Leading International Marathi News Daily

सोमवार, २० जुलै २००९

लाल किल्ला

मायावतींचा हत्ती: चाल आणि तोल

दोन वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत मायावतींच्या बसपने २०६ जागाजिंकल्या होत्या, तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्येही काँग्रेसने २०६ जागाजिंकल्या. उत्तर प्रदेशात सध्या बसप आणि काँग्रेसमध्ये बघायला मिळत असलेल्या संघर्षांचे मूळ कमालीचे साम्य असलेल्या या आकडय़ांमध्येही आहे. उत्तर प्रदेश काबिज केला तर केंद्रात पूर्ण बहुमतासह सत्ता येईल, याची जाणीव झालेला काँग्रेस पक्ष मायावतींना वारंवार आव्हान देण्याचा प्रयत्न करीत आहे, तर काँग्रेसचे आक्रमण परतवून लावताना मायावतीही तारतम्य बाळगताना दिसत नाहीत.
मुलायमसिंह यादव यांच्या समाजवादी पार्टीच्या गुंडाराजला कंटाळलेल्या उत्तर प्रदेशच्या जनतेने विधानसभा निवडणुकीत मायावतींच्या नेतृत्वावर विश्वास टाकून बसपला पूर्ण बहुमतासह सत्तेत बसविले. राज्याच्या राजकारणावर असलेले पुरुषी वर्चस्व, तसेच खोलवर रुजलेला जातीयवाद यांची पर्वा न करता उत्तर प्रदेशच्या मतदारांनी महिला आणि दलित असलेल्या मायावतींच्या हाती राज्याची सूत्रे सोपविली. त्यांचा निवडणूक जाहीरनामा काय आहे, याचीही चौकशी केली नाही. चौथ्यांदा स्वबळावर मुख्यमंत्री झाल्यानंतर मायावतींनीही राज्यातून गुंडाराजचे उच्चाटन करण्यासाठी

 

