Leading International Marathi News Daily

सोमवार, २० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

बसपची बुधवारी राज्यव्यापी निदर्शने
नागपूर, १९ जुलै/ प्रतिनिधी

काँग्रेस व यूपीए सरकारच्या कथित दलितविरोधी व जातीयवादी मानसिकतेची देशवासियांना माहिती व्हावी याकरता बहुजन समाज पक्षाने २२ जुलै रोजी राज्यव्यापी धरणे व निदर्शने आयोजित केली असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी के.के. सचान यांनी पत्रकार

 

परिषदेत दिली.
बसपच्यास राष्ट्रीय नेत्या मायावती यांच्या नेतृत्वात देशात भाईचारा बनवण्याची प्रक्रिया जोरात सुरू असताना काँग्रेस, भाजप व त्यांच्या समर्थक पक्षांनी ही प्रक्रिया थांबवून एका दलित महिलेला पंतप्रधान बनण्यापासून थांबवले. उत्तरप्रदेशात बसपची घोडदौड रोखण्यासाठी एकमेकांना कट्टर शत्रू मानणारे पक्षही एक झाले. यावरून या पक्षांचे साटेलोटे लक्षात येते. हे प्रकार जनतेच्या लक्षात आणून देण्यासाठी येत्या २२ तारखेला राज्यात विधानसभानिहाय धरणे देण्यात येतील. नागपुरात दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले जातील. हे अभियान नागपूर, मुंबई, पुणे व औरंगाबाद या चारही विभागात एकाचवेळी राबवले जाईल, अशी माहिती सचान यांनी दिली. उत्तरप्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष रिटा बहुगुणा जोशी यांनी मायावती यांच्या विरोधात जसे वक्तव्य केले, तसेच मायावती यांनी मुलायमसिंग हे मुख्यमंत्री असताना केले होते, हे लक्षात आणून दिले असता, मायावतींचे वक्तव्य वेगळ्या संदर्भात होते, असे सचान म्हणाले. विधानसभा निवडणुकीत बसप राज्यात सर्व २८८ जागा लढवेल, असेही ते म्हणाले. प्रदेश उपाध्यक्ष सुरेश साखरे, नागोराव जयकर, धरमकुमार पाटील, उत्तम शेवडे हेही यावेळी हजर होते.