सीएनजीच्या दरामध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. सीएसजीखेरीज लाखो घरांमध्ये पाईपलाईनद्वारे पुरविल्या जाणाऱ्या ‘पीएनजी’च्या दरामध्येही वाढ होणार आहे. सीएनजी व पीएनजीच्या या दरवाढीमुळे शहरातील टॅक्सी, रिक्षा व बसप्रवास महागण्याची शक्यता आहे. नव्या दरानुसार प्रति किलो सीएनजीसाठी वाहनधारकांना मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर आणि नवी मुंबईमध्ये अनुक्रमे २४.६५, २५.२१, २४.७७ आणि २४.८८ रुपये मोजावे लागणार आहेत. याखेरीज प्रति किलो ‘पीएनजी’साठी मुंबईत १३.६० रु., ठाण्यात १३.६५ रु. आणि मीरा-भाईंदरमध्ये १३.६७ रुपये मोजावे लागणार आहेत. उद्या शनिवारपासून ही दरवाढ लागू होईल, असे एमजीएलच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

पावसाळ्यात साथीच्या रोगांचे आजवर ३६ बळी
मुंबई, १७ जुलै / प्रतिनिधी

पावसाळ्याच्या सुरुवातीपासून साथीच्या रोगांमुळे आजवर मुंबईत ३६ जण दगावले आहेत. त्यापैकी १६ जण या महिन्यात दगावले असून, दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे. हिवताप, ताप, ग्रॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस या साथीच्या रोगांमुळे १ ते १७ जुलै या काळात दगावलेल्या १६ रुग्णांपैकी सर्वाधिक ११ रुग्ण तापाच्या साथीमुळे व त्याखालोखाल तीन रुग्ण हिवतापामुळे मरण पावले आहेत. ग्रॅस्ट्रो व डेंग्यूमुळे प्रत्येकी एकेक रुग्ण दगावला आहे. मागील वर्षी या कालावधीत साथीच्या रोगांनी १४ जणांचा बळी घेतला होता, अशी माहिती महापालिकेने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. मुंबईत आज दिवसभरात साथीच्या आजारांमुळे सुमारे ३५० जणांना रुग्णालयांत दाखल केले होते. त्यापैकी ताप आणि हिवतापामुळे प्रत्येक एकेकजण दगावला आहे. हिवतापाचे रुग्ण आढळून आलेल्या भागांत धुम्र फवारणी तसेच अळी नाशक उपाययोजना हाती घेण्यात येत असल्याचे पालिकेने नमूद केले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची चार सदस्यीय समिती
मुंबई, १७ जुलै/प्रतिनिधी

राज्यातील येत्या विधानसभा निवडणुकींसाठी काँग्रेस पक्षाने चार केंद्रीय निरीक्षकांची समिती नेमली असून या समितीमध्ये दिग्विजय सिंग, मधुसूदन मिस्त्री, मोहन प्रकाश व रहेमान खान यांचा समावेश आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर काँग्रेस पक्षाची युती होणार असल्याचे संकेत दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून मिळत आहेत. या बाबत दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल व काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांच्यात बोलणी सुरू आहेत. मात्र मतदारसंघ पुनर्रचनेच्या पाश्र्वभूमीवर काही जागांची अदलाबदल तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला नक्की किती जागा सोडण्यात याव्यात याबाबतचे महत्त्वाचे निर्णय घेणे बाकी आहे. या समितीची औपचारिक घोषणा येत्या एक-दोन दिवसांमध्ये झाल्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने काँग्रेस पक्षातील हालचालींना वेग येणार आहे.

 

प्रत्येक शुक्रवारी