Leading International Marathi News Daily

सोमवार, २० जुलै २००९

चौथ्या दिवशीही शिराळय़ात बंद
पाठिंब्यासाठी तालुक्यात आज लाक्षणिक बंद
सांगली, १९ जुलै / प्रतिनिधी

शिराळा येथील नागपंचमीसंदर्भात सांगली येथे झालेल्या बैठकीनंतरही रविवारी चौथ्या दिवशीही शिराळय़ात कडकडीत बंद पाळण्यात आला. विशेष म्हणजे हा बंद पूर्णपणे उत्स्फूर्त होता. नागपंचमी सणावरती येणाऱ्या र्निबधामुळे शिराळकरांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. या बेमुदत संपाला पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील सर्व गावांत एक दिवसाचा लाक्षणिक संप सोमवारी पुकारण्यात आला आहे.

बुधवारी नव्या शतकातील खग्रास सूर्यग्रहण भारतात सर्वत्र दिसणार
सोलापूर, १९ जुलै / प्रतिनिधी

येत्या २२ जुलै रोजी भारतात सकाळी दिसणारे खग्रास सूर्यग्रहण हे नव्या शतकातील पहिलेच ग्रहण असून ते पाहण्यास मिळाले तर लोक भाग्यावानच ठरतील. त्यानंतर पुन्हा भारतामध्ये असे ग्रहण पाहण्याची संधी २०३४ साली मिळणार असल्याची माहिती प्रसिद्ध पंचागकर्ते मोहनराव दाते यांनी दिली. २२ जुलैला सकाळी दिसणारे हे ग्रहण जवळजवळ सर्व आशिया खंड, हिंदी महासागराचा काही भाग, अरबी समुद्र आणि पॅसिफिक महासागर या प्रदेशात दिसणार आहे.

शिवाजी विद्यापीठाला १५ कोटींचे अनुदान
कोल्हापूर, १९ जुलै / विशेष प्रतिनिधी

विद्यापीठ अनुदान आयोगाने ११ व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत शिवाजी विद्यापीठाला १४ कोटी ७० लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. या अनुदानातून विद्यापीठात विविध विकासाचे प्रकल्प हाती घेण्यात येतील, अशी माहिती प्रभारी कुलगुरू डॉ. अजितकुमार डांगे यांनी येथे एका पत्रकार परिषदेत दिली. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मंजूर झालेले अर्थसाहाय्य आणि विद्यापीठाने प्रस्तावित केलेली विविध विकासकामे यांची माहिती देण्यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

अचानक पेट घेतल्याने किमती साहित्याचा ट्रक खाक
पेठवडगाव, १९ जुलै / वार्ताहर

मुंबईतून कोल्हापूरकडे सौंदर्य प्रसाधने, कॉस्मेटिक साहित्य, किमती कपडे, केमिकल्सच्या बाटल्या घेऊन जाणाऱ्या ट्रकने किणी टोलनाक्याजवळ अचानक पेट घेतल्याने ट्रकमधील हे साहित्य बेचिराख होऊन सुमारे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. या किणी टोलनाक्याजवळच ट्रक पेटून नुकसान होण्याची ही महिनाभरातील दुसरी घटना आहे.

डेक्कन सूतगिरणी कामगारांच्या थकीत रकमेबाबत १५ कोटींचा पर्याय मान्य
इचलकरंजी, १९ जुलै / वार्ताहर

डेक्कन सहकारी सूतगिरणीतील कामगारांच्या थकीत देय रकमेसाठी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेसंदर्भात कामगारांना १५ कोटी रुपये देण्याचा पर्याय उपस्थित केला असून, त्यास आगामी सुनावणीवेळी मान्यता देण्याचा निर्णय डेक्कन कामगार बचाव समितीच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे व संघटनेचे सचिव सुदाम ढपाले यांच्या उपस्थितीत एकमताने घेण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या या कामकाजाबाबत कामगारांनी स्वीकृती दर्शविण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रदीर्घ काळ रेंगाळलेल्या डेक्कन कामगारांच्या थकीत देय रकमेबाबत आशादायक वातावरण निर्माण झाल्यामुळे रविवारच्या या बैठकीवेळी कामगारांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

