Leading International Marathi News Daily

सोमवार, २० जुलै २००९

‘चलो बूथ की ओंर..’
भाजपश्रेष्ठींचा कार्यकर्त्यांना संदेश
नगर, १९ जुलै/प्रतिनिधी

‘चलो बूथ की ओंर’, असा संदेश कार्यकर्त्यांना देत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश संघटनमंत्री रघुनाथ कुलकर्णी यांनी आज पक्षाच्या जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी सक्रिय केले. जिल्ह्य़ातील लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघांतील युतीच्या विजयाबद्दल कुलकर्णी यांनी कार्यकर्त्यांना शाबासकीही दिली. खासदार, आमदार, नगरसेवक ही पदे येतील व जातील, कार्यकर्ता हे पद मात्र कायमचे आहे. ते कायम ठेवा व विधानसभाजिंकायची असेल, तर प्रथम बूथ (मतदान केंद्र) जिंकायच्या तयारीला लागा, असा सल्लाही त्यांनी दिला. जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली प्रेमदान चौकातील गायकवाड सांस्कृतिक भवनात आज जिल्हा कार्यकारिणीची व्यापक बैठक झाली.

वडाळ्यात ७० हजारांची लूट;दरोडेखोरांच्या हल्ल्यात तिघे जखमी
श्रीरामपूर, १९ जुलै/प्रतिनिधी

वडाळा महादेव येथील पवारवस्तीवर १० ते १२ दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. दरोडेखोरांच्या हल्ल्यात तिघे जखमी झाले. दरोडय़ात ७० हजारांचा ऐवज चोरीस गेला. श्रीकांत सर्जेराव पवार (वय २५), कृष्णा पवार (वय ३५), सर्जेराव गजाभाऊ पवार (वय ५५) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वडाळा महादेव येथे पुंजा आनंदा लगे यांच्या घराचा कोयंडा तोडून दरोडेखोरांनी ३ तोळे सोने व ३ हजार रुपये रक्कम चोरली. त्यानंतर दरोडेखोरांनी पवारवस्तीवर मोर्चा वळविला.

टपालपेटीत टाकलेलं पत्र जातं कुठं?
नगर, १९ जुलै/प्रतिनिधी

पोस्टाच्या पेटीत तुम्ही टाकलेले महत्त्वाचे पत्र दिलेल्या पत्त्यावर पोहचेल का? तशी खात्री अजिबात देता येत नाही. कारण नगर शहरातल्या अनेक टपालपेटय़ांची कुलपे चक्क उघडी आहेत! भारतातील टपालसेवा एकेकाळी विश्वासार्ह मानली जात असे. अलीकडे टपाल खात्याचा चेहरा-मोहरा बदलवण्याचा प्रयत्न झाला असला, तरी गलथानपणा मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. केवळ कार्यालये कार्पोरेट ऑफिससारखी चकाचक झाली, कार्यक्षमता मात्र कमालीची ढासळली आहे. नगर शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत टपाल यंत्रणा अपुरी आहे. टपालपेटय़ांची संख्या कमी तर आहेच, शिवाय आहे त्या टपालपेटय़ांची अवस्था धड नाही. स्टेशन रस्त्यावर एका टपालपेटीचे कुलूप अनेक महिन्यांपासून उघडे आहे. नागरिक विश्वासाने पत्र टाकतात, पण ही पत्रे नंतर गहाळ होतात.काही टपालपेटय़ा इतक्या छोटय़ा आहेत की त्यात बरीच कार्ड, पाकिटे साठली की वरच्यावर कुणीही आतली पाकिटे काढून घेऊ शकतो.

टेम्पो-अॅपेरिक्षा अपघातात १ ठार, २८ जखमी
राहाता, १९ जुलै/वार्ताहर

भरधाव वऱ्हाडाच्या टेम्पोने बैलगाडीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अपेरिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षामधील एक महिला जागीच ठार, तर वऱ्हाडाचा टेम्पो उलटल्याने २८जण जखमी झाले. हा अपघात आज सकाळी अकरा वाजता लोणी-बाभळेश्वर रस्त्यावर लोणी शिवारात घडला. जखमी वऱ्हाडी पुणे जिल्ह्य़ातील जुन्नर येथील आहेत. अॅपेरिक्षा (एमएच १७ व्ही ८०५) प्रवासी घेऊन बाभळेश्वरकडून लोणीकडे येत होती, तर टेम्पो (एमएच ०४ एस ८१६१) लोणीकडून वऱ्हाड घेऊन बाभळेश्वरकडे चालला होता.

