Leading International Marathi News Daily

सोमवार, २० जुलै २००९

कचऱ्याला दर्प कोटय़वधींच्या भ्रष्टाचाराचा!
प्रसाद रावकर/सुनील नांदगावकर, मुंबई, १९ जुलै

भ्रष्टाचाराचे नवीन नवीन मार्ग शोधणाऱ्या सर्व पक्षांच्या राजकारण्यांना आणि नोकरशहांना आता मुंबईच्या प्रचंड कचऱ्यामध्येही कोटय़वधी रुपयांचा वास लागला आहे. मुंबई महापालिकेच्या हद्दीमध्ये राहणारे सुमारे दीड कोटी लोक दररोज ५५०० मेट्रिक टन एवढा कचरा निर्माण करतात. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी साडेचार हजार कोटी रुपयांचा एक महाप्रकल्प परदेशातून आणून येथे बसविण्याचा प्रयत्न करणाऱ्या नोकरशहांचा आणि संबंधित राजकारण्यांचा यात आता कित्येक कोटींचा खाजगी लाभ होणार आहे. मुंबईचे हे मूषक आणि या घुशी आता या कचऱ्याच्या ढीगांमध्ये घुसून त्यातून कोटी-कोटी रुपयांची काळी मालमत्ता नोकरशहा आणि राजकारणी उभी करत आहेत. मुंबईच्या अथांग भासणाऱ्या कचऱ्याची व घाणीची दरुगधी आता या गडगंज जमविल्या जाणाऱ्या भ्रष्टाचारी उत्पन्नातूनही येऊ लागली आहे. मुंबईचे जीवन सर्वच दृष्टीने अगोदरच पूर्णपणे असुरक्षित झाले असताना त्यातच आता या भ्रष्टाचारामुळे सर्व प्रकारांच्या व्याधींनी अधिकच ग्रस्त होऊ लागले आहे. काही तज्ज्ञांच्या मते तर मुंबईच्या कचऱ्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावली नाही तर अध्र्याहून अधिक मुंबई श्वसनविकार व अन्य आजारांना बळी पडेल.

पाकिस्तानच्या कारवाईकडे अमेरिकेचे बारीक लक्ष
हिलरी गरजल्या!
गुरगाव, १९ जुलै/पीटीआय

पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटनांचे जाळेच आहे, त्यामुळे तो देश दहशतवादाला नष्ट करण्यासाठी काय कृती करतो, याकडे अमेरिकेचे बारकाईने लक्ष आहे व मुंबई हल्ल्यातील गुन्हेगारांना शिक्षा केली जाईल अशी आमची अपेक्षा आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी आज येथे सांगितले. श्रीमती क्लिंटन उद्या पंतप्रधान मनमोहन सिंग व परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. दहशतवादाचा धोका सर्वानाच आहे. ज्यांनी दहशतवाद्यांना मोकळे रान दिले आहे त्यांनाही तो आहे, त्यामुळे सर्वानीच दहशतवादाच्या विरोधात उभे ठाकले पाहिजे असे सांगून त्या म्हणाल्या, की दहशतवादाच्या उच्चाटनासाठी पाकिस्तान काय करीत आहे, याकडे तर आमचे लक्ष आहेच, पण मुंबईत अतिशय भयानक हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा होणे आम्हाला अपेक्षित आहे, त्यांनी केलेल्या कृत्याची शिक्षा त्यांना मिळाली पाहिजे.

भाजपमध्ये चैतन्य फुंकण्यासाठी अडवाणी पुन्हा काढणार यात्रा
नवी दिल्ली १९ जुलै/पीटीआय
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभवाचा फटका बसल्यानंतर भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आणखी एक यात्रा काढण्याचे ठरविले आहे. त्यात ते देशभर फिरणार असून काही राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. अडवाणी यांनी पीटीआयला दिलेल्या खास मुलाखतीत सांगितले की, मागील यात्रांमध्ये जशा जाहीर सभा घेतल्या तशा यावेळी घेणार नाही. केवळ स्थानिक पातळीवरील पक्ष कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणे हा त्यामागचा हेतू आहे. निवडणुकीतील अशा पराभवाने कायमचे खचून जायचे नसते असा संदेश ते या कार्यकर्त्यांना देणार आहेत. यात्रेच्यावेळी पक्षाचे काही ज्येष्ठ व अनुभवी नेते त्यांच्यासमवेत असतील व तेही कार्यकर्त्यांशी खलबते करतील.