नरेंद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल
सातारा, १९ जुलै / प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रतिनिधी व येथील मराठा सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यावर सातारा पोलीस स्टेशनमध्ये ठेकेदारास मारहाण, दमदाटी व खंडणीची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. बांधकाम व्यावसायिक विजयसिंह शिवाजीराव पाटील (वय ४०, रा. आनंदवन अपार्टमेंट, गोडोली, सातारा) यांनी फिर्याद दिल्यानंतर नरेंद्र पाटील यांच्यावर सातारा पोलीस स्टेशनमध्ये भा. दंड संहिता कलम ३८७, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा रजिस्टर नं. ४१५/०९ दाखल करण्यात आला आहे. विजयसिंह पाटील यांनी फिर्यादीमध्ये म्हटले आहे, की दि. १८/७/०९ रोजी दुपारी बारा वाजता मराठा सहकारी पतसंस्थेच्या दारात नरेंद्र पाटील यांनी आपल्याला धमकावून ‘धोम बलकवडी प्रकल्पांतर्गत शासकीय कामाच्या निविदा काढून घे’ असे सांगत मारहाण करीत पाच लाखांची खंडणी मागितली व निविदा काढली नाही तर जिवे मारण्याची धमकी दिली व शिवीगाळ केली. या गुन्ह्य़ाप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक खाडे तपास करीत आहेत.

आंबे लागवडीसाठी शास्त्रीय पद्धतीने खड्डे भरण्याचे प्रश्नत्यक्षिक
फलटण, १९ जुलै/वार्ताहर

ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत ठाकुरकी (ता. फलटण) येथे कार्यरत असलेल्या कृषी कन्यांनी आंबे लागवडीसाठी शास्त्रीय पद्धतीने खड्डे भरण्याचे प्रश्नत्यक्षिक दाखविले. यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने ठरवून दिलेल्या सुधारित तंत्राचा वापर करण्यात आला.
प्रश्नत्यक्षिकांतर्गत १ बाय १ मीटर आकाराचा खड्डा खणून त्यात सर्वप्रथम शेणखत व मातीचे मिश्रण, बुरशीनाशक पॉलीडॉल पावडर, तसेच सिंगल सुपर फॉस्फेट, निंबोळी पेंड व वाळलेला पालापाचोळा यांचा वापर दिलेल्या कामानुसार वेगवेगळ्या थरात करण्यात आला व नंतर हुमानी नियंत्रणासाठी थायमॅट (फोटेट) वापरण्यात आले. अशा पद्धतीने आंबा लागवडीपूर्वी खड्डे भरल्यास रोपाची जोमदार वाढ होते व त्यांचे बुरशी, कीड व रोगापासून संरक्षण होण्यास मदत होते, असे कृषीकन्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. या वेळी तंत्रसाहाय्य उपविभागीय कृषी अधिकारी एस. एस. शहा व एस.डी. जाधव उपस्थित होते.

डॉ. ऋता कुलकर्णी यांना वैद्यकभूषण पुरस्कार
सांगली, १९ जुलै/प्रतिनिधी

मिरज येथील सुप्रसिद्ध पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. श्रीमती ऋता मिलिंद कुलकर्णी यांना कोल्हापूर येथील वुईमेन्स डेव्हलपमेंट एज्युकेशन अँड पब्लिक वेल्फेअर फाऊंडेशनच्या वतीने वैद्यकभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. ऋता कुलकर्णी यांची पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक म्हणजे लहान मुलांवरील अस्थिव्यंगोपचार यात सुपर स्पेशालिटी आहे. ‘इलिझारोव्ह टेक्निक’ नावाच्या रशियन उपचार पद्धतीचे शिक्षण त्यांनी अमेरिकेत जाऊन घेतले आहे. इलिझारोव्ह पद्धतीने दोन हजारांहून अधिक शस्त्रक्रिया करणाऱ्या त्या भारतातील एकमेव महिला डॉक्टर आहेत. भारतातील अनेक राज्यांत शस्त्रक्रियेचे शिक्षण ऑर्थोपेडिक सर्जनना देण्यासाठी त्यांना विशेष निमंत्रित करण्यात आलेले आहे. त्यांनी आजवर विदेशातील परिषदांमध्ये ४० हून अधिक शोधनिबंध सादर केले आहेत. डॉ. ऋता कुलकर्णी या मिरज येथील सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. जी. एस. कुलकर्णी यांच्या ज्येष्ठ स्नुषा आहेत. त्यांचे हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असून, तेथे विद्यार्थ्यांना पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणही दिले जाते. डॉ. ऋता कुलकर्णी यांना राज्य शासनाच्या वतीने असोसिएट प्रश्नेफेसर म्हणूनही मान्यता मिळालेली आहे. त्यांनी नुकतेच प्लेटच्या साहाय्याने आखूड पायाची लांबी वाढविण्याचे नवे तंत्र विकसित केले असून, याचा अनेक रुग्णांनी लाभ घेतलेला आहे. डॉ. ऋता कुलकर्णी यांना मिळालेल्या या वैद्यकभूषण पुरस्कारामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

