Leading International Marathi News Daily

सोमवार, २० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

झलक नागपूरची
‘घरच्याई’साठी तरी..

दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांवर सादर होत असलेल्या रिअ‍ॅलिटी शोची क्रेझ इतकी वाढली आहे की हौसे नवसे गायक गायिका या कार्यक्रमाकडे आकर्षित होऊ लागले आहेत. नुकतीच नागपूरला ‘झीटीव्ही मराठी’वर सादर होत असलेल्या ‘सारेगमप’ या कार्यक्रमासाठी निवड चाचणी घेण्यात

 

आली. त्यासाठी बाहेरगावावरूनही मोठय़ा प्रमाणात युवक युवती आले होते. निवड चाचणी तीन टप्प्यात असल्यामुळे चाचणीसाठी येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला वेगवेगळी गाणी सादर करावी लागत होती. गडचिरोलीतील एक नवोदित गायक या चाचणीसाठी आला होता. त्याने पहिल्या टप्प्यात गीत सादर केल्यावर परीक्षकांनी दुसऱ्या टप्प्यात बोलावले. दुसऱ्या टप्प्यात परीक्षकांनी त्या युवकाचे गीत ऐकले आणि त्याला नंतर येण्यास सांगितले. दुसऱ्या टप्प्यात आपली निवड कां झाली नाही म्हणून हा युवक परीक्षकांना आत विचारलायला गेला आणि त्यावर परीक्षकांनी त्याला दिलेल्या उत्तरामुळे तो हताश होऊन बाहेर आला आणि संबंधित वाहिनीच्या एका प्रतिनिधीला म्हणाला, ग्रामीण भागातील युवकांना जास्तीत जास्त संधी देत असल्याचे तुम्ही सांगत असता ना, मग ‘मले अजून एक संधी द्या’ म्हणून विनंती केली. त्यावर तो प्रतिनिधी म्हणाला, ‘संधी तर मिळत नाही, पण तुमच्या जेवणाची व्यवस्था केली आहे’. त्यावर युवकाने, ‘अजी जेवन महत्त्वाचे नाही, माह्य़ा घरच्याईले मले टीव्हीवर पाहायचे आहे,’ अशी व्यथा सांगितली.
वक्ता ‘म्हैसाळकरे’षु!
वि.सा. संघ आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे धनवटे सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर होते. यावेळी गिरीश गांधी, कमल वाघधरे आणि अरुणा सबाने यांची भावपूर्ण मनोगते संपल्यावर कार्यक्रमही संपला असे वाटत असतानाच बरेच वर्षात म्हैसाळकर वक्तयासारखे बोलले, याचे अनेकांना आश्चर्य वाटले. ते वक्ते म्हणून सहसा कुठे जात नाहीत. दीर्घ भाषण ते केव्हाही करीत नाहीत. खाजगीत ते मनापासून बोलतात तसे मंचावरून बोलत नाहीत. पण, यावेळी मात्र पहिल्यांदाच तब्बल सात मिनिटांचे भाषण करून त्यांनी चाहत्यांना बुचकळ्यात पाडले. म्हैसाळकर विदर्भातील एकमेव व जाणत्या वाङ्मयीन संस्थेचे अध्यक्ष असल्याने त्यांच्या शब्दाला मंत्राचे महत्त्व आहे. पण, व्यासपीठावरून ते बोलत नाहीत त्यामुळे वाङ्मयीन क्षेत्रातील जिज्ञासू, रसिक प्रबोधनापासून वंचित राहतात. म्हैसाळकरांचे वक्तृत्व सार्वजनिक कार्यक्रमातही असेच बहरू देत, ही शुभेच्छा!
गरज सरो.
मानस चौकाच्या कडेला बुधवारी सायंकाळी दोन भिकाऱ्यांची होत असलेली मारामारी पाहून तेथे तैनात दोन पोलीस शिपाई त्यांच्याजवळ गेले. दोघेही एकमेकांना अश्लील शिवीगाळ करीत मारत होते. पोलीस त्यांना सोडवायचा प्रयत्न करीत होते. अखेर लोकांनी दोघांनाही पकडले आणि दूर नेले. दूर नेत असतानाही त्यांची टकळी सुरूच होती. ‘दोन दिवसांपूर्वी याच्याजवळ पैसे नव्हते. भूक लागली म्हणत त्याने पैसै मागितले तेव्हा त्याला मी दिले. आज माझ्याजवळ पैसे नाहीत म्हणून मागितले तर तो टाळाटाळ करतो आहे. ‘जरुरत पडी तो मीठा बोलके काम करवा लेते है, अब मुझे जरुरत पडी तो .’ म्हणत तो भिकारी तेथून निघून गेला. ‘गरज सरो वैद्य मरो’ वृत्तीचे लोक ‘याही’ दुनियेत आहेत, म्हणत ते दोन्ही पोलीसही तेथून निघून गेले. (ही झलक लिहिली आहे आमचे प्रतिनिधी राम भाकरे, किरण राजदेरकर आणि संदीप देशपांडे यांनी. नावाचा क्रम वृत्तांतानुसार आहेच असे नाही.)