‘मुळा-प्रवरा’च्या अधिकाऱ्यांना कोंडले
केंदळ गाव आठवडय़ापासून अंधारात

देवळाली प्रवरा, १९ जुलै/वार्ताहर

राहुरी तालुक्यातील केंदळ परिसरामधील ३ रोहित्रे बंद पडल्यामुळे केंदळ गाव आठवडय़ापासून अंधारात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी मानोरी येथे मुळा-प्रवरा वीज संस्थेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शनिवारी सकाळी कार्यालयात कोंडले. केंदळ परिसरातील हाडकी गावठाण, भोसलेवस्ती, सीताराम तारडे वस्ती या ठिकाणची रोहित्रे बंद पडल्यामुळे केंदळ गाव आठवडय़ापासून अंधारात होते. गावकऱ्यांनी वेळोवेळी मुळा-प्रवरा वीज संस्थेच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. परंतु कारवाई झाली नाही. याबाबत गावकऱ्यांनी विचारणा केल्यावर त्यांना वीजबिलाची ५० टक्के रक्कम भरा, अशी उत्तरे देण्यात आली. अनेकांनी बिलेही भरली, तरी शुक्रवापर्यंत वीजपुरवठा सुरळीत होईना.

गस्त घालणाऱ्या पोलिसांनाच लुटण्याचा कामरगाव घाटात प्रयत्न
नगर, १९ जुलै/प्रतिनिधी

गस्त घालणाऱ्या पोलिसांनाच काल रात्री कामरगाव घाटात लुटण्याचा प्रयत्न झाला. लुटारूंनी पोलिसांवर दगडफेक केली. झटापटीनंतर एकास पकडण्यात पोलिसांना यश आले. इतर तिघे मात्र पळून गेले. दगडफेकीत दोन पोलीस व तीन ग्रामस्थ जखमी झाले. पोलिसांनी रमेश सावळ्या भोसले (वय २०) यास अटक केली. गुण्या मीनानाथ भोसले, आत्मशा सावळ्या भोसले, तारामल निनाशा भोसले (सर्व रा. पिंपळगाव कौडा, ता. नगर) हे तिघेजण पळून गेले. नगर तालुका ठाण्यातील पोलीस शिपाई भाऊसाहेब काळे, अंकुश ढवळे व कामरगावच्या ग्रामदलातील काही तरुण जीपमधून नगर-पुणे रस्त्यावर रात्री गस्त घालत होते. साडेदहाच्या सुमारास ते कामरगाव घाटात आले असता चौघांनी रस्ता अडवून पैसे व मोबाईलची मागणी केली. लुटारूंनी त्यांच्यावर दगडफेकही केली, तसेच लाकडी दांडक्याने मारहाण सुरू केली. आपण ज्यांना अडवले ते पोलीस आहेत हे समजल्यानंतर लुटारू पळू लागले. पोलिसांनी त्यातील एकाला पकडले. झटापटीत पोलीस काळे, ढवळे व इतर तिघेजण जखमी झाले. पकडलेल्या आरोपींकडून आणखी गुन्ह्य़ांची माहिती उजेडात येण्याची शक्यता आहे. इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. तपास सहायक निरीक्षक बापूसाहेब महाजन करीत आहेत.

राज्यातील पालिका कर्मचारी ४ ऑगस्टपासून बेमुदत संपावर
नगर, १९ जुलै/प्रतिनिधी

राज्यातील सर्व नगरपालिका व महापालिकांतील कर्मचारी ६वा वेतन आयोग, तसेच अन्य मागण्यांसाठी ४ ऑगस्टपासून बेमुदत संप करणार आहेत. तत्पूर्वी २२ जुलैला नाशिक येथे होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या वेळी निदर्शने करण्यात येणार आहेत. पालिका कामगार संघर्ष समितीचे पदाधिकारी आनंदराव वायकर यांनी ही माहिती दिली. सर्व कामगारांना ६वा वेतन आयोग, वेतन व निवृत्तीवेतनावर १०० टक्के अनुदान, कंत्राटी कामाची पद्धत पूर्ण बंद करणे, सन १९९३नंतरच्या रोजंदारी कामगारांना कायम करणे, सर्व सफाई कर्मचाऱ्यांना घरे यासाठी कामगार संघटना गेली अनेक वर्षे सरकारबरोबर संघर्ष करीत आहेत, असे त्यांनी सांगितले. सरकारकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे राज्य नगरपालिका कर्मचारी महामंडळ, न. पा. कर्मचारी समन्वय समिती, महापालिका कर्मचारी फाउंडेशन व अन्य अनेक संघटनांनी एकत्र येऊन संघर्ष समतीची स्थापना केली. यापुढची लढाई समितीच्या माध्यमातूनच होणार असून, ४ ऑगस्टपासूनच्या संपाची व २२ जुलैच्या नाशिक निदर्शनाची नोटीस सरकारला देण्यात आल्याची माहिती वायकर यांनी दिली.

