Leading International Marathi News Daily

सोमवार, २० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

भाजपमध्ये चैतन्य फुंकण्यासाठी अडवाणी पुन्हा काढणार यात्रा
नवी दिल्ली १९ जुलै/पीटीआय
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभवाचा फटका बसल्यानंतर भाजप नेते लालकृष्ण

 

अडवाणी यांनी आणखी एक यात्रा काढण्याचे ठरविले आहे. त्यात ते देशभर फिरणार असून काही राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतील.
अडवाणी यांनी पीटीआयला दिलेल्या खास मुलाखतीत सांगितले की, मागील यात्रांमध्ये जशा जाहीर सभा घेतल्या तशा यावेळी घेणार नाही. केवळ स्थानिक पातळीवरील पक्ष कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणे हा त्यामागचा हेतू आहे. निवडणुकीतील अशा पराभवाने कायमचे खचून जायचे नसते असा संदेश ते या कार्यकर्त्यांना देणार आहेत. यात्रेच्यावेळी पक्षाचे काही ज्येष्ठ व अनुभवी नेते त्यांच्यासमवेत असतील व तेही कार्यकर्त्यांशी खलबते करतील.
त्यांच्या तक्रारी काय आहेत हे विचारतील. लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची कारणे काय असावीत हे कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून जाणून घेतील. खचलेले नीतीधैर्य पुन्हा उंचावण्यासाठी त्यांना प्रेरित करतील. अडवाणी यांनी अनिच्छेनेच लोकसभा विरोधी पक्षनेतेपद स्वीकारले असून दुसऱ्या कुठल्याही उमेदवारावर मतैक्य न झाल्याने वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांना हे पद सांभाळावे लागत आहे. भाजपची चिंतन बैठक येत्या २१ ऑगस्टपासून तीन दिवस होणार असून त्यानंतर सप्टेंबरमध्ये अडवाणी त्यांची नवीन यात्रा सुरू करतील. त्यांच्या माय कंट्री अँड माय लाईफ या आत्मचरित्राचे मराठी व उर्दू रूपांतर नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी अडवाणी यांनी काढलेली सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा १९९० मध्ये प्रचंड गाजली होती व राम मंदिराचा प्रश्न देशातील लोकांपुढे नेण्यात ते यशस्वी झाले होते. १९९६ मध्ये भाजपने १३ दिवसांचे सरकार चालविले होते. १९९३ मध्ये अडवाणी यांनी जनादेश यात्रा काढली व त्यानंतर २००६ मध्ये जनसुरक्षा यात्रा काढून दहशतवादाच्या प्रश्नावर यूपीए सरकारचे अपयश लोकांपुढे मांडले.