Leading International Marathi News Daily

सोमवार, २० जुलै २००९

अग्रलेख

हिलरी मॅडमचा तास!

मुंबईच्या सेंट झेविअर्स कॉलेजचा विद्यार्थिवर्ग हा भाग्यवान आहे. त्यांना एकाच वेळी दोन प्रभावी व्यक्तिमत्वांबरोबर बातचीत करता आली, त्यांचे मन त्यांना समजून घेता आले. अमेरिकेच्या

 

परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांना शिक्षणविषयक समस्यांविषयी विचारता आले. अभिनेता आमिर खान शैक्षणिक राजदूत आहे, त्यालाही हिलरींच्या समवेत विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या प्रश्नांना सामोरे जाता आले. शिक्षण ही आजकालची सर्वात गंभीर समस्या बनू पाहते आहे. आपल्याला शिक्षणक्षेत्र करिअर म्हणून निवडायचे आहे, असे सांगणारा विद्यार्थिवर्ग सहसा आढळत नाही, ही वस्तुस्थिती या दोघांनाही मान्य आहे. चांगला शिक्षक नसेल तर देशाला चांगला नेता, चांगला अभिनेता, उत्तम शास्त्रज्ञ, उत्तम बुद्धिवंत कसे मिळणार, हाही एक प्रश्नच आहे. शिक्षणावर कमी खर्च केला जातो, शिक्षकांची पगाराची स्थिती फारशी चांगली नसते, त्यामुळे शिक्षण क्षेत्राकडे वळणाऱ्यांची संख्या खूपच कमी असते, असे म्हटले जाते. चांगले शिक्षण मिळायचे असेल तर शिक्षकही उत्तम हवा. त्यासाठी त्याला योग्य ते वेतन दिले जायला हवे, असे हिलरी क्लिंटन म्हणाल्या. तरीही चांगला पगार मिळाला तर चांगले शिक्षक मिळतीलच असे नाही. सरकारी नोकरांना पगार काय कमी आहेत? चांगले सरकारी नोकर मोजकेच निघतात. शिक्षणाचा थेट संबंध हा विद्यार्थ्यांच्या बुद्धय़ांकापेक्षा शिक्षक-शिक्षिकांकडून त्याला जे ज्ञान मिळते ते त्याच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचते की नाही, याच्याशी असतो. हिलरींनी असेही म्हटले, की आपले अपुरे ज्ञान वाढवायची इच्छा काहीच शिक्षकांना असते. हे शिक्षक मात्र वर्षांला ४०० डॉलरएवढी रक्कम खर्च करून नवी पुस्तके खरेदी करत असतात. उत्तम दर्जाचा विद्यार्थी घडवायचा असेल तर त्यासाठी शिक्षकांना तयार करायची आणि त्यांना योग्य ते प्रशिक्षण द्यायची गरज आहे. हिलरींच्या या विचारांबाबत दुमत असायचे कारण नाही. आपल्याकडे दूरचित्रवाणी प्रथम आली तेव्हा त्याचा वापर हा शिक्षणासाठी सर्वाधिक व्हावा, अशी संकल्पना मांडण्यात आली. सकाळच्या आणि दुपारच्या वेळेचा सदुपयोग ‘इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी’ने करून घेतला. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना या माध्यमाद्वारे पाठ दिले. आजही हे कार्यक्रम दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित केले जातात, पण ते कितीजण पाहतात, हा पुन्हा प्रश्नच आहे. अमेरिकेत बालमनावर दूरचित्रवाणीचा वाईट परिणाम होतो, कारण त्याला काय पाहावे आणि काय पाहू नये, याविषयी योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही. वाहिन्यांच्या भडिमाराने