प्रभावी पावले टाकली, विकासाच्या आघाडीवर मागे पडलेल्या उत्तर प्रदेशचा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न केला. कर्तृत्व आणि क्षमतेपेक्षा जातीलाच प्राधान्य देणारा उत्तरप्रदेश सर्वसमाजाचा नारा देऊन लीलया काबिज केल्यानंतर मायावतींच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला धुमारे फुटले. दोन वर्षांच्या आत देशातील पहिली दलित महिला पंतप्रधान बनण्याचे लक्ष्य त्यांनी ठेवले. त्या आता स्वत:च्याच प्रेमात पडल्या होत्या.
कोणत्याही आघाडीला बहुमत नाही, अशा स्थितीतच मायावतींना पंतप्रधानपदावर दावा करता आला असता. त्यासाठी बसपला किमान ४०- ५० जागाजिंकणे आवश्यक होते. अन्य राज्यांमध्ये फारशी ताकद नसल्याने उत्तर प्रदेशातूनच जास्तीत जास्त जागाजिंकणे क्रमप्राप्त होते. पण लोकसभा निवडणुकांना सामोरे जाण्याची व़ेळ येईपर्यंत मायावतींची जनमानसावरील पकड सैल होत गेली. उत्तर प्रदेशात विधानसभेत बसपच्या २०६ आमदारांमध्ये ६१ दलित आमदारांव्यतिरिक्त ब्राह्मण, ठाकूर, मुस्लिम, ओबीसींचे प्रतिनिधित्व करणारे आमदारही मोठय़ा संख्येने आहेत, याचे भान ठेवणे त्यांना शक्य झाले नाही. त्यांना लागले होते दिल्लीवर चाल करून जाण्याचे वेध. पण तोपर्यंत मायावतींच्या हत्तीची चाल राजकीयदृष्टय़ा सदैव संवेदनशील उत्तर प्रदेशच्या जनतेच्या लक्षात आली होती.
समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशात न झालेली युती मायावतींच्या पथ्यावर पडणारी होती. पण गुंडाराजचे उच्चाटन करताना मायावतींनी पोलीस आणि प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे शासकीय गुंडगिरीची दहशत बसवून सर्वसामान्यांना त्रस्त करणे सुरू केले होते. आज उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक समाजकंटकांमध्ये असण्याऐवजी सर्वसामान्य जनतेत आहे. पोलीस आणि प्रशासनाच्या भ्रष्टाचारामुळे दलित, वंचित, उपेक्षित कमकुवत घटकच नव्हे, तर मध्यमवर्गालाही न्याय मिळविणे दुरापास्त झाले आहे. जनतेतील हा रोष दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि त्यासोबत मायावतींच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली. लोकसभा निवडणुकांच्या निकालात मायावतींची घसरगुंडी दिसून आली. ब्राह्मण-मुस्लिम-ओबीसी मतदार मायावतींकडे विधानसभा निवडणुकीपुरते आकृष्ट झाले होते. महाराष्ट्रातील मतदारांनी जशी शरद पवारांची पंतप्रधानपदाची दावेदारी साफ झिडकारली, तसेच उत्तर प्रदेशात मायावतींच्या बाबतीत घडले. पंतप्रधानपदासाठी मायावतींचे नेतृत्व परिपक्व झालेले नाही, असाच स्पष्ट कौल राज्यातील जनतेने लोकसभेच्या निकालांद्वारे दिला होता. बिहारप्रमाणेच गेली दोन दशके जातीयवादाच्या दलदलीत फसलेला उत्तर प्रदेश आता बाहेर पडण्यासाठी धडपडत आहे. विकासाची आस लावून बसला आहे. पण जातीयवादाची पाळेमुळे एवढी घट्ट झाली आहेत की हे अंतिम ध्येय सहजपणे साध्य होणार नाही. जातीयवादी समीकरणे मोडीत निघून मायावतींच्या हाती पूर्ण बहुमतासह आलेली राज्यातील सत्ता ही त्या स्थित्यंतराचा दिशेने झालेली सुरुवात आहे. लोकसभा निवडणुकीत मायावतींच्या दलित-ब्राह्मण समीकरणाला धक्का बसणार हे अपेक्षितच होते आणि तसे घडून पंतप्रधानपदाचे स्वप्न भंगल्यानंतर मायावतींनी संयम दाखवायला हवा होता. पण त्या संयम दाखवू शकणार नाहीत, हेही अपेक्षितच होते. उत्तर प्रदेश विधानसभेत जेमतेम २३ आमदार असलेल्या काँग्रेसचे अवघ्या दोन वर्षांत उत्तर प्रदेशातून लोकसभेत २१ खासदार पोहोचावेत, हा मायावतींना त्यांच्या दारुण अपेक्षाभंगाएवढाच बसलेला जबरदस्त धक्का होता. ब्राह्मण मतदारांनी दगा दिल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. विधानसभेत कमालीचा यशस्वी ठरलेला मायावतींचा सर्वसमाजचा प्रयोग ऐन मोक्याच्या वेळी लोकसभा निवडणुकांमध्ये ठोकरला गेला. राजधानी दिल्ली आणि लखनौसह उत्तर प्रदेशातील मोठय़ा शहरात स्वतच्या तसेच बसपचे निवडणूक चिन्ह असलेल्या हत्तींच्या शेकडो कोरीव मूर्ती उभारण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लावणाऱ्या मायावतींची दीनदलित, वंचित, उपेक्षितांविषयीची संवेदना ओसरली होती. राजकीय कारकीर्दीच्या पूर्वार्धात उच्चवर्णीयांना घालून पाडून बोलण्याचा आपला अधिकारच आहे, असे समजणाऱ्या मायावती चौथ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर स्वतच्या प्रतिमेविषयी कमालीच्या संवेदनशील झाल्या. सार्वजनिक जीवनात दोन देताना दोन घेण्याचीही तयारी ठेवावी लागते, याचाही त्यांना विसर पडला. त्यामुळेच वरुण गांधी प्रकरण पेटले तेव्हा मनेका गांधींनी मातृत्वावरून