Leading International Marathi News Daily

सोमवार, २० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

भाज्या ५० रुपये किलो, तूर डाळीने गाठले शतक!
नागपूर, १९ जुलै/ प्रतिनिधी

महागाईने सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर मध्यमर्गीय भरडून निघत असून महागाई कमी होण्याची कुठलीही शक्यता दिसून येत नाही, उलट ती वाढतच चालली आहे. पेट्रोलची दरवाढ आणि शेतकऱ्यांनी न केलेली लागवड याचा फटका भाज्यांना बसला असून कांदे-बटाटे सोडले तर एकही भाजी ५० रुपये किलोच्या खाली नाही, गेल्या आठवडय़ात ९० रुपये किलो विकली जाणारी तूर डाळही आता १०० रुपये झाली आहे, त्यामुळे सर्व सामान्यांच्या घरच्या जेवणातून

 

वरण हळूहळू कमी होत चालले आहे.
यंदाचा उन्हाळा जोरदार तापल्याने नद्या आणि नालेही कोरडे झाले, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला, पाणीच नसल्याने उन्हाळ्यात घेतले जाणारे भाज्यांचे पीक शेतकऱ्यांनी घेतलेच नाही, त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या भाज्यांचे प्रमाण कमी झाले. त्यातच केंद्रशासनाने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीही वाढविल्या, त्यामुळे वाहतूक खर्चात वाढ झाली, त्याचा परिणाम भाज्याच्या किंमतीवर झाला. ऐन पावसाळ्यातही भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. १० रुपये किलोला मिळणारी पालकसुद्धा १० रुपये पाव मिळू लागली आहे. भेंडी, कोबी, शेंगा, वांगी, कोहळे या भाज्या चार रुपये पावाने मिळत होत्या, त्यांची सध्याची किंमत ८ ते १० रुपये पाव इतकी आहे. कोथिंबीरही महागलेलीच आहे. सामान्यपणे पावसाळा असताना भाज्यांचे दर कमी होतात, मात्र यावर्षी उलटे झाले आहे. शहरात अनेक ठिकाणी साप्ताहिक बाजार भरतात. या बाजारातील दर चौकातील भाजीच्या दुकांनापेक्षा बरेच कमी असतात, मात्र गेल्या महिन्यापासून साप्ताहिक बाजारातील दरही चढलेलेच आहे. शनिवारी वर्धामार्गावरील सोमलवाडा बाजारात भाजी घेणाऱ्या प्रत्येक गृहिणीमध्ये दरवाढीचीच चर्चा होती. यासंदर्भात कॉटनमार्केट मधील भाजीचे ठोक विक्रेते इम्माईलभाई यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी आवक कमी झाल्यानेच दर वाढल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, गेल्याच आठवडय़ात ७० ते ८० रुपये प्रति किलो असणारी तुरीची डाळ १०० रुपये प्रति किलोवर गेली आहे. त्यामुळे रोजच्या जेवणातील वरणाची चव बिघडली आहे, महिलांचे महिन्याचे बजेटही वाढत्या माहगाईमुळे बिघडले आहे. तूर डाळीच्या वाढत्या किंमतीबाबत ग्राहक पंचायतने नाराजी व्यक्त केली आहे. ५० रुपये किलो असलेली डाळ एका महिन्यात १०० रुपये किलोवर कशी गेली, असा सवाल करीत व्यापाऱ्यांनी कृत्रिम टंचाई निर्माण केल्यानेच किंमती वाढल्या, असा आरोप पंचायतचे नगर संघटक संजय धर्माधिकारी यांनी केला आहे. ग्राहक पंचायतचे एक शिष्टमंडळ नुकचेच पुरवठा उपायुक्त जयवंत चौधरी यांना भेटले व त्यांच्याकडे साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.