Leading International Marathi News Daily

सोमवार, २० जुलै २००९

प्रदूषणाविरुद्ध उद्रेक
परळी औष्णिक वीज केंद्राचे पंपहाऊस बंद पाडले
सुरक्षारक्षकांना मारहाण करून वडगाव दादाहरी गावात कोंडले
केंद्राची जीप जाळली
धनंजय मुंडे यांची मध्यस्थी
परळी वैजनाथ, १९ जुलै/वार्ताहर

औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेपासून होणाऱ्या प्रदूषणाचा बंदोबस्त होत नसल्याने दादाहरी वडगावच्या संतप्त गावकऱ्यांनी वीजकेंद्राला पाणीपुरवठा करणारे पंपहाऊस आज बंद पाडले. हस्तक्षेप करणाऱ्या सुरक्षाधिकारी व सुरक्षारक्षक यांना जबर मारहाण करून तिघांना गावात डांबून ठेवले. गावकऱ्यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांची जीपही जाळली. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ज्येष्ठ समीक्षक डॉ. रसाळ यांना मसापचा जीवनगौरव पुरस्कार
औरंगाबाद, १९ जुलै/खास प्रतिनिधी

साहित्य, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पुरस्काराचे पहिले मानकरी ज्येष्ठ समीक्षक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख डॉ. सुधीर रसाळ ठरले आहेत. या पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ असे आहे. परिषदेचे अध्यक्ष प्रश्नचार्य कौतिकराव ठाले यांनी आज हा निर्णय जाहीर केला.

आमदार दानवे यांच्या विरोधात ‘राष्ट्रवादी’मध्ये बंडाचे निशाण!
जालना, १९ जुलै/वार्ताहर

भोकरदन येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चंद्रकांत दानवे यांच्याविरुद्धचा पक्षातंर्गत संघर्ष आता पक्षश्रेष्ठांपर्यंत पोहोचला आहे. या मतदारसंघातील भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यांतील पक्षाच्या बहुतेक महत्त्वाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांची बैठक भोकरदनच्या विश्रामगृहात झाली होती. त्या वेळी आमदार दानवे यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी झाल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील या असंतुष्टांनी मुंबई गाठून दानवे यांच्याविरुद्ध तक्रारींचा पाढा पक्षश्रेष्ठांसमोर वाचला.

राजकारण्यांचे मौनं सर्वार्थ साधनम्!
दत्ता सांगळे, औरंगाबाद, १९ जुलै

गॅसच्या टाकीसाठी मतदार ओळखपत्र सक्तीच्या करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयावर आतापर्यंत राजकीय पक्षांनी मौन बाळगले आहे. मोठय़ा प्रमाणावर मतदार नोंदणी व्हावी यावरच राजकीय पक्षांनी भर दिला असून त्याबदल्यात मतदारांना वेठीस धरले जात असल्याबद्दल त्यांना सोयरसुतक नसल्याचे समोर आले आहे. निवडणुका समोर आल्या असताना सामान्यांशी निगडीत एखादा मुद्दा समोर आल्यास सर्वच राजकीय पक्ष ‘संधीचे सोने’ करण्यासाठी पुढे सरसावतात.

देशमुख-मुंडे यांची न रंगलेली जुगलबंदी
बीड, १९ जुलै/वार्ताहर

‘‘खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या विजयात सर्वाचाच ‘हात’ असल्याने हा एकटय़ाचा विजय नाही. त्यामुळे त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्या ‘भाषणा’ने पूर्ण करा,’’ असा चिमटा काढीत केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांनी परळी-नगर रेल्वेमार्गासाठी पुढील अंदाजपत्रकात भरीव तरतूद करू, अशी ग्वाही आज दिली. ‘‘माझ्या विजयामागे ‘हात’ नसून जनतेची ‘साथ’ होती. तीच पाच वर्षात रेल्वे आणणार,’’ असा प्रतिटोला खासदार गोपीनाथ मुंडे यांनी लगावला. दोन्ही नेत्यांनी परस्परांना नेहमीप्रमाणे चिमटे काढले. मात्र देशमुख यांच्या ‘घाई’मुळे राजकीय जुगलबंदी ऐकायला आलेल्या श्रोत्यांचा हिरमोड झाला.

