Leading International Marathi News Daily

सोमवार, २० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

‘महात्मा’ची खरेदी; गडकरींची मुंडेंवर मात
नागपूर, १९ जुलै / प्रतिनिधी

वर्धा जिल्ह्य़ातील महात्मा सहकारी साखर कारखाना चालवण्यासाठी मिळवण्यात यशस्वी होऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष व पूर्ती उद्योग समूहाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार गोपीनाथ मुंडे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार दत्ता मेघे यांच्यावर कुरघोडी केली आहे.

 

महात्मा साखर कारखान्याच्या व्यवहारात नितीन गडकरी यांच्या पूर्ती उद्योग समूहाने गोपीनाथ मुंडे यांच्या वैजनाथ साखर कारखान्यावर मात करून तो मिळवला आहे. पूर्ती समूहाची ‘चीअरफूल बायो फ्यूएल कंपनी’ आता महात्मा कारखाना चालवणार आहे. राज्य सहकारी बँकेने अलीकडेच हा निर्णय घेतला.
शेतकऱ्यांच्या हितासाठी साखर कारखाने लिलावाद्वारे भंगारमध्ये न विकता ते खाजगी तत्त्वावर चालवण्यासाठी देण्यात यावे, अशी आग्रही भूमिका नितीन गडकरी यांनी घेतली होती, हे विशेष. त्याच दरम्यान, खासदार मेघे यांनीही मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन भागधारकांना साखर कारखाना चालवण्यासाठी द्यावा, अशी मागणी करून नितीन गडकरींना शह देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, बँकेने निविदा आमंत्रित केल्या असता पूर्ती आणि वैजनाथने महात्मासाठी निविदा भरल्या आणि खाजगीकरणाच्या प्रक्रियेत गडकरींसमोर मुंडे यांनी आव्हान उभे केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. निविदेच्या स्पर्धेत गडकरींच्या कंपनीच्या तुलनेत मुंडे यांचा कारखाना मागे पडला, तर खासदार मेघे यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन बँकेच्या निर्णयानंतर फोल ठरून नितीन गडकरी यांची सरशी झाली आहे.
वर्धा जिल्ह्य़ाच्या जामणी येथे हा कारखाना १४ कोटी १० लाख रुपयात चीअरफूलला देण्यात आला आहे. बँकेने निविदा आमंत्रित करताना १४ कोटी रुपये राखीव किंमत निश्चित केली होती. ‘चीअरफूल’ची निविदा इतर निविदांपेक्षा अधिक असल्याने त्यांना हा कारखाना चालवण्यासाठी देण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने घेतला. साखर कारखान्यासाठी येत्या ७ दिवसात कंपनीला २५ टक्के रक्कम भरायची असून उर्वरित ७५ टक्के रक्कम तीन महिन्यात बँकेत जमा करायची आहे. वर्धा जिल्ह्य़ातील बंद कारखाना सुरू होत असल्याने शेतकरी, कर्मचारी आणि या भागातील तरुणांना चैतन्य आले आहे.
राज्य सहकारी बँकेने लिलावाद्वारे बंद साखर कारखाने विकण्याऐवजी शासनाच्या निकषाप्रमाणे भाडेतत्त्वावर पूर्ती साखर कारखान्यास दिल्यास शेतकरी व कर्मचाऱ्यांचा फायदा आणि कारखाना परिसराच्या विकासासाठी प्रसंगी तोटा सहन करून कारखाने चालवण्याची तयारी नितीन गडकरी यांनी दर्शवली होती. शेतकऱ्यांच्या हितासाठी हे साखर कारखाने भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी द्यावे, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि राज्य सहकारी बँकेकडे केली होती.
वर्धा जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी महात्मा सहकारी साखर कारखाना घेतला आहे. पूर्ण क्षमतेने तो चालवण्यात येईल. बंद कारखाने सुरू झाल्यास शेतकऱ्यांना ऊसाचे नगदी पीक घेता येईल व त्यांची आर्थिक भरभराट होईल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.