Leading International Marathi News Daily

सोमवार, २० जुलै २००९

दोन घटनांनी शहर हादरले
दारूडय़ाने पत्नीला जाळले
नागपूर, १९ जुलै / प्रतिनिधी

दारूडय़ा पतीने पत्नीला निर्दयपणे जाळल्याची घटना वाडीमधील आंबेडकर नगरात रविवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घडली. आरोपीला सायंकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले. देशी कट्टय़ातून गोळी झाडून पत्नीला मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना कालच या परिसरात घडली होती. पतीने पत्नीला मारून टाकल्याच्या या दुसऱ्या क्रूर घटनेने वाडी परिसरात खळबळ उडाली आहे. कविता श्रीकृष्ण माहुरे हे मरण पावलेल्या विवाहितेचे नाव आहे. सकाळी अकरा वाजताच्या सुमारास तिच्या घरातून धूर निघत असल्याचे तिच्या भावाला कुणीतरी सांगितले.

रस्ते आणि पदपथही झाले वाहनतळ
नागपूर, १९ जुलै

शहरातील वाहनतळांचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक जीवघेणा ठरत चालला आहे. वाहनतळ नसल्याने रस्त्यांवर उभी राहणारी वाहने, त्यामुळे वाहतुकीची होणारी कोंडी, मॉल्स, दवाखाने, मंगल कार्यालय, शासकीय कार्यालय, बॅंकांमध्ये जागा नसल्याने रस्त्यांवर उभी करण्यात येणारी वाहने आणि रस्त्यावरच दोरी लावून ‘पार्किग’ च्या नावाखाली वाहनधारकांची होत असलेली लूट या सर्व बाबींकडे लक्ष वेधणारी ही वृत्तमालिका-
चंद्रशेखर बोबडे

भाज्या ५० रुपये किलो, तूर डाळीने गाठले शतक!
नागपूर, १९ जुलै/ प्रतिनिधी

महागाईने सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर मध्यमर्गीय भरडून निघत असून महागाई कमी होण्याची कुठलीही शक्यता दिसून येत नाही, उलट ती वाढतच चालली आहे. पेट्रोलची दरवाढ आणि शेतकऱ्यांनी न केलेली लागवड याचा फटका भाज्यांना बसला असून कांदे-बटाटे सोडले तर एकही भाजी ५० रुपये किलोच्या खाली नाही, गेल्या आठवडय़ात ९० रुपये किलो विकली जाणारी तूर डाळही आता १०० रुपये झाली आहे, त्यामुळे सर्व सामान्यांच्या घरच्या जेवणातून वरण हळूहळू कमी होत चालले आहे.

उपलब्ध संसाधनांच्या उपयोगातून विकास साधा -सुदर्शन
पूर्ती साखर कारखान्यात राज्यातील पहिल्या इथेनॉल मिश्रित डिझेल पंपाचे उद्घाटन
नागपूर, १९ जुलै/प्रतिनिधी

देशाला आत्मनिर्भर करायचे असेल तर, जी संसाधने उपलब्ध आहेत, त्याचा पुरेपूर उपयोग करून विकास साधल्यास कोणावरही अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. पूर्ती उद्योग समूहाने नेमक्या याच मार्गाचा अवलंब करून विकासाकडे झेप घेतली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक कुप्प.सी. सुदर्शन यांनी केले. विशेष म्हणजे, सुदर्शन यांनी त्यांच्या संपूर्ण भाषणात वेळोवेळी महात्मा गांधी यांच्या ग्रामीण विकासाच्या विचारांचा वेळोवेळी उल्लेख केला.