---------------------------------------------------------------------------

केदार शिंदे आणतोय ‘प्रश्नॅडक्शन नंबर वन’
आगामी

नायक, चित्रपट नि मालिका या तीनही माध्यमांत प्रभावीपणे मुलूखगिरी करुन प्रेक्षकांना रुचतील, भावतील अशा सही कलाकृती करून ‘अगं बाई अरेच्चा’ हा तर आपल्याच मनातील भावना कोणत्याही प्रकारचा लोचा न करता सहीपणे मांडतोय असे वाचायला लावणारा एकमेव दिग्दर्शक म्हणजे केदार शिंदे.. आतापर्यंत केदार शिंदेनी वेगळ्या वाटेवरील, वेगळ्या विषयावरील, तरीही आपली बोली, आपला बाणा व्यक्त करणाऱ्या कलाकृती सादर केल्या आहेत. मग ती कलाकृती मालिका असो वा चित्रपट अथवा नाटक, ते केदार शिंदेचा आहे म्हटले की प्रेक्षक आवर्जून ते बघायला उपस्थित राहतो.

प्रेरणास्रोत
‘अब के सावन ऐसे बरसे’,‘ रूबरू’, ‘रंग दे बसंती’, ‘खोलो खोलो’ आणि आता ‘मसाकली’.. प्रसून जोशी यांनी लिहिलेली बहुतेक गाणी ऐकताना श्रोत्यांमध्ये ऊर्जेचा संचार झालेला असतो. गाझियाबादसारख्या लहान शहरातून मॅकेन एरिक्सन या जाहिरात कंपनीच्या आशिया-पॅसिफिक विभागाच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचलेल्या प्रसून जोशी यांच्याशी मारलेल्या या मनमोकळ्या गप्पा. ‘मसाकली मटाकली’ या शब्दांना काही अर्थ आहे का, त्यांचे उगमस्थान काय, ते कुठे बोलले जातात? हे प्रश्न बहुतेकांना असतात.

‘धावाधाव’ प्रदर्शनासाठी सज्ज
एक दर्जेदार मनोरंजक चित्रकृती निर्माण करण्याच्या ध्यासाने रोहिणी फिल्म्स बॅनरखाली निर्माता नारायण भांडारकर धावाधाव हा एक धमाल कॉमेडी चित्रपट घेऊन येत आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरलेला लोकप्रिय अभिनेता भरत जाधव, शशांक उदापूरकरच्या जोडीने या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. भरत गायकवाड यांचे दिग्दर्शन असलेल्या धावाधाव चित्रपटाचे चित्रिकरण नुकतेच नागपूर आणि रामटेक परिसरात पूर्ण झाले आहे.

शोध ‘लिट्ल अ‍ॅडमेकर्स’चा प्रश्नैढ प्रेक्षकांना जाहिराती
हा टीव्हीवरील कार्यक्रमात आलेला व्यत्यय वाटत असला तरी बच्चेकंपनीला मात्र या जाहिराती भारी आवडतात. अनेक लहान मुले टीव्हीवरील जाहिराती पाहण्यात रमलेल्या दिसतात. अनेकांना तर या जाहिरातींमधील गाणी, संवाद तोंडपाठ असतात. केवळ जाहिराती पाहण्यावर समाधान न मानता या मुलांच्या मनातील कल्पना जाहिरातींच्या रुपाने बाहेर याव्यात याच हेतूने गेल्या वर्षी आईसप्लेक्स अ‍ॅडफिल्म अ‍ॅवॉर्डची (आयएएफए) सुरुवात करण्यात आली. या अंतर्गत आईसप्लेक्स टीव्ही, स्पेसटून वाहिनी आणि रायन इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ११ ते १९ या वयोगाटातील मुलांसाठी जाहिरात निर्मितीची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
---------------------------------------------------------------------------

नळदुर्गच्या सहायक पोलीस निरीक्षकाच्या पत्नीची आत्महत्या
नळदुर्ग, १९ जुलै/वार्ताहर