राणे यांच्या पाठोपाठ भुजबळांवर पॅकेजची ‘कृपादृष्टी’!
संतोष प्रधान, मुंबई, १९ जुलै
उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यामुळे कोकणासाठी सुमारे पाच हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आल्यानंतर आता येत्या बुधवारी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या आग्रहावरून खान्देशकरिता चार ते पाच हजार कोटींच्या पॅकेजची भेट दिली जाणार आहे. आधीच आर्थिक आघाडीवर बोंब असताना तसेच सुमारे सात हजार कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प सादर झाल्यावरही ज्येष्ठ मंत्र्यांचा पॅकेजेस्चा हट्ट पुरविताना मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची गोची झाली आहे.

आर्थिक आघाडीवर बोंब आणि मुख्यमंत्र्यांची गोची
राणे यांच्या पाठोपाठ भुजबळांवर पॅकेजची ‘कृपादृष्टी’!
संतोष प्रधान, मुंबई, १९ जुलै
उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यामुळे कोकणासाठी सुमारे पाच हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आल्यानंतर आता येत्या बुधवारी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या आग्रहावरून खान्देशकरिता चार ते पाच हजार कोटींच्या पॅकेजची भेट दिली जाणार आहे. आधीच आर्थिक आघाडीवर बोंब असताना तसेच सुमारे सात हजार कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प सादर झाल्यावरही ज्येष्ठ मंत्र्यांचा पॅकेजेस्चा हट्ट पुरविताना मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची गोची झाली आहे.

रीटा बहुगुणा यांची दिलगिरी
नवी दिल्ली, १९ जुलै/ पीटीआय

आपल्याला कोणा वैयक्तिक वा जातीविषयक भावना दुखविण्याचा हेतू नव्हता, असे सांगून आपल्या वक्तव्याबाबत उत्तर प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा रीटा बहुगुणा-जोशी यांनी केवळ दिलगिरी व्यक्त केली. मात्र आपल्या घरावर झालेला हल्ला, जाळपोळ या घटनांना राज्य सरकारच्या पाठिंब्यानेच होत्या. त्याबाबत राज्याच्या गुन्हा अन्वेषण विभागामार्फत आपल्याला चौकशी नको तर केंद्रीय अन्वेषण विभागाची चौकशी हवी, अशी मागणीही बहुगुणा-जोशी यांनी केली.

वीज कर्मचाऱ्यांचा संप बारगळणार?
मुंबई, १९ जुलै / प्रतिनिधी

राज्य वीज मंडळातील अधिकारी, अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ आणि विविध भत्त्यांच्या मागणीसाठी २१ जुलैपासून संपाची नोटीस दिली असली तरी वीज कंपन्या आपला वेतनवाढीचा प्रस्ताव उद्या राज्य विद्युत नियामक आयोगापुढे (एमईआरसी) याचिकेच्या स्वरूपात सादर करणार आहेत. हा प्रस्ताव आयोगाने दाखल करून घेतल्यास कर्मचारी संघटनांना संपही पुकारता येणार नसल्याने नियोजित संप बारगळण्याची लक्षणे दिसत आहेत. सद्यस्थितीत वीज कंपन्या एकतर्फी निर्णय घेण्याची शक्यता निर्माण झाली असून आपला १८ टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी आयोगाला सादर करणार आहे. हा प्रस्ताव दाखल झाल्यास आयोगाला प्रस्तावाची तांत्रिक पडताळणी, जाहीर सुनावणी ही सारी प्रक्रिया पार पडणे क्रमप्राप्त ठरणार आहे. त्यातच काही वाद निर्माण झाल्यास वेतनवाढ अपिलेट ट्रायब्युनल, उच्च न्यायालय अशा न्यायालयीन प्रक्रियेत अडकण्याची शक्यता असल्याने वेतनवाढ कर्मचाऱ्यांच्या पदरात प्रत्यक्षात कधी पडेल याबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे.

केरळ-ओरिसात पावसाचे २१ बळी
नवी दिल्ली, १९ जुलै/पी.टी.आय.

ओरिसा आणि केरळ या राज्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला असून या राज्यांमध्ये पुरामुळे आज २१ जण ठार झाले . दरम्यान, उत्तर भारतामधील काही भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. पुरामुळे ओरिसामध्ये १३ आणि केरळमध्ये ८ जणांचा मृत्यू झाला असून येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या दोन्ही राज्यांमध्ये पिकांचेही नुकसान झाले आहे. केरळमध्ये पुरामुळे विस्थापित झालेल्या २४ हजार नागरिकांना मदत छावणीमध्ये ठेवण्यात आले आहे. ओरिसामधील प्रमुख नद्यांना पूर आला आहे. नद्यांचे पाणी शहरांमध्ये शिरल्यामुळे अनेक भागाचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. ८ जणांच्या मृत्युमुळे गेल्या आठवडय़ापासून ओरिसामध्ये पुरातील बळींची संख्या ३६ झाली आहे.

 

प्रत्येक शुक्रवारी