समाज विघातक प्रवृत्तींना प्रश्नेत्साहन नको -प्रमिला मेढे
नागपूर १९ जुलै प्रतिनिधी

समाज व्यवस्था व नैतिक मूल्यांना समलैगिंक संबंधासारख्या विकृत प्रवृत्तीपासून वाचवण्याची गरज असून अशा प्रवृत्तींना सामाजिक हिताचा विचार करता प्रश्नेत्साहन देऊ नये, असे आवाहन राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका प्रमिला मेढे यांनी केले. राष्ट्र सेविका समितीच्या अर्ध वार्षिक बैठकीचा समारोप नुकताच देवी अहल्या मंदिरात झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रसारमाध्यमांनी हा मुद्दा चुकीच्या पद्धतीने जनतेसमोर मांडला असून त्याचा कोवळ्या वयातील मुलांवर विपरित परिणाम होत आहे.

राजभाषा निबंध स्पर्धेत ४० कर्मचारी सहभागी
नागपूर, १९ जुलै / प्रतिनिधी

नगर राजभाषा कार्यान्वयन समितीच्यावतीने नागपूर विभागातील केंद्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांकरीता हिंदी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ‘राष्ट्रीय एकतेत हिंदीचे योगदान’, ‘पर्यावरण संरक्षणाकरता उपाय’, ‘आजच्या युगात भारतीय संस्कृतीचे महत्त्व’ हे विषय स्पर्धेसाठी ठेवण्यात आले होते. या स्पध्रेत केंद्र सरकारच्या २२ कार्यालयातील सुमारे ४० कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय रेल्वे व्यवस्थापक देवेंद्र शर्मा होते. इतर भाषांचे ज्ञान असणे आवश्यक आहे पण, त्याचबरोबर स्वत:ची भाषा विसरता कामा नये, असे शर्मा म्हणाले. इस्रायलची मातृभाषा हिब्रू होती, ती कालांतराने लुप्त झाली होती. मात्र, दुसऱ्या विश्वयुद्धानंतर या येथील नागरिकांनी पुन्हा हिब्रुलाच मातृभाषेचा दर्जा दिला. इस्रायलने आता विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती केली असल्याचे शर्मा म्हणाले. याप्रसंगी शैलेंद्र जयस्वाल उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राजभाषा अधिकारी पौर्णिमा सुरडकर यांनी केले. राजभाषा विभागाच्या मीना कांबळे, कुमुद शर्मा, परिहार, महाजन, बडवाईक, धकाते, पद्मिनी आदी कर्मचाऱ्यांनी स्पर्धा यशस्वी करण्याकरता सहकार्य केले.

द्वादश ज्योतिर्लिग महारुद्राभिषेक व कालसर्प पूजा २३ जुलैपासून
नागपूर,१९ जुलै/प्रतिनिधी

संत मौनीबाबा यांच्या १४व्या पुण्यतिथीनिमित्त व श्रावण महिन्यानिमित्त २३ जुलै ते ४ ऑगस्टपर्यंत संत्रा मार्केटमधील शीतला माता मंदिरात द्वादश ज्योतिर्लिग महारुद्राभिषेक पार्थिव पूजन व कालसर्प योग पूजा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात दररोज मातीची १५१११ शिवलिंगे तयार करण्यात येतील. तसेच, दुपारी १२ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पं. हरिमहाराज, पं. रमेशकुमार शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली द्वादश ज्योतिर्लिगाची पूजा आणि कालसर्प योगशांती पूजा करण्यात येईल. पुजेनंतर मातीच्या शिवलिंगांचे विसर्जन फुटाळा तलावात करण्यात येईल. ४ ऑगस्टला संत मौनीबाबा पुण्यतिथी व धार्मिक समारंभाच्या समाप्तीनिमित्त सकाळी ९ वाजेपासून हवन होईल. दुपारी महाप्रसाद होईल. या कार्यक्रमासाठी टीकमचंद छाबरानी, ओमप्रकाश गुप्ता, लेखवानी परिवार, साधुराम बंसीजानी, श्यामसुंदर गुप्ता, हीराचंद लालवानी, प्रेमकुमार फुलवानी आदी सहकार्य करत आहेत.

