Leading International Marathi News Daily

रविवार, १९ जुलै २००९आरक्षणबदलांची ‘शाळा’ कोटी-कोटींची!
संदीप आचार्य, मुंबई, १८ जुलै

सोन्याची अंडी देणाऱ्या मुंबई तसेच नवी मुंबईपासून राज्यातील जवळपास प्रत्येक महत्वाच्या शहरापर्यंत, आरक्षित भूखंड ओरपण्याचे काम तथाकथित शिक्षणसम्राटांकडून अत्यंत पद्धतशीरपणे सुरू आहे. शिक्षणसम्राटांशिवाय राजकीय प्रभाव असणारे धनदांडगेही रुग्णालये, क्रीडांगणे, उद्याने आणि शाळांसाठी आरक्षित असणारे भूखंड योजनाबद्धरीत्या हडपण्याचे काम करत असतात. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी संबंधित मांजरा चॅरिटेबल ट्रस्टने काही वर्षांपूर्वी वर्सोवा येथे माध्यमिक शाळेसाठीचा एक भूखंड असाच मिळवला. नियमानुसार या भूखंडावर दोन वर्षांमध्ये शाळा बांधणे आवश्यक होते, मात्र दोन वर्षांत कोणतेही बांधकाम करण्यात आले नाही.

‘२४ जुलैला शतकातील मोठी भरती’
हा केवळ गैरसमज!
अभिजित घोरपडे, मुंबई, १८ जुलै

मुंबईत सर्वाधिक उंचीची भरती केवळ हिवाळ्यातच (नोव्हेंबर ते फेब्रुवारी) येते हे भौगोलिक वास्तव असल्यामुळे येत्या २४ तारखेला मुंबईत शतकातील सर्वात मोठी भरती येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे याबाबत मुंबईकरांमध्ये (व कोकणातसुद्धा) पसरलेली अस्वस्थता पूर्णपणे अशास्त्रीय माहितीच्या आधारावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईमध्ये येत्या शुक्रवारी (२४ जुलै) शतकातील सर्वाधिक उंचीची भरती येणार असल्याचे बृहन्मुंबई महापालिकेतर्फे जाहीर करण्यात आले आहे. त्या दिवशी दुपारी २ वाजून ०३ मिनिटांनी तिची उंची ५.०५ मीटर असेल, असे भाकीत आहे. त्यामुळे विविध कार्पोरेट कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे, या दिवशी शक्यतो बाहेर न पडण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. या दिवशी नेमके काय होणार, याबाबत उलटसुलट चर्चाही सुरू आहे. पण मुंबईतील भरती-ओहोटीचा इतिहास व त्यामागचे भौगोलिक वास्तवानुसार, २४ जुलैची भरती ही अपवादात्मक घटना असणार नाही.

शिरूरजवळील अपघातात मुंबईचे दहा ठार
शिरूर, १८ जुलै/वार्ताहर

पुणे-नगर रस्त्यावरील शिरूरजवळच्या फलकेमळा येथे आज पहाटे भरधाव स्कॉर्पियो जीप समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळून झालेल्या भीषण अपघातात स्कॉर्पिओतील दहाजण जागीच ठार झाले. अपघातातातील सर्व मृत मुंबईतील असून एका नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी ते नगरकडे निघाले होते. मरण पावलेल्यांत एक अपंग मुलगी, दोन वर्षांचे बालक व चार महिलांचा समावेश आहे. अपघातग्रस्त स्कॉर्पियो जीप पहाटे साडेचार ते पाचच्या सुमारास फलकेमळा येथे आली असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी दुभाजक ओलांडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकवर जाऊन धडकली.

