Leading International Marathi News Daily

सोमवार, २० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

आर्थिक आघाडीवर बोंब आणि मुख्यमंत्र्यांची गोची
राणे यांच्या पाठोपाठ भुजबळांवर पॅकेजची ‘कृपादृष्टी’!
संतोष प्रधान , मुंबई, १९ जुलै

उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यामुळे कोकणासाठी सुमारे पाच हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात

 

आल्यानंतर आता येत्या बुधवारी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या आग्रहावरून खान्देशकरिता चार ते पाच हजार कोटींच्या पॅकेजची भेट दिली जाणार आहे. आधीच आर्थिक आघाडीवर बोंब असताना तसेच सुमारे सात हजार कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प सादर झाल्यावरही ज्येष्ठ मंत्र्यांचा पॅकेजेस्चा हट्ट पुरविताना मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची गोची झाली आहे.
येत्या बुधवारी नाशिकमध्ये होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खान्देशसाठी पॅकेज जाहीर केले जाणार आहे. पॅकेजमध्ये कोणत्या कामांचा समावेश करायचा याचे सारे नियोजन भुजबळांनी केले आहे. विभागवार पॅकेज जाहीर केल्याने आर्थिक आघाडीवर गोंधळ होतो, असे वित्त व नियोजन विभागाने मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. राज्य नियोजन आयोगाचे कार्याध्यक्ष डॉ. रत्नाकर महाजन यांनी तर यापूर्वीच अशी विभागवार पॅकेज देऊ नये, अशी भूमिका शासनाकडे मांडली होती. यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या विदर्भ आणि मराठवाडा पॅकेजेस्चा अनुभव फारसा चांगला नाही. गेल्याच महिन्यात वित्तमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मांडलेला अर्थसंकल्प सुमारे सात हजार कोटी रुपयांचा महसुली तुटीचा आहे. आर्थिक परिस्थिती समाधानकारक नसल्यानेच शासकीय कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार घरभाडे आणि वाहतूक भत्ता देण्याचे शासनाने टाळले आहे. सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे आधीच शासनाचे कंबरडे मोडले आहे. कोकण व खान्देशचे नियोजित पॅकेज पुढील दोन-तीन वर्षांंसाठी असले तरी अर्थसंकल्पीय तरतूद आणि पॅकेजची कामे यात गोंधळ होतो, असे वित्त विभागाचे म्हणणे आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यावर अवघ्या २० दिवसांमध्ये कोकणासाठी पॅकेज जाहीर करण्यात आले. यातील फार थोडय़ा कामांची यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याचे वित्त विभागातील उच्चपदस्थांकडून सांगण्यात आले.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता महिना-दीड महिन्यात लागू होईल. तोपर्यंत खान्देश पॅकेजमध्ये तरतूद होणाऱ्या कामांचे शासकीय आदेशही निघणे कठीण असल्याचे मंत्रालयात बोलले जात आहे. यामुळे कोकण काय किंवा खान्देश पॅकेजचा विधानसभा निवडणुकीत राजकीय लाभ घेण्याचा नेतेमंडळींचा प्रयत्न राहणार आहे!