विद्यार्थ्यांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे, अशी हिलरींची तक्रार आहे. अमेरिकेतल्या एका पाहणीनुसार अमेरिकेत असणाऱ्या प्रत्येक बालक रोज सरासरी किमान तीन तास दूरचित्रवाणी पाहते. विशेष म्हणजे १९९९ मध्ये म्हणजे दहा वर्षांपूर्वी अमेरिकेतले प्रत्येक मूल सरासरी सहा तास ३२ मिनिटे दूरचित्रवाणी पाहण्यात घालवत असे. या अमेरिकन हिशेबाप्रमाणे प्रत्येक अमेरिकन व्यक्ती वयाची सत्तरी गाठेपर्यंत प्रत्येकी सरासरी सात ते दहा वर्षे दूरचित्रवाणीचे कार्यक्रम पाहण्यात घालवते. आपल्याकडे दूरचित्रवाणी आणि तिचे रंगीत कार्यक्रम मुळातच उशिरा सुरू झाल्याने हा प्रश्न फारसा उद्भवत नाही. तरीही आपल्या देशाचे आकारमान आणि लोकसंख्या लक्षात घेता आपल्याकडे वृथा खर्च होणाऱ्या वेळेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. दूरचित्रवाणीचे चांगले आणि वाईट परिणाम या विषयावर आजही आपल्यात बरीच मतभिन्नता आहे. हिलरी क्लिंटन यांनी, अमेरिकेत अगदी उत्तम अशी नावाजलेली विद्यापीठे आहेत, पण तिथे दिल्या जाणाऱ्या शिक्षणात सर्वसमावेशकता नसल्याचे स्पष्ट केले आहे. मुलांचे शिक्षणविषयक अधिकार या विषयावर हिलरी यांनी खूपच काम केले आहे. मुलांचे अधिकार अनेक प्रकारे स्पष्ट करता येतात. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक स्थिती आणि अन्न, वस्त्र, निवारा मिळण्याबद्दलचा जीवनावश्यक अधिकार यातूनच त्या मुलाची प्रगती होत असते. सेंट झेविअर्सच्या एका विद्यार्थिनीने आपण धारावी झोपडपट्टीपासून काही अंतरावरच राहात असल्याचे सांगून धारावीतल्या पाच लहान मुलांना एका झाडाखाली शिक्षण द्यायचा उपक्रम राबवायला घेतला, पण दोन-तीन दिवसांनंतर ती मुले गायब झाल्याचे म्हटले. तिने या मुलांची चौकशी केली, पण आई-वडिलांकडूनही योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही, असे तिने स्पष्ट केले, तेव्हा हिलरींनी आणि आमिरने तिला ‘तू हे प्रयत्न एका अनुभवावरून सोडू नकोस,’ असा सल्ला दिला. मार्टिन ल्यूथर किंग यांनी गांधीजींकडून कोणता बोध घेतला ते हिलरींनी तिला स्पष्ट केले. प्रत्येक व्यक्तीकडे जर सेवाभाव असेल तर ती महान पदावर पोहोचू शकते, हा गांधीजींकडून मानवतेला मिळालेला संदेश आहे. या देशात येऊन हिलरींना तो आपल्याला ऐकवावा लागतो, यातच आपण कोणत्या पायरीवर आहोत ते लक्षात येते. संधी नाकारली जाण्यात दारिद्रय़ाचा मोठा वाटा असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. हिलरींचे पती बिल क्लिंटन हे अध्यक्ष बनण्यापूर्वी अर्कान्सस प्रांताचे गव्हर्नर होते. बिल हे त्यांच्या कुटुंबात महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत पोहोचू शकलेले पहिले विद्यार्थी होते. आपल्या कन्येकडे असणाऱ्या शब्दसंपदेने बिल आणि आपण आश्चर्यचकित होत असू, असा अगदी व्यक्तिगत अनुभव सांगताना अर्कान्ससमध्ये घेतलेल्या एका चाचणी परीक्षेत १० टक्के शिक्षक अनुत्तीर्ण झाल्याचे