Leading International Marathi News Daily

सोमवार, २० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

रीटा बहुगुणा यांची दिलगिरी
नवी दिल्ली, १९ जुलै/ पीटीआय

आपल्याला कोणा वैयक्तिक वा जातीविषयक भावना दुखविण्याचा हेतू नव्हता, असे सांगून

 

आपल्या वक्तव्याबाबत उत्तर प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा रीटा बहुगुणा-जोशी यांनी केवळ दिलगिरी व्यक्त केली. मात्र आपल्या घरावर झालेला हल्ला, जाळपोळ या घटनांना राज्य सरकारच्या पाठिंब्यानेच होत्या. त्याबाबत राज्याच्या गुन्हा अन्वेषण विभागामार्फत आपल्याला चौकशी नको तर केंद्रीय अन्वेषण विभागाची चौकशी हवी, अशी मागणीही बहुगुणा-जोशी यांनी केली.
उत्तर प्रदेश प्रशासनाचा हात आपल्या घरावर बसपा कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यात आहे. माझा मायावती सरकारवर विश्वास नाही. त्यामुळेच राज्य सरकारने या हल्ल्याबाबत दिलेल्या चौकशीचे आदेश आपल्याला पटणारे नाहीत, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
दरम्यान, रीटा बहुगुणा जोशी यांच्या निवासस्थानी हल्ला करून ते पेटवल्याच्या घटनेची सीआयडी चौकशी करण्यात येईल अशी घोषणा उत्तर प्रदेश सरकारचे कॅबिनेट सचिव शशांक शेखर सिंग यांनी आज केली. मात्र काँग्रेसने त्यावर समाधान मानलेले नाही. उत्तर प्रदेश सरकारकडून केल्या जाणाऱ्या चौकशीत कुठलाही न्याय मिळण्याची आशा नाही असे पक्षाचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना सांगितले.