आशा जगन्नाथ कळसकर (वय ४०) यांनी आज सकाळी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्या त्या पत्नी होत. शहरातील ‘हॉटेल अंकुर’जवळ कळसकर राहतात. त्यांची मुले व पत्नी शिक्षणासाठी उस्मानाबाद येथे राहत होती. आज सुट्टी असल्याने त्यांच्या आशा मुलांसह नळदुर्ग येथे आल्या होत्या. श्री. कळसकर सकाळी अल्पोपाहाराकरिता मुलांसमवेत घराबाहेर पडल्याने घरी त्या एकटय़ाच होत्या. त्यांनी घरातील पंख्यास दोरखंड बांधून आत्महत्या केली. पोलीस शिपाई मुलांना घेऊन घरी आल्यानंतर त्यास ही घटना दिसली. कळसकर दांपत्य मूळचे नगर जिल्ह्य़ातील कर्जतचे आहे. आशा यांच्या आत्महत्येचे कारण समजले नाही. माहिती समजताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, उपविभागीय पोलीस अधिकारी ठोंगे, उपनिरीक्षक राजेंद्र मोरे, सहायक निरीक्षक हनपुडे आदींनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली. रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. आशा यांच्यावर कर्जत येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

औषधचोरास अटक
नांदेड, १९ जुलै/वार्ताहर

केरळातून महागडी औषधे चोरून त्याची वेगवेगळ्या भागांत विक्री करणाऱ्या एक टोळी उघडकीस आणण्यात नांदेड पोलिसांना यश आले. टोळीचा मुख्य सूत्रधार सतीश शर्मा याला आज पोलिसांनी ताब्यात घेतले. केरळ पोलिसांच्या साहाय्याने झालेल्या या कारवाईने खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी सांगितले की, नांदेडमध्ये राहणारा वैद्यकीय प्रतिनिधी सतीश शर्मा साथीदारांच्या मदतीने केरळमधील तिरुवेला, तिरुवेलम, कोलायम, कोलम या जिल्ह्य़ांतल्या वेगवेगळ्या औषध दुकानांतून महागडी औषधे चोरत असे. चोरलेली औषधे बेंगलोर तसेच महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत विकत असते. शर्माविरुद्ध केरळमधील चार वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत यापूर्वीच गुन्हे दाखल आहेत. नांदेडमध्ये वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेल्या शर्माच्या शोधासाठी केरळचे पोलीस पथक काल रात्री दाखल झाले. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सत्यनारायण चौधरी यांची भेट घेऊन मदत मागितली. श्री. चौधरी यांनी शर्माच्या शोधासाठी पोलीस उपअधीक्षक लक्ष्मीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक पथक स्थापन केले. या पथकाने शर्माला विसावानगर परिसरात ताब्यात धेतले. त्याच्याकडून २६ हजार रुपयांची औषधे जप्त करण्यात आली.

सवना येथे गॅस्ट्रोचे पंधरा रुग्ण
नांदेड, १९ जुलै/वार्ताहर

हिमायतनगर तालुक्यातल्या सवना येथे दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची लागण झाली असून सध्या प्रश्नथमिक आरोग्य केंद्रात १५ जणांवर उपचार सुरू आहेत. सवना येथे पाणीपुरवठा करणारी वाहिनी फुटल्याने दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे गावात सध्या गॅस्ट्रोची साथ पसरली आहे. सुमारे १५ जण प्रश्नथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत असले तरी अनेक जण खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले. वैद्यकीय अधिकारी एस. डी. सुकळीकर यांनी या गावाला भेट देऊन साथ प्रतिबंधक उपाययोजनांबद्दल ग्रामसेवकांना लेखी सूचना केल्या आहेत. पाण्याचे निर्जंतुकीकरण तसेच पाईपलाईनची दुरुस्ती त्वरित करण्यात यावी, अशी सूचना त्यांनी केली असली तरी अद्यापि संबंधितांनी कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या नाहीत. गेल्या तीन दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

पंचायत समिती महिला सदस्यासह चौघांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा
चाकूर, १९ जुलै/वार्ताहर

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याच्या आरोपावरून पंचायत समितीच्या महिला सदस्यासह चौघांवरुद्ध चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाही आरोपीस आजपर्यंत अटक झालेली नाही. पंचायत समितीच्या सदस्य संजीवनी भालेराव, देवानंद केशव महालिंगे, केशव गोविंद महालिंगे, सुमन केशव महालिंगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे तपास करीत आहेत. पोलिसांनी सांगितले की, एक तरुण या मुलीच्या घरी जाऊन तिची छेडछाड काढत होता. याची माहिती मुलीने घरी सांगितली. यावरून आई-वडील जाब विचारण्यासाठी गेले असता ‘आम्ही तुझ्या पोरीला पळवून नेऊन लग्न लावल्यास काय करणार, असे म्हणून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर संगनमत करून त्या मुलीला पळवून नेण्यात आले.

