Leading International Marathi News Daily

सोमवार, २० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

कॉटन मार्केटच्या सफाईचा खर्च कृउबासकडून घेणार
नागपूर, १९जुलै/ प्रतिनिधी

अनेकदा नोटीशी बजावूनही भाजी विक्रेते स्वच्छता राखत नाही आणि सफाई राखण्यास जबाबदार असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती दुर्लक्ष करत असल्याने महात्मा फुले भाजी बाजाराची (कॉटन मार्केट) सफाई महापालिका करणार असून त्यावरील खर्च कृषी उत्पन्न बाजार

 

समितीकडून वसूल करणार आहे.
महापालिका आयुक्त असिम गुप्ता यांनी गेल्या आठवडय़ात बाजाराची पाहणी केली. त्यावेळी महापालिकेने कृषी उत्पन्न बाजार समितीला दिलेल्या परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य असल्याचे आढळले. परिसरात रस्ते कच्चे असल्यामुळे चोहीकडे चिखल होता. ठोक विक्रेते भाज्यांचा सर्व कचरा रस्त्यावरच टाकत असल्यामुळे व त्यावरून वाहने जात असल्याने चिखल होतो आणि दरुगधी पसरते. जनतेच्या आरोग्यालाच या भाजी विक्रेत्यांनी आव्हान दिले आहे. आयुक्तांनी बाजाराची सफाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने गेल्या सात दिवसांपासून स्वच्छता मोहीम राबवली. त्यात ४१ ट्रक कचरा निघाला.
ही मोहीम थांबताच कचरा, घाण आणि दरुगधीचे साम्राज्य कायम आहे. भाजी विक्रेते बाजारात कचरा टाकण्यापासून परावृत्त होत नाही आणि कृषी उत्पन्न बाजार समितीने सफाईचे कंत्राट दिलेले कंत्राटदार स्वच्छता राखत नाही. त्यामुळे आता महापालिका स्वत: बाजाराची सफाई करणार आहे आणि त्यावर होणारा खर्च कृषी उत्पन्न बाजार समितीकडून वसूल करणार आहे, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद गणवीर यांनी दिली.