‘वाकचौरेंनी बेताल वक्तव्ये न थांबविल्यास प्रत्युत्तर देऊ’
राहाता, १९ जुलै/वार्ताहर

रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदावरून हकालपट्टी झालेल्या विजय वाकचौरे यांनी आपली बेताल वक्तव्ये थांबवावीत; अन्यथा त्याच भाषेत त्यांना उत्तर देण्यात येईल, असा इशारा रामदास आठवले समर्थक उत्तर महाराष्ट्राचे सचिव प्रकाश कोपरे यांनी दिला आहे. राजकीय स्वार्थासाठी आठवलेंसारख्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शिर्डी मतदारसंघातून उमेदवारीचा घाट घालून त्यांचा घात करणाऱ्या वाकचौरे यांना रिपब्लिकन जनता माफ करणार नाही, असेही श्री. कोपरे म्हणाले.
आठवले यांच्या शिर्डीतील पराभवानंतर वाकचौरे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यायला हवा होता. मात्र, पदाच्या लालसेपोटी त्यांनी राजीनामा दिला नाही. हकालपट्टीची कुणकुण लागताच मात्र त्यांनी राजीनामा पाठविला. नगर येथे झालेल्या बैठकीनंतर या नेत्यांनी आठवले यांच्याशी चर्चा करून उत्तरेसाठी चांगदेव जगताप व दक्षिणेसाठी सुनील साळवे यांची जिल्हाध्यक्ष पदासाठी नियुक्ती केली. सर्व कार्यकर्ते जगताप यांच्या पाठिशी असल्याचा विश्वास कोपरे यांनी एका निवेदनाद्वारे व्यक्त केला.

‘निळू फुले यांच्या निधनाने अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ पोरकी’
राहाता, १९ जुलै/वार्ताहर

ज्येष्ठ रंगकर्मी व परिवर्तनवादी चळवळीचे नेते निळू फुले यांच्या निधनाने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आधारस्तंभ हरपला असून ही चळवळ पोरकी झाली आहे, अशा शब्दांत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण कडू यांनी श्रद्धांजली वाहिली. निळू फुले यांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी समितीचे रायचंद दुबे, रावसाहेब कर्पे, डॉ. मच्छिंद्र वाघ, बाबा आरगडे, गोवर्धन घोलप, मुसळे, प्रश्न. गोरे उपस्थित होते. अंधश्रद्धा निर्मूलनच्या कार्यक्रमासाठी निळू फुले यांनी समाजप्रबोधन केले. फुले आणि नगर जिल्ह्य़ाचे वेगळे नाते होते, असे सांगून कडू म्हणाले की, नगर जिल्ह्य़ातील सार्वजनिक कार्यक्रम, चळवळी यांचे नेतृत्व केले. ज्येष्ठ नेते पी. बी. कडू यांच्यासह फुले यांनी शनिमंदिर व वरवंडी येथील पशुहत्याविरोधी आंदोलनांत भाग घेतला. लवकरच नगर येथे ज्येष्ठ रंगकर्मी सदाशिव अमरापूरकर यांच्या उपस्थितीत शोकसभेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सय्यदबाबांचा उरूस एकात्मतेचे प्रतीक - विखे
संगमनेर, १९ जुलै/वार्ताहर

येथे दर वर्षी भरणारा सय्यदबाबांचा उरूस हिंदू-मुस्लिम एकात्मतेचे दर्शन घडविणाऱ्या राज्यातील अनेक प्रतिकांपैकी एक आहे. संगमनेरच्या नागरिकांनी एकत्र येऊन परंपरेने जोपासलेली ही प्रथा सर्वासाठी अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार राज्याच्या विधी, न्याय व शालेय शिक्षण खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी काढले. गेल्या दोन दिवसांपासून येथे सुरू असलेल्या सय्यदबाबा उरुसास विखे यांनी भेट देऊन दर्शन घेतले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, सामाजिक सद्भावना जोपासण्यासाठी धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने होणे आवश्यक आहे. त्यातूनच राष्ट्रीय एकात्मता साधली जाते. संगमनेरचा हा उरूस एकात्मतेचेच प्रतीक आहे. विखे यांच्यासमवेत शहर काँग्रेसचे अध्यक्ष उमर बेग, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, ‘प्रवरा’चे उपाध्यक्ष रामभाऊ भुसाळ, उद्योजक साहेबराव नवले, शिवसेना नेते बाबासाहेब कुटे, मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरुण इथापे, पं. स. सदस्य पोपट वाणी आदी उपस्थित होते.

मराठा सेवा संघाची कार्यकारिणी जाहीर
नगर, १९ जुलै/प्रतिनिधी

मराठा सेवा संघाची जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष सोपान मुळे यांनी जाहीर केली. नवे पदाधिकारी पुढीलप्रमाणे - कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गांगर्डे, प्रश्न. सीताराम काकडे, सचिव भास्कर नरसाळे, खजिनदार गोरक्षनाथ घुगरकर, उपाध्यक्ष सुभाष कराळे, संजय शेळके, राजेंद्र गंधारे, हेमंत शेळके, सहसचिव बाळासाहेब खुळे, राजू जरे, प्रवक्ता प्रकाश कराळे, सल्लागार प्रल्हाद शितोळे, विठ्ठल निर्मळ, कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण कर्डिले, राज्य कार्यकारिणी सदस्य शरद निमसे, संभाजी औटी, जिल्हा संघटक बाळासाहेब मिसाळ, आसाराम म्हस्के, प्रश्न. विजय
भोस, महादेव कराळे. अन्य १० पक्षांच्या प्रमुखांचीही निवड करण्यात आली.