Leading International Marathi News Daily

सोमवार, २० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

दोन घटनांनी शहर हादरले
दारूडय़ाने पत्नीला जाळले
नागपूर, १९ जुलै / प्रतिनिधी

दारूडय़ा पतीने पत्नीला निर्दयपणे जाळल्याची घटना वाडीमधील आंबेडकर नगरात रविवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घडली. आरोपीला सायंकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले. देशी कट्टय़ातून गोळी झाडून पत्नीला मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना कालच या परिसरात घडली होती.

 

पतीने पत्नीला मारून टाकल्याच्या या दुसऱ्या क्रूर घटनेने वाडी परिसरात खळबळ उडाली आहे.
कविता श्रीकृष्ण माहुरे हे मरण पावलेल्या विवाहितेचे नाव आहे. सकाळी अकरा वाजताच्या सुमारास तिच्या घरातून धूर निघत असल्याचे तिच्या भावाला कुणीतरी सांगितले. तिचा भाऊ धावतच तिच्या घरी गेला. त्यालाही घरातून धूर निघत असल्याचे दिसले. त्याने जोरजोराने लाथा मारून बंद असलेले दार उघडले. आतील दृश्य पाहून त्याचा थरकाप उडाला. त्याने आरडाओरड केली. त्या घरातून धूर निघत असल्याचे पाहून आधीच साशंक असलेले लोक घरासमोर गोळा झाले. कुणीतरी पोलिसांना कळवले. या घटनेची माहिती समजताच वाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर चव्हाण सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले.
पोलिसांनी घराचे निरीक्षण केले. आतील दृश्य पाहून पोलिसांच्याही अंगावर शहारे आले. कविताचा जळून काळा-ठिक्कर झालेला मृतदेह खोलीत पडला होता. शरिराच्या जळालेल्या भागातून रक्तमिश्रित पाणी सुटले होते. खोलीत उग्र दुगर्ंध सुटला होता. रॉकेल ओतून जाळल्याचे स्पष्ट होते. हा खून की आत्महत्या, असा प्रश्न पोलिसांनाही पडला होता. तिने स्वत: पेटवून घेतले असते तर शरिराची त्वचा पेटल्याने होणाऱ्या अंगाच्या वेदनेने आणि जळजळीने ती ओरडली असती तसेच इकडे तिकडे धावली असती. त्यामुळे खोलीतही आग लागली असती. मात्र, खोलीत काहीच वस्तू जळालेल्या दिसत होत्या. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठवला. कविताच्या भावाच्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी तिचा पती आरोपी श्रीकृष्ण माहुरे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.
या घटनेने त्या परिसरात खळबळ उडाली. श्रीकृष्ण मजुरी करतो. त्याला १ मुलगा व १ मुलगी असून ते दोघेही काल त्यांच्या मावशीकडे गेले होते. दारूच्या आहारी गेलेला श्रीकृष्ण रोज दारू पिऊन घरी पत्नीला अश्लील शिवीगाळ व मारहाण करीत असे. कालही रात्री त्या दोघांचे जोरजोराने भांडण झाले. हे रोजचेच असल्याने शेजारच्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आज सकाळी त्याच्या घरातून धूर निघत असल्याने लोक साशंक झाले. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास तो त्याच्या काही परिचितांना भेटला होता. दोन पव्वे घश्यात रिचवल्याचे तो त्यांच्याजवळ बोलला होता. सकाळपासून श्रीकृष्ण दिसत नव्हता. तो काम करायचा तेथेही पोलिसांनी त्याचा शोध घेतला. सायंकाळी तो सापडला. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. ‘काय झाले हे मला माहिती नाही’ असेच तो पोलिसांजवळ बोलतो आहे. देशी कट्टय़ातून गोळी झाडून पतीने पत्नीला मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना कालच या परिसरात घडली होती. पतीने पत्नीला जाळून टाकल्याच्या या दुसऱ्या क्रूर घटनेने वाडी परिसरात खळबळ उडाली आहे.
दारुडय़ा वडिलांचा खून
नागपूर, १९ जुलै / प्रतिनिधी

घरातील महिलेबद्दल अपशब्द वापरल्याच्या कारणावरून मुलांनी मारहाण करीत दारूडय़ा वडिलांचा खून केला. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने पूर्व नागपुरातील चिंतेश्वर मंदिर परिसरात खळबळ उडाली.
लकडगंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नामदेव रामभाऊ चौधरी हे खून झालेल्याचे नाव आहे. नामदेवचे वडील रामभाऊ यांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. आज तेरवी होती. लहानशा घरात तेरवीचे जेवण सुरू होते. नामदेव दारू ढोसून घरी आला. घरी त्याचा मोठा मुलगा प्रकाश, पंधरा वर्षाचा मुलगा, मुलगी व इतर नातेवाईक जेवत होते. नामदेव आला आणि दारूच्या नशेत बरळू लागला. त्यावरून नामदेव आणि मुलांमध्ये बाचाबाची झाली. नामदेवने घरातील महिलांबद्दल अपशब्द काढल्याने मुलांचा संताप अनावर झाला. घरात शब्दाने शब्द वाढत गेला. काही लोक घाईघाईत जेवून घराबाहेर पडले. काही नातेवाईक मुलांना समजावण्याचा प्रयत्न करू लागले. बाप-लेकांचे भांडण विकोपाला गेले. बाप-लेकांची मारामारी होत असल्याचे पाहून लोक दूर झाले. प्रकाश व त्याच्या लहान भावाने नामदेवला बुक्क्यांनी मारहाण केली आणि ढकलून दिले. नामदेव जमिनीवर जोरदार आपटला. खाली गिट्टी होती. छाती व डोक्याला गिट्टीचा मार लागला. काहीवेळ तसाच गेला. नामदेवने हालचाल न केल्याने घरातील लोक भानावर आले.
बाप-लेकांचे जोरदार भांडण झाल्याने चिंतेश्वर मंदिर बैरागी पुऱ्यात खळबळ उडाली. नागरिकांची नामदेवच्या घरासमोर गर्दी झाली. या घटनेची माहिती समजताच लकडगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सुपारे सहकाऱ्यांसह तेथे पोहोचले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठवला. आरोपी प्रकाश नामदेव चौधरी व त्याच्या लहान भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले. नामदेव सुतार काम करायचा. प्रकाश मजुरी करायचा. घरातील महिलेबद्दल अपशब्द बोलल्याच्या कारणावरून खून झालेल्याचे बोलले जात असले तरी संपत्ती हे मूळ कारण असल्याचा संशय पोलिसांना आहे.