Leading International Marathi News Daily

सोमवार, २० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)कचऱ्याला दर्प कोटय़वधींच्या भ्रष्टाचाराचा!
प्रसाद रावकर/सुनील नांदगावकर , मुंबई, १९ जुलै

भ्रष्टाचाराचे नवीन नवीन मार्ग शोधणाऱ्या सर्व पक्षांच्या राजकारण्यांना आणि नोकरशहांना आता

 

मुंबईच्या प्रचंड कचऱ्यामध्येही कोटय़वधी रुपयांचा वास लागला आहे. मुंबई महापालिकेच्या हद्दीमध्ये राहणारे सुमारे दीड कोटी लोक दररोज ५५०० मेट्रिक टन एवढा कचरा निर्माण करतात. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी साडेचार हजार कोटी रुपयांचा एक महाप्रकल्प परदेशातून आणून येथे बसविण्याचा प्रयत्न करणाऱ्या नोकरशहांचा आणि संबंधित राजकारण्यांचा यात आता कित्येक कोटींचा खाजगी लाभ होणार आहे. मुंबईचे हे मूषक आणि या घुशी आता या कचऱ्याच्या ढीगांमध्ये घुसून त्यातून कोटी-कोटी रुपयांची काळी मालमत्ता नोकरशहा आणि राजकारणी उभी करत आहेत. मुंबईच्या अथांग भासणाऱ्या कचऱ्याची व घाणीची दरुगधी आता या गडगंज जमविल्या जाणाऱ्या भ्रष्टाचारी उत्पन्नातूनही येऊ लागली आहे. मुंबईचे जीवन सर्वच दृष्टीने अगोदरच पूर्णपणे असुरक्षित झाले असताना त्यातच आता या भ्रष्टाचारामुळे सर्व प्रकारांच्या व्याधींनी अधिकच ग्रस्त होऊ लागले आहे. काही तज्ज्ञांच्या मते तर मुंबईच्या कचऱ्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावली नाही तर अध्र्याहून अधिक मुंबई श्वसनविकार व अन्य आजारांना बळी पडेल. हा कचरा वाहून नेण्याची जी कंत्राटे दिली जातात, त्या कंत्राटांमध्येही कोटय़वधी रुपयांचा भ्रष्टाचार असून त्यात कर्मचारी व अधिकारी सामील असल्याचे बोलले जाते.
देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सुमारे साडेचार हजार कोटी रुपयांच्या लॅण्डफिल बायोगॅस प्रकल्पाचा प्रस्ताव घाईघाईने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीपुढे सोमवारी मांडण्यात येणार आहे. विदेशी महागडय़ा तंत्रज्ञानाचा वापर करून राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पाबद्दल आणि त्यावरील अवाढव्य खर्चाबाबत पालिका वर्तुळात तसेच जनसामान्यांमध्ये शंका व्यक्त करण्यात येत आहेत. न्यायालयासमोर सुनावणी होणार असल्याने सदर प्रकल्पाबाबत पालिकेकडून घाई केली जात आहे. मुख्यत: मुंबईतील कचऱ्याचे प्रमाण कमी व्हावे यासाठी पालिकेकडून कोणतेच प्रयत्न करण्यात येत नसून तो कसा वाढेल आणि आपापल्या हितसंबंधांची कंत्राटे भविष्यात कशी सुरू राहतील यातच संबंधितांना अधिक रस असल्याची जोरदार चर्चा मुंबईकरांमध्ये सुरू आहे. दरम्यान, देवनार डम्पिंग ग्राऊंडमधील कचऱ्यामुळे या परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यातच आहे. एकंदर परिस्थितीवरून देवनार डम्पिंग ग्राऊंडमधील कचऱ्याला आता भ्रष्टाचाराचाही गंध सुटला आहे. करदात्यांच्या पैशाचा गैरवापर करून महागडा प्रकल्प लादण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
पालिकेतील काही हितसंबंधितांकडून या विचाराला हरताळ फासण्यात आला आहे. सध्या देवनार डम्पिंग ग्राऊंडमध्ये कचरा टाकण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर डम्परचा वापर केला जातो. पालिकेतील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचेच डम्पर्स डम्पिंग ग्राऊंडमध्ये कचरा वाहून नेण्याचे काम करीत आहेत. जर वॉर्डनिहाय कचऱ्याची साठवणूक करून त्यापासून खतनिर्मिती करण्यात आली तर अनेकांचे डम्पर जागेवरच उभे राहतील आणि त्यांचे नुकसान होईल. तसे होऊ नये याकरिता पालिकेतील एक गट कार्यशील झाला आहे. या गटाला शह देण्यासाठी आता जनतेनेच एकत्र यायला हवे.
सन २००० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कचऱ्याचे वर्गीकरण करावे, कोरडा कचरा डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जाऊ नये असे स्पष्ट निर्देश दिले होते. तसेच २००६ साली महाराष्ट्र शासनानेही अशाच प्रकारचे आदेश पालिका प्रशासनाला दिले होते. कचऱ्याचे वर्गीकरण ही अतिशय महत्त्वाची बाब असूनही त्याकडे पालिकेने सातत्याने दुर्लक्ष करून न्यायालय, महाराष्ट्र शासन यांनी दिलेल्या आदेशांचे उल्लंघनच केले आहे. अ‍ॅडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंटअंतर्गत मुंबईतील अनेक सोसायटय़ांमध्ये छोटय़ा स्तरावर कचऱ्याची विल्हेवाट योग्य तऱ्हेने लावण्याचे यशस्वी उपक्रम सुरू आहेत, भाभा अणुसंशोधन केंद्राने विकसित केलेला प्रकल्पही उत्कृष्ट आहे. म्हणजे मुंबई महानगरांतील सगळ्या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे यशस्वी प्रयोग सुरू असूनही पालिकेतील काही अधिकारी मात्र या स्वस्त प्रकल्पांचा विचार न करता अनेक नियमांचे उल्लंघन करून केवळ महागडा विदेशी तंत्रज्ञानाचा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत यावरून भ्रष्टाचाराची मुळे कुठवर पोहोचली असावीत हे सहज स्पष्ट होते. मुंबईतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी १९२७ मध्ये देवनार डम्पिंग ग्राऊंड सुरू करण्यात आले. १२७ हेक्टर जागेत विस्तारलेले देवनार डम्पिंग ग्राऊंड आशियातील सर्वात मोठे डम्पिंग ग्राऊंड म्हणून ओळखले जाते. सध्या तर या डम्पिंग ग्राऊंडवर ५०-६० कचऱ्याचे डोंगर उभे राहिले आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाच्या विकारांनी ग्रासले आहे. देवनार डम्पिंग ग्राऊंडमधील कचऱ्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्यात येत नसल्यामुळे पर्यावरणाची भीषण समस्या निर्माण झाली आहे.