हिलरींनी सांगितले. हा आकडाही वस्तुस्थिती सांगायला पुरेसा आहे. एका अमेरिकन पाहणीनुसार श्रीमंत आणि सुशिक्षित घरात पालक आपल्या मुलांशी सतत वेगवेगळय़ा विषयांवर गप्पा मारतात, तर गरीब घरांमध्ये मुलांसाठी टेबलावर खाद्यपदार्थ ठेवण्यापुरताच आई-वडिलांचा त्यांच्याशी संबंध येतो. श्रीमंत घरातली मुले अधिक चुणचुणीत बनतात. अर्थात या पाहणीसाठी अमेरिका कशाला हवी, आपल्याकडेही थोडय़ाफार फरकाने तीच परिस्थिती आहे. काही श्रीमंत आई-वडिलांना आपल्या मुलांना शिकवणी लावली की आपले काम झाले असे वाटते, हा भाग निराळा! हल्ली त्यांना मुलांशी बोलायलाही फार वेळ असत नाही. गरीब आई-बाप बिचारे मुलगा शाळेत गेला तरी खूप, असे मानतात. इथे शिक्षणाचा असमतोल आपल्याला प्रकर्षांने जाणवतो. एखाद्या गरीब घरातला, अगदी शेतमजुराचा मुलगा दहावी- बारावीला बोर्डात पहिला आला, तर त्याबद्दल त्याचे कौतुक वाटणाऱ्यांइतकेच या घटनेने चकित होणाऱ्यांचे प्रमाण सापडते. आपण आपल्या मुलाला सर्व काही दिले, पण त्याला शिक्षणात गोडीच वाटत नाही, अशी तक्रार करणारे ‘तारे जमीन पर’ चित्रपटातील ईशान अवस्थीचे वडील आणि असा मुलगाही कर्तृत्व दाखवून देऊ शकतो, हे सांगणारा निकुंभ सरांसारखा आमिर खानरूपी शिक्षक यापैकी पहिले चित्र आपल्याला बहुतेक ठिकाणी पाहायला मिळते, पण निकुंभ सरांसारखे शिक्षक मिळणे खरोखरच अवघड. उपजत गुण किंवा प्रतिभा आणि शिक्षणात मिळणारी संधी यामध्ये निर्माण झालेली दरी म्हणूनच कमी करायला हवी, असे हिलरींना वाटते आहे. त्यासाठी त्यांनी उद्योगपतींना, सरकारला, शिक्षणसंस्थांना विनंती केली आहे. त्यांनी मनावर घेतले तर हा बदल घडू शकतो, असे त्यांना वाटते आहे. आपल्याकडे अजूनही दहावीनंतर ‘एटीकेटी’ द्यावी की बारावीनंतर आणि बारावीनंतर ती दिली तर विद्यापीठांनी करायचे तरी काय, असे प्रश्न विचारले जात आहेत. प्रत्येक मुलाला वा मुलीला स्वत:चा विकास साधायची जास्तीत जास्त संधी दिली जायला हवी असेल तर शिक्षणाच्या क्षेत्रात प्रत्येक पायरीवर केला जाणारा हस्तक्षेप थांबायला हवा. हा हस्तक्षेप सरकारचाच असतो असेही नाही, बऱ्याचदा तो परिस्थितीचा असतो, राहत्या ठिकाणाचा, आसपासच्या वातावरणाचा वा संगतीचा असतो. सेंट झेविअर्समधल्या हिलरींच्या तासाने आपल्याला या गोष्टीचे आकलन झाले तरी खूप आहे. हिलरींनी महाविद्यालयीन जीवनात स्वत:चे वर्णन ‘मनाने स्थितिप्रिय, हृदयाने सुधारणावादी’ असे केले होते. मार्टिन ल्यूथर किंग यांच्या हत्येनंतर आपल्या ‘वेलस्ली’ कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा दोन दिवसांचा संप घडवून आणणाऱ्या आणि ‘वेलस्ली’मध्ये अधिक कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी धडपडणाऱ्या हिलरी शिक्षण क्षेत्रतल्या संधीबद्दल हक्काने बोलू शकतात. त्यांचा हा गप्पागोष्टींचा तास ‘सेंट झेविअर्स’च्या विद्यार्थ्यांनाच काय, समस्त समाजाला घडवायला उपयुक्त ठरावा.