एकनाथ शिंदे-सतीश प्रधान भेटीने अफवांना ऊत!
ठाणे, १८ जुलै/प्रतिनिधी

शिवसेनेच्या कल्याण विभागाची सुभेदारी गोपाळ लांडगे यांच्याकडे सोपविण्यात आल्याने नाराज झालेल्या जिल्हा प्रमुख एकनाथ शिंदे यांनी आता ‘मनसे’त प्रवेश करण्याची तयारी केल्याच्या अफवांना आज ऊत आला होता. तर लांडगे यांच्या विरुद्ध अपप्रचार करणारे हजारो ‘एसएमएस’ आज दिवसभर मोबाईल टू मोबाईल संचार करीत होते. वरील पाश्र्वभूमीवर आज शिंदे यांनी ‘मनसे’चे नेते सतीश प्रधान यांची गुप्त भेट घेतल्याच्या जोरदार अफवा ठाण्यात पसरल्या होत्या. शिवसेनेला रामराम ठोकून ते ‘मनसे’त प्रवेश करण्याच्या मन:स्थितीत असल्याचे वृत्त विविध ‘चॅनेल’वरून झळकायला सुरुवात झाल्याने या चर्चेत अधिकच भर पडली. तथापि, या चर्चे संदर्भात शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ही चर्चा म्हणजे आपल्या हितशत्रुंनी आपल्या विरुद्ध स्वार्थासाठी सुरू केलेल्या मोहिमेचाच भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेला आव्हान देण्याचा ‘एकनाथसेने’चा केविलवाणा प्रयत्न!
मुंबई, १८ जुलै/प्रतिनिधी

आनंद दिघे यांनी तब्बल २५ वर्षे राखलेला ठाण्यातील शिवसेनेचा गड एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून लोकांना आयात करून गमावला. ठाण्यातील निष्ठावंत शिवसैनिकांत ‘एकनाथसेनेच्या’ आयातनितीबाबत कमालीचा असंतोष असून त्यामुळेच ठाणे जिल्ह्यातील संघटनेत साफसफाई करण्यास शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सुरूवात केली आहे. कल्याण लोकसभा क्षेत्राच्या प्रभारी जिल्हाप्रमुखपदावर गोपाळ लांडगे यांची नियुक्ती करून एकनाथ शिंदे यांच्या अधिकारांना उद्धव ठाकरे यांनी कात्री लावल्यानंतर शिंदे यांनी मनसेचे ज्येष्ठ नेते सतीश प्रधान यांची भेट घेऊन शिवसेनेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.

वसई फाटा येथे घराची भिंत कोसळून चार ठार
ठाणे, १८ जुलै/प्रतिनिधी

वसई फाटा येथे घराची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका बालिकेसह चार महिला जागीच ठार झाल्या. ही घटना आज सायंकाळी घडली. मध्यप्रदेशातून आलेले हे मजुर वसईभागात गेले वर्षभर काम करीत होते. तर वसई फाटा येथे ते रहात होते. आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पाऊस कोसळत असताना हे मजुर घरातच होते. वादळामुळे अचानक घराची भिंत कोसळली. त्यात शांता कैलास भुरीया (२०), शारदा किशोर उर्फ डोंगरीया दामोर (२०), वसू संब्बेशीसिंग कटय़ार (२५) आणि पूजा किशोर उर्फ डोंगरीया दामोर (३) या चौघी जागीच ठार झाल्या, तर सुरती मुल्ली भुरया ही गंभीर जखमी असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.

२४ जुलैला काय घडू शकते?
मुंबईत पावसाळ्याच्या काळात मोठा पाऊस आणि भरती या दोन गोष्टी एकाच वेळेस आल्या की पाणी साचते. त्यामुळे येत्या २४ तारखेला उच्चांकी भरती नसली तरी पाऊस पडला तर काही काळ पाणी साचू शकते. पण हे प्रत्येक पावसाळ्यातच घडते. मुंबईतील २००५ सालच्या महापुराचे सत्यशोधन करणाऱ्या चितळे समितीच्या अहवालानुसार, मुंबई शहरात दरवर्षी किमान सहा वेळा मोठा पाऊस व भरती यांची वेळ जुळून येते. तसे येत्या २४ तारखेला घडले तर एरवी पावसाळ्यात साचते तेवढेच पाणी साचण्याची शक्यता आहे, तेसुद्धा त्या वेळेस मुंबईत मोठा पाऊस पडला तर! त्यामुळे या दिवशी काळजी जरूर घ्यायला हवी, पण पावसाळ्यात काळजी घेतली जाते तितकीच. त्यामुळे घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही, असे या विषयातील तज्ज्ञांनी भौगोलिक व वैज्ञानिक माहितीच्या आधारे स्पष्ट केले आहे.

 

प्रत्येक शुक्रवारी