केलेली टीका सहन न होऊन मायावती भडकून उठल्या. मुरादाबादमध्ये जेव्हा रीटा बहुगुणा जोशींनी बलात्काराच्या मुद्यावरून अभद्र भाषेत शरसंधान केले तेव्हा तर मायावतींच्या संतापाला पारावार उरला नाही. खरे तर बहुगुणा-जोशींनी जी खालच्या दर्जाची भाषा वापरली तिचा सर्व स्तरावर तात्काळ निषेध होऊन मायावतींना सहानुभूतीच मिळाली होती. पण ही सहानुभूती मायावती काही तासही टिकवू शकल्या नाहीत. जशास तसे उत्तर देण्याच्या प्रयत्नात त्यांनी खलनायिका बनलेल्या बहुगुणा-जोशींना दलित अत्याचारविरोधी कायद्यातील कलमांखाली तुरुंगात डांबताना पहाटेचीही प्रतीक्षा केली नाही. बहुगुणा-जोशींना १४ दिवस तुरुंगात पाठविण्याच्या घाईत त्यांनी सत्तेचा दुरुपयोग केला आणि केलेल्या अपराधाची शिक्षा भोगून बहुगुणा-जोशींना नायिकेप्रमाणे तुरुंगातून सुटण्याची संधीही दिली. स्त्री-दाक्षिण्य म्हणून मायावतींनी अडीच वर्षांपूर्वी बहुगुणा-जोशींप्रमाणेच केलेल्या प्रक्षोभक विधानाकडे तत्कालीन मुलायमसिंह यादव यांनी कानाडोळा केला. दुर्दैवाने असा संयम मायावतींना दाखवता आला नाही.
सरकारी यंत्रणेचा वापर करताना आततायीपणा दाखविणाऱ्या मायावतींची ‘दीदी अमीन’ अशा शब्दात युगांडाचे दिवंगत राष्ट्राध्यक्ष ईदी अमीन यांच्याशी समाजवादी पार्टीचे सरचिटणीस अमर सिंहांनी केलेली तुलना मायावतींवर अन्याय करणारीच आहे. पण आपल्या विरोधकांना अशी टीका करण्याची संधी देण्यास मायावतीच कारणीभूत ठरल्या आहेत. मिळणारी सहानुभूती गमावून आपल्याच विरोधात वातावरण कसे निर्माण करायचे, हे मायावतींनी दाखवून दिले आहे. हाच संताप मायावतींनी राज्यातील सर्वसामान्यांवर होणारे अत्याचार निपटून काढण्यासाठी दाखविला असता तर ठिकठिकाणी स्वतचे पुतळे न उभारताही त्यांची लोकप्रियता शतपटींनी वाढली असती. वापरलेल्या अपशब्दांबद्दल तुरुंगवासाद्वारे पापक्षालन करून रीटा बहुगुणा-जोशी पुन्हा त्यांच्यावर टीका करायला मोकळ्या झाल्या आहेत. लखनौच्या व्हीआयपी भागात असलेल्या बहुगुणा-जोशींचे निवासस्थान जाळून राज्यातील कायदा व सुव्यवस्था किती कुचकामी आहे हे मायावतींनी नकळत दाखवून दिले. वरुण गांधींपाठोपाठ बहुगुणा-जोशींच्या रूपाने खोटय़ा कलमांखाली विरोधकांना तुरुंगात डांबण्याची मायावती प्रशासनाची ही दुसरी वेळ आहे. विरोधकांच्या मुस्कटदाबीसाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी दाखविणाऱ्या मायावतीच आता आरोपीच्या िपजऱ्यात उभ्या होऊन टीकेच्या धनी झाल्या आहेत. उत्तर प्रदेशातील त्यांच्या सरकारला जेमतेम दोन वर्षे झाली आहेत. त्यांची आणखी तीन वर्षांची सत्ता कायम आहे. केंद्रातील काँग्रेसचे सारे विरोधक सध्या संदर्भहीन झाले असताना मायावतींनी स्वतच्या हाताने आपली प्रतिमा डागाळून घेतली. विशेष म्हणजे मायावतींवर तोफा डागणाऱ्या महिलाच आहेत. आपल्यावरही टोकाची टीका होऊ शकते, याची जाणीव गेल्या चार महिन्यांत मायावतींना झाली आहे. यातून बोध घेऊन त्यांनी निदान आपली पुढची राजकीय वाटचाल अबाधित राखण्यासाठी संयम बाळगण्याची गरज आहे. अरेला तुरेने उत्तर देण्याचे धोरण नेहमी यशस्वी होतेच असे नाही. विरोधकांना नामोहरम करण्यासाठी रोज उठून उग्र विधाने करणारे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आज कुठे आहेत, याचीही जाणीव मायावतींनी ठेवायला हवी. आपल्या सहकाऱ्यांवर कधीही विश्वास न ठेवणाऱ्या मायावतींनी त्यांचे आर्य चाणक्य सतीश मिश्रा यांनाही दुखावलेलेच आहेत. मायावतींची कितीही चाकरी केली तरी आपल्या वाटय़ाला काही येणार नाही, याची जाणीव एव्हाना मिश्रांना होऊ लागली आहे. जातीयवादाला छेद देऊन मायावतींनी उत्तर प्रदेशातील सत्ता मिळविली. मतदारांनी दलित व वंचितांच्या हाती सत्ता सोपविण्याचा चमत्कार उत्तर प्रदेशसारख्या राज्यात मायावतींमुळे घडला. पण मायावतींनी आपल्या वागण्यात आवश्यक ते बदल केले नाहीत तर प्रस्थापितांकडून उपेक्षित वर्गाच्या हाती सत्ता जाण्याच्या या प्रक्रियेला खीळ बसेल. त्यासाठी मायावतींना आपल्या अहंकाराला व आततायीपणाला मुरड घालावी लागेल. समाजातील सर्व घटकांना न दुखावता सोबत ठेवण्याची ‘परंपरा’ असलेला काँग्रेस पक्ष राहुल गांधींसारख्या तरुण, तडफदार नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशात नव्या जोमाने उभा होत आहे. रीटा बहुगुणा-जोशींनी अपशब्दांचा वापर करून उत्तर प्रदेशात काँग्रेसला केंद्रस्थानी आणले आहे. त्यासाठी त्यांनी तीन दिवसांची शिक्षाही भोगली आहे. अचानक उलटलेल्या या वातावरणामुळे मायावतींचा तोल आणखी ढळण्याची शक्यता आहे. मायावतींपुढच्या आव्हानांची आता कुठे सुरुवात झाली आहे.
सुनील चावक