राजेंद्र सरकाळे यांना कृषिसाहित्य पुरस्कार
सातारा, १९ जुलै / प्रतिनिधी

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपव्यवस्थापक कृषितज्ज्ञ व प्रगतशील शेतकरी राजेंद्र सरकाळे यांना कै. वसंतरावजी नाईक कृषी संशोधन आणि ग्रामीण विकास प्रतिष्ठानमार्फत दिला जाणारा मानाचा कृषिसाहित्य पुरस्कार राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते व मनोहर नाईक, अन्न व औषध प्रशासन मंत्री व प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. निलय नाईक यांच्या उपस्थितीत मुंबई येथे प्रदान करण्यात आला. राजेंद्र सरकाळे यांनी कृषिविषयक विविध पुस्तकांचे लेखन केले आहे; तसेच प्रगत देशांतील तंत्रज्ञान व भारतीय शेतीसंदर्भात त्यांचे आतापर्यंत शंभर लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी सर्कलवाडी (ता.कोरेगाव) येथे आपल्या शेतात उच्च तंत्राचा अवलंब करून खडकाळ व डोंगराळ भागात फळबाग व भाजीपाला लागवड प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. सरकाळे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत उपव्यवस्थापक पदावर कार्यरत असून, बँकेच्या माध्यमातून त्यांनी सुमारे २२ देशांचा शेतीविषयक अभ्यास दौरा पूर्ण केला आहे.

घराला आग
इचलकरंजी, १९ जुलै / वार्ताहर

येथील गावभाग परिसरातील एका घराच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. या घटनेत वायरिंग व लाकडी साहित्य जळून खाक झाले. गावभागात महादेव मंदिराच्या परिसरात श्यामराव भिडे यांच्या मालकीचे दोनमजली घर आहे. सध्या या घराच्या डागडुजीचे काम सुरू आहे. या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील वायरिंगमध्ये दोष निर्माण होऊन आग लागली. तेथे असलेले अडगळीतील लाकडी साहित्य पेटून धुमसत राहिल्याने धुराचे लोट निर्माण झाले. भरवस्तीत हा प्रकार घडल्याने परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. तातडीने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. जवानांनी पाण्याचा मारा करून धुमसणारी आग विझवली. तत्पूर्वी या खोलीत असलेले गॅस सिलिंडर एका तरुणाने धाडसाने बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत लाकडी साहित्य व वायरिंग जळून खाक झाले. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

नाशिकच्या मंत्रिमंडळ बैठकीवर शिक्षण सेवकांचे हल्लाबोल आंदोलन
सोलापूर, १९ जुलै/प्रतिनिधी

शिक्षण सेवक कायदा रद्द करावा, शिक्षण सेवकांना अनट्रेंड वेतनश्रेणी देण्यात यावी, अंशदान निवृत्तिवेतन योजना रद्द करावी, शिक्षण सेवकांना दहा हजार रुपये मानधन देण्यात यावे, इ. मागण्यांसाठी नाशिक येथे २२ जुलै रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीवर महाराष्ट्र राज्य प्रश्नथमिक शिक्षण सेवक, संघटनेच्या वतीने हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे. शिक्षण सेवकांना रोजगार हमी योजनेवरील मजुरांपेक्षा कमी मानधन देण्यात येते. महागाईने उच्चांक गाठला असून, तुटपुंज्या मानधनात उदरनिर्वाह चालविणे अशक्य झाले आहे. या आर्थिक परिस्थितीला कंटाळून ठाणे येथील गणेश गीते या अप्रशिक्षित शिक्षण सेवकाने लोकलमधून उडी घेऊन आत्महत्या केली. तसेच संजय खिलारे (सांगली), मच्छिंद्र राठोड या शिक्षण सेवकांना पैशाअभावी औषधोपचार न झाल्याने प्रश्नणास मुकावे लागले. या गंभीर बाबीची शासनाने दखल न घेतल्याने २२ जुलै रोजी नाशिक येथे होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर हल्लाबोल आंदोलन करण्याचा संघटनेने निर्णय घेतल्याचे संघटनेचे अध्यक्ष धनंजय गायकवाड यांनी सांगितले.

