Leading International Marathi News Daily

सोमवार, २० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

उपलब्ध संसाधनांच्या उपयोगातून विकास साधा -सुदर्शन
पूर्ती साखर कारखान्यात राज्यातील पहिल्या इथेनॉल मिश्रित डिझेल पंपाचे उद्घाटन
नागपूर, १९ जुलै/प्रतिनिधी

देशाला आत्मनिर्भर करायचे असेल तर, जी संसाधने उपलब्ध आहेत, त्याचा पुरेपूर उपयोग करून विकास साधल्यास कोणावरही अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. पूर्ती उद्योग समूहाने

 

नेमक्या याच मार्गाचा अवलंब करून विकासाकडे झेप घेतली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक कुप्प.सी. सुदर्शन यांनी केले. विशेष म्हणजे, सुदर्शन यांनी त्यांच्या संपूर्ण भाषणात वेळोवेळी महात्मा गांधी यांच्या ग्रामीण विकासाच्या विचारांचा वेळोवेळी उल्लेख केला.
पूर्ती उद्योग समूहाच्या साखर कारखान्यात महाराष्ट्रातील पहिल्या इथेनॉल मिश्रित डिझेल पंपाच्या उद्घाटन प्रसंगी सुदर्शन बोलत होते. यावेळी माजी खासदार बनवारीलाल पुरोहित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर, पूर्तीचे अध्यक्ष नितीन गडकरी, जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश मानकर, आमदार देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार अशोक मानकर, माजी खासदार सुरेश वाघमारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जगात भारतासारखा सर्व नैसर्गिक साधनसंपत्तीनी संपन्न असा कुठलाही देश नसल्याचे सांगत सुदर्शन म्हणाले, सर्व नैसर्गिक साधनसंपत्ती असून त्याचा पुरेपूर उपयोग केल्यास भारताला कुणावरही निर्भर राहण्याची गरज भासणार नाही. मात्र, प्रत्येक वेळी कुठल्याही प्रकल्पाची सुरुवात करायची असेल तर, परदेशातील संसाधने वापरून लवकरात लवकर विकास कसा साधू शकतो, याच्या योजना आखण्यात येतात. मात्र, आपल्या देशातील संसाधनांचा वापर करण्याचा विचार कधीच करीत नाही. त्यामुळे अलिकडच्या काळात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे गंभीर परिणाम पर्यावरणावर दिसू लागले आहेत. याला सरकारचे चुकीचे धोरणच जवाबदार असल्याचा आरोपही सुदर्शन यांनी यावेळी केला.
देश स्वतंत्र्य झाल्यावर महात्मा गांधींनी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांना विकासाची ध्येयधोरणे विचारली होती आणि त्यात ग्रामीण भागांना विकासाचा केंद्रबिंदू करावा, असे सुचवले होते. मात्र, याकडे कुठल्याच सरकारने लक्ष दिले नाही. उलट, जलदगतीने प्रगती साधण्यासाठी परकीय तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आज भारताच्या पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सतत परकीय तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यापेक्षा जे उपलब्ध आहे, त्या संसाधनांचा चांगल्या पद्धतीने उपयोग करून कसा विकास साधता येईल यावर भर दिल्यास शेतक ऱ्यांचा विकास साध्य होईल आणि अर्थव्यवस्थाही बळकट होईल.
यावेळी पूर्तीने सुरुवातीला साखर कारखाना आणि त्यातून निघणाऱ्या इतर टाकाऊ उत्पादनांचाही वापर करून इंधन निर्मितीसारखे चांगले उपक्रम राबवले आहेत. यामुळे सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांचा होणार असून गेल्या काही वर्षापासून सुरू असलेल्या आत्महत्यांमुळे त्यांनी गमाालेला आत्मविश्वास परत मिळविण्यास मदत होईल, असेही सुदर्शन म्हणाले. पूर्ती साखर कारखान्याने साखर, वीज, अल्कोहोल, इथेनॉल आणि सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प सुरू करून आत्मनिर्भर होण्याचा पायंडा घालून दिला, अशी प्रशंसाही त्यांनी केली.
कार्यक्रमाच्या प्रश्नस्ताविकात कारखान्याचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी इथेनॉल मिश्रित डिझेल प्रकल्पाची माहिती दिली. डिझेलमध्ये ७.७ टक्के इथेनॉलचे मिश्रण करण्यात येणार असून यावरच पूर्तीची सर्व वाहने चालणार आहेत. तसेच, गावक ऱ्यांसाठी हे डिझेल १ रुपया स्वस्त दराने देण्यात येणार असल्याची घोषणा गडकरी यांनी केली. इथेनॉल प्रकल्पाची माहिती देताना गडकरी म्हणाले, उसाच्या गाळिपापासून मोठय़ा प्रमाणात इथेनॉल तयार होते. हे इथेनॉल सरकारने खरेदी केले तर उसाला २ हजार रुपये टन भाव मिळेल आणि या भागातील शेतकरी जास्तीत जास्त प्रमाणात उसाचे पीक घेतील. मात्र, याबाबत असलेल्या सरकारी लालफितशाहीमुळे हे शक्य होत नाही पण, इंधनाच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याचा पूर्तीने निश्चय केला असून त्यासाठी इथेनॉल मिश्रित डिझेल पंपाची उभारणी केली असल्याचे गडकरी म्हणाले. अशाप्रकारचा पंप उभारणारा पूर्ती समुह देशातील दुसरा तर, महाराष्ट्रातील पहिलाच साखर कारखाना असल्याचे गडकरी यांनी सांगितले. पूर्ती साखर कारखान्याचे कार्य आता सुरळीतपणे सुरू आहे. इथेनॉल मिश्रित डिझेलमुळे कारखान्याच्या खर्चात मोठय़ा प्रमाणात कपात होण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. यावेळी व्यासपीठावर पूर्ती साखर कारखान्याचे सर्व संचालक उपस्थित होते. कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने शेतकरी उपस्थित होते.
पूर्ती साखर कारखान्याने सुरू केलेल्या इंधन मिश्रित डिझेल पंपाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक कुप्प.सी. सुदर्शन यांच्या हस्ते उद्घाटन केल्यानंतर, स्वत: सुदर्शन यांनी त्यांच्या गाडीत २० लिटर इथेनॉल मिश्रित डिझेल भरले.