हिंगणा सवरेदय विद्यालयात गुणवंतांचा सत्कार
हिंगणा, १९ जुलै/ वार्ताहर

येथील सवरेदय विद्यालयाचा दहावीचा ९५.४० टक्के निकाल लागला असून विद्यालयातील सर्वाधिक गुण मिळवल्याबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी गुणवंतांचा सत्कार केला. विद्यालयात आशीष मुरलीधर चक्रवर्ती हा ८० टक्के गुण घेऊन प्रथम आला तर आशीष धनराज आदे हा (७७ टक्के) दुसरा व सौरभ सुनील सिंह सेंगर (७६ टक्के) हा तिसरा आला. बारावी परीक्षेचा निकाल ७२ टक्के असून यात प्रियंका विजय वैद्य ही प्रथम आली आहे. कार्यक्रमाला उपस्थितीत संस्थेचे सचिव व संस्थापक प्रश्नचार्य राजेंद्र सिंह चंदेल, संस्थेच्या अध्यक्षा व संस्थापक प्रश्नचार्या माया चंदेल यांच्या हस्ते गुणवंत- विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला प्रश्नचार्य बाबाराव उंबरकर, पर्यवेक्षिका पुष्पा लांजेवार, चापले उपस्थित होते. विद्यालयात परीक्षा केंद्र नसतानाही विद्यार्थ्यांनी दुसऱ्या शाळेत परीक्षा देऊन निकालात उच्चांक गाठल्याबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन एल.सी. बुधे यांनी तर एफ.एन. शेंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रश्नस्ताविक प्रश्नचार्य उंबरकर यांनी केले.

संघर्ष युवक संघटनेचा मेळावा
हिंगणा, १९ जुलै / वार्ताहर

संघर्ष युवक संघटनेच्यावतीने तालुका युवक कार्यकर्ता मेळावा नुकताच लाडगाव येथे पार पडला.
या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रमेश बंग उपस्थित होते. राजेंद्र वाघ, सुवर्णा खोबे, प्रमोद बंग, गोवर्धन प्रधान, पुरुषोत्तम डाखळे, सुरेश काळबांडे, महेश बंग, शेख हुसेन, अनिल चानपूरकर आदी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीसाठी युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन बंग यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाचे संचालन शशिकांत थोटे यांनी केले. याप्रसंगी जावेद महाजन, इसराईल शेख, नंदकिशोर बांदरे, पंकज गौर, रवी राठोड, हमीद खान, प्रवीण रंगारी, विलास मसराम, भावेश कैकाडे आदी उपस्थित होते.

‘क्लिनिकल रसशास्त्र’चे प्रकाशन
नागपूर, १९ जुलै / प्रतिनिधी

शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील रसशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश हिरालाल खापर्डे यांच्या ‘क्लिनिकल रसशास्त्र’ पुस्तकाचे प्रकाशन श्री आयुर्वेद महाविद्यालयाचे प्रश्नचार्य एम.एम. जुमळे यांच्या हस्ते पार पडले. बी.ए.एम.एस. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी हे पुस्तक अत्यंत उपयोगी आहे. प्रश्नचार्य जुमळे यांनी आयुर्वेदात रसशास्त्राचे महत्व विशद करून पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक अतीशय उपयुक्त असल्याचे सांगितले. हे पुस्तक नागपूरच्या रजनी प्रकाशनने प्रकाशित केले आहे. पुस्तक प्रकाशनप्रसंगी डॉ. आर.एम. खियानी, डॉ. गोरे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