मिरासाहेब उरुसातील डिजिटल फलक जप्त
मिरज, १९ जुलै/वार्ताहर

मिरासाहेब उरुसासाठी मिरज शहरात येणाऱ्या यात्रेकरूंवर प्रभाव पाडण्यासाठी शहरात उभारण्यात आलेले डिजिटल फलक सांगली महापालिकेच्या पथकाने शुक्रवारी जप्त केले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या फलकयुद्धाला यामुळे आळा बसला असला तरी गल्लीबोळात उभारलेले फलक मात्र अद्यापही कायम आहेत. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारा मिरजेचा मिरासाहेब उरूस शनिवारपासून झाला असून, यानिमित्ताने शहरात येणाऱ्या यात्रेकरूंची संख्या लाखाच्या घरात असते. ही पर्वणी साधून संभाव्य विधानसभा उमेदवारांनी व काही कार्यकर्त्यांनी आपली छबी असणारे डिजिटल फलक लक्ष्मी मार्केट परिसरात उभारले होते. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने कार्यालयापासून २०० मीटर परिसरात उभारलेले डिजिटल फलक जप्त केले आहेत. याशिवाय पोलीस खात्यानेही एक फलक जप्त केला आहे.

सोलापुरात अरबी मदरशाचा उद्घाटन सोहळा आज
सोलापूर, १९ जुलै/प्रतिनिधी

अक्कलकोट रस्त्यावरील मुस्लिम कब्रस्तान परिसरात सोलापूर महापालिका व तत्कालीन आमदार विश्वनाथ चाकोते यांच्या आमदार विकास निधीतून बांधलेल्या गौसिया अरबी मदरसा व जियारतगृहाचा उद्घाटन सोहळा पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या हस्ते आज (२० जुलै) रोजी होत आहे. मुस्लिम धर्मियांच्या पवित्र ‘शबे मेहराज’निमित्त काँग्रेसचे स्थानिक नेते विष्णुपंत कोठे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभास महापौर अरुणा वाकसे यांच्यासह माजी आमदार विश्वनाथ चाकोते, पालिका सभागृहनेते महेश कोठे, माजी महापौर मनोहर सपाटे, खाजादाऊद नालबंद आदी उपस्थित राहणार आहेत. सोलापूर शहर गौसिया एज्युकेशन अ‍ॅन्ड वेल्फेअर असोसिएशनने आयोजिलेल्या या कार्यक्रमाची माहिती संस्थेचे अध्यक्ष, नगरसेवक मकबूल मोहोळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितली. या निमित्ताने त्याच दिवशी सायंकाळी सात वाजता रायचूरचे सज्जादा नशीन हाजी डॉ. सय्यद ताजोद्दीन व शहर काझी सय्यद मुझफ्फर हुसेन यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी होणार असल्याचे मोहोळकर यांनी सांगितले.

ट्रकची धडक बसून दुचाकीस्वार ठार
इचलकरंजी, १९ जुलै / वार्ताहर

ट्रकची मोटरसायकलला धडक बसल्याने प्रवीण शंकर कुंभार (वय २० रा. मांजूर, ता. चिक्कोडी) हा युवक जागीच ठार झाला. हा अपघात कोल्हापूर-सांगली राज्य मार्गावरील अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील सोनी पेट्रोल पंपासमोर शुक्रवारी दुपारी दोन वाजता घडला. प्रवीण कुंभार हा बजाज बॉक्सरमध्ये पेट्रोल भरून रस्त्यावर आला. समोरून आलेल्या अज्ञात वाहनाची धडक प्रवीणला लागली. या धडकेमुळे कोल्हापूरहून सांगलीकडे जाणाऱ्या ट्रकखाली प्रवीण फेकला गेला. ट्रक अंगावरून गेल्याने तो जागीच ठार झाला. मृतदेह ट्रकखाली अडकल्याने आणि रक्ताचे थारोळे रस्त्यावर सांडल्याने अपघात पाहण्यासाठी गर्दी झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली. ट्रकचालक धनाजी महादेव मोरे (वय ४० रा. सुरूकली, ता. कागल) हा स्वत:हून हातकणंगले पोलिस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर पोलिस निरीक्षक अनिलकुमार जाधव व सहकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून बघ्यांना पांगवले.