Leading International Marathi News Daily

सोमवार, २० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

पाकिस्तानच्या कारवाईकडे अमेरिकेचे बारीक लक्ष
हिलरी गरजल्या!
गुरगाव, १९ जुलै/पीटीआय
पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटनांचे जाळेच आहे, त्यामुळे तो देश दहशतवादाला नष्ट

 

करण्यासाठी काय कृती करतो, याकडे अमेरिकेचे बारकाईने लक्ष आहे व मुंबई हल्ल्यातील गुन्हेगारांना शिक्षा केली जाईल अशी आमची अपेक्षा आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी आज येथे सांगितले. श्रीमती क्लिंटन उद्या पंतप्रधान मनमोहन सिंग व परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.
दहशतवादाचा धोका सर्वानाच आहे. ज्यांनी दहशतवाद्यांना मोकळे रान दिले आहे त्यांनाही तो आहे, त्यामुळे सर्वानीच दहशतवादाच्या विरोधात उभे ठाकले पाहिजे असे सांगून त्या म्हणाल्या, की दहशतवादाच्या उच्चाटनासाठी पाकिस्तान काय करीत आहे, याकडे तर आमचे लक्ष आहेच, पण मुंबईत अतिशय भयानक हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा होणे आम्हाला अपेक्षित आहे, त्यांनी केलेल्या कृत्याची शिक्षा त्यांना मिळाली पाहिजे.
पत्रकारांशी वार्तालापात त्या म्हणाल्या, की पाकिस्तानात दहशतवादाचे जाळे आहे व तेच भारताला त्रास देत आहेत. अमेरिकेलाही त्याचा फटका बसत आहे. दहशतवादाच्या विरोधात लढणेच त्यांच्या हिताचे आहे हे पाकिस्तानी जनतेला आपण बजावून सांगितले आहे, कारण तसे केले तरच त्या देशात शांतता व स्थिरता नांदेल. पाकिस्तानी सरकारच नव्हे तर जनतेनेही दहशतवाद हा धोक्याचा असून त्याचे उच्चाटन करण्याचे वचन दिले आहे व तसे चित्रही आम्हाला त्या देशात पाहायला मिळते आहे असे सांगून त्या म्हणाल्या, की गेल्या सहा महिन्यांत पाकिस्तान सरकारने आमच्या अपेक्षेप्रमाणे दहशतवादाच्या विरोधात कारवाई केली आहे. पाकिस्तानशी लष्करी, सरकारी, नागरी व गुप्तचर पातळीवर अमेरिकेचा संवाद चालू आहे व त्यात दहशतवादाचा मुकाबला हाच महत्त्वाचा विषय आहे. अल काईदा, तालिबान व दहशतवादी संघटनांचे जाळे एकमेकांशी जोडलेले आहे व पाकिस्तान सरकार त्यांच्यावर कठोर कारवाई करील, अशी आमची आशा आहे व आम्ही त्यावर देखरेख करीत आहोत. या दहशतवादाचे चटके अमेरिकेला व भारताला बसले आहेत व पाकिस्तानलाही ते सतावत आहेत. दहशतवादाचा धोका सर्वच देशांना आहे, त्यामुळे सर्वानी एकजुटीने त्या विरोधात लढा दिला पाहिजे, किंबहुना प्रत्येक देशाची ती जबाबदारी आहे.