अध्यक्षपदी मंदा देशमुख
अंबाजोगाई, १९ जुलै/वार्ताहर

मराठवाडा साहित्य परिषदेच्या अंबाजोगाई शाखेच्या अध्यक्षपदी मंदा देशमुख आणि सचिवपदी दगडू लोमटे यांची एकमताने निवड करण्यात आली. साहित्य परिषदेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य डॉ. भास्कर बडे निर्वाचन अधिकारी म्हणून उपस्थित होते. मावळते अध्यक्ष प्रश्न. मधुकर इंगोले यांनी नव्या कार्यकारिणीचा प्रस्ताव ठेवला. नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : अध्यक्ष - मंदा देशमुख, उपाध्यक्ष - बलभीम तरकसे, सचिव - दगडू लोमटे, कोषाध्यक्ष - प्रश्न. डॉ. अलका सरोदे, सदस्य - प्रश्नचार्य भारत हंडीबाग, दिनकर जोशी, प्रश्न. मुकुंद राजपंखे, प्रश्न. वैशाली कुलकर्णी, रणजीत डांगे, कायम निमंत्रित तथा मार्गदर्शक - प्रश्न. मधुकर इंगोले, अमर हबीब, डॉ. श्रीहरी नागरगोजे, प्रश्न. रंगनाथ तिवारी. साहित्य मैफलीत रसिकांनी त्यांना आवडलेल्या कविता सादर केल्या. प्रश्न. वैशाली कुलकर्णी यांनी ‘मधु मागशी माझ्या’ ही भा. रा. तांबे यांची, अमर हबीब यांनी सर्वेश्वर दयाल सक्सेना यांची ‘तुम मेरे कौन हो?’ ही हिंदी कविता, छोटय़ा पडद्यावरील कलाकार बलवंत देशपांडे यांनी कात्याययन यांच्या दोन हिंदी कविता सादर केल्या. सुतार यांनी ना. धों. महानोर यांची बदलत्या ग्रामीण जीवनावरील मुक्तछंदातील कविता म्हटली.

५० हजारासांठी विवाहितेला अ‍ॅसिड पाजले
औरंगाबाद, १९ जुलै/प्रतिनिधी

विवाहितने माहेराहून ५० हजार रुपये आणण्यास नकार दिल्याने तिला अ‍ॅसिड पाजून जिवंत मारण्याचा प्रयत्न केला. राधा गोकुळ सुरभैय्ये (वय २१, रा. मिलिंदनगर, उस्मानपुरा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एप्रिल २००८ मध्ये त्यांचे लग्न गोकूळ सुरभैय्ये यांच्याशी झाले होते. दुकान टाकण्यासाठी तिने माहेराहून ५० हजार रुपये आणावेत अशी सुरभैय्ये कुटुंबीयांची मागणी होती. ही मागणी पूर्ण करत नसल्यामुळे राधा यांचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात येत होता. अनेक वेळा त्यांना मारहाण, शिवीगाळ करण्यात आली. वेळोवेळी जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. तरीही मागणी पूर्ण न झाल्यामुळे १५ जानेवारीला त्यांना फरशी पुसण्याचे अ‍ॅसिड पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर राधा यांनी उस्मानपुरा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली असून गोकूळसह गेंदाबाई सुरभैय्ये, कन्हैयालाल सुरभैय्ये यांच्याविरुद्ध गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली आहे.

‘इनरव्हील’च्या अध्यक्षपदी प्रमिला तोडकरी
औरंगाबाद, १९ जुलै/प्रतिनिधी

इनरव्हील क्लब औरंगाबादची नवीन कार्यकारिणी नुकतीच घोषित करण्यात आली असून अध्यक्षपदी प्रमिला तोडकरी यांची तर सचिवपदी वसुंधरा पाटील यांची निवड करण्यात आली आहे. जिमखाना क्लब येथे झालेल्या समारंभात महापौर विजया रहाटकर, ३१३ डिस्ट्रीक चेअरमन ज्योती राव यांच्या उपस्थितीत पदग्रहण केले. क्बलच्या उपाध्यक्षपदी रेखा हिप्पळगावकर, कोषाध्यक्षपदी चंदा घोंगडे यांची निवड करण्यात आली असून कार्यकारिणीवर वृषाली उपाध्ये, अलका मेहता, अंजली पांडे, प्रतिभा धामणे, सुनिता वाजपेयी, उषा धामणे यांचा समावेश आहे. श्रीमती रहाटकर यांच्या हस्ते श्रीमती तोडकरी यांचा सत्कार करण्यात आला.

