Leading International Marathi News Daily

सोमवार, २० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

रस्ते आणि पदपथही झाले वाहनतळ
नागपूर, १९ जुलै

शहरातील वाहनतळांचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक जीवघेणा ठरत चालला आहे. वाहनतळ नसल्याने रस्त्यांवर उभी राहणारी वाहने, त्यामुळे वाहतुकीची होणारी कोंडी, मॉल्स, दवाखाने, मंगल कार्यालय, शासकीय कार्यालय, बॅंकांमध्ये जागा नसल्याने रस्त्यांवर उभी करण्यात येणारी वाहने आणि रस्त्यावरच दोरी लावून ‘पार्किग’ च्या नावाखाली वाहनधारकांची होत असलेली लूट या सर्व बाबींकडे लक्ष वेधणारी ही वृत्तमालिका-
चंद्रशेखर बोबडे
देशातील ‘टॉपटेन’ शहरांपैकी एक असलेल्या आणि अलिकडच्या काळात झपाटय़ाने विकसित होत असलेले शहर म्हणून नावारूपास आलेल्या नागपूर शहरातील वाहनतळांची (पार्किंग) समस्या सर्वसामान्य वाहनधारकांसाठी डोकेदुखी तर ठरलीच आहे पण, जागाच नसल्याने पादचाऱ्यांसाठी केलेले पदपथ आणि रस्तेही सध्या शहरात वाहनतळ झाले आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी तर

 

होतेच शिवाय, अपघातांचे धोकेही वाढले आहेत.
तीस लाखाच्या या शहरात जुन्या वस्त्या असोत किंवा नवीन वस्त्या, बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये, बॅंका, प्रमुख रस्ते, मॉल्स, रेल्वे, बसस्थानक एवढेच नव्हे तर, नागरी वस्त्यांमध्येही वाहनतळांची समस्या निर्माण झाली आहे. घर तेथे किमान दोन दुचाकी, दहा घरांमागे एक कार, यामुळे वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचा फटका जसा अपार्टमेन्टसनाला बसतो आहे तसाच तो शासकीय कार्यालये, बॅंका, बाजारपेठांनाही बसतो आहे.
वाहनतळांची समस्या नागपूरकरांना नवीन नाही पण, ती पूर्वी बर्डी, महाल, गोकुळपेठ, सदर, रामदासपेठ, गांधी बाग, इतवारी या बाजारपेठांपर्यंत मर्यादित होती. आता ती हळूहळू बाजारपेठालगत असलेल्या वस्त्यांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास रामदासपेठ आणि धंतोलीचे देता येईल. रामदासपेठ, धंतोलीचे रूपांतर हळूहळू ‘मेडिकल हब’ असे होत चालले आहे. धंतोलीत तर प्रत्येक बोळीत हॉस्पिटल, संशोधन संस्थेचा फलक लागलेला आढळतो. निवासी संकूल कोणते आणि दवाखाना कोणता, यातील भेदही संपत यावा अशी स्थिती या भागात आहे. दवाखान्याच्या पुढे उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे पहिलेच अरुंद असलेले रस्ते तर गुदमरतातच शिवाय, तेथे येणाऱ्या दुचाकींनी इतरांच्या घरापुढचीही जागा व्यापलेली असते. जनता चौकातून धंतोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील प्रवास किती कठीण झाला, याची कल्पना तेथून जाणाऱ्या वाहनधारकांनाच असते. हीच परिस्थिती रामदासपेठेतही आहे. जनता चौकातून बजाजनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सर्व पदपथ हे वाहनतळ ठरले आहेत. विशेष म्हणजे, ते व्यापाऱ्यांनी अधिकृत वाहनतळ केले आहेत. त्यांचे सुरक्षा रक्षकच तेथे दुचाकी वाहने ठेवण्यास सांगतात, यावरून व्यावसायिकांची हिंमत किती वाढली, याची प्रचिती येते. रस्त्यावर वाहनांची गर्दी आणि पदपथावरून चालावे म्हटले तर तेथेही तिच स्थिती. अशा वेळी वाहनांच्या गर्दीतून पायवाट शोधण्याशिवाय पादचाऱ्यांना पर्याय नसतो.
महापालिकेच्या नियमानुसार प्रत्येक इमारतीचा आराखडा इमारतीत वाहनतळाची सोय असल्याशिवाय मंजूर व्हायला नको पण, या भागाचा फेरफटका मारला असता आराखडय़ात दर्शविण्यात आलेली जागा आणि प्रत्यक्षातील स्थिती यात कमालीचा फरक दिसून येतो. वाहनतळासाठी सोडण्यात आलेल्या जागेवरच अनेकांनी दुकाने थाटली आहेत. या मार्गावरच असलेला व सध्या पेट्रोल पंप असलेली जागा एका मोठय़ा इमारतीसाठी वाहनतळाची जागा झाला आहे. याचा मार्गावरील एका तारांकित हॉटेलपुढे उभी राहणारी वाहने या मार्गावर दिवसभर वाहतुकीच्या अडथळ्यासाठी कारणीभूत ठरतात. पंचशील चौकातील बिगबाजारमध्ये तळघरात वाहनतळ आहे मात्र, त्यासाठी पैसै मोजावे लागत असल्याने तेथील वाहने सर्व रस्त्यावरच उभी राहतात. पंचशील चित्रपटगृह, तेथून पुढे गेल्यावर महापालिकेच्या बसेसमुळे होणारी वाहतूक कोंडी, ही आता पादचाऱ्यांच्या अंगवळणी पडली आहे. सदर मेन रोड, बर्डी मेन रोड, गोकुळपेठ, गांधीबाग, इतवारी गांधी चौकापासून शहीद चौकाकडे, सराफा बाजारातून नंग्या पुतळ्याकडे जाणारा मार्ग, गोळीबार चौक, बसस्थानक, रेल्वेस्थानक, बसस्थानक, या सर्वच ठिकाणी पदपथ आणि रस्त्यांची जागा उभ्या असलेल्या वाहनांनीच घेतलेली आढळते. तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, सिव्हील लाईन्समधील एम.जी. गुप्ता हाऊस, महाल भागातील श्याम टॉकीज चौक ते सेन्ट्रल एव्हेन्यू चौक, बडकस चौक ते सेन्ट्ल एव्हेन्यू, शंकरनगर ते लॉ कॉलेज चौक, रामनगर ते रविनगर, रवीनगर ते रवीनगर बसथांबा, या भागातील पदपथ हे पादचाऱ्यांना चालण्यासाठी शिल्लकच राहिलेले नाहीत. बाजारात गेल्यावर हातात दुचाकी घेऊन ती ठेवण्यासाठी जागा शोधणाऱ्या चाकरमान्यांचे चित्र आता सार्वत्रिक झाले आहे.