पशुविज्ञान विद्यापीठातील पदभरतीचा अहवाल आज मिळणार नागपूर,
१९ जुलै/ प्रतिनिधी

महाराष्ट्र पशू विज्ञान विद्यापीठातील पदभरतीची चौकशी करणाऱ्या समितीचा अहवाल उद्या, २० जुलैला राज्यपालांना सादर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र पशू व मत्स विज्ञान विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ४५० जागा भरताना गैरव्यवहार झाल्याची तक्रार विद्यापीठाच्याच भ्रष्टाचार विरोधी कृती समितीने राज्यपालांकडे केली होती. त्यावरून राज्यपालांनी विद्यापीठ कायदा १९८८ च्या कलम ११ (१) अन्वये ४ फेब्रुवारी २००९ ला विभागीय आयुक्त आनंद लिमये यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. राज्यपालांनी एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते, पण प्रकरणाची गंभीरता लक्षात घेतल्यावर चौकशीचा कालावधी पाच महिन्यापर्यंत वाढवण्यात आला होता. उद्या, सोमवारी लिमये समितीचा अहवाल राज्यपालांना सादर करणार आहे. यासंदर्भात राजभवन, मुंबई येथे दुपारी ३ वाजता बैठक बोलवण्यात आली आहे. विद्यापीठातील पदभरतीची चौकशी सुरू असतानाच नव्याने काहीजागा भरण्यात आल्या त्याला विद्यापीठ भ्रष्टाचार विरोधी कृती समितीने विरोध केला होता व भरतीच्या विरोधात आंदोलनही केले होते.

विहिरीत चक्क गरम पाणी
नागपूर, १९ जुलै / प्रतिनिधी

बजरंग नगरातील एका विहिरीतील पाणी चक्क गरम झाल्याने रविवारी सकाळी तेथे हा औत्सुक्याचा विषय झाला होता. बजरंग नगरातील सरस्वती अपार्टमेंटच्या आवारात अंदाजे तीन फूट व्यासाची विहीर आहे. त्यावर पंप बसवला आहे. आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास त्या विहिरीतून पंपाद्वारे गरम पाणी आल्याने तेथील रहिवासीयांना आश्चर्य वाटले. एका कुटुंबात झालेली कुजबुज हळूहळू कर्णोपकर्णी झाली. प्रत्येकजण विहिरीतून पाणी काढून बघू लागला. तेथे नागरिकांची गर्दी झाली. कुणी डोकावून बघू लागले. कुणी दोराने बादली विहिरीत सोडून पाणी ओढून बघितले. अनेकांनी ते पाणी गरम असल्याची खात्री करून घेतली. काहीजण हा चमत्कार असल्याचे म्हणत होते. काहीलोक मात्र हा चमत्कार असल्याचे मानत नव्हते. दोन दिवसांनी सूर्यग्रहण असून भूकंप होणार असल्याचा हा संकेत असल्याचे काहीजण बोलत होते. विहिरीतून गरम पाणी येत असल्याचे पोलिसांच्याही कानावर गेले. कुणीतरी अग्निशमन दलाला कळवले. अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस तेथे गेले. अग्निशमन दलाच्या जवानांनी गाडीतील पाणी विहिरीत सोडले. त्यानंतर मात्र पाणी थंड झाले.

‘नागपूर राऊंड टेबल ८३’ चे अध्यक्ष रितेश सिंघानिया
नागपूर, १९ जुलै/ प्रतिनिधी

‘नागपूर राऊंड टेबल ८३’चे अध्यक्ष रितेश सिंघानिया आणि सचिव म्हणून राहुल शर्मा यांनी पदभार स्वीकारला. ‘नागपूर राऊंड टेबल ८३’ची सभा नुकतीच पेंच व्याघ्र प्रकल्पात झाली. त्यात राहुल शर्मा यांच्याकडून रितेश सिंघानिया यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. नागपूर राऊंड टेबल ८३ ही राऊंड टेबल इंडियामधील शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी महत्त्वाची संस्था आहे. राऊंड टेबल ही १८ ते ४० वयोगटातील युवकांची संघटना आहे. युवावर्गामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सेवा, फेलोशिप आणि गुडविल निर्माण करणे. हा उद्देश या संघटनेचा आहे. राऊंड टेबलचे विद्यमान स्थितीत ५२ देशांमध्ये ४३ हजार सदस्य आहेत.