सेवानिवृत्ती म्हणजे नव्या जीवनाची संधी - डॉ. कोत्तापल्ले
औरंगाबाद -
मनुष्य आयुष्यभर आपल्या क्षेत्रात कार्यरत असतो. त्यामुळे नोकरीतून सेवानिवृत्त होणे म्हणजेही नव्या जीवनाची संधी असते, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सेवानिवृत्त झालेल्या प्रश्नध्यापक, अधिकारी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवागौरव समारंभात ते बोलत होते. यावेळी कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे, बीसीयूडीचे संचालक डॉ. ए. जी. खान यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, एखादा कर्मचारी सेवानिवृत्त झाला म्हणजे त्याचा विद्यापीठाशी संबंध संपला, असे नाही. त्यांच्या अनुभवाचा फायदा वेळोवेळी विद्यापीठाला होतो. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना भावी आयुष्य सुखासमृद्धीचे जावो, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या. १९ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाधिकारी व्ही. जी. लिमगावे यांनी सूत्रसंचालन केले.

जिद्दीने अभ्यास करून लौकिक मिळवा - कीर्तने
लातूर -
डॉ. बाबासाहेबांनी १८-१८ तास अभ्यास करून जगात लौकिक मिळविला. त्याच जिद्दीने, तळमळीने अभ्यास करून ज्ञानी व्हावे, असे आवाहन माजी शिक्षण विस्तार अधिकारी बी. एन. कीर्तने यांनी केले. संत ज्ञानेश्वरनगर, प्रगतीनगर येथील बौद्ध बांधवांच्या वतीने प्रश्न. इंदवे यांच्या निवासस्थानी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बी. के. लोखंडे होते. मागे राहू नका श्री. कीर्तने पुढे म्हणाले, चांगले काम करण्यासाठी लाजू नका. धाडसाने पुढे या, शिका, संघर्ष करा ही बाबासा-हेबांनी दिलेली हाक कृतीत आणा. तंत्रज्ञान युगात संधीचे दालन खुले झाले आहे त्यात तुम्ही मागे राहू नका. संघर्षमय जीवनाला धाडसाने सामोरे जा, असा सल्ला त्यांनी दिला. सूत्रसंच-ालन तानाजी माटे यांनी केले. आभार प्रश्न. विलास इंदवे यांनी मानले.

मराठवाडा शिक्षक संघाच्या लोहा तालुकाध्यक्षपदी भुजबळ
लोहा, १९ जुलै/वार्ताहर

मराठवाडा शिक्षक संघाच्या तालुकाध्यक्षपदी ज्येष्ठ शिक्षक नेते रंगनाथ भुजबळ यांची व कार्याध्यक्षपदी दामोदर वडजे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मराठवाडा शिक्षक संघाचे विभागीय उपाध्यक्ष आनंद भंडारे व जिल्हा सचिव सूर्यकांत विश्वासराव यांच्या उपस्थितीत कै. विश्वनाथराव नलगे विद्यालयात बैठक झाली. त्यात नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अन्य पदाधिकारी असे : उपाध्यक्ष - एस. जी. लुंगारे, कोषाध्यक्ष - गोविंद ताटे, सचिव - हृषीकेश जोगदंड, सदस्य - ए. पी. सुगावकर, दिलीप पवार, विष्णू शिंदे, संजय फाजगे, एस. टी. मोरे, एस. के. शिनगारे, संपर्कप्रमुख - बी. डी. जाधव व प्रसिद्धीप्रमुख - वा. पू. गायखर. या बैठकीस अनिल हामदे, रवी चव्हाण, अनंत चव्हाण, माळवदकर, मधुकर वानखेडे, डी. डी. हाटकर उपस्थित होते.

अखेर वादग्रस्त रस्त्याची ‘वाट’ मोकळी
गंगाखेड, १९ जुलै/वार्ताहर

शहरातील बसस्थानक ते दिलकश चौक या मुख्य रस्त्याचे नगरपालिकेने हाती घेतलेले मजबुतीकरणाचे काम तक्रारीमुळे बंद पडले होते. गत सहा महिन्यांपासून नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी माजी नगराध्यक्ष डॉ. मधुसुदन केंद्रे यांनी एका शिष्टमंडळाद्वारे परभणीचे जिल्हाधिकारी मोहन ठोंबरे यांना भेटून नागरिकांच्या व्यथा सांगीत याप्रकरणी मार्ग काढल्याने अखेर या वादग्रस्त रस्त्याची ‘वाट’ मोकळी झाल्याने नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे. सहा महिन्यांपूर्वी नगरपालिकेने बसस्थानक ते दिलकश चौक रस्ता मजबुतीकरणाचे काम हाती घेतले होते. मात्र रिपाइं (गवई गट)ने या रस्त्याच्या बांधकामात सुधारणा करीत रस्त्याच्या दोन्ही बाजूने नाली बांधकाम करावे या मागणीसाठी रस्त्याचे काम थांबविले होते. या विवादातून दोन समाजात तेढ निर्माण होण्याचीही परिस्थिती निर्माण झाल्याने पालिकेने काम थांबविण्याची भूमिका घेतली.
तद्वतच सध्या पावसाळ्याच्या दिवसात संभाव्य अडचण तसेच नागरिकांच्या हालअपेष्टा लक्षात घेऊन माजी नगराध्यक्ष डॉ. केंद्रे यांनी नगरसेवकांच्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत परिस्थिती कानावर घातली. त्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ रस्त्याचे काम सुरू करण्यास संमती दिली व गत सहा महिन्यांपासून नागरिकांची होत असलेली कुचंबना आज परिस्थितीत सुटताना दिसत आहे.

बसप अध्यक्ष शेख समद विरुद्ध गुन्हा दाखल
भोकरदन, १९ जुलै/वार्ताहर

येथील वैद्यकीय अधिकारी के. ए. पळशीकर यांना शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून बहुजन समाज पक्षाचे भोकरदन विधानसभा क्षेत्र अध्यक्ष शेख समद यांच्याविरुद्ध भोकरदन पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला. संबंधित अधिकाऱ्याचे काही एक म्हणणे नसून तसे माझ्याजवळ लेखी असल्याचा दावा शेख समद यांनी केला आहे. शेख समद हे आज सकाळी ८.२० वाजता त्यांचा पुतण्या शेख जलील यास साप चावल्याने त्यास घेऊन सुरंगळी येथून येथील ग्रामीण रुग्णालयात आले. त्यांनी पळशीकर यांना फोन करून बोलावून घेतले. ते दहा मिनिटांत हजर झाले. परंतु समद यांनी तू मुद्दामहून उशिरा आलास त्यामुळेच आमचा रुग्ण दगावला असे म्हणत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केला, अशी फिर्याद पळशीकर यांनी पोलिसात दिल्याने शेख समद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तक्रार दिलेली नसतानाही हेतूपुरस्सर हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोप शेख समद यांनी केला असून माझी काही एक तक्रार नसल्याचे त्यांनी लेखी दिल्याचा दावाही केला आहे.

सहकार क्षेत्राच्या सभेला सभासदाची पाठ
सोयगाव, १९ जुलै/वार्ताहर

राज्यातील सहकार अंतर्गत सर्व सहकारी संस्थेला १४ ऑगस्टपूर्वी वार्षिक सभा घ्यावयाचे आदेश असल्याने सध्या वार्षिक सभेची लगीन-घाई सुरू आहे. मात्र सभासदांच्या कमी उपस्थितीमुळे सभेची रंगत कमी झाली. राज्यात सहकारअंतर्गत कारखाने, बँका, पतसंस्था, मजूरसंस्था, जीनिंग प्रेसिंगसह शेकडो सहकारी संस्था उच्च शिखरावर आहेत. तर अनेक ठिकाणी सहकाराची शोकांतिका झाली आहे. दरवर्षी जुलै, ऑगस्टमध्ये या संस्थेची वार्षिक सभा घेण्याचे कडक आदेश सहकार खात्यातर्फे देण्यात येतात. त्याप्रमाणे या सभेला सर्व सभासदाला आमंत्रित केले जाते. या सभेत संस्थेची ताजी आर्थिक स्थिती, कर्जवाटप, वसुली, नफा खर्चाची मंजुरी नियम दुरुस्ती आदी महत्त्वाच्या निर्णयाची संमती सभासदाकडून घेतली जाते. मात्र ग्रामसभेप्रमाणे सहकारी संस्थेच्या या वार्षिक सभेला सभासदांनी पाठ फिरविली आहे.